आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जग बदल घालूनी घाव...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मयूर लंकेश्वर

विविध देशांत महिलांनी उभ्या केलेल्या आंदोलनांची दखल घेणे जगाला भाग पडले आहे. पुरुषीपणाचा तोरा मिरवणाऱ्या हिंसक जगाला ह्या महिलांनी पायाशी लोळण घ्यायला लावली आहे. त्याच मागार्वरून जात शाहीनबागच्या महिलांनी घडवून आणलेला सत्याग्रही शांततेचा उबदारपणा ही खरी “आयडिया ऑफ इंडिया”ची हमी देणारी गोष्ट आहे.

१९१३ साली अमेरिकेत महिलांचा मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाचा उद्देश होता – मतदान करण्याचा हक्क मिळवणे. अमेरिकेसारख्या देशातसुद्धा महिलांना मतदानाच्या हक्कासाठी एकेकाळी लढावे लागले होते हे आज कदाचित खरेही वाटणार नाही. त्याच्याही साधारण सव्वाशे वर्षे आधी – १७८९ साली फ्रेंच राज्यात जेव्हा अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या तेव्हा राजपरिवाराने कुलूप घालून ठेवलेली अन्नधान्याची भांडारं गरीब जनतेसाठी उघडायला लावणाऱ्या ह्या महिलाच होत्या. २००३ साली लिबेरियाच्या चौदा वर्षापासून हिंसेचे थैमान मांडलेल्या गृहयुद्धाला थांबविण्यासाठी युद्धखोर गटांना शांततेच्या मार्गाने तोडगा काढायला मजबूर करणाऱ्याही महिलाच होत्या. २०१९ मध्ये केरळ राज्यात शबरीमला मंदिरातील प्रवेशासंदर्भातील वादात महिलांनी सहाशे किलोमीटरची मानवी साखळी उभी केली होती. जगभरात महिलांच्या आंदोलनांची ठळक उदाहरणे कमी नाहीत. जगाच्या तुलनेत पुढारलेल्या अमेरिका-युरोपसारख्या देशात सुद्धा महिलांची आंदोलने वेळोवेळी झालेली आहेत. किंबहुना अशी आंदोलने तिथे वेळोवेळी घडली, म्हणूनच तिथला समाज हा जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक व्यक्तिस्वातंत्र्यवादी, समतावादी आणि विज्ञानवादी आहे. 

अमेरिका असो वा युरोप, तो केवळ तंत्रज्ञांनाच्याच पातळीवरच नाही तर लोकशाही आणि मानवतावादी मूल्यांच्या दृष्टीने सुद्धा आधुनिक बनवण्यासाठी महिलांनी उपसलेले कष्ट हे अपार आहेत.  तो सर्व बदल एका दिवसात वा एका रात्रीत वा एका आंदोलनात घडलेला नाही. १९१३ साली अमेरिकेतला मतदानाच्या हक्कासाठीचा मोर्चा निघाला तेव्हा पुरुषांच्या झुंडींनी त्या मोर्चावर दगडफेक केली, शिव्या घातल्या, जाळपोळ केली, अंगावर थुंकण्यात आलं. ‘द सफरेज मुव्हमेंट’ म्हणून नावारूपास आलेलं हे आंदोलन पुढे जगभरातील अनेक महिलांना प्रेरणा देणारं आंदोलन ठरलं. त्या प्रेरणेतून पाश्चिमात्य देशात अनेक आंदोलनं जन्मास आली. १९७५-१९७६ सालापासून सुरू झालेल्या ‘टेक बॅक द नाइट’ सारख्या मार्चमधून मांडला गेलेला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, २००० साली मदर्स डे च्या दिवशी ‘द मिलियन मॉम मार्च’ म्हणून उभं राहिलेलं अमेरिकेतीलच गन कंट्रोल बाबतचं आंदोलन, २००४ सालचं अमेरिकतील महिलांचं प्रजननाच्या-गर्भपाताच्या हक्काचं ‘द मार्च फॉर वूमन्स लाईव्हज’ आंदोलन, सौदी सारख्या देशात वाहन चालवायचा हक्क मिळवण्यासाठीचं आंदोलन, २०१२ साली ट्रेवोन मार्टिन ह्या सतरा वर्षीय मुलाची वर्णवंशवादातून हत्या झाली तेव्हा अॅलिशिया गार्झा ह्या महिलेच्या फेसबुक पोस्टमधल्या संज्ञेमधून प्रेरणा घेऊन उभं राहिलेलं ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन... विविध देशात महिलांनी उभ्या केलेल्या आंदोलनांची दखल घेणे जगाला भाग पडले आहे. पुरुषीपणाचा तोरा मिरवणाऱ्या हिंसक जगाला ह्या महिलांनी पायाशी लोळण घ्यायला लावली आहे. 

शोषणाची, सत्तेची सर्व हत्यारे आपल्या हाती ठेवून वर्चस्व अबाधित राखण्याचे प्रयोग जगभरातल्या सत्ताधीशांकडून नेहमीच सुरू असतात. कोणतीही सत्ता ही समाजाच्या अंतरंगात दडून बसलेल्या हिंसक पुरुषीपणाचे प्रारूप असते. त्यामुळेच सत्तेचा संबंध हा नेहमीच मर्द असण्याशी लावला जातो. त्या सत्तेला आवाहन देणारेही मर्दच असण्याची व्यवस्था केली जाते. एकूणच कुठल्याही सत्तेतल्या ह्या मर्दपणाच्या खेळात रूढार्थाने अबला समजल्या जाणाऱ्या महिलांनी उतरणे हा सत्तेच्या पुरुषी अहंकाराला लावला गेलेला पहिला मोठा तडा ठरतो. हुकुमशाही राष्ट्रातले सत्ताधीश अशा आंदोलनाला बळाचा वापर करून चिरडायला मागेपुढे पाहत नाहीत. तर लोकशाहीवादी व्यवस्था स्वीकारलेले देश अश्या आंदोलनांना दडपायला बळाचा थेट वापर करू शकले नाहीत तरी ते कुजबुज मोहिमेच्या माध्यमातून, लाचार माध्यमांचे लगाम पकडून त्यांना बदनाम करण्याचे षड‌्यंत्र मात्र जरूर वापरतात. त्यातून अफवांचे वारेमाप पीक सूडबुद्धीच्या पाण्यावर घेतले जाते. आंदोलनकर्त्या महिलांच्या चारित्र्याची वारंवार चिरफाड केली जाते. भारतासारख्या लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या पण मुळातच बेगडीपणा नसानसात भिनलेल्या देशात हे सनातनी तंत्र अजिबातच नवे नाही. कारण भारतात फक्त सरकारच सत्तेत नसते तर सरकार सोबत इथला एक मोठा धर्मांध गट सुद्धा कायमच समाजव्यवस्थेतील सत्ताधीशाच्या रुबाबात खुलेआम वावरत असतो. ह्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे सध्याचे शाहीनबाग इथे सुरू असणारे महिलांचे आंदोलन आणि त्याबद्दल सरकारच्या बाजूने सीएए एनएआरसी च्या समर्थकांकडून राबवला जाणारा हिडीस प्रपोगंडा. 

जगभरातल्या इतर मोठ्या आंदोलनाइतकेच लक्षणीय आज भारतातले शाहीनबागचे आंदोलन आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय ह्यांनी शाहीनबागेतल्या महिलांवर रोजंदारीने पाचशे ते दोन हजार रुपये घेऊन त्या आंदोलन करत असल्याची हूल उठवली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी एखाद्या पुरुषाने दुसऱ्या पुरुषाला डिवचण्यासाठी त्याचा मर्दमुकीचा अहंकार दुखवावा अशा हेतूचे ‘शाहीनबागच्या महिलांच्या घरातले पुरुष हे बायकांना पुढे करून स्वत: आराम करत आहेत’ असे संघाच्या संस्काराना अनुसरून पुरुषी विधान केले. फेसबुक-ट्विटरसारख्या समाजमाध्यमात शाहीनबागच्या महिला कशा पाकिस्तानी-बांगलादेशी आहेत असा ट्रोलधाड टोळ्यांनी शोध लावला. काहीजणांच्या हिंदुत्ववादी देशभक्तीच्या ज्वराचा पारा इतका बेफाट उसळला की त्यांनी ह्या महिलांच्या चारित्र्याचे जोरदार खच्चीकरण केले. शाहीनबागला ‘रंडीखाना’ म्हणण्यापर्यंत,  त्यांना वेश्या म्हणण्यापर्यंत, कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कुणी त्यांच्या अंगावरून रणगाडे चालवा, बॉम्ब फेका, अॅसिड ओता अशी सरकारला कळकळीची विनंती केली. शाहीनबाग बद्दल हरएक प्रकारे भीती, बदनामी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. इतके असूनही शाहीनबागच्या महिला जागेवरून अजिबातच हलल्या नाहीत. दिवसरात्र चोवीसतास घरदार मुलं सांभाळत, लादल्या गेलेल्या हजारो जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांनी आयुष्य वाकलेले असतानाही, संविधानातला धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभावाचा भारत टिकावा म्हणून शाहीनबागची अभेद्य भिंत त्यांनी उभी केली आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर देशाला ध्रुवीकरणाकडे लोटू पाहणाऱ्या अजस्त्र व्यवस्थेच्या थोबाडावर मारलेली ही सणसणीत चपराक आहे.  शून्य डिग्रीच्या आसपास गारठवून टाकणाऱ्या दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीत शाहीनबागच्या महिलांनी घडवून आणलेला सत्याग्रही शांततेचा उबदारपणा ही खरी “आयडिया ऑफ इंडिया”ची हमी देणारी गोष्ट आहे. ह्या महिलांच्या हातात गांधीजींची आणि आंबेडकरांची तसबीर आहे. ह्यातल्या कितीजणांनी पुस्तकातले हे महामानव वाचले असतील ठाऊक नाही, परंतु त्यांनी दमनकारी व्यवस्थेविरोधात सत्याग्रहाचा शांततेचा एल्गार पुकारणारे  गांधी आणि बाबासाहेब कृतीतूनच आत्मसात केले आहेत. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्यात पुढाकार घेण्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. ज्योतिबा-सवित्रिबाई फुले, फातीमा शेख ह्यांनी भारतातली मुलींची पहिली शाळा उघडली तेव्हा त्यांच्यावर चिखलफेक झाली तरी ते मागे हटले नव्हते. म्हणूनच शाहीनबागच्या ह्या कणखर करारी महिला मला जोतिबा सावित्रीबाई फातीमा शेख बाबासाहेब ह्यांचा वारसा चालवणाऱ्या लढवय्या महिला वाटतात. त्यांना बळ देणे हेच भारताचे ‘भारत’पण टिकवणे आहे.  
लेखकाचा संपर्क - 9970028408