आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचं जुनं नवं...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक आबुज

शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार हे आयकून रखमाजी व तात्या दोघांनाही लै आनंद झाल्याचं त्यांच्या हावभावावरनं व त्यांच्या ओसंडून हासण्यानं दिसत व्हतं. कारण दोघांकडंही दोन-दोन लाख रुपयांचे शेतीसाठी घेतलेलं कर्ज व्हतं. आन् आता ते माफ व्हणार म्हणून दोघांनाही अतिशय आनंत झाला व्हता.

गणपती तात्या सकाळं सकाळं ऊठून जनावरांच्या दावणीच्या आजूबाजूला पडलेल्या शेणाच्या पवट्या उचलून हात झटकीत गाईच्या वासराच्या पुढची वैरण सांब्री-सुंब्री करीत व्हते. भल्या पहाटंच गाईच्या धारा काढून कँडातलं दूध मेडीला अडकून ठुलं व्हतं. रोजच्या परमानं तात्याचं ह्ये काम नित्यानियमानं चालू व्हतं. तेवढ्यात रखमाजी कांबळ्या तिथं आला. तात्याचं काम त्यांच्याच धुंदीत चालू व्हतं. त्यामुळं रखमाजी आल्याची भनक तात्याला लागली नव्हती. रखमाजी म्हणजी, तात्याच्या शेताचा शेजारी. अगदी तात्याच्या बांधाला बांध असणारा मनुक्ष. तात्याच्या शिनपाकी असलेला रखमाजी तात्यांचा लहानपणीपासूनचा दोस्तच व्हता. तसंच तात्याच्या सुख-दुःखाला रखमाजी पहिल्यांदा धावून येणारा गावातला पहिला माणूस असल्यानं तात्यांची अन् रखमाजीचं चांगलंच जमायचं. बांधाला बांध असूनदेखील त्यांची आयुष्यात एकदाही भांडण झाली नाहीत किंवा साधी शब्दाला शब्द लागुन कधीही साधी आरे-तुरे झाली नाही. दोघांचाही स्वभाव चांगला असल्यानं तात्याची व रखमाजीची गुण्या गोविंद्यानं राहणारी जोडी म्हणून गावात गवगवा व्हता. 

काहीही झालं तरी ते दोघं कधीही खऱ्याची बाजू घेणारी माणसं व्हती. तात्याचं सकाळ सकाळंचं जनावरांच्या गोठ्यातलं हे काम चालू असतानाच तेवढ्यात रखमाजी खाकरत खोकरत तिथं आला. "अयं तात्या, काय चाल्ल्यं' असं त्याच्या  येगळ्या स्टाईलच्या किलकारीनं  शेतातलं वातावरण दुमदुमून टाकलं आन् तात्या "बरं हाय' म्हणंत त्यांच बोलणं पुढी चालू राहिलं. "तात्या, काढ तंबाकू' म्हणत रखमाजीनं बोलाया सुरवात केली तशी तात्यानं गाईच्या शेणानं भरलेली हातं मातीत खसाखसा घोळसीली व कोपरीच्या डाव्या खिशातून तंबाकूचा तोटा व चुन्याची डब्बी काढून रखमाजीच्या हातावर टेकून "मला बी एक इडा मळं' असं सांगून  आपलं काम करण्यात व्यस्त राहिला. 

तेवढ्यात बाजूनं तेल्याचा माणक्या रेडू आयकत आयकत गावाकडून त्याच्या शेताच्या वाटानं जात व्हता. सकाळचे सात सव्वासात वाजले आहेत, असं रेडूतल्या बाईनं आत्ताचं सांगितलं व्हतं आन् थोडक्याच येळात बातम्या सांगणार असल्याचंही ती रेडूतली बाई म्हणाली व्हती. तात्याला व रखमाजीलासुद्धा बातम्या आयकायची लैच हौस व्हती. त्यांच्याकडंही रेडू असायला फायजी असं त्यांना वाटायचं पण त्यांची अन् रेडूची गाठ या जनमात तरी पडणार नव्हती. तरीही ते दोघं या ना त्या कारणांनी गरामपंचाईतीतला रेडू सकाळ संध्याकाळ आयकायचे. 

तेल्याच्या माणक्याला हिकडं बोलिवण्यासाठी तात्यानं त्याला हाळी भरली अन् माणक्याला तात्यानं बोलवून घेतलं, सकाळचे सव्वासात वाजत आहेत थोड्याच वेळात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही आता प्रसारित करीत आहोत... असा आवाज रेडूतून आला आन् बातम्या सुरू झाल्या. रेडूतली पहिलीची बातमी होती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची... राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एक जानेवारीपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त म्हणून रेडूतली बाई बोलायला लागली, तशी या तिघांचीही कानं त्या रेडूतल्या बाईच्या बोलण्याकडं टवकारली आन् कानांत जीव आणून ते सगळं ते तिघंही आयकू लागली. 

शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार हे आयकून रखमाजी व तात्या दोघांनाही लै आनंद झाल्याचं त्यांच्या हावभावावरनं व त्यांच्या ओसंडून हासण्यानं दिसत व्हतं. कारण दोघांकडंही दोन-दोन लाख रुपयांचे शेतीसाठी घेतलेलं कर्ज व्हतं आन् आता ते माफ व्हणार म्हणून दोघांनाही अतिशय आनंत झाला व्हता. काही टायमानं रेडूवरच्या बातम्या संपल्या आणि रेडूवर काही मराठी संगीताचा कार्यक्रम लागला. तसा माणक्या त्याचा रेडू घेऊन त्याच्या पुढच्या कामासाठी निघून गेला.आपली कर्जमाफी झाली आता आपल्याला कोणत्याही प्रकारचं कर्जाचं टेन्शन नाही म्हणून ते दोघंही लैच खुश झाले व्हते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला व्हता. कर्जमाफी करणाऱ्या मुख्यमंत्र्याला ते त्याच क्षणापासनं देव मानायला लागले व्हते. कारण त्या देवमाणसांनं त्यांचा सातबारा कोरा केल्याची घोषणा केली व्हती. आता खरंच त्यांचा सातबारा कोरा झाला का नाही याबाबत त्यांना इस्वास बसतं नव्हता. पण त्यांना एक माहीत व्हतं की, रेडूनं दिलेली बातमी खरी असतीय अशी भावना दोघांच्या मनात अगदी लहानपणीपासून असल्यानं त्यांना रेडूतली बातमी अगदी खरीच असतीया असा त्यांचा ठाम विश्वास व्हता. तरीही रखमाजी तात्याला म्हणाला, तात्या तलाठ्याकडं जाऊन त्यानलाच विचारू की आपल्याला त्या कर्जाच्या माफीतलं काय खरं काय खोटं... त्यावर दोघांंचं एकमत होऊन त्यांनी त्याच दिवशी तालुक्याच्या गावाला जायचं ठरविलं आणि ते तालुक्याच्या ठिकाणी गेले. तिथं गेल्यावर त्यांनी सातबारा देण्याची गावच्या तलाठ्याला विनंती केली. त्यानंतर तलाठ्यापशी अर्धा दिवस बसून राहिल्यावर त्यांनी त्यांच्या जमिनीचा सातबाराचा उतारा मिळाला अन् त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज माफ न केल्याचं नमूद करण्यात आलं व्हतं. त्या दोघांचंही कर्ज माफ झालेलं नव्हतं. तशी तात्याच्या पायाखालची जमीनच सरकली. गावातल्या बऱ्याच जणांना कर्जमाफीचा फायदा झाला व्हता. तात्यासारखे असे अनेक व्हते की, त्यांना या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही, असे तलाठी साहेब सांगत तात्याची समजूत काढीत व्हते.

तात्यांनी व रखमाजी या दोघांनीही दोन दोन लाख रुपये शेतीतल्या पीकपेरणीसाठी गेल्या  पावसाळ्याच्या तोंडाला पीक कर्ज काढलं व्हतं. त्या पीक कर्जातून आलेल्या पैशातून त्यांनी काळ्या आईची वटी भरली व्हती. पण पावसांनी दगा दिल्यामुळं पेरणी केलेलं बी उगवलंच नव्हतं. त्यामुळं घरातलं व्हतं नव्हतं तेवढं खाजगी सावकाराकडं गहान ठिवून पुन्हा दुबार पेरणी केली व्हती. दुसऱ्या वर्षी पाऊस चांगला झाला म्हणून कर्जाचं नवं-जुनं केलं व्हतं. म्हंजी गेल्या वर्षीचं कर्जं परत भरणा केल्याचं 

दाखवून या वर्षी नवीन कर्ज उचललं व्हतं आणि त्यामुळं त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नव्हता. कारण सरकारनं जानेवारीपासून थकीत असलेल्या कर्जावर माफी दिली व्हती आणि तात्यानं व रखमाजींनं गेल्या वर्षीच्या कर्जाचं नवं-जुनं पावसाळ्याच्या तोंडाला म्हणजी जुन-जुलैच्या टायमाला केलं व्हतं. त्यामुळं सरकारच्या नियमानुसार तात्याचं कर्ज थकीत कर्ज नव्हतं म्हणे. आज पहिल्यांदा रेडूवरच्या बातम्यात खोटं सांगितल्याची भावना तात्याची झाली व्हती.


लेखकाचा संपर्क - 9881051265

बातम्या आणखी आहेत...