आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी अधःपतनाची काव्यात्मक ‘मुनादी’!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश तेलंगे

कविता ही व्यापक संकल्पना आहे. ती भोवतालचे फक्त सम्यक आकलनच नाही तर त्यापलीकडे जाऊन इतिहासाच्या पाऊलखुणां शोधते. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचं अवलोकन काव्यात जाणिवेच्या-नेणिवेच्या पातळीवर होतं. आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेण्याचा उत्स्फूर्त प्रयत्न कवी करतो. अलीकडेच प्रकाशित झालेला मांगीलाल राठोड यांचा ‘मुनादी’ हा काव्यसंग्रह त्याच पठडीतला.

नादी म्हणजे धोक्याची घंटा. ढोल बडवून दिलेली सूचना, दवंडी. राजेशाही असताना महत्त्वाचा संदेश, सूचना संपूर्ण गावापर्यंत पोहोचवण्यासाठी दिली जात असे.परंतु माध्यमांमुळे या दवंडीचे स्वरूप उत्तरोत्तर काळात बदलले. इथे दिली जाणारी दवंडी काळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घटकांच्या बदलांची सूचक आहे. प्रवाही शब्दयोजना आणि गाढ अभ्यास-चिंतनातून लिहिला गेलेला हा काव्यसंग्रह आपल्या मुळाचा, अस्तित्वाचा शोध घेणारा आहे.अनेक ऐतिहासिक संदर्भ, तपशिलांची कवितेच्या मर्यादेत विस्तृत मांडणी कवी करतो.


मागेच तर फिरताहेत लोक
पुढे गेलेले
मागचाच तर शोधताहेत इतिहास
जगायचंय त्यांना इति
हासात!

आपण एवढे मागे का? या कवितेत स्वतःच्या मुळांचा शोध घेणाऱ्या अस्तित्वहीन मानवाच्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रवृत्तीवर बोट ठेवलं आहे. माणसे इतिहासात जाऊन आपल्या पिढीचा, पूर्वजांचा वर्तमानाशी आणि पर्यायाने स्वतःशी असलेला सहसंबंध तपासत असतात. यातून त्यांना भूतकाळात जगायची इच्छा आहे का ? असं कवीला वाटते.


मी 
टकळत असतो आपला
साहित्य, समाज संस्कृती
आरशात डोकावतात माझ्या अजून
पाठसरू ऑब्जेक्ट्स 
इतिहास,
वर्तमान !

‘ई-मॅन’ या कवितेत कवी साहित्य, समाज, संस्कृतीच्या व्यापक परिघात भ्रमंती करत असताना विस्मरणात पडलेला, दुर्लक्षिला गेलेला इतिहास आणि वर्तमानाचा उल्लेख करतो. पाठसरू ऑब्जेक्ट्स अशी तो या कालघटकांना उपमा देतो. ऐतिहासिक संज्ञेच्या वापराबरोबरच इंग्रजी शब्दांचाही अर्थपूर्ण वापर कवी करतो यामुळे नादमयतेत भर पडते. बंजारा बोलीभाषेतील बऱ्याच कविता या काव्यसंग्रहात आहेत. ‘हाईसू मार’ या कवितेतून कष्टकऱ्यांच्या जीवनाचे वर्णन, “वघम रे टळ’ मधून कालचक्रामुळे व परिस्थितीच्या फेऱ्यामुळे काही अनिष्ट घडू नये असे कवीला वाटते. “आमी बी कुणबटो हुयीन’ मध्ये शिकारी सोडून लमाणी समुदायाचा कुणबी होण्यासंबंधीचा परिवर्तनाचा कालजयी दृष्टिकोन दिसून येतो. याशिवाय निळी जलाशये, आत्महत्या, रस्ते, कंत्राट, मीच अंत्यपुरुष, निळतळीचे पळसबन, पाऊस आणि दंगल, खूप उमगल्यानंतर, शांततेची मुनादी या कवितांमधून कवी निरनिराळ्या अर्थप्रतिमा निर्माण करणाऱ्या कवितांमधून स्वतःचं समाजाशी व स्वतःशीच असलेलं नातं, त्या नात्याचं अस्तित्व पारखून बघू लागतो. मार्मिक शब्दयोजना हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य. देशबंधो कवितेत निष्ठेचे जे प्रकार कवीने मांडले आहेत ते निव्वळ अप्रतिम आहेत. लमाणी बोलीभाषेत भाषेतला प्रवाहीपणा, वाक्प्रचार आणि म्हणींचा केलेला उत्स्फूर्त वापरही संग्रहात दिसून येतो.

आपल्याच संस्कृतीतून रव्यातल्या किड्यासारखे बेदखल झालेल्या रोमा निर्वासितांच्या वेदनाही संग्रहात दिसतात. निर्वासितांची अस्तित्वाबद्दलची जिज्ञासा,  स्थलांतरामुळे निर्वासित म्हणून दाटलेली अव्यक्त भावना कवी शब्दबद्ध करतो. निर्वासितांच्या वेदना प्रभावीपणे कवीच्या लेखणीतून उतरतात. वंश,धर्म,राष्ट्र यांपैकी काहीच नसणारे रोमा जेव्हा आपल्या मायभूमीत परततात तेव्हा स्थानिक भूमिपुत्रांकडूनही त्यांना स्वीकारले जात नाही. त्यामुळे अस्वीकार्यतेचं दुःख कसं उमटतं हे या कवितांमधून मांडलंय. एकीकडे हडप्पा संस्कृतीतून नाश झालेल्या अवशेषांची भग्न हकिगत तर दुसरीकडे रोमा निर्वासितांच्या वेदना, प्रतीक-प्रतिमांचा अर्थपूर्ण वापर करत मांडण्यात आल्यात. शहरी समाजाचं स्वतःमध्ये रममाण होणंही कवीला अस्वस्थ करतं. शहरी वर्गही स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात स्वतःला कसं अडकवून घेतो हे कवी उदाहरण देऊन दर्शवतो.


‘की सुटलेत प्रश्न त्यांचे
खुराड्यांचे संस्कार अंगीकारून ?
की शोधली आहे त्यांनी
अंधार गॅलरीतली सामाजिक सुरक्षित
ता ?’

मांगीलाल राठोड यांचा ‘मुनादी’ अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. भावनिक, मानसिक पातळीवरचा संघर्ष आणि मनात उठणारी आंदोलने यांचं प्रत्ययकारी चित्रण आहे. 

डॉ. सदानंद देशमुख यांची प्रस्तावना काव्यसंग्रहाला लाभली आहे. भारतातील आदिवासी समूहाबद्दलची संघर्षाची जाणीव आणि पुसटशा होत जाणाऱ्या करोडो वर्षांपासूनच्या पुरातन संस्कृतीच्या पाऊलखुणा या सर्वांचा धांडोळा ‘मुनादी’ घेतो. ऐतिहासिक, अभियांत्रिकी, भूजल क्षेत्रातील विविध संज्ञा काव्यात उतरल्याने 
त्या काव्याला अधिकाधिक समृद्ध करत असतात.


लेखकाचा संपर्क : ८३२९३९६५०३

बातम्या आणखी आहेत...