आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम न करण्याची शपथ अन् माझ्या लग्नाची गोष्ट

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'तू स्वत:हून तुझा जीवनसाथी शोधला, याचा मला खूप आनंद झाला'

तनुजा मुनघाटे - प्रजापती

tanuja.munghate@gmail.com


काही दिवसांपूर्वी अमरावतीची एक बातमी वाचण्यात आली आणि खूप वाईट वाटलं. ‘व्हॅलेन्टाईन डे’ला एका कॉलेजमध्ये तिथल्या प्राध्यापकांनी मुलींना, ‘आम्ही प्रेम करणार नाही आणि प्रेमविवाह सुद्धा करणार नाही’, अशी शपथ घ्यायला लावली. मला फारच वाईट वाटलं या घटनेचं. ज्या मुलींनी शपथ घेतली; म्हणजे ज्यांना घ्यावी लागली, त्यांना आयुष्यात कधी प्रेम करण्याचा आणि प्रेमविवाह करण्याचा अधिकारच नाही का, खरंच प्रेम आणि प्रेमविवाह या गोष्टी इतक्या वाईट असतात का, असे प्रश्न मी स्वतःलाच विचारले आणि माझ्या लग्नाची गोष्ट सांगावीशी वाटली.

मी आज खरोखरच खूप आनंदी आहे. कारण माझ्या किंवा देवांगच्या आई-बाबांकडून कोणत्याही विरोधाशिवाय आमच्या लग्नाला सहज परवानगी मिळाली होती. देवांग गुजराती आहे आणि मी मराठी. याशिवाय, आमच्या कौटुंबिक स्थितीत अनेक गोष्टी असमान. पण, आम्हा दोघांसाठी एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे आमचे एकमेकांवरील प्रेम. तीच गोष्ट मला मोठी वाटत होती. त्या प्रेमापुढे जात-धर्म किंवा संस्कार-संस्कृती याचा आम्ही कधी विचार केला नाही की कधीच चर्चा केली नाही.


लग्नापूर्वी चार वर्षे आम्ही गुजरातमधील गांधीनगरच्या  ‘निफ्ट’मध्ये (National Institute of Fashion Technology) सोबत शिकत होतो. आम्ही दोघेही चांगले मित्र होतो आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतले होते. मला अजूनही आठवते, जेव्हा मी माझ्या आई आणि बाबांना देवांगबद्दल प्रथम सांगितले. खरं म्हणजे, आधी आईलाच सांगितलं. आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत बाबांना ती बातमी कळलीच. दुसऱ्याच दिवशी मी प्रथम माझ्या बाबांना कॉल केला आणि मी काहीही बोलण्यापूर्वी ते म्हणाले, ‘बेटा, मी तुझ्या निर्णयामुळे खूप खूष आहे. 


तू स्वत:हून तुझा जीवनसाथी शोधला, याचा मला खूप आनंद झाला. तू आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय स्वतः घेऊ शकतेस, याचा मला खूप अभिमान आहे’. माझ्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या आयुष्याच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची परवानगी दिली. बाबांनी मला फक्त तीन प्रश्न विचारले होते. देवांग कुठला आहे, त्याने त्याच्या आई-वडिलांना विचारलं आहे का आणि लग्नानंतर तुमचं काय प्लॅनिंग आहे? मी दिलेल्या उत्तरावर त्यांनी चर्चा केली आणि सहमती दर्शवली.

एक दिवस मुंबईत नरिमन पॉइंटला दुपारी मी आई-बाबांची देवांगशी भेट घडवून आणली. मला आजही एका गोष्टीचे विशेष वाटते, की आई-बाबांनी देवांगला त्याची जात-धर्म असे प्रश्न विचारलेच नाहीत. बाबांनी त्याला सुद्धा तीन प्रश्न विचारले. लग्न कधी करणार, त्याच्या पालकांचे लग्नाविषयी काय म्हणणे आहे ? म्हणजे ते नोंदणी पद्धतीने लग्नाला तयार होतील का? आणि लग्नानंतर सेटलमेंटची काय योजना आहे वगैरे. लग्नानंतरचे काही संभाव्य प्रश्न सांगून त्यांनी आम्हाला विचार करायला वेळ दिला. पुढे काही दिवस यावर चर्चा होऊन सगळेच प्रश्न सुटले. माझं लग्न होत असेल, तर मलाच माझा जोडीदार निवडावा लागेल, कारण मी आयुष्यभर त्याच्याबरोबरच जगणार आहे, ही गोष्ट माझ्या आई-बाबांनी समजून घेतली. त्यांचा हा प्रतिसाद मला खूप महत्वाचा वाटतो. दोन वेगवेगळ्या  समाजातील किंवा धर्मातील तरुण-तरुणींमध्ये प्रेम जुळून आले, तर काय परिणाम होतात, हे मी आजूबाजूला बघितले होते. आपल्या समाजात ‘प्रेम’ ही एक चांगली गोष्ट नेहमीच वादग्रस्त विषय का होते, हे मला कधी समजलेच नाही. वयात आलेल्या मुला-मुलींचे प्रेम समाज का स्वीकारत नाही, असा प्रश्न पडतो. काही कुटुंब प्रेम आणि प्रेमविवाह स्वीकारत नाहीत, बरीच कुटुंब ‘लव्ह मॅरेज’ स्वीकारतात, पण ते एकाच जातीतील किंवा सारख्याच आर्थिक स्थितीतील. मात्र, आजही अधिकाधिक प्रेम विवाहांना विरोध होतो, तो केवळ जात आणि धर्म यांच्यातील भिन्नतेच्या मुद्द्यावरुनच. याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला माझ्या पालकांनी समजून घेतलं. आज देवांग आणि मी खूप आनंदी आहोत. माझे आई-वडील आणि माझे सासू-सासरे पण खूप समाधानी आहेत.

बातम्या आणखी आहेत...