आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय मांडके 

सातारा - सातारा लोकसभा पोटनिवडणूक व जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक नेत्यांनी रान उठवले आहे. आघाडी व महायुतीच्या बाजूने दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार हे जिल्ह्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी सभा झाली. महायुतीबद्दल नाराजी आहे, पण नरेंद्र मोदींच्या सभेमुळे काही फरक पडेल असे महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा? यावर सध्या चर्चा सुरू आहे. 

संथ वाहते कृष्णामाई... ही सातारकरांची कृष्णा नदीबद्दल असणारी भावना, ही कृष्णामाई महाबळेश्वरमध्ये उगम पावते आणि वाई, सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यांतून पुढे सांगली जिल्ह्यात जाते. साताऱ्यातून वाहत असताना कृष्णेचा प्रवास सुरू असताना कुडाळी, वेण्णा, वंगणा, उरमोडी, तारळी, उत्तर मांड, दक्षिण मांड, कोयना या नद्या येऊन मिळतात. 

सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचाच नव्हे, तर एकेकाळी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कृष्णाकाठ राहिल्याचे दिसून येते. कृष्णा आणि तिला मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर येथील शेती आणि शेतीपूरक उद्योग बहरला. साखर कारखानदारी, दूध संघ, सोसायट्या, शिक्षण संस्था हे सर्व उभं राहिलं. यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात कृष्णाकाठचं प्राबल्य राहिलेले आहे. क्रांतिसिह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई,  विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील  ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय वाटचालीत कृष्णाकाठाचा महत्त्वाचा वाटा राहिला. 

२०१९ च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत हा कृष्णाकाठ कुणाच्या बाजूने कौल देतो हे यावर कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा? हे ठरणार आहे.  कृष्णाकाठ ताब्यात घेताना महायुतीला मात्र बंडखोरीचा सामना करायला लागणार आहे. 

वाई विधानसभा मतदारसंघ : कृष्णा नदीचा उगम या विधानसभा मतदारसंघात होतो. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असणारा वाई-खंडाळा -महाबळेश्वर मतदारसंघ येथे मकरंद पाटील यांनी एकदा अपक्ष आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. विरोधी गटात काय स्थिती आहे पाहूया. महायुतीच्या जागावाटपात हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होता. येथून शिवेसेनेचे पुरुषोत्तम जाधव इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून  भाजपमध्ये आलेले मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली. ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. पुरुषोत्तम जाधव लोकसभेचे तिकीट मिळेल या आशेपोटी भाजपमधून शिवसेनेत गेले होते. तसे ते पूर्वीचे शिवसेनेचेच. लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तरी त्यांना विधानसभा उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र, इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांनी आता थेट बंडाचे निशाण फडकावले आहे.  सातारा लोकसभा आणि वाई  विधानसभा दोन्ही मतदारसंघांत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले, पण अखेरच्या दिवशी त्यांनी तलवार म्यान केली.

कृष्णाकाठावरचा दुसरा मतदारसंघ म्हणजे सातारा जावळी - तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार असणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले राजीनामा देऊन भाजपवासी झाले. आता इथे भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांची चिन्हे बदलली आहेत, एवढाच काय तो बदल सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघात होणार आहे. इथे महायुतीच्या वाटेत बंडखोरीचा धोका जाणवणार नाही. नेहमी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीला मतदान करणारा मतदार या वेळी कमळाच्या चिन्हाकडे वळतो का यावर साताऱ्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेल्याने ऐनवेळी उमेदवार आयात करून भाजपच्या महेश शिंदे यांना तिकीट द्यावे लागले. महेश शिंदे यांनी भाजपकडून तयारी केली होती. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघात आपली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे महेश शिंदे यांचे आव्हान शशिकांत शिंदे यांना किती प्रमाणात मिळते यावर मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे.  

कृष्णाकाठावरील चौथा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील.  तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, तर एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात भाजपच्या मनोज घोरपडे यांनी गेली ५ वर्षे तयारी केली. ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन हाती बांधले आणि उमेदवारी मिळवली.  मनोज घोरपडे यांनी अन्याय झाल्याची भावना व्यक्त केलीय आणि बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बाळासाहेब पाटील यांना मतविभाजनाचा फायदा होईल, अशी परिस्थिती आहे. कृष्णाकाठावरचा पाचवा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण मतदारसंघ. पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये विलासकाका उंडाळकर त्यांच्यानंतर २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे विजय मिळवला. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून, तर  भाजप नेते डॉ.अतुल भोसले यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अॅड. उदयसिंह पाटीलदेखील कराड दक्षिणच्या मैदानात उतरले आहेत. इथे महायुतीपेक्षा आघाडीलाच मतविभाजानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पाटणमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार शंभुराज देसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजितसिंह पाटणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथली लढत पारंपरिक आहे. पाटणची लढत नेहमीच अटीतटीची राहिलेली आहे. इथे पक्षापेक्षा शंभुराज देसाई यांचा वैयक्तिक करिष्मा महत्त्वाचा ठरतो. 

माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण मध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण त्यांच्याविरोधात महायुतीचे दिंगबर आगवणे निवडणूक रिंगणात आहेत. ही लढत रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची, तर बातच न्यारी, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेखर गोरे शिवसेनेत गेले. माण मतदारसंघासाठी सेना युती तोडेल अशा वल्गना केल्या गेल्या. माणमध्ये भाजपकडून जयकुमार गोरे, सेनेकडून शेखर गोरे, अपक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी आहे. ही लढत रंगतदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन गेलेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या १८ रोजी सभा घेणार आहेत.  
सातारा लोकसभा मतदारसंघाची  पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होत आहे. इथं भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील मैदानात आहेत. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक असल्याने जिल्ह्यात रंगत निर्माण झालीय. पुढच्या पाच-सहा दिवसांत प्रचाराचा धुरळा उडवला जाईल. एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली जाईल. साताऱ्याच्या कृष्णाकाठानं एकेकाळी देशाचं आणि राज्याचं नेतृत्व केलं. कृष्णाकाठ नेहमी पुरोगामी विचांराच्या मागे उभा राहिला.  वारं बदललं तसं नेत्यांनी राजकीय पक्ष बदलले. कृष्णाकाठ या वेळी महायुतीच्या की आघाडीच्या पाठीमागे उभा राहील हे येता काळच ठरवेल.  काळ बदलला आता रोज नवनवीन बदल होताहेत. नवी आव्हानं निर्माण होताहेत. पुण्या-मुंबईत, कोल्हापुरात गेलात तर बरेच जण साताऱ्याचे दिसतात. रोजगार मिळावा म्हणून युवकांना जिल्ह्याबाहेर जावे लागतेय. जिल्ह्यातील रस्ते, शेती, पाणी, दुष्काळी तालुके, शिक्षणाचे प्रश्न तसेच आहेत. हे प्रश्न नव्याने निवडून येणाऱ्या कारभाऱ्यांनी लक्षात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संथ वाहणारी कृष्णामाईदेखील रौद्ररूप धारण करत असल्याचे येथील नागिरकांनी अनुभवले आहे.

बातम्या आणखी आहेत...