आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्मा नावाची कु-प्रथा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅड. लालसू नागोटी


एकेकाळी मातृसत्ताक असलेल्या आदिवासी समाजावर नागरी समाजाची छाप पडली आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेतील काही कु-प्रथांनी या समाजातही शिरकाव केला.  यापैकीच एक कु-प्रथा म्हणजे कुर्मा... दर महिन्याला बाईच्या शरीरातून होणाऱ्या रक्तस्रावाचे वैज्ञानिक कारण माहीत नसल्याने अनाकलनीय गूढ शक्तींमध्ये ते शोधले गेले आणि मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी गावाबाहेरील कुर्मा घरात राहण्याची परंपरा सुरू झा
ली.

एकेकाळी मातृसत्ताक असलेल्या आदिवासी समाजावर नागरी समाजाची छाप पडली आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेतील काही कु-प्रथांनी या समाजातही शिरकाव केला. मुळात अज्ञान आणि प्रचंड असुरक्षितता यामुळे आदिवासी समाजात भवतालच्या अनाकलनीय घटनांबद्दल गूढत्व निर्माण झाले होते. त्याची उत्तरे देवता आणि धार्मिक क्रियाकर्म यात शोधण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक प्रथा, परंपरा पुढे आल्या. काही समाजाला एकत्र आणणाऱ्या होत्या, समाज आणि संस्कृती यांचे संवर्धन करणाऱ्या होत्या तर काही समाजातील दुर्बलांना दाबणाऱ्या... यातलीच एक प्रथा म्हणजे कुर्मा. दर महिन्याला बाईच्या शरीरातून होणाऱ्या रक्तस्रावाचे वैज्ञानिक कारण माहीत नसल्याने अनाकलनीय गूढ शक्तींमध्ये ते शोधले गेले आणि मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी गावाबाहेरील कुर्मा घरात राहण्याची परंपरा सुरू झाली. गडचिरोली, बस्तर, नारायणपूर, बिजापूर या मध्य भारतातील गोंड, माडिया या आदिवासी समाजामध्ये आजही ही प्रथा पाळली जाते.

कुर्मा म्हणजे मासिक पाळीच्या काळात आदिवासी स्त्रीचे बाजूला बसणे. मात्र हे स्वत:च्या घरात नाही तर दूर नदीच्या काठी बांधलेल्या कुर्मा घरात...  नावालाच घर... प्रत्यक्षात वर शाकारलेले छप्पर आणि भोवती गवत-चिखलाच्या भिंती अशी गावाने उभारलेली ती बसकी झोपडीच असते. साधारण चार - पाच कुटुंो मिळून दूर जंगलात नदीच्या कडेला हे कुर्मा घर उभारतात. मासिक पाळीच्या काळात त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना राहते घर सोडून चार दिवस या कुर्मामध्ये राहावे लागते. कोणताही पाया किंवा पक्की जमीन नसलेल्या ओल्या जमिनीवर त्यांना चार दिवस झोपावे लागते. घरून येणाऱ्या भाकरीवर पोट भरावे लागते. या काळात तिला पुरुषाने स्पर्श करायचा नाही की तिचे तोंड पाहायचे नाही.

कदाचित पुरातन काळात कष्टाच्या कामांपासून स्त्रियांना विश्रांती मिळावी या हेतूने  कुर्मा प्रथेला सुरुवात झाली असेल असे गृहीत धरले तर ते ठीक होते. मात्र या काळात पुरुषाला, पुजाऱ्याला तिचे तोंड दिसू नये म्हणून रानात पळणाऱ्या, झाडामागे लपणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की यामागील अतार्किकता अधिक ढळक होते. विशेष म्हणजे, या प्रथेमध्ये कुर्मा पाळणाऱ्या आणि न पाळणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांच्या वाट्याला अवहेलनाच येते. एखाद्या गावावर किवा कुटुंबावर काही संकट आले, रोगराई आली, मृत्यू झाला तर तेथील कुर्मा न पाळणाऱ्या स्त्रीला दोषी धरले जाते. प्रतिकूल परिस्थितीत गावात राहून शिक्षण देणाऱ्या शिक्षिकांना लक्ष्य केले जाते. विशेष म्हणजे या प्रथेभोवतीचा धार्मिकतेचा आणि श्रद्धेचा फास एवढा घट्ट आवळला आहे की, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या विषयावर महत्त्वाचे काम उभे करणाऱ्या सामाजिक संस्थादेखील यास विरोध करू शकल्या नाहीत. स्त्रियांचे आरोग्य आणि हक्क याविषयी काम करणाऱ्या सामाजिक संस्था, महिला चळवळी इथपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. येथील महिलांच्या जिवाला धोका असताना त्यावर कुणी काम करताना दिसत नाही. आज आदिवासी मुली शिक्षणासाठी बाहेर गेल्या आहेत, परंतु गावात आल्यावर त्यांना कुर्मा पाळावा लागतो. ही प्रथा महिलांच्या जिवावर उठण्याचे अनेक प्रसंग घडत आहेत. कुर्मामध्ये असलेल्या स्त्रीला गावातील विहिरीला, बोअर, नळाला शिवू दिले जात नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तिला नदीवर जावे लागते. दूषित पाणी प्यावे लागते. पावसाळ्यात नदीकाठच्या कुर्मा घरात पूर्ण ओल आलेली असते, चिखल, पाणी साचलेले असते. आसपास साप, विंचू दडलेले असतात. गवत वाढलेले असते, तशातच राहावे लागते. त्यात ती आजारी पडली तरी तिच्यावर उपचार होत नाहीत. मागे ‘टेकला’ गावातील वंजा दुर्वा यांच्या पत्नीला कुर्मामध्ये असताना साप चावला. मात्र, कुर्म्यातील स्त्रीला पुरुष शिवू शकत नाही या अंधश्रद्धेपायी तिला कुणी दवाखान्यापर्यंत आणले नाही आणि तिला जीव गमवावा लागला.

जिल्हा परिषद, ग्रामसभा यांच्या माध्यमातून आम्ही यावर बोलण्याचा प्रयत्न केला तर मोठा विरोध होऊ शकतो.आदिवासींच्या धार्मिक श्रद्धा या प्रथेशी जोडल्या गेल्याने हा अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. परंतु, महिला आणि त्यांचे आरोग्य, सुरक्षितता या दृष्टीने यावर काम होणे खूप गरजेचे आहे.  यावर काम करण्याचे दोन मार्ग असू शकतात. एक म्हणजे कायद्याने ही अघोरी प्रथा बंद करणे किवा त्यात काळानुरूप सुधारणा करणे. मेंढा लेखा गावाने  व्यवस्थित पाया खोदून पक्क्या स्वरूपाचा कुर्मा  बांधला आहे. त्यामुळे तेथील महिलांना किमान सुरक्षित निवारा उपलब्ध झाला आहे. हा एक पर्याय आहे. ग्रामविकास निधीमधून गोटूल बांधकाम केले जाते तसे कुर्मा गृह बांधता येतील का? तसे केल्यास या प्रथेचे समर्थन केल्यासारखे होईल का? की गावातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने एखादे महिला केंद्र बांधावे जिथे कुर्मातील महिलांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होईल, त्यांना आरोग्यसेवा, एखादे  प्रशिक्षण देता येईल, असा काही पर्याय दिल्यास गावकरी स्वीकारतील का? अशा अनेक पातळ्यांवर विचार करावा लागणार आहे. एवढे निश्चित, की आतापर्यंत चळवळींनी, संस्थांनी बाजूला ठेवलेला, आदिवासींनी चुप्पी बाळगलेला हा विषय सगळ्यांना हातात घ्यावा लागेल. अर्थात, काळानुरूप बदलाचे संकेत यातही मिळू लागले आहेत. पूर्वी कुर्म्यातील महिला पुरुष दिसला की जंगलात पळून जात होती. आताच्या मुली कुर्मा पाळतात, पण घराच्या आसपास राहतात. कामानिमित्ताने तालुक्याच्या गावाला, बाजाराच्या गावाला जातात. पुरुषांशी बोलतात. पूर्वी कुर्म्याच्या काळात तिने वेचलेली मोहाची फुलेही घरात घेतली जात नसत एवढी शिवाशीव पाळली जाई. आता, तेंदूूपत्त्याच्या तोडणीच्या सीझनला कुर्म्यातील बाईला सहभागी करून घेतले जाते कारण तिथे संबंध थेट पैशाच्या गणिताशी येतो. हे बदलाचे बिंदू सामाजिक-शैक्षणिक धाग्याने काळजीपूर्वक गुंफले तर आदिवसींमधील या सांस्कृतिक प्रथेतील दुजाभाव आणि जोखीम संपवून त्यास विधायक रूप देणे शक्य होईल.

अॅड. लालसू नागोटी
शब्दांकन : दीप्ती राऊत
लेखकाचा संपर्क : ९४०५१३०५३०