आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्यांच्या आठवणीचा उकिरडा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नारायण भोसले

भटक्यांच्या मुख्य ४२ जमाती व त्याच्या पोटशाखा इंगळीच्या पायासारख्या २५० पेक्षा जास्त वाढल्या आहेत आणि वाढतच आहेत. इंग्रजी अमलाचे भारतीय समाजावर अनेक बरे-वाईट परिणाम झाले. त्यातला सर्वाधिक विघातक सामाजिक परिणाम याच भटक्या समाजावर झाला. भटकंती करत जीवन जगणाऱ्या या जमातींचे पारंपरिक व्यवसाय व कला यांचे खच्चीकरण होत गेले. स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती बदलायला हवी होती, परंतु तसे घडले नाही. भटक्या विमुक्तांची कहाणी फारच थोड्या प्रमाणात ज्ञात आहे. “फिरस्तू’ या पाक्षिक सदरामागची भूमिका नेमकी हीच आहे. या प्रकाशात भटक्यांच्या जीवनात काही नवा बदल घडण्याचे रस्ते उजळले तर या प्रयत्नाचे सार्थक होईल...

मी काही कामानिमित्त झारखंड राज्यातील रांची शहरात होतो. तेव्हा मला मोठ्या बंधूचा फोन आला, ‘आपला गोरख रांचीजवळील बंडू गावात आज मरण पावला. तू तिथे असल्याने तुला फोन केला. तुला शक्य असल्यास जाऊन ये. गोरखच्या डेड बॉडीजवळ त्याची बायको, दोन लहान मुली व त्याचा दहा-बारा वर्षांचा मुलगा आहे.’ मला काही करावे ते कळेना. कामात मन लागेना. सारखा गोरख समोर दिसू लागला, आठवू लागला. 

महाराष्ट्रात शासन पुरस्कृत व मान्य अशा मुख्य ४२ जमाती आहेत. व त्याच्या पोटशाखा इंगळीच्या पायासारख्या २५० पेक्षा जास्त वाढल्या आहेत आणि वाढतच आहेत. यातील बऱ्याच भटक्या जमातीचा जगण्यासाठीचा मुख्य व्यवसाय भिक्षा हाच आहे. यातील नाथपंथी डवरी गोसावी ही एक ऐतिहासिक भटकी जमात. गोरख हा याच जमातीचा. याही जमातीचा जगण्याचा मुख्य व्यवसाय भिक्षा हाच राहिलेला आहे. यांची अंदाजे लोकसंख्या चार-पाच लाख असावी. या पैकी निम्मे तरी लोक भिक्षेवरच जगतात, हे निरीक्षणात्मक अनुमान आहे. यांचे मूळ महाराष्ट्र असले तरी वेल मात्र भारतभर पसरली आहे. ते भारतातील विविध भागात भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करतात.

नवरा-बायको, असली तर लहान मुले, कधी-कधी आई-वडील किंवा अन्य नातेवाईक सोयरे सोबत असतात, आंधळ्याला आंधळ्याची सोबत असते त्याप्रमाणे. जगभर सामंती-भांडवली व्यवस्थेच्या पिळवणुकीच्या वर्तणुकीने अंधश्रद्ध लोक जास्त मागास असल्याचे निरीक्षण आहे किंवा मागास लोक अंधश्रद्ध ठेवले जातात. ज्यांना चिकित्सेचा अधिकार नाकारला जातो ते मागास राहतात. यांचा मागासलेपणा हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक असा बहुअंगी असल्याने शरीरात बसलेल्या कॅन्सरच्या विळख्यासारखा असतो. यामुळे पूर्ण जमातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जमाती नष्ट होतील, पण त्यांचे दारिद्र्य नाही. भांडवलशाही वाढत असताना ती काही लोकांना-समुदायांना गुंगीचे औषध म्हणून धर्म व देव-देवळे यांचा वापर करायला लावते. भांडवलशाही मोठ्या कौशल्याने त्यांच्या श्रमाची चोरी करून त्यांनाच चोर-मागास ठरवते आणि पुन्हा यांच्या तथाकथित उन्नयनाचे कार्यक्रम आखून स्व:तच गब्बर होते. भांडवलशाही सततचे लागणारे शोध, संशोधन, ज्ञान श्रमिकापासून लपवते. श्रमिकांना दु:खाच्या झेंड्याखालीही एकत्र येऊ देत नाही. शोषितांची एकजूट म्हणजे भांडवलशाहीची घसरण असते. त्यासाठी ती बुद्धिभ्रम करून सतत एकमेकांत संशयाचे भूत उभे करते. भांडवलशाही ऑक्टोपसप्रमाणे हजार हाताने शोषितांचे शोषण करते. ऑक्टोपस निसर्ग रचित आहे पण भांडवलशाही मनुष्यरचित आहे. 

भटक्यांसारखे समुदाय जगण्यासाठी कशाचा सहारा घेत असतील? किंवा त्यांना कोणती साधने वापरण्याची मोकळीक असते? भटके भिक्षेसाठी देवाच्या मूर्ती वापरतात. मूर्ती विज्ञानाचे नियम वापरून बनवल्या जातात व त्याची पूजा अवैज्ञानिकतेचे काम करते. देवांच्या मूर्तीचा छोटा रथ बनवितात व त्यावर भिक्षा मागतात. कधी कधी काळूबाई, दुर्गामाता, साईबाबा, स्वामी समर्थ यांची पालखी करून त्यावर भिक्षा मागतात. पाच-सहा पाय गाई, तीन शिंगे, तीन डोळे, दोन जननेंद्रिय, असलेली जनावरे घेऊन त्यावर भिक्षा मागतात, सर्व प्रवास पायी. दिवसाला दहा-पंधरा ते वीस-पंचवीस मैलाचे अंतर चालून रस्त्यातील वाड्या-वस्त्या व शहरे आढळल्यास तेथे या साधनाचा वापर करून भिक्षा मागतात. ते आपल्या मूळ गावी वर्षाला एकदा या प्रमाणे येतात. पैशाच्या उपलब्धतेवर यांचे गावाकडे येणे वर्ष-दोन वर्षे अथवा अनेक वर्षांनी होते. याच प्रवासात लहान वयात यांची लग्ने होतात... यांना मुले-बाळे होतात... प्रवासात वाट चालता-चालता बाई बाळंत होते, तिथेच दगडाने नाळ तोडली जाते. ओली बाळंतीण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते. कोणी आजारी पडल्यास झाडपाल्याचे औषध घेऊन तर कधी पैसे असतील तर खर्चिक दवाखाना बघून पुढचा प्रवास सुरु होतो. या प्रवासात आजाराने-नैसर्गिक आपत्तीने-वृद्धत्वाने अनेकांचा मृत्यू होतो. अशा वेळी मिळेल तशा जागेत, मिळेल त्या साधनाने मृताचे दहन अथवा दफन केले जाते. कधी-कधी दहन-दफानास जागा मिळेपर्यंत मृत शरीर घेऊन शेकडो मैल प्रवास करावा लागतो. रड नाही की बोंब नाही! हुंदका नाही की आक्रोश नाही! डोळ्यातून घरंगळणारे अश्रू आटवले जातात. कित्येक दिवसाचे उपाशी पोट बांधले जाते. अाडवं-तिडवं वाढणारे झाड वाढू नये म्हणून मुळ्या बांधून बोन्साय करतात तशा! बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या कित्येकांना आपल्या आप्तस्वकीयांचा मृत्यू सहा महिने वर्षांनी कळतो. तेव्हा सर्व काही संपलेलं असतं! ही कर्म कहाणी प्रत्येक भटक्या बिऱ्हाडाच्या वाट्याला येतेच येते. यात कधी बिऱ्हाडात निराशा नाही की अात्म्हत्याचा विचार नाही. जीवनाचाच विचार! जगण्याचाच विचार! भटके भाषा सोडतील प्रांत सोडतील पण जगणे सोडणार नाही. मग गोरख दादाराव भोसलेचे काय झाले? तर गोरख दादाराव भोसले, गाव बामणी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील रहिवासी. रहिवासी म्हणजे काय तर त्याच्या वाड-वडिलांचे पाल तेथे होते! तेथील ना रेशन कार्ड, ना आधार कार्ड, ना ओळख पत्र, ना ७/१२, ना हे गाव आपले आहे त्याचा काही पुरावा! म्हणून गोरख जमातीच्या परंपरेने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करत होता, प्रतिज्ञेतील परंपरेचा पाईक म्हणून! महाराष्ट्राचा प्रांत मागत-मागत तो भारतभर फिरला. सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा कधी अनुभव त्याच्या वाट्याला आला नाही. शेवटी निसर्ग समृद्ध अशा झारखंड भागात गेला. मिळालेले वास्तव स्वीकारण्या अथवा नाकारण्यासाठी यांच्याकडे असतेच काय? कसं विसरणार पोटातील भुकेला? कसं विसरणार औषध-पाण्यावाचून तडफडून मारणाऱ्या पोटाच्या गोळ्याला? कसं विसरणार पदरकरीन पोरीच्या विनयभंग होताना? कसं विसरणार चोर समजून मरेपर्यंत मारणाऱ्या-ठेचणाऱ्या मारेकऱ्यांना? कसं समजून घेणार या भग्न संसाराला? एक-एक पिकलेलं पान गळाव तसं बिऱ्हाडातील गळणाऱ्या माणसांना! नवी पालावी फुटावी तसं जन्मणाऱ्या पिलाकडे बघून कशी करावी आत्महत्या? मग व्यसनाशिवाय जवळचा मार्ग कोणता? कोण डोकं शांत ठेवायला मदत करणार? हे प्रश्न झाकण्यास कोण मदत करणार? पोटात अन्न नाही. आजारपणात औषध नाही... याने गोरख खंगत गेला. वाळल्या चिपाडागत होत गेला. आणि शेवटी बिन औषध पाण्याचा, आई-वडिलाविना, बहीण-भावाविना, नातेवाइकाविना एकटाच मृत्यूंच्या सरणावर चढला! 

मला रांचीत बातमी समजली. गोरख माझा दूरच भाऊ होता. झारखंड व त्यातील राजधानीचे ठिकाण रांची व रांची जवळ बंडू गाव आणि त्याच गावात कुठेतरी गोरखाचे पाल होतेे. मी व माझे दोन सहकारी गोरखाची डेड बॉडी शोधायला निघालो. गावात पोहचलो... तिथे  एक झोपडीवजा घर होते व त्यातून एक मध्यम वयाची बाई आली व हिंदीमिश्रित झारखंडी भाषेत विचारू लागली, ‘अाप कौन लोग है? किसलीये आये हो?’ मी म्हणालो, ‘हम टीचर है. बच्चों को पढाते है. यहां एक आदमी जो घुमंतू था वो मर गया है. उसके वास्ते हम आये है..’ भटक्याला निवारा-आसरा-सहारा कोण देते? तर त्यांच्यासारखीच मागास वा व्यवस्थेचे बळी पडलेले समूह! 

ती बाई थोडा वेळ थांबली. काही बलामत तर नाही ना याचा तिने अंदाज घेतला. म्हणाली, ‘यहा से दोन किलोमीटर दूर एक नदी है, उस नादी के किनारे पे उस अादमी को जलाने के वास्ते  लोग गये है. उस मे मेरा भी मर्द है’. बहुदा ते अादिवासी होते. गरीब होते. कष्टकरी होते. गाडीतून उतरून चालत नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने बराच वेळ बरेच अंतर चालल्यावर अंधारात काही माणसे दिसली. त्यातील गोरखच्या बायकोला मी ओळखले. तिनेही मला ओळखले. तिला हंबरडा फोडायचा होता आणि मलाही हुंदका अवरावयाचा होता. तिने प्रेत दाखवले. गोरखचा मुलगा सरणाची तयारी करत होता. लाकडं, पांढरं कापड, मडकं, फुलांचा हार, रॉकेल हे गोळा करण त्या लहानग्याच्या अनुभव विश्वाच्या पलीकडे होते, पण त्याने ते केलं, परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी येण्यासाठी त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली! बापाचं मढ सजवलं! परिस्थिती माणसाला सर्व  शिकविते हेच खरे. सगळा आसमंत शांत होता फक्त येथेच काय ती प्रत्येकाच्या हृदयी कालवाकालव होती. मी अग्नी दिला. हे सर्व माझे मित्र पाहत होते. ते माझ्या जमात समुदायाला ओळखत नव्हते. त्यांना शेवटी कळले, नारायण भोसले कोणत्या वातावरणात आपले अॅकडमिक सांभाळतो आहे! 

कथा इथेच संपत नाही! 

गोरख आदिवासीच्या घराजवळ वारला होता. त्यांनीच त्याला सहारा दिला होता. त्यांच्या प्रथेप्रमाणे तिसऱ्या दिवशीचा मांसाहारी विधी बोकड कापून करणे आवश्यक होते. जेव्हा गोरखचे कुटुंब बंडू गाव सोडून जाऊ लागले तेव्हा आदिवासींनी त्यांना अडवले व इथेच बोकड कापून क्रियाकर्म केल्याशिवाय तुम्हाला जाऊ दिले जाणार नाही असे सांगितले. पुन्हा पैशाची जुळवा-जुळव केली, बोकड कापले, सर्वाना जेवू घातले व हे भटके आपल्या तथाकथित मायदेशी परतण्यास निघाले. कोणता मायदेश ?      

(लेखक इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९८२२३४८३६१ 

बातम्या आणखी आहेत...