आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यशोधरा काटकर
अनेक चित्रकारांचे प्रेरणास्थान, चिंतनशील आणि प्रसिध्दीपराङमुख चित्रकार कलामहर्षी कृष्णाजी भीमराव कुलकर्णी उर्फ केबी यांचे नाव कलाक्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांना "बेळगावचे चित्रकार' मानले गेले असले तरी ब्रिटिश अकादमिक शैली रुजवणाऱ्या चित्रकारांची पिढी आणि "प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप' चा उदय व्हायच्या मधल्या टप्प्यातले, स्वतःच्या अभिजात शैलीची वेगळीच वाट निर्माण करणारे भारतीय कलासृष्टीच्या प्रवाहातले ते महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. २०२० हे केबींचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून ४ ते ६ फेब्रुवारी २०२० दरम्यान त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उदघाटन बेळगाव इथे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रसिद्ध होणाऱ्या 'शतकाचे संचित' या स्मृतिग्रंथातल्या लेखाचा भाग…
काही माणसे आयुष्यात अवचित येतात आणि काही विलक्षण मूल्ये ओंजळीत ठेवून, जगणे समृद्ध करून पावलांचा आवाज न करता अलगद निघूनही जातात. ब्रह्मांडाच्या कुठल्या मितीवरून कुणी संदेश पाठवला होता कुणास ठाऊक पण कुणा अदृश्य हाताने मला बेळगावच्या खडेबाजारातल्या गजबजलेल्या रस्त्यावरून, चिंचोळ्या गल्लीतून अडथळ्यांची शर्यत पार करवत, जीएंच्या कथेत असतात तशा गूढ वातावरणात बुडलेल्या उंच लाकडी जिन्यावरून के. बी. कुलकर्णी नावाच्या अवलिया कलाकाराच्या मठीत नेऊन पोहचवले होते. बेळगावमध्ये वर्षानुवर्षे कलासाधना करणाऱ्या चित्रतपस्वी श्री कृष्णाजी भीमराव कुलकर्णी उर्फ ‘केबी’ यांच्याशी "स्वामी' कार रणजित देसाई यांनी माझी ओळख करून देणे ही माझ्या आयुष्यातली महत्वाची घटना, आयुष्याला नवीन वळण देणारा "ट्रिगर' असेच म्हणावे लागेल.
के.बी.कुलकर्णी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नामवंत कलाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव. उत्तम कलाकारांच्या अनेक पिढ्या घडवणारे हाडाचे शिक्षक. केबींनी मुंबई-दिल्लीच्या कलाव्यावसायिक विश्वापासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवत सगळे आयुष्य घालवले ते काहीशा आडबाजूच्या बेळगावमध्ये. केबी मूळचे हिंडलग्याचे म्हणजे कलापूर असलेल्या कोल्हापूर आणि बेळगाव यांच्या अधेमध्ये असलेल्या एका गावचे रहिवासी. कोल्हापुरात एकाहून एक सरस कलाकारांची मांदियाळी आणि परंपरा पण बेळगावात काय होते? सर्वच दृष्ट्या दूर असलेल्या, शिवाय सीमा-संघर्षामुळे काहीशा मागे राहिलेल्या बेळगावमध्ये राहून कलासाधना करत,स्वतःची ऊर्जा नित्यनूतन, चिरंतन ठेवणे, नवनवे प्रयोग करणे, इतरांना ते करायला लावून त्यांची करिअर घडवणे हे कठीण काम होते. सरांनी सुरुवातीच्या काळात हळदणकरांसारख्या ज्येष्ठ कलाकाराकडे चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले, पुढे जे जे स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षकाचा अभ्यासक्रम, पुढे पदवीचे शिक्षणही घेतले अशी नोंद सापडते. पण पुढे मात्र त्यांनी स्वतःच स्वतःचा गुरु व्हायचे ठरवून, ती बंदिस्त वाट सोडून स्वतःच्या शैलीचा शोध घेतला. प्रत्येक "जिवंत' माणसाच्या आयुष्यात ती घडी येतेच जेव्हा जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगलसारखे किनाऱ्यावरच्या कळपात दाणे टिपत सुरक्षित जगणे नाकारून, अनंतात झेप घेत स्वतःमधल्या सगळ्या शक्यता अजमावून पाहण्याचा धोका पत्करावा लागतो,मग त्यात कपाळमोक्ष होऊन जीव गेला तरी बेहत्तर. केबींनी स्वतःच्या अंतःप्रेरणेला साद देत ती धाडसी उडी घेतली आणि ज्ञान मिळवण्यासाठी कलाविषयक ग्रंथ, पुस्तके आणि मासिके यांचा आधार घेत त्यातला एकेक कण टिपून घेतला रेम्ब्रॉ,सार्जंट ,रसेल फ्लिन्टसारख्या दिग्गज चित्रकारांनी त्यांना निश्चितच प्रभावित केले पण त्यांच्या शैलीच्या सापळ्यात न सापडता बुद्धिमत्ता, सर्जनशीलता,नाविन्याचा ध्यास आणि तपश्चर्या या अंगभूत गुणांमुळे ते स्वतःला सतत घडवत- मोडत नवनिर्मिती करत राहिले. त्यांची कला परंपरेत जन्माला आली पण नवतेशी नाते जोडत आपलेच एक वेगळे शैलीदार स्कूल स्थापन करत गेली. हे सोपे नक्कीच नव्हते. मला केबी भेटले त्या काळापर्यंत चित्रकार म्हणून त्यांचा दबदबा निर्माण झाला होताच शिवाय जॉन फर्नाडिस, बिंदुमाधव कुलकर्णी, मारुती पाटील, विकास पाटणेकर,किरण हणमशेठ, संतोष पेडणेकर, रवी परांजपे असे त्यांचे अनेक शिष्य कलासृष्टीत प्रस्थापित झाले होते.
केबी सरांचे चित्र - निसर्गचित्र, फिगरेटीव्ह वा व्यक्तिचित्र - कोणत्याही प्रकारचे असो त्यात मला जाणवते ती विलक्षण शांती. ती शांती त्यांच्या व्यक्तिमत्वातच मुरलेली होती त्यांचे आयुष्य तसे खाचखळग्यांनी भरलेले पण त्याबद्दल चुकार शब्द न काढता हा कलाकार अतिशय स्थितप्रज्ञतेने सगळ्या अनुभवांना समोर जात, स्थिरचित्त राहून कलेची साधना करत राहिला.साथीला जे. कृष्णमूर्ती होतेच.त्यामुळे नेणिवेत रुजलेली ती स्थिरता आणि शांती त्यांच्या चित्रांमधूनही पावले उमटवत गेली. त्या असीम शांतीमधून उमटणारे सौंदर्य आणि भक्तीचे प्रतिध्वनी त्यांच्या चित्रांना अलौकिकत्वाची झळाळी देत गेले.
त्यांची चित्रे मूर्त की अमूर्त,वास्तववादी, कलावादी की कैवल्यवादी ह्या वितंडवादात ते कधीच पडले नाहीत. ते ‘वास्तववादी’ आहेत असे अनेक जाणकार समीक्षकांनी नोंदवले असले तरी ते कितपत खरे आहे असा प्रश्न मला नेहमीच पडत राहतो. ते सौंदर्याचे उपासक होते आणि भक्तदेखील,त्यांची ती भूमिका कायम राहिली. निसर्गातला कोणताही घटक त्यांनी चित्रविषय म्हणून निषिध्द मानला नाही पण एकदा त्या विषयाची भुरळ पडली की त्यांचे लक्ष त्यावरच केंद्रित होत बाकीचे दिसेनासे होत जाई आणि ते त्या विषयाशी एकरूप होत त्या जाणिवांना चित्रबद्ध करण्याच्या मागे लागत. म्हणून स्टुडिओतल्या एखाद्या मॉडेलचे चित्र असो, खेडेगावचे वा हिंडलग्याच्या उघड्याबोडक्या माळाचे ; ते टेनिसन ,वर्डस्वर्थ ,एलिझाबेथ ब्राऊनिंगच्या काव्यासारखे विलक्षण गूढरम्य सौंदर्य घेऊन प्रकट होते.
त्यांच्या चित्रातल्या प्रकाशाचा स्रोत कधी "दिसून' येत नाही. चित्राचा कानाकोपरा शोध शोधूनही न सापडणारा तो घटक या चित्रकाराने मोठ्या खुबीने तिथे दडवलेला असतो,पण तो असतोच.त्यामुळे त्यांच्या चित्रातून जाणवणारी प्रकाशमय ऊर्जा चित्रविषयाला कवेत घेत त्याचे अंतरंग उजळून टाकते आणि चित्राच्या अवकाशातून चौकटीबाहेर पसरत चराचर सृष्टीला व्यापून राहिलेल्या प्रकाशतत्वाशी नाते जोडत, बघणाऱ्याचे अंतरंग उजळून टाकत त्यातच विलीन होते. केबींच्या चित्रातल्या प्रकाशाप्रमाणे त्यांच्या चित्रातले रंग हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या निसर्गचित्रातले रंग प्रकृतीने निर्मिलेल्या खऱ्या निसर्गचित्रातले नेहमीचे रंग नसतात, ते प्रतिसृष्टीच्या ह्या निर्मात्याने अतिशय विचारपूर्वक योजलेले असतात. मन एकाग्र करून निरखून पाहिले तरच ते इवलेइवले रंगबिंदू,हेलकावे आणि फटकारे दिसू लागतात. शरीर आणि मन स्तब्ध करून चित्रासमोर उभे राहिले तर त्या प्रत्येक बिंदूचे कंपन जाणवू लागते,त्यामागे दडलेला उजाळा चमकारे फेकत नजरेला भूल घालू लागतो ,लक्षात येते की तिथे एकच बिंदू नाही,अगणित रंगांचे असंख्य बिंदू आहेत,अनोळखी रंगांचे ते अगणित एकेकटे बिंदू झगमगत अंतरंगात नेणिवेच्या तळापर्यंत उतरत जातात आणि त्या कंपनांच्या अनाहत नादाने मन भरून जाते. प्रकाश आणि रंग यांची गूढगुंजनमय एकात्मता त्या चित्राला एक वेगळीच अध्यात्मिक लय प्राप्त करून देते. म्हणून त्यांची निसर्गचित्रे - स्त्रीदेह हादेखील त्यांनी निसर्गघटक म्हणून स्वीकारला हे लक्षात आले की ही सगळी चित्रे वास्तवाचे दर्शन देणाऱ्या प्रतिकृती नसून अध्यात्मिक जाणिवा घेऊन प्रकटतात ते दिसू लागते.
हे ज्याला "दिसते' तो खऱ्या अर्थी भाग्यवान.
चित्र चित्रकाराच्या मनाच्या तळातल्या नेणिवांच्या अंतःस्तरात विजेसारखे चमकते, त्या अंधारलेल्या गुहेतून उसळ्या घेत वर येत जाते आणि पृष्ठभागावर येतायेता चित्राच्या रूपात साकार होत असते. केबींप्रमाणे ‘अज्ञेय’ नादेखील हे जाणवले होते, म्हणून ते लिहून गेले,
'मैंने देखा
एक बूँद सहसा
उछली सागर के झाग से
रँगी गई क्षण भर
ढलते सूरज की आग से।'
"मुझको दिख गया :
सूने विराट् के सम्मुख
हर आलोक-छुआ अपनापन
है उन्मोचन
नश्वरता के दाग से!'
चित्र हे सरांच्या लेखी न साधन होते न साध्य. चित्रकला हे जीवनाचे असे अंग आहे ज्याशिवाय जगणे अशक्य व्हावे असे ते म्हणत,त्यांच्यासाठी ते तसे होतेच. पण आयुष्याला नश्वरतेचा डाग आहे हे त्यांच्यापेक्षा उत्तम जाणणारे दुसरे कोण होते? म्हणून ते कलाविश्वातल्या झगमगाटाची, मानसन्मान -पुरस्कारांची पर्वा न करता,आपला कॅनव्हास,ब्रश आणि रंगांशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. कलाजगतातल्या व्यक्तिगत हेव्यादाव्यांचा स्वतःला स्पर्श न होऊ देता ते स्वान्तसुखाय कलानिर्मितीमध्ये मग्न राहिले,या प्रवासात जी अमूल्य रत्ने त्यांना सापडली ती त्यांनी अत्यंत निस्पृहपणे सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाटून टाकली. त्यांचे ‘चित्रमंदिर’ खऱ्या अर्थी गुरुकुल होते कारण इथे येणारे सगळेच सरांच्या शिस्तीत औपचारिक धडे घेता घेता अनेक अनौपचारिक शिक्षण -संस्कारातून घडत गेले सरांच्या प्रत्येक शिष्याने बेळगावी मातीशी आणि कलासंस्कारांशी प्रामाणिक राहूनही आपल्या गुरूप्रमाणे कोणताही एकच एक "इझम' मानला नाही,ते त्या भिंती ओलांडून, आपापल्या वाटा धुंडाळत राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येत गेले.
कलाक्षेत्रात इतक्या उंचीवर पोचूनही हा महापुरुष इतका नम्र, विरक्त आणि आनंदी कसा आहे याचे मला वाटणारे आश्चर्य कालांतराने विरून गेले. त्यांच्याशी मारलेल्या अगणित गप्पांमधून मला केबी आणि त्यांची चित्रे समजत गेली. व्हॅन गॉफ,मॉने,गोगॉ,तुलॉ लॉत्रे हे ‘इम्प्रेशनिस्ट’ चित्रकार माझ्या प्रेमाचे विषय. या सगळ्या कलाकारांकडे बघण्याची 'दृष्टी' सरांच्या सान्निध्यात मिळत गेली. चित्रकला ही एक अद्भुत, अप्राप्य ,अलौकिक गोष्ट आहे हे माझ्या मनावरचे भारावलेपणाचे प्रचंड ओझे त्यांनी हळूहळू दूर करत नेले. चित्र म्हणजे काय हे आपल्याला कधी कळणारच नाही हा माझा गैरसमज नाहीसा होत गेला आणि सरांची चित्रे बघता बघता माझा चित्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक निर्मळ होत, चित्र ही केवळ एक कलावस्तू नाही तर सौंदर्याची अनुभूती आहे ही जाण आपोआप मिळत गेली. त्यातून चित्रकलेविषयी माझ्या मनात असणारे अनेक पूर्वग्रह नाहीसे होत मी चित्राकडे अतिशय निकोप दृष्टीने बघून शकले,शकते. मला वाटते की त्यांनी मलाच नव्हे,माझ्यासारख्या अनेकांना आयुष्यभरासाठी दिलेली ती अमूल्य देणगी आहे.
सर त्या अर्थी माझे शिक्षक –‘मेंटर’ बनले ते आजतागायत. त्यांनी चित्रकलेशी माझे हरवलेले नाते पुन्हा जोडून दिले. त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मला आजही जगण्यासाठी आशा,उत्साह आणि शक्ती पुरवत राहतात. या सगळ्या प्रवासात माझ्याबरोबर प्रवास करत घरात स्थिरावलेली त्यांची चित्रे जगण्याची ऊर्जा देत राहतात. आयुष्यात अनेक वादळे -वावटळी आल्या,आजही येत आहेत,त्यांचा सामना करत असताना हा "सेन्स ऑफ बिलॉन्गिन्ग ' कधी सोडून जात नाही, ही माझ्या लेखी अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
केबी होते,आहेत आणि असतीलच .
त्यांचे असणे माझ्या लेखी वादातीत आहे.
लेखिकेचा संपर्क - 9821148810
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.