आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकलढ्यांचा कलात्मक आविष्कार ‘ॲक्टिव्हिस्टा’!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवराज मोहिते

कलावंतांच्या सामाजिक जाणिवा जागृत होतात तेव्हा परिवर्तनाला सहयोग आणि वेग मिळत असतो. स्वातंत्र्याचा एक नवा हुंकार माणगावच्या साने गुरुजी स्मारकाच्या विस्तीर्ण परिसरात ॲक्टिव्हिस्टामार्फत सुरू होतोय. वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय विषयांवर काम करणारे कार्यकर्ते आणि कलावंत एकत्र येऊन लोकलढ्यांचा हा कलात्मक आविष्कार मांडत आहेत.

१९३६ सालची गोष्ट... एका युद्धनौकेच्या अनावरण प्रसंगी नाझी समर्थकांकडून हात उंचावून हिटलरचा जयजयकार सुरू होता. पोशाखी नाझींमध्ये तो एकच माणूस असा होता, जो त्या समुदायात हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर होता हिटलरी हुकूमशाहीचा निषेध. त्याचं नाव होतं आॅगस्ट लँडमेस्सर. तो फोटो खूप प्रसिद्ध आहे...  हुकूमशाहीला सुरुंग लावणाऱ्या या घटनेचा फोटो काढला होता रेमंड डी ॲडरिओ यांनी. रेमंड हा हिटलर आर्मीचा अधिकृत फोटोग्राफर होता. पण तो केवळ हिटलरचेच फोटो काढत बसला नाही. अशा घटना त्याने टिपल्या की, पुढे त्यातून इतिहास उभा राहिला. त्याची किंमतही नंतर त्याला मोजावी लागली. रेमंडने काढलेला लँडमेस्सरचा तो फोटो बाणेदार स्वातंत्र्याचं प्रतीक ठरला. त्याकडे नुसता एक फोटो म्हणून पाहता येणार नाही. ते एका सजग आणि संवेदनशील कलाकाराचं इन्स्टाॅलेशन होतं. जगभरात अशा कलावंतांच्या इन्स्टाॅलेशन्सनी परिवर्तन घडवल्याचे दाखले आहेत. बर्लिनची भिंत ही कलाकारांच्या निषेधाचा कॅन्व्हास झाली आणि पुढे ती पडली. पुण्याच्या ‘एफटीआय’मध्ये संचालक म्हणून गजेंद्र चौहान या बथ्थड कलाकाराची नियुक्ती झाली आणि ‘कलावंत’ विद्यार्थ्यांनी एका खुर्चीवर मोठा दगड ठेवून आंदोलन केलं. त्यानंतर चौहानांना जावं लागलं. 

समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. यात कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. व्यक्त होणारा लेखक, कवी, कलावंत हा घटक संख्येने कमी असला तरी तोच समाजाचा ‘बॅलेन्स फोर्स’ असतो. प्रत्येक काळात पहिला घाव पडतो तो लेखक, कलावंतांवर. कारण शब्द, रेषा, रंग, आणि इतर माध्यमांतली सामाजिक, राजकीय भाष्य करणारी अभिव्यक्ती ही सत्तांधांना रुचत नसते. हुकूमशाही नाकारण्यासाठी तर ही अभिव्यक्ती लोकशाही व्यवस्थेत फार परिणामकारक ठरते. काही कलावंत त्याबाबत सक्रिय आहेत. अनेक देशांत तर मोठ्या प्रमाणात काही प्रयोग सुरू आहेत. मुंबईत काळाघोडा फेस्टिव्हल असो का केरळमधील ‘कोची बिनाले’ असो, इथले कलाविष्कार हे थक्क करणारे असतात. ‘कोची बिनाले’ मध्ये गावंच्या गावं रंगतात. सर्व माध्यमांतले कलाकार, सर्व पद्धतीच्या कला अगदी आॅडिओ-व्हिडिओसह इथे व्यक्त होत असतात. जगभरातून लोक यासाठी येतात. कुणी इतिहासाचे दाखले देत वर्तमानावर मार्मिक भाष्य करतो, कुणी ताज्या घटनांवर निर्भीडपणे व्यक्त होतो. कलाकारांची संकल्पना आणि मांडणी थक्क करणारी असते. विचाराला किती पैलू असू शकतात याची अनुभूती येते. हे सगळं पाहताना संकल्पनांच्या भव्यतेने भारावून जायला होतं. 

याच कोची बिनालेच्या निमित्ताने राजू सुतार यांचा संपर्क आला. राजू सुतार पेंटिंगच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय नाव. कोची बिनालेमधील क्युरेटर म्हणून त्यांचा लौकिकही अनुभवता आला. इंदापूरच्या आकार पाॅटरी आर्टचे राजेश कुलकर्णी यांच्यासमवेत राजू सुतार साने गुरुजी स्मारकात आले आणि स्मारकाचा भाग बनले. राजू सुतार, राजेश कुलकर्णी, वैशाली ओक, स्नेहल एकबोटे अशी कलाकारांची मांदियाळी होत गेली. स्मारकावर आर्टिस्ट कॅम्प होऊ लागले. संवादाचा हाच धागा पुढे सुरू राहिला. यातूनच कलाकाराला भूमिका असावी की नाही, अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा पुढे बऱ्याच गोष्टींना जन्म देणारी ठरली. वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय विषयांवर काम करणारे कार्यकर्ते आणि कलावंत एकत्र येऊन काही करावं ही संकल्पना पुढे आली. तुम्ही कार्यकर्ते सांगा, मी कलाकार बघतो. एक राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम करू, असं राजू सुतार म्हणाले. त्याचंच नाव - ॲक्टिव्हिस्टा ! 

अॅक्टिव्हिस्टाच्या या पहिल्या सत्रात दोन आंदोलकांसोबत काम करण्याचं ठरलं. ते दोघं कोण, हे निवडायला फार कष्ट घेण्याची गरजच नव्हती. गेल्या चार दशकांत या देशावर ज्या आंदोलनाचा प्रभाव राहिला ते म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. मेधाताई पाटकरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अजून जारी आहे. मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण होत असताना पर्यायी विकास नितीचा मुद्दा, विस्थापन, पुनर्वसन हे मुद्दे या आंदोलनाने एेरणीवर आणले. 


महाराष्ट्राला वळण देणारी दुसरी चळवळ म्हणजे गिरणी कामगारांचं आंदोलन. दत्ता सामंतांच्या संपानंतर गिरण्या बंद पडल्या. पुढे हे आंदोलन दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहिलं. कामगारांची देणी, घरांचा प्रश्न, शहर नियोजनात कष्टकऱ्यांचं स्थान हे सगळे प्रश्न घेवून गिरणी कामगार संघर्ष समिती काम करतेय. गिरण्या बंद झाल्या, पण कामगारांची तळपती तलवार अजून परजते आहे. योगायोग असा की या दोन्ही चळवळींना ३५ वर्षे पूर्ण होताहेत. त्यामुळे मेधाताई आणि इस्वलकर यांच्यासोबत ॲक्टिव्हिस्टाची तयारी सुरू झाली. 

यातला पहिला टप्पा असा होता की, या दोघांसोबत कलाकारांचा संवाद. ॲक्टिव्हिस्टा रेसिडेन्सी म्हणजे सात दिवसांचा वर्कशाॅपच होता. अनेक कलाकारांनी यात इंटरेस्ट दाखवला होता. मात्र ही संख्या मर्यादित ठेवायची हे ठरलं होतं. आॅस्ट्रेलिया, आसाम, आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून ९ कलाकार स्मारकावर पोहोचले. यात प्रख्यात सिनेदिग्दर्शक सुनील सुखथनकरही होते. मेधाताईंना यासाठी मनवणं आणि त्यांची आंदोलनं, कोर्टाच्या फेऱ्या, गावागावांतील बैठका यातून वेळ मिळवणं हीच तारेवरची कसरत होती. पण संजय मंगोंनी हे अवघड काम फत्ते केलं. दत्ता इस्वलकर हे नेहमी प्रमाणे उत्साही. प्रकृती नीट नसताना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते स्मारकावर पोहोचले. आंदोलक आणि कलाकार यांच्यातील संवादातून मग स्मारकांचा आसमंत तेजाळून निघाला. नवी प्रेरणा, नवी उर्जा या सहित रेसिडेन्सी पूर्ण झाली. एका नव्या जोमाने सहभागी कलाकार निघाले फिल्डवर्कला. मुंबईतील जुना गिरणगाव, गिरण्यांचा होणारा कायापालट, कामगारांची वस्ती, सहकार चळवळी, असा हा सगळा दौरा करत कलाकारांनी तो काळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग टीम निघाली नर्मदा खोऱ्यात. नर्मदेवरील धरणाच्या पाण्यात बुडालेली आणि अजून बुडत असलेली गावं. विस्थापित आदिवासी, शेतकरी यांचा न्यायासाठी होणारा प्राणांतिक लढा... ही सगळी विकासाच्या नावाने उद्भवलेली दाहकता कलाकार अनुभवत होते. 

या अंतर्मुखतेतून ॲक्टिव्हिस्टाचा पहिला टप्पा पार पडलाय. या सर्व अनुभूतीवर आता हे कलाकार  विविध कला माध्यमातून व्यक्त होणार आहेत. या कलाकृतींची मांडणी (इन्स्टॉलेशन) माणगावच्या साने गुरूजी स्मारकाच्या विस्तीर्ण परिसरात केली जाणार आहे. जानेवारी २०२० पासून सुरू झालेला रायगड ॲक्टिव्हिस्टाचा महोत्सव पुढे महिनाभर सुरू राहणार आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, लेखक, अभ्यासक, विद्यार्थी यांची रेलचेल असणार आहे. अनेक कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात हा नवा प्रयोग घडत आहे. कलावंतांच्या सामाजिक जाणिवा जागृत होतात तेव्हा परिवर्तनाला सहयोग आणि वेग मिळत असतो. स्वातंत्र्याचा एक नवा हुंकार ॲक्टिव्हिस्टा मार्फत सुरू होतोय. यातूनच आॅगस्ट लँडमेस्सेर याच्या सोबत ठामपणे उभी रहाणारी नवी फळी उभी राहायला बळ मिळेल यात शंका नाही. 


(लेखक आंतरभारती कला भवनचे अध्यक्ष आहेत.)
संपर्क - ८८९८०६१४३०
 

बातम्या आणखी आहेत...