Home | Magazine | Madhurima | Anagha Barve Malshe writes about Horsegram usal

कुळथाची उसळ

अनघा बर्वे - मालशे, पुणे | Update - Aug 28, 2018, 12:34 AM IST

रोजच्या जेवणातले किती तरी पदार्थ मला आई, आजी अगदी पणजीआजीपर्यंत घेऊन जातात, किती तरी पदार्थ सासूबाईंनी त्यांच्या सासूबाई

 • Anagha Barve Malshe writes about Horsegram usal

  रोजच्या जेवणातले किती तरी पदार्थ मला आई, आजी अगदी पणजीआजीपर्यंत घेऊन जातात, किती तरी पदार्थ सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंच्या पद्धतीने शिकवलेलेसुद्धा आहेत. आठवणीत गुंफलेले आणि आठवणींनी गुंफलेले असे हे पदार्थ. त्या सगळ्या पदार्थातून मग मी ‘कुळथाची उसळ’ निवडली. मला अतिशय आवडणारी ही उसळ. आम्ही लहानपणी दर सुट्टीत रत्नागिरीला जायचो, तेव्हा आजी प्रेमाने करत असलेल्या अनेक पदार्थांमध्ये ‘कुळथाची उसळही’ असायचीच!


  एकदम साधी, सोपी, खूप मसाले नसलेली अशी ही कुळथाची उसळ. उष्ण असल्यामुळे गरोदर बायकांनी खाऊ नये असं म्हणतात. यावरून आठवलं, माझ्या माहेरी सगळ्यांनाच ही उसळ खूप प्रिय आहे. त्यावेळी आम्ही सुट्टीत नेहेमीप्रमाणे रत्नागिरीला गेलो होतो आणि माझी आत्या बाळंतपणासाठी आली होती, घरात पाय ठेवताच तिने आजीला सांगितलेलं आठवतंय, “मला कुळथाची उसळ खावीशी वाटतेय.” आजीला काय करावं कळेना, लेकीचं मन मोडवेना! तिने मग डाॅक्टरांना विचारून त्यांची परवानगी घेऊन उसळ केली पण आत्याला चमचाभरच खायला देऊन तिने परत खाऊ नये हे पटवलं होतं. नकळत अशा परिस्थितीत कसं वागावं याचे धडे दिले होते.


  माझ्या सासरी क्वचितच होत असे ही उसळ. पूर्वी मी करत असे पण नंतर कुठेतरी विस्मरणात गेली बहुदा. गेल्या वर्षी एका काकूकडे जेव्हा ही उसळ खाल्ली तेव्हा तिची आठवण झाली आणि तेव्हापासून मात्र मी सासरीही बरेचदा ही उसळ करू लागले. गेल्या आठवड्यात परत एकदा उसळ केली. केल्यावर आईकडे घेऊन गेले, आईने ती खाताच लगेच “अगदी वहिनींच्या (म्हणजे माझ्या आजीच्या) उसळीची आठवण झाली,” असं सांगितलं. यापेक्षा मोठ्ठं वेगळं कौतुक काय असू शकतं?


  कृती : उसळ करण्यासाठी कुळीथ १०/१२ तास भिजवून, उपसून, फडक्यात बांधून ठेवावे. मोड आले की, कुकरमध्ये शिजवून घ्यावे. फोडणीमध्ये मोहरी, हिंग, लाल मिरची, गोडा मसाला, हळद घालून शिजवलेले कुळीथ घालावे. मीठ, गूळ आणि ओलं खोबरं घातलं की झाली उसळ तयार.


  - अनघा बर्वे - मालशे, पुणे
  anaghamalshe@gmail.com

Trending