आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणी पुरी स्वस्त नि मस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनघा कऱ्हाडे

दिवाळीच्या धामधुमीत एखादा पदार्थ बिघडतोच. काही जणींचा त्यामुळे त्रागा होतो, तर काही जणी पुन्हा त्या वाटेला जात नाहीत. मात्र काही उत्साही सुगरणी बिघडलेल्या पदार्थामधूनही काहीतरी भन्नाट तयार करतात. बिघडलेल्या चकलीचे काटे टोचल्यानंतर उरलेल्या पिठातून मऊसूत पुऱ्यांची वाट शोधणाऱ्या हौशी सुगरणीचा अनुभव....
 

यावर्षी मी भाजणीच्या चकल्यांऐवजी मैद्याच्या उकडीच्या चकल्या करायचं ठरवलं. दोन किलो मैद्याच्या उकडीत शिजवलेली मूगडाळ घातली. तिखट, मीठ, हिंग, धन्या-जिऱ्याची पूड, तीळ  टाकून त्यात मोहनरावांचं समर्पणही केलं. तिंबलेल सारण सोऱ्यात घालून सुरेख काटेरी चकल्याना बसवलं पेपरवर, पहिल्या चार जणींना सोडलं पोहायला उकळत्या तेलात. वाटलं काटेरी, खुसखुशीत, खमंग चकलीबाई येतील वर. पण कसलं काय, चकलीचं फदफद आलं की वर पोहून. ही काय जादू म्हणून  पुढल्या चौघींचंं समर्पण केलं तेलात. पण पुन्हा तेच. मनाशीच म्हटलं मोहनराव जास्त झालेत, थोडं गव्हाचं पीठ मिसळू म्हणजे होईल व्यवस्थित. पुन्हा नवीन प्रात्यक्षिक, आता फदफद्याऐवजी वातड पापडीबाई अवतरल्या. डोंगराएवढा उंडा माझा बीपी वाढवायला लागला. मग सल्ल्यासाठी फोनाफोनी, मंद आच, मध्यम आच, लाकडी सोऱ्या, पितळी सोऱ्या, सैल पीठ, घट्ट पीठ या गोंधळात चकलीबाई कुठे चुकल्या कळेचना. एव्हाना पोरांच्या चकलीसाठी चकरा सुरू झाल्या. मी गांगरले. मग काढलं माळ्यावरचं पाककृतीचं पुस्तक. माझ्या पाककृतीशी साधर्म्य असलेली तांदळाच पीठ घालून केलेली कोकणीपुरीची पाककृती मला सापडली. मग झटपट तयार  झाल्या माझ्या कोकणी पुऱ्या. हिरमुसल्या पोरांची काढली समजूत. पण आता हा पुऱ्यांचा ढिगारा संपवायचा कसा? तेवढ्यात माझं शेंडेफळ आलं की ओरडत. आई, आपल्या कॉलनीत आनंदनगरी भरलीय, आपण जायचं का खायला? माझ्या डोक्यात चमकली वीज. म्हटलं, खायला नाही, खाऊ घालायला जायचं. आपण तिथे पुऱ्यांचं दुकान लावूयात. सॉसची बाटली, पेपर प्लेट, टेबल खुर्ची सगळं साहित्य केलं गोळा. अज्ञानात आनंद. शेंडेफळ लागलं नाचायला. सगळा जामानिमा घेऊन लावला स्टॉल. काय आश्चर्य, पाणीपुरी, भेळच्या स्टॉलवरची गर्दी वळली की कोकणी पुरीकडं. माझ्या घरात दीनवाण्या बसलेल्या कोकणी पुरीला भाव आला. कांदे विकून शेतकरी जसा खुश होतो तसंच माझं कोकणी पुरी विकून झालं. अवघ्या दोन तासांत खेळ खल्लास. कोकणी पुऱ्या विकून तेराशे रुपयांची विक्रमी कमाई करून आम्ही घरी परतलो.  मी मात्र मनातल्या मनात देवाचे आभार मानून भाजणीच्या चकल्या करायला पदर खोचला. 

लेखिकेचा संपर्क : ९७६३४४८१३७

बातम्या आणखी आहेत...