आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा दाखवून देणारी निवडणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्हा परिषदेत सत्ता गमावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विदर्भातील तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये मतदारांनी आस्मान दाखवले. उर्वरित जि. प.मध्येही या पक्षाची काहीशी तीच अवस्था झाली. केवळ धुळे जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळाली, पण त्या यशाचे वाटेकरी अमरीश पटेल यांच्यापासून राजवर्धन कदमबांडे यांच्यापर्यंत कालचे काँग्रेसवासीच अधिक आहेत हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हालाच जनादेश दिला, अशी शेखी भाजप नेत्यांना फारशी मिरवता येणार नाही. एका अर्थाने ग्रामीण जनतेने विधानसभेवेळची भूमिका आता बदलली आहे. ती भाजपच्या अलीकडच्या वर्तनाची प्रतिक्रिया आहे का, हे तपासण्यासाठी त्या पक्षनेत्यांनी दक्ष व्हायला हवे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर झालेली ही पहिली मतचाचणी होती. या निवडणुकीतही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्कीच झाला. शिवसेना-भाजप पूर्वीप्रमाणे एकत्र असते तर आज नंदुरबार, वाशीम आणि पालघर या तीन जि.प. मध्ये भाजप सत्ताधारी पक्ष बनला असता. ते घडले नाही. पण शिवसेनेलाही थेट आणि मोठा फायदा झालेला दिसत नाही. या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आजही सत्तेत येऊ शकेल अशी स्थिती आहे. पण सत्तेच्या लोण्याचा गोळा तिघांमध्ये वाटला जाणार आहे. त्यात शिवसेनेच्या वाट्याला किती लोणी येईल हा प्रश्नच आहे. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वरील तीन जिल्हा परिषदांमध्ये केवळ या नव्या राजकीय समीकरणामुळे सत्तेची फळे चाखायला मिळणार आहेत. त्यामुळे फायदा झाला आहे तो या दोन्ही काँग्रेस पक्षांचा. भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकांतील एकूण विजयी उमेदवारांची संख्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे ५३ उमेदवार निवडून आले होते. या वेळी ती संख्या १०३ वर गेली आहे. म्हणजे जवळपास दुप्पट उमेदवार या वेळी निवडून आले आहेत. उद्या याचेही भांडवल भाजपचे राज्यभरातील प्रवक्ते करतील. पण शेवटी मतदारांनी या पक्षाकडे सत्ता सोपवली नाही हे कसे नाकारणार? शेवटी जनादेश हा सत्तेसाठी असेल तर तो जनादेश. बहुजन वंचित आघाडीला अकोला जिल्हा परिषदेत बहुमत मिळाले नसले तरी पुन्हा सत्ता स्थापन करता येईल, इतपत जागा त्यांना मिळाल्या आहेत. अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा गड बनला आहे आणि तो निदान जिल्हा परिषदेत तरी त्यांच्या पक्षाने सांभाळला आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाने खूप मोठ्या आशा निर्माण केल्या होत्या. पण भाजप आणि नंतर शरद पवार यांनी तयार केलेल्या वातावरणात प्रकाश आंबेडकरांच्या या पक्षाचा ठाव लागला नाही. जिल्हा परिषदेची ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर होत असली तरी शेवटी ज्याला त्याला मतदारांनी त्यांची त्यांची जागा दाखवली आहे हेच खरे.  

बातम्या आणखी आहेत...