Home | Magazine | Rasik | An unhealthy Feelings article by Nilesh Manadane

एक अस्वस्थ करणारी अनुभूती...

नीलेश मदाने | Update - Dec 09, 2018, 12:29 AM IST

या कादंबरीच्या माध्यमातून एका चांगल्या कथासूत्राची म्हणजे ‘प्लॉट’ची हाताळणी माजी अधिकारी तथा पत्रकार-लेखकाने केली आहे.

 • An unhealthy Feelings article by Nilesh Manadane

  मंत्रालयीन निर्णयाच्या भोवती पिंगा घालणारे अनेक हितसंबंधी गट आणि त्यातील ताणतणाव या समकालीन वास्तवावर स्पष्ट भाष्य करणारी कादंबरी म्हणजे पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी साकारलेली ‘रेड टेप' होय...

  या कादंबरीच्या माध्यमातून एका चांगल्या कथासूत्राची म्हणजे ‘प्लॉट’ची हाताळणी माजी अधिकारी तथा पत्रकार-लेखकाने केली आहे. त्यायोगे, वास्तवावर कल्पिताचे झालेले खुमासदार लेपन, या दृष्टीने सामान्य वाचकांबरोबरच पत्रकार, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, सर्व स्तरांवरील अधिकारी यांनी आपल्या भवतालावर आपल्यातल्याच एकाने टाकलेला हा प्रकाशझोत अनुभवायलाच हवा.

  त्रालय म्हणजे प्रत्येक राज्याचं सर्वशक्तिमान शक्तिस्थळ! लोकहिताच्या अनेक निर्णयांचं हे जसं उगमस्थान तसंच लालफितीने विकासाची वाट अडवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचे आश्रयस्थानसुद्धा. संवेदनशीलता आणि संवेदनशून्यता इथं एकाच वेळी गुण्यागोविंदाने नांदताना दिसते. जी. आर किंवा अध्यादेशाच्या एका फटकाऱ्याने समाजाच्या शेवटच्या घटकाला या वास्तूमुळे दिलासा मिळतो, तर लालफितीची पोलादी चौकट लोकहिताच्या चांगल्या कायद्याचीसुद्धा वाट लावू शकते, ती इथल्याच वास्तुदोषामुळेच. लोकशाहीतील चार प्रमुख स्तंभांपैकी प्रभावशाली असलेला हा स्तंभ अंगीभूत शक्तिसामर्थ्यामुळे अनेकांना विशेषत: चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधींना नेहमीच आव्हानात्मक वाटतो. मंत्रालयीन निर्णयाच्याभोवती पिंगा घालणारे अनेक हितसंबंधी गट आणि त्यातील ताण-तणाव या समकालीन वास्तवावर स्पष्ट भाष्य करणारी कादंबरी म्हणजे पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी साकारलेली ‘रेड टेप' होय.

  पत्रकारितेतील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे दोन वर्षे अधिकारी पदावर बजावलेली सेवा आणि त्यानंतर शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पुन्हा पत्रकारिता, असा दोन्ही बाजूंचा अनुभव गाठीशी असल्याने कादंबरीत निवडण्यात आलेले प्रसंग आणि पात्र वाचकांना शेवटचे पान वाचेपर्यंत खिळवून ठेवतात. व्यवस्थेविरुद्ध उभे राहणे हे सोपे काम नाही. फार थोडे अधिकारी आणि सरळ मार्गी नेते आपल्या कारकीर्दीमध्ये ही जोखीम स्वीकारतात. वांद्रे शासकीय वसाहत विकसनाच्या प्रकरणात वांद्रे जिल्हाधिकारी महेश राऊत यांना कोणकोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांना या मिशनमध्ये जया – अभी ही पत्रकारांची जोडगोळी कशी साथ देते याची उत्कंठावर्धक कथा आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळते. कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्याला समाज आणि प्रसिद्धी माध्यमे तेवढ्यापुरते डोक्यावर घेतात परंतु नंतर त्यांचे काय होते हा पुन्हा अभ्यासाचा एक वेगळा विषय आहे.

  वांद्रे वसाहत विकास प्रक्रियेत लोकहितासाठी ठामपणे लढत आपली नोकरी पणास लावणारे वांद्रे जिल्हाधिकारी महेश यांना वरिष्ठ अधिकारी, ‘वर्षा' नामक ‘हितचिंतक’ बॅचमेट, बिल्डर लॉबी, सामाजिक कार्यकर्ते कसे समजावण्याचा खरे तर ‘घेरण्याचा' प्रयत्न करतात, ते वास्तव अभिजित यांनी फारच मार्मिकपणे चितारले आहे. कादंबरीत या संदर्भातील प्रसंग जिवंत करतांना त्यांनी शासकीय सेवेत असतांनाचे आपले निरीक्षण आणि चिंतन यांचा खुबीने वापर केला आहे. मुख्य सचिव हे महेश यांना त्यांच्या ठाम भूमिकेसंदर्भात समजावताना म्हणतात, ‘चढते सूरज को सलाम करना हमारे लोग बहुत अच्छे तरह से जानते है, लेकिन जब वह ढलने लगता हे तो यही लोग दोनो हाथों से तालिया पिटकर उसे अलविदा कर देते है!’प्रसिद्धी माध्यमांबाबत विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत देखील अभिजित काही प्रसंगांच्या माध्यमातून नेमकेपणाने भाष्य करतात. ‘Television is a Democracy at its ugliest’ हे एका प्रसिद्ध अमेरिकन लेखक, कादंबरीकाराचे वाक्य ही कादंबरी वाचताना वेगळ्या अंगाने आपल्याला सतत आठवल्या वाचून राहत नाही. नीर-गाठ-उकल जितकी योग्य तितकी कादंबरी यशस्वी असे म्हटले जाते. मंत्रालयात लागलेल्या आगीच्या घटनेचा कादंबरीकाराने नेमकेपणाने वापर करून कादंबरीचा परमोच्च बिंदूवर शेवट केला आहे. साहित्य निर्मितीत ‘सत्य’, ‘प्रत्यक्ष’ आणि ‘कल्पित’ याचे बेमालूम मिश्रण असायला हवे जे या कादंबरीत निश्चितच जाणवते.

  ठाशीव व्यक्तिरेखा असल्याशिवाय कोणतीही कलाकृती मग तो चित्रपट असो अथवा कादंबरी वा नाटक, रसिकांच्या मन:पटलावर ठसा उमटवू शकत नाही. त्या दृष्टीने महेशची व्यक्तिरेखा उठावदार असली तरी आणखी काही व्यक्तिरेखा अधिक ठाशीव करता आल्या असत्या असे वाटते. कादंबरीची रंजकता वाढवण्यासाठी वाचकांच्या मनात विस्मय आणि हुरहूर सतत सुरू ठेवणे आवश्यक असते, त्याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतली असली तरी काही लांबलेले तपशील टाळता येऊ शकले असते. या कादंबरीच्या माध्यमातून एका चांगल्या कथासूत्राची म्हणजे ‘प्लॉट'ची हाताळणी माजी अधिकारी तथा पत्रकार-लेखकाने केली आहे. त्यायोगे, वास्तवावर कल्पिताचे झालेले खुमासदार लेपन, या दृष्टीने सामान्य वाचकांबरोबरच पत्रकार, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, सर्व स्तरांवरील अधिकारी यांनी आपल्या भवतालावर आपल्यातल्याच एकाने टाकलेला हा प्रकाशझोत अनुभवायलाच हवा. कारण पदोपदी माफियाशाहीचे अडथळे ओलांडत जिणं पुढं ढकलत असलेले लोकशाहीतले सामान्यजन ‘गॉडफादर’ कादंबरीचं ब्रीद असलेल्या Behind every great fortune, there is a crime ची दाहक अनुभूती रोजच घेत असतात...

Trending