आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जनाचा ‘नाट्यपूर्ण’ सोहळा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृता मोरे
कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा स्त्रियांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. संबंधित गोष्टीतले अनेक नवे कंगोरे, नवे पैलू स्त्रियांना सापडू शकतात. स्त्रिया एखाद्या बाबीकडे अधिक तरल आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पाहू शकतात. निर्मिती ही निसर्गानं स्त्रीला बहाल केलेली सगळ्यात मोठी देणगीच आहे. सर्जनाचा हाच वसा रंगभूमीसाठी वापरून नाट्यनिर्मितीसारख्या क्षेत्रात महिलांनी स्वत:चा ‘बेंचमार्क’ निर्माण केलाय. आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अशा मोजक्याच परंतु नाट्यनिर्मितीमध्ये एक नवा आयाम निर्माण करणाऱ्या, पडद्यामागच्या कलाकार असणाऱ्या महिला नाट्यनिर्मात्यांच्या कार्याला सलाम...

टक आणि मराठी माणूस हे नातं अगदी जवळचं मानलं जातं. हल्ली तर अनेक महाविद्यालयांमधून एकांकिका स्पर्धांच्या निमित्तानं अनेक मध्यमवर्गीय घरांतली मुलं-मुली रंगभूमीला स्पर्श करून येताना दिसतात. आणि अगदी नाटक करणं जरी थोडं लांबचं वाटत असलं, तरी नाटक पाहणं आणि त्याचा आस्वाद घेणं हे मात्र मराठी रसिकांच्या अगदी जिव्हाळ्याचं म्हणायला हवं. पण ह्याच नाटकाची शून्यापासून ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करण्यापर्यंतची प्रक्रिया अतिशय जटिल आहे. 

नाटकाच्या प्रक्रियेला नाटक उभं राहणं असं म्हटलं जातं. जसं एखादं लहान मूल हळूहळू उभं राहतं, तशीच काहीशी नाटकाचीही प्रक्रिया असते. संहितेपासून सुरू होणारं नाटक नाटककाराकडून दिग्दर्शकापर्यंत, तिथून कलाकारांपर्यंत, तंत्रज्ञांपर्यंत पोहोचतं आणि मग प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. पण ह्या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नाटकाचा निर्माता. तालमींसाठी जागा ठरवण्यापासून ते थिएटर बुक करेपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी जे आर्थिक पाठबळ लागतं, ते पुरवणं आणि नाटक उभं राहण्याचे सगळे टप्पे विनाअडथळे पार पाडून नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची धुरा सांभाळतो, तो निर्माता. 

करमणुकीच्या वेगवेगळ्या माध्यमांच्या रेट्यामध्ये आज नाटकाची आर्थिक घडी बसवणं खूपच जिकिरीचं झालेलं दिसतं. किंबहुना रंगभूमीवर एखादं नाटक उभं राहतं, तेव्हा त्याच्या मागे अधिक नाट्यपूर्ण घडामोडी घडत असतात. नाटकाचं नेपथ्य उभं करणं, रोजच्या तालमीसाठी लागणारा हॉल, तिथे जमलेल्या संचाचं खाणं-पिणं, कपडेपट अशा अनेक बाबींचे खर्च नाटक प्रत्यक्ष उभं राहण्याआधीच सुरू होतात. आणि मग नाटक उभं राहिल्यानंतर निर्मात्यांचा झगडा सुरू होतो तो थिएटरच्या तारखा मिळवण्यापासून. थिएटरचं बुकिंग, जाहिराती देणं, नटांचं, तंत्रज्ञांचं मानधन देणं इथपासून ते दर प्रयोग निर्विघ्न पार पडेपर्यंतचा कामांचा सगळा डोलारा निर्मात्याच्या खांद्यावर उभा असतो. ट्रॅफिकमधून वाट काढत सेटचा टेम्पो प्रयोगाच्या वेळेच्या पुरेशा आधी पोहोचतोय की नाही, नटमंडळी त्यांच्या शूटिंगच्या तारखा आणि वेळा सांभाळून वेळेत येतायत ना, इथपासून ते थिएटरमध्ये प्रेक्षकांची काही गैरसोय तर होत नाही ना, हे पाहण्यापर्यंत सगळ्या लहानसहान गोष्टींची अंतिम जबाबदारी निर्मात्यालाच सांभाळावी लागते. कधी गोड बोलून, तर कधी धारेवर धरत, तर कधी काहीसं राजकारण खेळत कामं करवून घ्यावी लागतात. कधी एखाद्या तंत्रज्ञ,कलाकाराची एखादी वैयक्तिक अडचण उद्भवते, तर कधी एखाद्या वेगळ्याच कारणामुळे कोणाच्या अस्मिता दुखावल्या जाऊन नाटक बंद पाडण्यापर्यंत लोकांची मजल जाते. कधी पावसामुळे बुकिंगवर परिणाम होतो, तर कधी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट शोचे पैसेही बुडवले जातात. 

ह्या आणि अशा अनेक अडचणींना सामोरं जाताना, जबाबदाऱ्या पार पाडताना पैशांबरोबरच वेळेची आणि माणसांचीही गणितं चुकवून चालत नाहीत. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, असं म्हणतातच. त्यातही नट मंडळी अगदीच लीलया सोंगं करू शकतात. पण निर्मात्याला मात्र क्षणा-क्षणाला वास्तवाला धरूनच राहावं लागतं. प्रसंगी कठोर व्हावं लागतं. फायद्या-तोट्याची गणितं सांभाळताना अतिशय काटेकोरपणे अनेक गोष्टींबाबत सजग राहावं लागतं. नाटक कितीही भावनाप्रधान असलं, तरी हा व्यवहार सांभाळताना मात्र भावनेला अजिबात थारा नसतो. आणि म्हणूनच कदाचित, नाटकाचा हा पैलू पुष्कळसा पुरुषप्रधान आहे. फार कमी नाट्यकर्मी महिला नाट्यनिर्मिती करताना दिसतात. 

वास्तविक मराठी रंगभूमीला अनेक प्रतिभासंपन्न अभिनेत्री लाभल्या आहेत. बालगंधर्वादी पुरुष कलाकारांनी साकारलेल्या अजरामर स्त्री पात्रांपासून ते अगदी आजच्या उत्तराधुनिक युगाला साजेशा, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल अशा अनेक स्त्री व्यक्तिरेखा मराठी रंगभूमीवर झालेल्या आहेत. सुभद्रा, भामिनी ह्यांच्यापासून बेणारेपर्यंत अनेक स्त्री व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. मराठी रंगभूमीच्या दीडशे वर्षांच्या परंपरेत पौराणिक, ऐतिहासिक कथानक असलेल्या संगीत नाटकांपासून नव-नव्या विचारधारांची आणि करमणुकीची कास धरलेली नाटकं आज रंगभूमीच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहताना दिसत आहे. स्त्री पार्टी करणाऱ्या नटांपासून विषय-आशयाच्या प्रमाणेच अभिनय पद्धतीच्या प्रायोगिकतेचे नवे आयाम धुंडाळू पाहणाऱ्या अभिनेत्रींपर्यंत अनेक स्थित्यंतरं मराठी रंगभूमीने पाहिली आहेत. सई परांजपे, विजया मेहतांसारख्या अनेक धडाडीच्या लेखिका-दिग्दर्शिकासुद्धा मराठी रंगभूमीनं पाहिल्या आहेत.

मात्र असं असूनही नाट्यनिर्मितीमध्ये महिला अग्रभागी दिसत नाहीत, असंच आजही म्हणावं लागतं. असं असलं, तरीही लता नार्वेकरांसारखी एखादी निर्माती सातत्यानं अनेक नाटकांची निर्मिती करताना दिसते. ‘श्रीचिंतामणी’ संस्थेमार्फत ‘मी रेवती देशपांडे’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘आधी बसू मग बोलू’, ते अगदी सध्या गाजत असलेलं ‘तिला काही सांगायचंय’ अशी अनेक उत्तम नाटकं त्यांनी प्रेक्षकांना दिली आहेत. भाग्यश्री देसाईंसारखं आणखी एक नाव निर्माती म्हणून ऐकायला मिळतं. ‘रसिकमोहिनी’ ह्या त्यांच्या संस्थेनं ‘चिरंजीव आईस...’, ‘जन्मरहस्य’, ‘ब्लाइंड गेम’ अशा नाटकांची निर्मिती केलेली आहे. 

तसंच गेल्या काही वर्षांत आणखी काही नवीन नावं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातही ऐकायला मिळत आहेत. त्यात प्रकर्षानं दखल घ्यावी लागते ती अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे हिची. ‘रसिका’ ह्या संस्थेची निर्मिती करून ‘छापा-काटा’, ‘लव्हबर्ड्स’, ‘कोडमंत्र’ ह्यांसारख्या अनेक उत्तम नाट्यकृती तिनं गेल्या सहा-सात वर्षांत रसिकांपुढे सादर केल्या. अर्थात ह्यात तिला दिनेश पेडणेकरांसारख्या मुरब्बी निर्मात्याची साथही लाभली. 

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जरा वेगळ्या वाटेनं जाणारं रसिका आगाशे हे आणखी एक नाव, जे नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात ऐकायला मिळतंय. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यप्रशिक्षण घेतलेल्या रसिका आगाशे सातत्यानं प्रायोगिक नाटकांची निर्मिती करताना दिसतायत. ‘मरणात खरोखर जग जगतं’ ह्या नावानं इब्सेनच्या नाटकाचं मराठीतलं रूपांतर, ‘हारूस मारूस’, ‘म्युझियम ऑफ स्पिशिज इन डेंजर’, ‘साठेचं काय करायचं’ ह्या मराठी नाटकाचं हिंदी रूपांतर ‘इस कम्बख्त साठे का क्या करंे’, ‘सत् भाषे रैदास’, ‘राधेय’ अशा मराठीबरोबरच हिंदी नाटकांचीही निर्मिती करून, त्यांचे भारतभर प्रयोग करताना रसिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दमछाक होत असणार हे नक्की. पण तरीही रंगभूमीबद्दलचं प्रेम आणि आदर अशा मंडळींना नव्या नाटकांच्या निर्मितीची उर्मी आणि ऊर्जा देत असणार. 

आणि आता ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ ह्या नाटकाच्या निमित्तानं अभिनेत्री प्रिया बापटही नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात उतरलेली दिसतेय. आपल्याला आवडलेला, भावलेला विषय नाटकांच्या स्वरूपात मांडण्यासाठी एखाद्या निर्मात्यानं धाडस करावं, धोका पत्करावा त्यापेक्षा आपण स्वतच त्याची निर्मिती करावी, ह्या भावनेनं कुमारी मातेचा विषय घेऊन प्रियानं ‘सोनल प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून तिचं पहिलं नाटक रंगभूमीवर आणलंय. अर्थात इथेही नंदू आणि सोनल कदम ह्या निर्माता दांपत्याची तिला साथ लाभली आहे. 

आपल्या समोर, एकाच अवकाशात जिवंत काहीतरी घडतंय, आणि ते याचि देही, याचि डोळा आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतंय, ही भावना अजूनही प्रेक्षकांसाठी रोमांचक आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी नाट्यनिर्मितीकडे एक आव्हान आणि संधी म्हणून पाहिलं, तर येत्या काळात आपल्याला आणखी दर्जेदार नाट्यकृती पाहायला मिळतील, असं खात्रीनं म्हणता येईल. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे इथेही आव्हानं आहेत, अडचणी आहेत, ताण-तणाव आहेत. पण त्यातून आपल्या कल्पनकतेनं, प्रयोगशीलतेनं आणि नवनव्या युक्त्या वापरून मार्ग काढत रंगभूमी आणखी समृद्ध करणं हे आजच्या स्त्रियांना नक्की जमू शकतं. 

आजघडीला गुंतवलेले पैसे परत येतील की नाही, ह्याची पुरेशी खात्री नसतानाही मराठी निर्माते नवीन नाटकं घेऊन येतायत, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. पण कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा स्त्रियांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यातील अनेक नवे कंगोरे, नवे पैलू स्त्रियांना सापडू शकतात. स्त्रिया एखाद्या बाबीकडे अधिक तरल आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पाहू शकतात. खरं तर निर्मिती ही निसर्गानं स्त्रीला बहाल केलेली सगळ्यात मोठी देणगीच आहे. सर्जनाचा हा वसा नाट्यकलेसाठीही वापरता आला तर मराठी नाटकाला उज्ज्वल भविष्य असेल, अशी आशा ह्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त करायला हरकत नाही.

नुकसान शेवटी निर्मात्याचंच... 
‘दादा, एक गुड न्यूज आहे!’ नाटकाचा दुपारचा प्रयोग मुलुंडच्या “कालिदास’ला होता. आणि नंतरचा कल्याणच्या ‘आचार्य अत्रे’ ला. दोन्ही नाट्यगृहांत ३० किमीचं अंतर. मुलुंडच्या प्रयोगानंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक बॅकस्टेजला कलाकारांना भेटायला आले. तोवर सेटचा टेम्पो कल्याणसाठी रवाना झाला होता. पण, रसिक प्रेक्षकांना भेटून, त्यांच्याकडून दाद स्वीकारून कलाकार मंडळींना मुलुंडहून निघायला उशीर झाला. त्यात कल्याणच्या पुलावर प्रचंड ट्रॅफिक जॅम झाला होता. प्रमुख भूमिका असलेल्या उमेश कामत ह्यांची गाडी कशीबशी ट्रॅफिकमधून सुटली. बाकीचे कलाकार ज्या गाडीत होते, ती मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली. मग मी ट्रॅफिकमधल्या पुढच्या गाडीत नाटकाच्या इतर कलाकारांची व्यवस्था केली. ती गाडी भरधाव वेगानं रंगमंदिराच्या दिशेनं निघाली. कलाकार कसेबसे थिएटरवर पोहोचले. प्रयोग वेळेत सुरू झाला. नंतर ट्रॅफिकमधली गाडी घेऊन मी अखेर रंगमंदिरावर पोहोचले. तोवर प्रयोग सुरू होऊन तासभर उलटला होता. अशा प्रसंगी प्रयोग रद्द करावा लागला, तर ते नुकसान निर्मात्यालाच सहन करावं लागतं. 
- प्रिया बापट

अमृता मोरे : moreamruta@gmail.com

लेखिकेचा संपर्क : ९९२०८९४८९७

बातम्या आणखी आहेत...