फर्स्ट टाइम / पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर रोमान्स करताना दिसणार अमृता-पुष्कर, हा आहे चित्रपट

पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.

Oct 09,2019 12:36:00 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. दस-याच्या शुभमुहूर्तावर या दोघांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. 'वेल डन बेबी' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून येत्या 21 ऑक्टोबरपासून लंडनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पुष्कर आणि अमृता यांच्यासह अभिनेत्री वंदना गुप्ते यांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. प्रियांका तन्वर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


पुष्कर अलीकडेच 'ती अॅण्ड ती' या चित्रपटात झळकला होता. तर अमृताचे ब-याच काळानंतर मराठी चित्रपटात चाहत्यांना दर्शन घडणार आहे. 'वेल डन बेबी' व्यतिरिक्त अमृता 'पाँडेचेरी' या मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट सचिन कुंडलकर दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात तिच्यासह वैभव तत्त्ववादी, सई ताम्हणकर, नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठीसोबतच बॉलिवूड चित्रपटातही अमृता सध्या बिझी आहे. आगामी 'मलंग' या बॉलिवूड चित्रपटात अमृता अभिनेता अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी आणि कुणाल खेमू यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

X