आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भरते दप्तराविना शाळा; माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अभिनव उपक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता शासनाने परिपत्रक काढले मात्र ते केवळ कागदावरच राहिले आहे. अद्याप ही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झालेले नाही. असे असताना माढा तालुक्यातील उंदरगाव ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मात्रा दप्तराविना भरत आहे.

तुम्ही अचंबित होणं साहजिकच आहे. मात्र हे खरे आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे पाहुन या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांनी पुढाकार घेत बिपिन कदम, धोंडिराम कांबळे, कुमुदिनी गिड्डे, या शिक्षकांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी या शाळेत विद्यार्थी दप्तराविना येतात. या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या बाहेरचे ज्ञान दिले जाते. त्यामुळे चिमुकल्यांना देखील या दिवशी  पुस्तकांच्या बाहेरची दुनिया अनुभवता येते.

या दिवशी मुले देखील आनंदुन जातात.
पाटी, खडु, पेन्सील, वही, पेन, फळा काहीच नसल्याने मुलांना या दिवशी आपरुकच वाटतं. शनिवार प्रमाणेच दररोज दप्तराविना शाळा भरावी अश्या प्रतिक्रिया चिमुकल्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना मांडल्या. 

शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरु केला गेला असून इतर दिवशी देखील असा प्रयोग राबविण्याचा शाळेचा मानस आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासंदर्भात एक परिपत्रक काढले होते. त्यात विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के दप्तराचे ओझे असावे असे निर्देश दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात या परिपत्रकाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अश्यातच एक दिवस का होईना उंदरगाव शाळेने प्रत्यक्षात दप्तराच्या ओझ्या संदर्भात केलेली अंमलबजावणी स्तुत्य अशीच आहे. ग्रामस्थांच्या  लोकवर्गणीतुन या शाळेचे रुपडे पालटले आहे. भिंतीवर चित्रातुन विविध सामाजिक संदेश दिलेले आहेत.

गुणवत्तेत देखील ही शाळा अग्रेसरच आहे. या उपक्रमांमुळे पालक देखील कमालीचे खुष आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळेचा पट 121 वरुन 140 वर पोहचला आहे. असा उपक्रम राबविणारी उंदरगाव जि.प.शाळा राज्यापुढे आदर्शदायी असुन इतर शाळांसाठी अनुकरणीय आहे.
 

शनिवारचे  घेतले जातात हे उपक्र
शनिवारी या शाळेत पुस्तकाबाहेरचे सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. बाजारपेठेतील व्यवहार, बँक-पतसंस्थेतील व्यवहार, विविध शासकीय कार्यांलयाना भेटी, समाजातील राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्राविषयी माहिती देऊन माढा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात क्षेत्र व संस्थाच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांना नेले जाते. विद्यार्थ्यांच्या अंगभुत सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धा घेतल्या जातात.
 
दररोज सकाळी पाठीवर ओझे घेऊन विद्यार्थी शाळेत जातात. मात्र येताना दारातुनच दप्तर फेकून देतात. ओझ्यासंदर्भात शासनाने ठोस पावले उचलेली नाहीत. मात्र या शाळेने शासनाच्या शिक्षण खात्याच्या डोळ्यात अंजनच घातले आहे. विद्यार्थी देखील शनिवारी आनंदाने शाळेत जातात. त्यांच्या या उपक्रमाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घ्यावी - अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. 

मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे पाहुनच आम्ही हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग आम्ही सुरु केल्याने एक दिवस का होईना मात्र विद्यार्थ्याची ओझ्यापासुन मुक्तता होते. या उपक्रमाकरिता आणखी दिवस वाढवण्याचा नियोजन करीत आहोत. पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजातील परिसरातील गोष्टींचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे. यामुळे व्यवहार कौशल्य आत्मसात होतात. 
- नंदकिशोर कापसे, मुख्याध्यापक, 
जि.प.प्राथमिक शाळा उंदरगाव ता.माढा 
 

बातम्या आणखी आहेत...