आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • An Article Of Sandesh Kurtadkar About Film 'Wake Up Sid' From Sid To Aisha ... From Aisha To Sid ...!

सिदपासून आयेशापर्यंत... आयेशापासून सिदपर्यंत...!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदेश कुडतरकर

बायोमेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगसाठी घालवलेले सहा महिने अजूनही आठवतात. एखाद्या दिवशी कुणीच सर्व्हिस इंजिनिअर येत नसे. आमच्या ट्रेनर बाई मग आम्हाला तिथल्या लोखंडी कपाटातली प्रॉडक्ट्स मॅन्युअल्स वाचायला लावायच्या. मी चक्क झोपून जात असे. कॉलेजला लॉजिक सर्किट्सचं लेक्चर असलं की, माझ्या पोटात कळ यायची. इंजिनिअर वगैरे व्हायचंच नव्हतं कधी. पण पुढे काय करायचंय हेही माहीत नव्हतं. अभ्यास करताना झोपणारा, बाबांच्या ऑफिसमधून पळून जाणारा "सिद मेहरा' म्हणूनच जवळचा वाटतो.

"वेक अप सिद' चित्रपटगृहात तर पाहायचा राहून गेला. पण नंतर मात्र त्याची पारायणं केलीत. जिच्या घरी पळून जाता येईल, अशी "आयेशा बॅनर्जी' आयुष्यात नसली तरी एखाद्या कंटाळवाण्या लग्नसमारंभात जेव्हा "तुमचा मुलगा काय करतो? किती पगार आहे त्याला? टाइप प्रश्नांची सरबत्ती अनोळखी नातेवाइकांकडून सुुरू होते तेव्हा तिथून सिदसारखा बऱ्याचदा पळ काढावासा वाटला आहे. आईबाबांशी तारस्वरात भांडणं होतात, तेव्हा स्वतःचं काहीएक करता येत नसतानाही सिदसारखं घर सोडून जावसं वाटलं आहे. आवडत्या कामात स्वतःला झोकून दिल्यावर आणि त्या कामाच्या मोबदल्याचा पहिला चेक मिळाल्यावर सिदला जसा आनंद होतो तसाच आनंद कुठल्याही वर्तमानपत्रात, वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखासाठी जेव्हा मानधन मिळतं तेव्हा होतो. अशा अनेक क्षणांतून सिद भेटत राहतो... धडका देत राहतो... माझ्यातलं स्वतःचं अस्तित्व अधूनमधून दाखवून देत राहतो.

गंमत म्हणजे आयेशा बॅनर्जीही तितकीच जवळची वाटत राहते. तिच्या प्रामाणिकपणाशी रिलेट करता येतं. सिदने "घरापासून एवढ्या दूर या अनोळखी शहरात एकटी राहतेस तू. तुला भीती नाही वाटत?' असं विचारल्यावर उगाच तो आपल्याला "जज' करेल, या भीतीपायी ती खोटं सांगत नाही. ती बिनधास्तपणे सांगते की, "भीती अर्थातच वाटते.' पण आपल्या स्वातंत्र्याची आपणच मोजलेली ही किंमत आहे, हे ती पक्कं जाणून आहे. लेखिका बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेली आयेशा "बॉम्बे बीट्स'मध्ये ऑफिस असिस्टंटची नोकरी पत्करते. तिच्या बॉसने "हे तुझ्या प्रोफाइलला मॅच होणारं नाही', हे स्पष्टपणे सांगूनही. त्यातूनच ती आपला मार्ग शोधते. बॉसच्या टेबलवर आपले लेख ठेवत राहते. कधीतरी तो ते वाचेल, या आशेवर. सिदच्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध असलेली आयेशा सिदशी सहज मैत्री करते. आपल्या जगात त्याला सहज सामावून घेते. तरीही आपलं सिदवर प्रेम आहे, हे तिला फार उशिरा कळतं. मी स्वतःपुरता विचार करत असताना मलाही हेच जाणवतं बऱ्याचदा की, "जवाब इतने दिनों से मेरी आँखों के सामने था. बस मैं ही पहचान नहीं पा रहा था.'


आयेशा स्वाभिमानी तर आहेच, पण चित्रपटात तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दिसतात. सिदच्या मित्रांनी तिला नवीन घरात सेटल व्हायला मदत केलेली असली, तरी तिच्या परवानगीशिवाय सिदने आपल्या मित्रांना तिच्या घरी बोलावणं तिला खपत नाही. शेजारी राहणाऱ्या सोनियाशी तिचा एक वेगळा कम्फर्ट झोन आहे. आपल्या बॉससह - कबीरसह - जॅझच्या मैफिलीला गेल्यावर कंटाळलेली ती सिदबरोबर कॅरिओकेला जाते, तेव्हा आपल्याला गाता येत नाही हे माहीत असूनही प्रेक्षकांसमोर "पहला नशा' म्हणते. सिदला ती आपल्या घरात आसरा देते, पण त्याच वेळेला "तू काय करतोयस स्वतःच्या आयुष्याचं? एवढा बिझनेस आहे तुझ्या वडिलांचा आणि तू माझ्या घरात बसून ऑम्लेट्स बनवतोयस?' हेही सांगत त्याला वेळीच जागं होण्याचीही जाणीव करून देते.

अयान मुखर्जीचा हा चित्रपट म्हणजे नातेसंबंधांची खोलवर रुजलेली पाळंमुळं शोधत त्यातल्या ओलाव्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. आपल्याबरोबर टवाळक्या करूनही रिषी पास झाल्यावर सिद चिडतो, तेव्हा त्यांच्या मैत्रीला गेलेला तडाही इथे स्पष्ट दिसतो. त्याचप्रमाणे नापासाचा शिक्का बसल्यामुळे स्वतःला पराभूत समजणाऱ्या सिदला आपण स्वतःही रोज डाएट करायचं ठरवतो आणि नापास होतो, हे सांगणारी, कुठल्याही परिस्थितीत त्याच्या सोबत असणारी लक्ष्मीही दिसते. सिदवर राग असणारी डेबीही तो रेस्टॉरंटमध्ये कठीण प्रसंगात सापडल्यावर त्याला मदत करताना दिसते. आयेशावर डाफरणाऱ्या म्हातारीला सिद मात्र तिचे फोटो काढत सहज हसवू शकतो. एकीकडे सोनिया आणि छोट्या संजूच्या आईची लटकी भांडणं आहेत, तर दुसरीकडे संजूचे फोटो काढण्यासाठी सिद आणि आयेशाला त्याच वरकरणी भांडकुदळ वाटणाऱ्या बाईने पोहे खायला घालणंही आहे. जसा आयेशा आणि तिचा बॉस कबीर यांच्यातल्या नात्याचा अॉकवर्डनेस आहे, तसाच सिद आणि तानियाच्या नात्याचाही लग्नसमारंभातल्या भेटीपासून "आपण एकमेकांसाठी नाही' या जाणिवेपर्यंतचा प्रवास आहे.

पालक आणि मुलांमधले नातेसंबंध या चित्रपटात अगदी सहजपणे येतात. भवतालातून टीपकागदासारखं सगळं शोषून घेतल्यासारखे. आयेशाच्या आईचं नखही चित्रपटात दिसत नाही. फक्त एका दृश्यात सिद घरातून निघून गेल्यावर आयेशा आपल्या आईशी फोनवर बोलताना दिसते. घरापासून दूर राहत स्वतंत्र आयुष्य जगतानाही तिने कुटुंबाशी असलेली नाळ तोडलेली नाही. याउलट सिदचे वडील राम मेहरा आणि आई सरिता मेहरा यांच्याशी सिदचं नातं तणावांनी भरलेलं आहे. आपण कष्ट करून इथवर पोहोचलो आहोत आणि याची तुला जराही जाणीव नाही, असं म्हणणारे सिदचे वडील कठोर भासत असले, तरी सिदचं बालपण त्यांनी त्याच्या फोटोंमधून जपल्याचं दिसतं, तेव्हा त्यांच्या मनाचा हळवा कोपरा उलगडतो. सिदची आई सरिता त्याच्यावर मनापासून प्रेम करतेय, पण नवऱ्याच्या पाठीशीही ती खंबीरपणे उभी आहे. सिद नापास झाल्यावर ती रागावते, मात्र तो घर सोडून गेल्यावर आयेशाच्या घरी ती त्याच्यासाठी स्वतः आंबे पाठवते. आयेशा तिला म्हणते की, "सिद और मैं... हमारे बीच वैसा कुछ है नहीं.' त्या वेळी सरिता तिच्या गालावरून हात फिरवते. त्या स्पर्शात अनंत गोष्टी सामावल्या आहेत. विश्वास आहे. प्रेम आहे. 

पिझ्झावर तुटून पडणाऱ्या सिदला ती प्रेमाने म्हणते, "ये सब क्यूँ खाते हो? घर में कितना अच्छा खाना बनता है', तेव्हा माझीच आई दिसते मला तिच्यात. नायकापेक्षा वयाने मोठ्या नायिकेबरोबरच्या प्रेमकथा नवीन नाहीत रुपेरी पडद्याला, पण इथे सिद आणि आयेशाचा रोमान्स खरा वाटतो. चित्रपटातील कॉस्मोपॉलिटन मुंबई, आयेशाचं ऑफिस, आयेशाचं घर, सिदच्या वडिलांचं ऑफिस, सिदचं घर, मरीन ड्राइव्ह, पाऊस, पब्ज हे सगळं इथे सिद आणि आयेशाच्या हळुवार फुलणाऱ्या प्रेमकथेचा अविभाज्य भाग म्हणून येतं आणि मग या सगळ्या निर्जीव गोष्टींमध्येही प्राण फुंकला जातो. इतक्या वर्षांनंतर पाहूनही पहाटे फुललेल्या फुलांसारख्या टवटवीत वाटणाऱ्या या चित्रपटाने स्तंभाची सुरुवात करण्याचं कारणही तसंच खास आहे. आयेशा म्हणते त्याप्रमाणे, "मेरा रायटर बनने का सपना पूरा हुआ जब मुझे ये कॉलम लिखने को कहा गया.' तिच्या स्वप्नाप्रमाणेच आज माझ्या यादीतलं एक स्वप्न पूर्ण होतंय. बाकी अजून काही सापडतंय का, हे शोधण्याचा प्रयत्न मात्र चालूच राहील. सिदपासून आयेशापर्यंत... आयेशापासून सिदपर्यंत...

लेखकाचा संपर्क - ७७३८३९४०२३