आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड शहरामध्ये मतदारांना पैसे वाटप करताना एक अटकेत; सव्वा लाख जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड शहरात मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेली रक्कम. - Divya Marathi
बीड शहरात मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेली रक्कम.

बीड - बीड शहरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दुपारी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मतदान करण्यासाठी लाच म्हणून मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या एकाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये बीडमध्ये लक्षवेधी लढत होत आहे. यामुळे बीड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे. संवेदनशील म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच दुपारी १ वाजेच्या दरम्यान शहरातील पेठ बीड भागातील खंडेश्वरी मंदिर परिसरात सुरेश आसाराम बनसोडे हा मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली, तर काही कार्यकर्त्यांनी बनसोडे याला पकडून ठेवले. पेठ बीड पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीच्या (एमएच २३, एझेड ६७२१) डिकीमध्ये दोन हजार, पाचशे व शंभराच्या नोटांचे बंडल आढळून आले. एकूण १ लाख २६ हजार १६५ रुपयांची रोकड त्याच्याकडे आढळली. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचे विश्वासू राम गोकुळ इगडे (रा. बीड) याने ही रोकड आपल्याला दिली असून क्षीरसागर यांना मतदान करण्यासाठी वाटप करण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले. तशा प्रकारचा लेखी जबाबही दिला आहे. रक्कम, दुचाकी व मोबाइल असा एकूण १ लाख ७१ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला गेला.

दरम्यान, याप्रकरणी आचारसंहिता पथक क्रमांक ४चे प्रमुख तथा सहायक लेखापरीक्षण अधिकारी बाबासाहेब रघुनाथ नेहरकर यांनी पेठ बीड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सुरेश आसाराम बनसोडे (५५, रा. करीमपुरा) व राम इगडे (रा. बीड) या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.  बनसोडे अटकेत तर इगडे फरार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पठाण यांनी सांगितले.
 

संदीप क्षीरसागर आक्रमक
पैसे वाटप केले जात असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी खंडेश्वरी मंदिराकडे धाव घेतली. पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी पोलिसांसमक्ष फैलावर घेतले. धनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा व मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न काका जयदत्त क्षीरसागर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

निरीक्षकांच्या भेटी : दरम्यान, या प्रकारानंतर निवडणूक विभागाचे निवडणूक निरीक्षक, पोलिस विभागाचे निवडणूक निरीक्षक व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पेठ बीड ठाण्यात भेट दिली. रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडून माहिती घेतली.