आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमध्ये सत्ताधारी भाजपला पायउतार करीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने बहुमत मिळवले आहे. हा सत्ताबदल केवळ राजकीय नाही, तर मानसिक आणि भावनिकही आहे. महाराष्ट्र आणि हरियाणानंतर आलेला हा निकाल देशातील राजकारणाच्या बदलणाऱ्या वाऱ्याचे संकेत देणारा आहे. केंद्राच्या सत्तेत बहुमताने विराजमान असलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर बसलेला हा आणखी एक झटका आहे. हरियाणात सत्ता काबीज करताना या पक्षाला मोठी कसरत करावी लागली, तर महाराष्ट्रात तर सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून वंचित राहावे लागले. आपल्याला हवी ती धोरणे आखण्यापासून ती सक्तीने राबवण्यापर्यंतच नव्हे, तर एकूणच राष्ट्रीय आणि राजकीय वर्तणुकीतील या पक्षाच्या अहंमन्यतेला वारंवार धक्का बसतो आहे. झारखंडमधील प्रचार सभांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आवर्जून सांगायचे, की वाजपेयींनी निर्माण केलेल्या या राज्याचा विकास मोदींनीच केला. काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चाच्या काळात केवळ गरिबी आणि नक्षलवाद वाढला. पण, २०१४ पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचेच सरकार होते. तरीही तेथे मतदारांनी या पक्षाला नाकारले, याचा अर्थ लोकांनी पर्याय हवा होता. काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाला सोबत घेऊन तो दिला आणि त्यात त्यांना यशही आले. भाजपच्या विरोधात काँग्रेसने बदललेली नीती, हा या निकालातील महत्वाचा पैलू आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर शिवसेनेला दिलेली साथ आणि झारखंडमध्ये 'झामुमो'शी केलेल्या हातमिळवणीतून ती अधिक स्पष्ट होते. पण, या ना त्या मार्गाने राज्यामागून राज्यांची सत्ता काबीज करीत निघालेल्या भाजपची अवस्था अतिआत्मविश्वास आणि स्वत:च्या क्षमतेचा गर्व झालेल्या गोष्टीतल्या सशासारखी झाली आहे. ज्याच्यापासून देशाला मुक्त करण्यासाठी भाजप धाप लागेपर्यंत धावतोय, तोच काँग्रेस कासवाच्या गतीने पुढे निघाला आहे. ३७० वे कलम, तिहेरी तलाक, एनआरसी, सीएए अशी अनेक राष्ट्रवादी आयुधे असतानाही भाजपच्या हातून राज्ये निसटत आहेत. अशा आयुधांनी स्थानिक मुद्यांची धग दाबून टाकण्याच्या प्रयत्नाला महाराष्ट्रात काही प्रमाणात यश आले, पण राष्ट्राभिमानाने छाती फुगण्यासाठी आधी पोटात काही असावे लागते, हे झारखंडसारख्या छोट्या राज्याने दाखवून दिले. पाच वर्षे सरकार कसेही चालले असले, तरी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यामुळे सत्ता परत मिळेल, हाही भाजपचा कयास महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही फोल ठरला. मुख्यमंत्री रघुबर दास आणि प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांचा पराभव, हे त्याचेच द्योतक. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा टाटा स्टीलमधील कामगार सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला म्हणून त्यांचे कौतुकही झाले होते. मात्र, लोक आता प्रतिमेच्या भुलभुलय्यात अडकत नाहीत. ते आपल्या जगण्या-मरण्याच्या मुद्यांशी तडजोड न करता सजगपणे मतदान करतात, हे महाराष्ट्रानंतर झारखंडनेही दाखवून दिले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपने जपलेल्या नेत्यांच्या प्रतिमाप्रेमाला आणि अतिरेकी राष्ट्रवादाला या निकालाने छेद दिला आहे. चिंतनवादी पक्षाला हा इशारा अधिक चिंतेत टाकणारा आहे.  

बातम्या आणखी आहेत...