आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील दिघेंचे निष्ठावान, म्हणून नाव ठेवले आनंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रतिस्पर्धी पक्षातील म्होरके फोडण्याचे काम सुरू असतानाच शुक्रवारी शिवसेनेचे मुंबई-ठाणे पट्ट्यातील एकमेव खासदार आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले अन् राजकीय क्षेत्राला धक्काच बसला. अचानक चर्चेत आलेले आनंद परांजपे तीन वर्षांपूर्वी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ठाण्यातील शिवसेनेच्या पहिल्या टीममध्ये ज्यांची नावे घेतली जातात त्यांच्यापैकी एक असलेले प्रकाश परांजपे यांचे आनंद हे चिरंजीव. चाळिशी ओलांडलेले आनंद हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. ठाण्यात त्यांची एक इंजिनिअरिंग फर्मही आहे. ‘आपण भले आणि आपला व्यवसाय भला’ अशी त्यांची प्रवृत्ती. वडील प्रकाश परांजपे ठाण्यातील शिवसेनेच्या पहिल्या ऐतिहासिक विजयाचे एक शिलेदार. त्या वेळी ठाण्याचे जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघे यांचे निकटवर्ती. आपल्या मुलाचे नाव आनंद ठेवावे इतके ते दिघेंचे कट्टर समर्थक. त्या वेळी दिघेंचा ठाणे शिवसेनेवर एकछत्री अंमल होता. त्यांच्यामुळेच प्रकाशराव नगरसेवक झाले, अनेक मानाची पदं त्यांनी भूषवली. सलग तीनदा खासदारही झाले. मात्र, दिघेंच्या अपघाती मृत्यूनंतर ठाण्यातील शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली. त्यात प्रकाश परांजपे काहीसे बाजूला फेकले गेले. शेवटचे काही दिवस ते अस्वस्थच होते. कर्करोगाने 2008 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेला आनंद परांजपे यांना संधी देणे भाग पडले. या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. 2009 च्या निवडणुकीत बदललेल्या वातावरणात त्यांना कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून उभे करण्यात आले. वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा त्यांनी प्रचंड मताधिक्याने पराभव केला. त्या वेळीही प्रकाशरावांच्याच कर्तृत्वावामुळे यश मिळाल्याचा दावा केला जात होता. ते मान्य करतानाच आनंद यांनी आपल्या यशाचे श्रेय सामान्य शिवसैनिकांना देण्याचा मनाचा मोठेपणाही दाखविला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आनंद शिवसेनेत एकटे पडले होते. स्थानिक पदाधिकाºयांशी त्यांचे सूर कधी जुळलेच नाहीत. वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना अडगळीत टाकले होते. याकडे ‘मातोश्री’चे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र, उपयोग झाला नाही. मध्यंतरी त्यांच्या भावाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही वाद उफाळला होता. राज ठाकरे यांना निमंत्रण दिल्यावरून गदारोळ झाला होता. आपल्या खासदारांच्या या कार्याकडे उद्धव ठाकरे फिरकले नव्हते. यातच मनसे आमदार राम कदम यांनी काही दिवसांपूर्वीच परांजपे मनसेत येण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सांगून संशयाचे वातावरण गडद केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आनंद परांजपे भक्कम आधाराच्या शोधात होते. शरद पवारांच्या रूपाने त्यांना तो भेटला असावा.