आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाेक चव्हाण यांच्या पराभवाने राजकारणावर दूरगामी परिणाम; केवळ वंचित बहुजन आघाडीमुळेच बालेकिल्ला ढासळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यांच्या पराभवामुळे जिल्ह्याच्या राजकारणाने कूस बदलली असे मानले जाते. अशोक चव्हाणांना या पराभवाचे सखोल चिंतन करावे लागणार आहे.  अशोक चव्हाण हे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आहेत. दोन वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. अनेक वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. नांदेड जिल्ह्यावर त्यांची मजबूत पकड  आहे. त्यांचा पराभव होईल याचा विचारही कोणी करीत नव्हते. तथापि प्रताप पाटलांनी ते करून दाखवले. चव्हाणांच्या पराभवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते चिखलीकरापर्यंत सर्वांनी शक्ती पणाला लावली. त्यात त्यांना यशही आले. 
केवळ वंचितमुळे पराभव  : चव्हाणांचा पराभव हा भाजपच्या प्रताप पाटलांनी केला असला तरी खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. यशपाल भिंगे याला कारणीभूत ठरले. भिंगे यांनी १ लाख ६५ हजार ३४० मते  घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत व्होट बँकेला भगदाड पडले. चव्हाणांची हमखास मिळणारी मते वंचितकडे वळली आणि त्याचा फायदा भाजपला झाला. अशोक चव्हाणांच्या पडतीच्या काळातही भोकर, नांदेड  उत्तर व नांदेड दक्षिण हे विधान सभा मतदार संघ त्यांच्या बाजूने उभे राहिले. भोकरमध्ये त्यांना ४ हजार ७८६ मतांची आघाडी मिळाली. नांदेड उत्तरमधून सर्वाधिक ३० हजार ११७ मतांची आघाडी मिळाली. तर नांदेड दक्षिणमधून ४ हजार ८६४ मतांची आघाडी मिळाली. २०१४ च्या निवडणुकीतही चव्हाणांना भोकरमधून २३ हजारांची तर नांदेड उत्तर व दक्षिणमधून ७० हजाराची आघाडी मिळाली. यावेळी वंचितने मते खाल्ल्याने ती कमी झाली. 

 

राजकारणाचा केंद्रबिंदू बदलला : आजपर्यंत जिल्ह्यात अशोक चव्हाण हेच राजकारणाचे केंद्रबिंदू होते. त्याचे कारण केंद्रात व राज्यात काँग्रेस आघाडीचीच सरकारे होती. परंतु आता हे समीकरण बदलले. केंद्रात मोदींची घट्ट पकड आहे. राज्यात सध्या युती शासन आहे. चव्हाणांसारख्या मातब्बर नेत्याला हरवून प्रताप पाटील यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता  किमान जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू तरी ते राहणार आहेत. अशोक चव्हाणांना आता आपल्या राजकीय कारकीर्दीची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. व्यक्तिगत अशोक चव्हाणांबाबत कोणाचीही नाराजी नाही. त्यानंतरही हा पराभव का झाला याचे सूक्ष्म विश्लेषण त्यांना करावे लागणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष अमेठीत हरले, महाराष्ट्राचे प्रभारी खरगे गुलबर्गामध्ये हरले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नांदेडमध्ये हरले. पराभवाची ही उतरंड का झाली याचा काँग्रेसलाही सखोल विचार करावा लागणार आहे. निवडणुकीत जय पराजय होतच असतात. परंतु असा दारुण पराभव का झाला याचे आत्मचिंतन होणे काँग्रेसच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे.   
 

 

मराठवाड्यासाठी धक्कादायक 
अशोक चव्हाणांचा पराभव मराठवाड्यासाठी धक्कादायक आहे.   त्यांच्या इतका उंचीवर पोहोचलेला सक्रिय नेता काँग्रेसमध्ये नाही. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर मराठवाडा नेतृत्वाच्या बाबतीत पोरका झाला. शिवराज पाटील चाकूरकर आहेत, पण ते मासबेस लीडर नाहीत. अशोक चव्हाण मासबेस लीडर आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. दोन वेळा मुख्यमंत्री आणि अनेक वर्षे मंत्री राहिल्याने त्यांना राज्यात सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे त्यांचा पराभव नांदेड जिल्ह्यासाठी तर धक्कादायक आहेच, पण मराठवाड्यासाठीही धक्कादायक आहे. 

 

२०१४ ची स्थिती 
२०१४ च्या निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना आणि सर्वत्र काँग्रेसची पडझड होत असतानाही अशोक चव्हाणांनी नांदेडची जागा चांगल्या मताधिक्क्याने जिंकली होती. त्या निवडणुकीत चव्हाणांना ४ लाख ९३ हजार ७५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे डी.बी.पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मते मिळाली. त्यावेळी राजरत्न आंबेडकरही रिंगणात होते. परंतु त्यांना केवळ २८ हजार ४४७ मते मिळाली. परंतु या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने दलितांची सर्व मते आपल्या बाजूने वळवली. त्यासोबत काही मुस्लिमांची मते आणि इतर वंचित घटकातील मते आपल्या बाजूने वळवली. त्यामुळे अशोक चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला.

 

प्रताप पाटील चिखलीकरांना भरघोस आघाडी

नायगाव, देगलूर व मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघांनी प्रताप पाटलांना भरघोस आघाडी देऊन विजय मिळवून दिला. नायगावमधून २० हजार ६४१, देगलूरमधून २५ हजार ५१५ तर मुखेडमधून सर्वाधिक ३५ हजार ८२६ मतांची आघाडी चिखलीकरांना मिळाली. त्यांच्या विजयाचे शिल्पकार हे तीन मतदार संघ ठरले.