आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना रक्ताने लिहिले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण : पैठण मतदारसंघात आपल्या नेत्याला पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून पाठवले आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार संजय वाघचौरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असताना ऐनवेळी पक्षाने भाजपमधून आलेले दत्ता गोर्डे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षाविरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते थेट राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून संजय वाघचौरे यांना उमेदवारी न देण्याचा जाब विचारत असतानाच रविवारी तालुक्यातील कोळीबोडखा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिवाजीराव चावरे यांनी वाघचौरे यांना उमेदवारी न मिळाल्याने चक्क आपल्या रक्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिले आहे. गेल्या २० वर्षांपासून वाघचौरे यांनी राष्ट्रवादीला तालुक्यात जिवंत ठेवले आहे. मात्र विधानसभेची उमेदवारी देताना त्यांनाच डावलून पक्षाने एका दिवसात प्रवेश केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने वाघचौरे यांच्या समर्थकांत तीव्र नाराजी असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

संजय वाघचौरे यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून आज त्यांच्यावरच पक्षाने अन्याय केला आहे. पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला आदेश समजणाऱ्या नेत्यांवर अन्याय करू नका. अजूनही वेळ गेली नसून लवकरच योग्य निर्णय घ्यावा, यासाठी रक्तरंजित पत्र लिहित असल्याचे या पत्रात युवराज चावरे यांनी म्हटले आहे. वाघचौरे यांना व दत्ता गोर्डे यांनाही पक्षाने एबी फाॅर्म दिला. यात वाघचौरे यांना एबी फाॅर्म बरोबर प्रदेशाध्यक्ष यांचे पत्र देऊनही त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असल्याने वाघचौरे हे कोर्टात गेले असताना त्यांचे समर्थक रक्ताने पत्र लिहित आहे.
 

बातम्या आणखी आहेत...