आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केव्हा तरी पहाटे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिल गोविलकर

सुरेश भटांनी उर्दूतील गझल आकृतिबंध स्वीकारला आणि उर्दूतील शृंगाराची मस्ती मराठीत आणली. आजही त्यांच्या काही कविता वाचताना, आत्ममग्न आणि शृंगार याची नेमकी सीमारेषा ओळखून भोगवादी कविता वाचल्याचे समाधान देतात. श्रृंगार आहे, पण उठवळपणा नाही. आवाहन आहे, पण लालसा नाही तसेच आमंत्रण आहे, पण निलाजरेपणा नाही.

राठीत धीट आणि मोकळा शृंगार असा फारच कमी वेळा वाचायला मिळतो, अगदी कवितेसारखे मुक्त, अल्पाक्षरी माध्यम घेतले तरीही. याला प्रथम छेद दिला पु.शि. रेग्यांनी आणि नंतर सुरेश भटांनी. त्यातून सुरेश भटांनी उर्दूतील गझल आकृतिबंध स्वीकारला आणि उर्दूतील शृंगाराची मस्ती मराठीत आणली. आजही त्यांच्या काही कविता वाचताना, आत्ममग्न आणि शृंगार याची नेमकी सीमारेषा ओळखून भोगवादी कविता वाचल्याचे समाधान देतात. श्रृंगार आहे, पण उठवळपणा नाही. आवाहन आहे, पण लालसा नाही तसेच आमंत्रण आहे, पण निलाजरेपणा नाही. शृंगारिक कविता वाचताना भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार वाचत आहोत हे भान बहुतेक वेळा कायम असते. अर्थात, लिखाणात सातत्य आले की काही वेळा घसरण होणे क्रमप्राप्तच असते. परंतु एकूणच आढावा घेतला तर सुरेश भटांनी मराठी मनाला शृंगारातील मनोज्ञपणा शिकवले असे म्हटले तर फार चुकीचे ठरू नये. आजची आपली रचना अशाच रतीक्लान्त मनोवस्थेची आनंदमयी कविता आहे. सुरेश भटांच्या कवितेतील अनुभव हे खास वेगळेच आणि एककेंद्री अनुभविश्व असते.  त्याचे भावविश्व भिन्न असते तसेच त्याचा प्रतिमाधर्म वेगळा असतो. मानवी जीवनातील सृजनशक्ती ही त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी असते. त्यामुळेच मिळालेला अनुभव तसाच्या तसा मांडण्यात सुरेश भटांना फारसा रस नाही, तर त्या अनुभवाच्या उगमाशी जाऊन त्यातील भावाशय अचूकपणे हेरून नेमक्या शब्दांतून मांडण्यात त्यांना अधिक रस आहे.  


"उरले उरात काही आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली’ यासारखी तलम आणि दृश्यमय प्रतिमा सुरेश भट सहज लिहून जातात या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रतिमा आपल्याला आजच्या गाण्यात वाचायला मिळतात. खरं तर कविता जास्त कडव्यांची आहे, परंतु ललित संगीताच्या स्वतःच्या अशा अंगभूत मर्यादा असल्याने त्यातील निवडक कडवी गाण्यासाठी घ्यावी लागतात. अर्थात, हा अधिकार संगीतकाराचा.  

संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांचा कवितेचा अभ्यास हा नेहमीच आश्चर्य वाटावे इतका वैविध्यपूर्ण आहे. मराठीतील अनेक कवींच्या कविता त्यांनी स्वरबद्ध करून लोकांमध्ये त्या कवीची आणि त्यांच्या कवितांची समर्थ ओळख करून दिली. हाताशी भावोत्कट कविता असणे अवश्य असते असा जणू हेका असावा, या ध्यासानेच हृदयनाथ मंगेशकर नवनवीन कविता हुडकीत असतात आणि त्यासाठी त्यांचे नेहमी सातत्याने कविता वाचन चाललेले असते. चाल लावायला घेतलेली कविता ही आधी आशयसमृद्ध कविता असावी, असा त्यांचा जणू आग्रह असतो आणि त्या आग्रहापोटीच त्यांनी जे कवी अगम्य वाटतात, त्यांच्या कवितेतील रसमयता ओळखून, त्यांना चाली लावल्या आणि त्या कविता लोकप्रिय केल्या. 

गाण्याची चाल ही दुर्गा रागावर आधारित आहे. तसे बघितले तर राग दुर्गा हा कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात' केलेला आहे. परंतु जसे इतर रागांबाबत झाले तसेच या रागाबाबत झाले. आयात करताना त्याची ठेवण उत्तर भारतीय संगीताला साजेशी केली. कविता गझल वृत्तात लिहिली गेली आहे. गझल वृत्तात लिहिताना जेव्हा प्रत्येक कडव्यात दुसरी ओळ संपते तेव्हा त्या ओळीचा समारोप थोडासा धक्कान्तिक स्वरूपाचा असतो आणि वाचक थोडा स्तिमित होऊन जातो. परिणामी काव्य अधिक महत्त्वाचे असते. संगीतकाराने हाच विशेष नजरेसमोर ठेवून चाल आणि वाद्यमेळ याची रचना केली आहे. प्रत्येक अंतरा वेगवेगळा बांधला आहे, परंतु अंतऱ्याचा शेवट करताना मुखड्याशी जुळवून घेतले आहे. सर्जनशीलता दर्शवण्यासाठी अशा प्रकारची स्वररचना असणे आवश्यकच असते. आशा भोसलेंनी या गीताचे गायन केले आहे. गायक जर का प्रतिभाशाली असेल तर हातातील चाळीचे सोने कसे करू शकतो याचा हा आदिनमुना आहे. मुळात अाशा भोसलेंचा आवाज सगळ्या सप्तकात सहजपणे विहरणारा त्यामुळे स्वर कमी पडला हे संभवतच नाही. "उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली’ ही ओळ मुद्दामहून ऐकावी. वास्तविक शरीरशास्त्रदृष्ट्या श्वास अडकलेला आहे, परंतु त्यातील लालित्य शब्दात ज्या प्रकारे मांडले आहे आणि त्या लालित्याचा स्वरिक विस्तार कसा केला आहे हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे आहे. तसेच गाण्याचा शेवटचा अंतरा गाताना, "स्मरल्या मला न तेंच माझ्याच गीतपंक्ती’ ही ओळ गाताना स्वर काहीसा दुखरा ठेवला आहे. त्यामुळे ऐकताना रसिक आपसूकच काहीसा हळवा होतो. कवीला जे म्हणायचे आहे, याची संगीतकाराला नेमकी जाण झाल्यावर गायकांकडून अचूकपणे कसे काढून घ्यायचे, याचे हे सुंदर उदाहरण म्हणायला हवे. वाद्यमेळ प्रामुख्याने सतार या वाद्यावरच आधारलेला आहे, पण इतके ओघवते काव्य आणि गायकी ढंगाची चाल आहे म्हटल्यावर अनेक वाद्ये वापरून अकारण सांगीतिक कौशल्य दाखवण्याचा हव्यास अजिबात जरुरीचा नसतो. सतारीवर फक्त चालीची धून वाजवली आहे आणि तीदेखील चालीला पूरक अशीच आहे. परिणामी कवितेचा गाढा परिणाम ऐकणाऱ्यावर होता. ललित संगीताकडून आणखी वेगळ्या अपेक्षा ठेवणे चूकच. 

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली 
मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली 
सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे 
उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली 
कळले मला न केंव्हा सुटली मिठी जराशी 
कळले मला न केंव्हा निसटून रात्र गेली 
उरले उरात काही आवाज चांदण्याचे 
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली 
स्मरल्या मला न तेंव्हा माझ्याच गीतपंक्ती 
मग ओळ शेवटची
सुचवून रात्र गेली.

संपर्क - ९८१९९३१३७२

बातम्या आणखी आहेत...