आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 तास पडून होते अपघातातील बेशुद्ध आणि मृत व्यक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- तालुक्यातील रावेर बारी येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे बेशुद्ध दुचाकीचालक व मृत असे दोघे ११ तास पडून होते. सोमवारी सकाळी गावकरी व पोलिस आल्यानंतर बेशुद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.


मध्य प्रदेशातील सेंधव्यापासून जवळ असलेल्या असली या गावातील कादऱ्या गाेविंदा पावरा व समकाऱ्या गोट्या पावरा हे दोघे मोटारसायकलने शहरात आले होते. रावेर बारीजवळ असलेल्या एका स्ट्रोन क्रशरवर त्यांचा नातलग कामाला आहे. त्याची भेट घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. या वेळी समकाऱ्या मोटारसायकल चालवत होता. तर कादऱ्या हा मागे बसला होता.

 

रावेर बारी येथून जाताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात कादऱ्या व समकाऱ्या दोघेही दगडावर फेकले गेले. या घटनेत कादऱ्याचा मृत्यू झाला. तर समकाऱ्या हा बेशुद्धावस्थेत रात्रभर पडून होता.नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी रावेर बारी येथून वाहतूक सुरू झाली. त्या वेळी दोन जण रस्त्याजवळ पडून असल्याचे दिसले. त्यापैकी एक मृत तर दुसरा बेशुद्ध होता. काही अंतरावर त्यांची मोटारसायकल होती. याची माहिती मिळताच तालुका पाेलिसांना कळवण्यात आले. पोलिस येईपर्यंत जखमी समकाऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आले.

 

पोलिस उपनिरीक्षक विनोद वसावे, हेडकॉन्स्टेबल आर. यू. मोरे, गावित यांचे पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुपारी रुग्णालय गाठले. तोपर्यंत समकाऱ्या शुद्धीवर आला. त्याला विचारणा केल्यावर स्वत: व मृत कादऱ्याचे नाव त्याने सांगितले. तसेच रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. घटनेबद्दल तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी आर. यू. मोरे तपास करत आहेत.


... तर वाचला असता प्राण
रावेरबारी व परिसरात सायंकाळनंतर सहसा कोणी फिरकत नाही. रात्रीच्या वेळी या ठिकाणी वाहने अडवून लूट केली जाते. प्रसंगी मारहाणही होते. त्यामुळे सायंकाळनंतर वाहनचालक या परिसरातून जाणे टाळतात. समकाऱ्या व कादऱ्या यांच्या अपघातानंतर कोणतेही वाहन याच कारणामुळे येथून फिरकले नसावे. त्यामुळेच दोघांबद्दल अकरा तासांपर्यंत काेणालाही माहिती नव्हती

बातम्या आणखी आहेत...