प्रशांत किशोर : / प्रशांत किशोर : वलयांकित मिथक!

निवडणुकीतल्या राजकारणातले यशस्वी स्ट्रॅटेजिस्ट अर्थात, रणनीतिकार ही प्रशांत किशोर यांची ओळख. २०१४ मध्ये त्यांच्या मोदीकेंद्रित प्रचारतंत्राला यश आले. २०१५च्या बिहार निवडणुकीत आणि २०१७च्या पंजाब निवडणुकीत अनुक्रमे नितीशकुमार, अमरिंदर सिंग यांच्या विजयाने त्यांच्या नावाला दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ग्लॅमर दिले. येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची आखणी करणार आहेत.

Aug 05,2018 12:31:00 AM IST

निवडणुकीतल्या राजकारणातले यशस्वी स्ट्रॅटेजिस्ट अर्थात, रणनीतिकार ही प्रशांत किशोर यांची ओळख. २०१४ मध्ये त्यांच्या मोदीकेंद्रित प्रचारतंत्राला यश आले. २०१५च्या बिहार निवडणुकीत आणि २०१७च्या पंजाब निवडणुकीत अनुक्रमे नितीशकुमार, अमरिंदर सिंग यांच्या विजयाने त्यांच्या नावाला दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ग्लॅमर दिले. येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची आखणी करणार आहेत. नेमके कोण आहेत, हे प्रशांत किशोर? त्यांचा प्रभाव आगामी लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणार का? पंजाब निवडणूक प्रचारात प्रशांत किशोर यांच्यासोबत मोहीम राबवलेल्या कार्यकर्ता-अभ्यासकाचे हे विवेचन...


यश माणसाची प्रतिमा घडवते. प्रतिमेचा प्रभाव माणसाभोवती वलय निर्माण करतो. त्या वलयाने बघणाऱ्यांचे डोळे दिपतात. वलयाची जादूच अशी की, माणूस लार्जर दॅन लाइफ होऊन जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीने प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट असलेले असे दोन चेहरे राजकीय पटलावर पुढे आले. त्यातले एक नरेंद्र मोदी. ज्यांनी आपल्या प्रतिमेच्या करिष्म्यावर भारताच्या राजकीय इतिहासात काँग्रेसला शब्दश: नामशेष केले. दुसरे म्हणजे, प्रशांत किशोर. रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित असूनही मोदींचे खास मोहरे अशी त्यांचीओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिले. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणे हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानले गेले. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. पण जादूगाराची जादू हातचलाखीवर अवलंबून असते. त्याचे यश त्याच्या चाणाक्षपणावर आधारलेले असते.


इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आयपॅक) या संस्थेचे प्रशांत किशोर हे सल्लागार. याच कंपनीने ‘सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स’ (कॅग) हे वेगळे नाव धारण करून प्रशांत किशोर यांच्या पुढाकाराने मोदींची प्रचार मोहीम राबवली. पण, म्हणजे, मोदींच्या यशात सिंहाचा वाटा उचलला का? प्रचाराचे नवे तंत्र जन्माला घातले का? प्रचाराला विचारांची, तत्त्वांची नवी जोड दिली का? प्रचारातून सामाजिक-राजकीय बदलांची बीजे पेरली का? तर अजिबात नाही. मोदींची २०१४ निवडणुकीची प्रचार मोहीम बहुस्तरीय होती. इव्हेंट मॅनेजमेंट तंत्राचा आक्रमक वापर करून त्यातल्या फक्त ऑनलाइन युवाकेंद्री संवाद मोहिमेची आणि मतदारांना भुरळ घालणाऱ्या थ्री-डी सभांची आखणी किशोर यांनी केली. परंतु या पलीकडे जाऊन मोदींचा झंझावात अधिक प्रभावी होता. तरीही मोदींच्या यशाचे श्रेय त्यांना दिले गेले. त्यांनीही ते चाणाक्षपणे मिरवले. यात तत्त्वांपेक्षा व्यवहार अधिक होता. बदलांच्या आग्रहापेक्षा भव्यदिव्यता अधिक होती.


प्रशांत किशोर हे बिहारी गृहस्थ. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कॉर्पोरेट संस्कृतीची झाक. प्रसिद्धिविन्मुखता ही त्यांची खासियत आणि मोठी सोयही. त्यांनी आजवर संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम केले आहे. उदात्त, उन्नत आणि सेवाभावी ही संयुक्त राष्ट्रसंघाची प्रतिमा आहे, ती बव्हंशी खरीदेखील आहे, पण त्याचा प्रभाव प्रशांत किशोरांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला आहे, हे मला कधी जाणवले नाही. कारण, आफ्रिकेतल्या देशांमध्ये आरोग्यविषयक मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या प्रशांत किशोरांकडे ज्याला आपण ‘वर्ल्ड व्ह्यू’ म्हणतो, असे काही नाही. त्यांचा विचार मुख्यत: उत्सवकेंद्री आहे. प्रतिमा-प्रतीकांचा खेळ करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यात त्यांनी निश्चितच प्रावीण्य मिळवले आहे.

परदेशातून परतल्यानंतर प्रारंभी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात प्रशांत किशोर यांनी स्वत:ला आजमावून पाहिले. आधी त्यांनी सोनिया गांधींच्या प्रयत्नांनी सुरू झालेल्या रायबरेली हॉस्पिटलच्या उभारणीत काम मिळवले. मात्र, योजनाबरहुकूम योगदान देता न आल्याने, त्यातून बाहेर पडणे त्यांना भाग पडले. एक आरोग्यविषयक योजना घेऊनच ते पुढे गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना भेटले. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यात करण्यात यशस्वी ठरले. त्याच बळावर त्यांनी २०१२मध्ये मोदींच्या प्रचाराची एक बाजू सांभाळली. तरुण मतदारांना आकृष्ट करणे आणि मीडिया सोशल मीडियातली प्रतिमा उंचावणे या दोन जबाबदाऱ्या त्यांना दिल्या गेल्या. २००२च्या गुजरात दंगलीची चर्चाच होणार नाही, अशा पद्धतीने खऱ्या, खोट्या आकडेवारीसह विकासाचे मॉडेल पुढे करायचे ही मोदींची रणनीती अगोदरच निश्चित होती, तिला भव्यदिव्यता देऊन राबवण्याचे काम तेवढे प्रशांत किशोर यांनी केले. माहिती-तंत्रज्ञानाचे तरुण मतदारांना आकर्षण आहे हे हेरून मोदींच्या थ्री-डी प्रचारसभा भरवल्या. मोदी सुपरहीरो बनले. मोदींची प्रतिमा उंचावत गेली, त्याचा आपसूक फायदा प्रशांत किशोर यांना झाला. त्यांना किंगमेकर ठरवले गेले. सगळे बडे राजकारणी त्यांच्या खिशात आहेत, अशी पद्धतशीर वातावरण निर्मिती केली गेली. २०१४ नंतर वर्ष-दीड वर्षात बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रशांत किशोरांनी त्यावेळचे भाजप विरोधक नितीशकुमारांच्या ‘जदयू’साठी प्रचारयंत्रणा राबवणे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. एक तर मोदींच्या विजयात मोठा वाटा उचलणारे रणनीतिकार ही त्यांची प्रतिमा अगोदरच तयार झाली होती, अपेक्षा अशी होती की ते बिहारमध्येही भाजपच्या प्रचाराचे काम पाहतील, पण मुद्दा मनासारखे कंत्राट मिळण्याचा होता, आर्थिक परताव्याचा आणि निर्णय प्रक्रियेत मोकळे रान मिळण्याचा होता, या मागण्यांची पूर्तता काही प्रमाणात जदयूने केली. तडजोडीत माहीर असलेले किशोर त्यांच्याकडे गेले. नितीश-लालू युती जिंकून आली. तेव्हा, प्रशांत किशोर मोदींना निवडून आणू शकतात, तसे भाजपला पाडूही शकतात, असा विनाकारण एक भ्रम तयार केला गेला. वस्तूस्थिती मात्र भिन्न होती. बिहारमधला विजय हा मुख्यत: लालूप्रसादांच्या जातीय समीकरणांचा परिपाक होता. पण त्याचे अनावश्यक श्रेय प्रशांत किशोरांना मिळाले.

त्यानंतर उ. प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेसचे मर्यादित स्वरूपाचे काम त्यांनी पाहिले. तिथे त्यांनी एकही नावीन्यपूर्ण कल्पना मांडली नाही. पण अखिलेश यादव यांनी १८ ते ३५ वयोगटातल्या मतदारांना मोफत मोबाइल देण्याच्या आश्वासनाला त्यांनी अचूक हेरले. पुढे जेव्हा त्यांनी पंजाब विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या प्रचाराचे काम मिळाले. पहिले काम त्यांनी काय केेले तर, ‘वो अखिलेश का आयडिया यहाँ कॉपी-पेस्ट करते है’ म्हणत, मोफत सिमकार्ड आणि डेटा देण्याची “कॅप्टन स्मार्ट कनेक्ट’ नावाची योजना सिंगांच्या गळी उतरवली. ती दणक्यात राबवायचे आदेश दिले. त्याआधी काँग्रेस पक्षातर्फे छोट्या आकाराची पोस्टर्स लावली जात होती, किशोर यांनी त्याचा पाचपट मोठा आकार वाढवायला लावला. १० सभांच्या ऐवजी १०० सभा घ्यायचे नियोजन करायला सांगितले. सोबत फसवी आकडेवारी देऊन मतदार आणि मीडियाची दिशाभूलही केली गेली. उदा. काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले. त्यानुसार १० हजार शेतकऱ्यांनी किसान वेव्हर फॉर्म भरले. मात्र, मीडियाला हा आकडा एक लाख इतका सांगितला गेला.


मी मास कम्युनिकेशन्स अँड कॅम्पेनिंग या विषयात मास्टर्स करून इंग्लडहून भारतात परतलो होतो. किशोर यांच्या टीमचा सदस्य म्हणून काम करताना पंजाब निवडणुकीच्या प्रचारात सामाजिक बदलासाठीच्या योजना मतदारांपुढे नेण्याची कल्पना मी मांडली. त्या दृष्टीने प्रत्यक्ष पंजाबातल्या अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या गावांत फिरलो. संस्था-संघटना-पोलीस अशा सगळ्यांना भेटलो. त्यांच्या मुलाखती घेतल्या. शासन स्तरावर आकडेवारी मिळवली. मग संशोधन करून एक भल्या मोठ्या मोहिमेचे सादरीकरण तयार केले. पण त्यात किशोर यांना जराही रस नव्हता. त्यांनी कारणे सांगून हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी त्यांना याविषयी विचारणा केली, तेव्हा, कुठून ही ब्याद आली, कशाला मी असला उद्योग करायला सांगितला, असाच त्यांचा पवित्रा होता. माझ्या हेही त्या वेळी ध्यानात आले की, आरोग्य, शिक्षण, आणि त्यातून सामाजिक-राजकीय परिवर्तन हा त्यांचा हेतूच नाही. त्यांची निश्चित अशी विचारसरणीही नाही, की सामाजिक प्रश्नांचे त्यांना पुरेसे भान नाही. त्यांना फक्त मोठ्या रकमेचे कंत्राट मिळवायचे आहे. नेत्यांच्या इच्छेनुसार शक्य तितक्या भव्यदिव्यपणे राबवायचे आहे.


आता पुन्हा एकदा प्रशांत किशोरांना मोदींच्या प्रचाराचे काम मिळाले आहे. त्यांच्या संस्थेने ‘नॅशनल अजेंडा फोरम’ नावाने एक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, आदी १८ तत्त्वांचा वापर करून युवकांसाठी राबवली जाणार आहे. यात तुम्हाला कोणती समस्या महत्वाची वाटते? कोणता नेता ती सोडवण्यास सक्षम आहे, असे दोन मुख्य प्रश्न विचारले जात आहेत. या सर्वेक्षणाचा वापर करून मोदी हेच सर्व समस्यांवरचे उत्तर आहे, असा निष्कर्ष काढला जाणार हे उघड आहे. प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळे काही माफ असते. हे गृहीत धरून जशी आपल्याकडच्या राजकीय पक्षांची वाटचाल सुरू आहे, त्याला अनुसरूनच ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्व प्रशांत किशोर यांनी अवलंबले आहे. यात दिशाभूल सामान्य मतदारांची होत आहे आणि एका मिथकाला विनाकारण वलय प्राप्त होत चालले आहे.

(लेखक दिल्लीस्थित ‘क्राऊडन्यूजइंग’संस्थेचे सहसंस्थापक आहेत. दलित-शेतकरी-माजी सैनिकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत.)

- आनंद मंगनाळे
[email protected]

X