आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामूहिक कबर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

समीर गायकवाड

प्रसिद्ध इराकी कवी खादीम खंजेर यांनी इराकमधला जीवघेणा हिंसाचार, नरसंहार याचि देही याचि डोळा अनुभवला असल्याने त्यांच्या कवितेत त्याचं चित्र रेखाटलं जाणं साहजिक आहे. कवीच्या भावाचा मृत्यू नेमका कधी, कुठे, कसा आणि का झाला हे त्याला माहिती नाही, पण त्याची अखेर त्याने कशी अनुभवली याचे शब्दचित्र अत्यंत दाहक आणि वेदनादायक आहे. 

ब्रेकिंग न्यूज : निकटच्या अंतरावरच सामूहिक कबर सापडलीय! कालच मी फोरेन्सिक मेडिसिन विभागात जाऊन आलो.  त्यांनी माझ्या बोटांचे ठसे मागितलेले, डीएनए जुळतो का ते टेस्ट करण्यासाठी.  ते सांगत होते की, त्यांना काही विजोड कुळाच्या अस्थी मिळाल्यात. आशेच्या सुऱ्याच्या पात्यावर ठेवलेल्या संत्र्यासारखं दर टेस्टगणिक वाटत होतं. 
बंधू, मी आता घरी आलो आहे.
तुझ्या फोटो फ्रेमसमोर ठेवलेल्या कृत्रिम फुलांवरची धूळ हटवतोय अन अश्रूंनी त्यांचे सिंचन करतोय.
आताच मेडिकल रिपोर्ट आलाय,
ज्या हाडांची थैली मिळाल्याची पोच पावती मी दिलीय, ती थैली "तुझी' आहे असं त्यात म्हटलंय.
पण ती खूपच किरकोळ आहे. 
घरी नेऊन टेबलावरती सगळी हाडे मी विखरून ठेवली आहेत, 
त्याचे त्यांनी बारकावे दिलेत-सहा छिद्रे असलेली कवटी, एक क्लेव्हिकल, तीन फासळ्या, 
तासलं गेलेलं फिमर, मनगटातील हाडांचा बुकणा आणि काही मणके. 
हा इतकासा ऐवज म्हणजे तू कसा काय असू शकतोस बंधू? 
पण मेडिकल रिपोर्ट तर तसेच सूचित करतोय. 
सगळी हाडे मी पुन्हा थैलीत ठेवलीत. 
माझ्या हातांवर चढलेली त्या हाडांवरची मातकट धूळ मी झटकली, 
टेबलावर पडलेली उरलीसुरली मातकट धूळही फुंकून टाकली आणि 
तुला माझ्या "पाठीवर' घेऊन मी बाहेर पडलो. 
बसमध्ये बसल्यावर ती थैली माझ्याशेजारीच ठेवली. 
त्यासाठी मी दोन सीटचं तिकीट काढलं. 
या वेळेस तिकिटाचे पैसे अदा करणारा मी होतो!
आता मी तितका तरी नक्कीच मोठा झालोय की तुला पाठीवर वागवू शकेन अन् तुझं बसचं तिकीट काढू शकेन. मला इतकी छोटी अमानत मिळाल्याचं मी कुणालाच कळवलं नाही,  ज्या सोफ्यावर "तुला' सामावून घेणारी ती थैली ठेवली होती, त्याच्या अगदी जवळून तुझी पत्नी आणि मुलं खेटून गेली.  त्यांच्यापैकी कोणी तरी ती थैली उघडून पाहावी असं मला राहूनराहून वाटत होतं.  त्यांनी तुला अखेरचं डोळे भरून पाहावं असंही वाटत होतं.  पण तूही या अस्थींसारखा झाला होतास, न विरघळणारा वज्रच! नंतर त्यांनी सोफ्यावरच्या अश्रूंचे डाग पाहून त्या संदर्भात विचारणाही केली होती. 
आता मागच्या एक तासापासून मी धडपडतोय, 
शवपेटीच्या ताबूतात तळाशी ही ओलसर हाडे नीटस मांडतोय, 
तुला पूर्णत्व देण्याच्या नादात अब्दतोय.
आता ताबुताच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या खिळ्यांनाच फक्त ठाऊक आहे की हा अस्थिपंजर खूपच किरकोळ आहे. 
--------------------------------------
प्रसिद्ध इराकी कवी खादीम खंजेर यांच्या ‘जमायती मकबरा’ या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. कवी ज्या परिसरात जगतो, वाढतो, जन्मतो त्याचे पडसाद त्याच्या रचनेत निश्चित उमटतात. त्याने अनुभवलेल्या जाणिवा, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याच्या वाट्याला आलेलं आकाश या साऱ्यांचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडतं. कवी खादीम यांनी इराकमधला जीवघेणा हिंसाचार, नरसंहार याचि देही याचि डोळा अनुभवला असल्याने त्यांच्या कवितेत त्याचं चित्र रेखाटलं जाणं साहजिक आहे. कवीच्या भावाचा मृत्यू नेमका कधी, कुठे, कसा आणि का झाला हे त्याला माहिती नाही, पण त्याची अखेर त्याने कशी अनुभवली याचे शब्दचित्र अत्यंत दाहक आणि वेदनादायक आहे. 


अंगावर काटे आणणाऱ्या हिंसाचाराचं वर्णन करण्यासाठी कोणतंही हत्यार वा हिंस्र शब्द न वापरता अगदी सहज सोप्या शब्दात कवी आपलं दुःख लाव्हा ओतावा तसं आपल्यापुढे ओतत जातो. 


संवादी शैलीतली ही कविता मनावर खोल आघात करते. इराकमध्ये काय घडून गेलं असेल याचं चित्र आपल्या डोळ्यापुढे ठळक उभं राहिल्याने वाचक कमालीचा अस्वस्थ होतो. कवीला हेच तर अपेक्षित आहे !   
लेखकाचा संपर्क - 9766833283