आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी वेदनेची आत्मीय गोष्ट!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"बिलव्हेड' ही मानवी वेदनेची वैश्विक गोष्ट आहे. ज्यात समाजसमूहांना अत्याचार हेच आपले भागधेय आहे, असे मानणाऱ्या देशोदेशीच्या  स्वत:चे प्रतिबिंब ठळकपणे दिसत आले आहे. ही खचितच टोनी मॉरिसन नावाच्या कृष्णवर्णीय प्रतिभावंत लेखिकेने जगभरातल्या वंचित-शोषितांना दिलेली अमूल्य भेट आहे...

 

गार्गारेट गार्नर या गुलाम स्त्रीवर आधारित ‘बिलव्हेड’ ही कादंबरी आहे, असे मी या अगोदर विधान केले होते. परवा माझे मित्र दीपक बोरगावे यांनी ‘युगवाणी’च्या अंकात टोनी मॉरिसनची मुलाखत अनुवादित केलेली मी वाचली. त्यात त्या म्हणतात, ‘माझ्या पात्रनिर्मितीत मला माहीत असलेल्या मी कुठल्याही व्यक्तीचा वापर करीत नाही'. आणि एका अर्थाने ते खरेही असावे. मॉरिसन पुढे म्हणतात, "माझी पात्रे ही जेव्हा संपूर्णतः स्वतंत्ररित्या शोधलेली असतात, तेव्हाच मला मोकळी, मुक्त आणि निवांत झाल्यासारखे वाटते.’

 

‘बिलव्हेड’ची गोष्ट आणि अवकाश तसा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील. त्यासाठी त्यांनी वास्तव अन् कल्पनेचा वापर करून तो काळ आपल्यासमोर उभा केला आहे. कादंबरीत पात्र तशी मोजकीच. कादंबरीची नायिका सिदी, जिच्याविषयी बोलले नाही तरी चालेलं, कारण अवघी कादंबरी तिच्या आसाभोवतीच फिरते. गोऱ्यांच्या हातून सुटण्याचा कोणताही पर्याय नसलेली एक काळी लेकुरवाळी स्त्री, घारीघुबडांपासून कोंबडी जशी आपली पिल्लं वाचवू पहाते, तशी ती गोऱ्या बोक्यांपासून आपली मुलं लपवते. लपवता न आलेल्या लहान बाळाला ती स्वतःच्या हाताने मारते. जसे बकरी-कोकरी-मेंढ्या अन् बैल अशी अवघी पाळीव जनावरं आपण विकतो अन् पैसे गाठीला बांधतो. तसे काळे, लोकही गोऱ्यांसाठी जनावरच. त्यांची मुलं, उद्याचे गुलाम. आपल्या पश्चात आपल्या बाळाचेही हेच असेल, भागधेय, तर त्याने जगावे तरी कशाला, अशा वेळी सांगा ना, तिनं काय करावे?

 

परत स्वतः लेखिका भृणाच्या हत्येचं प्रस्तुत घटनेचं, विवरण करायला टाळते. भृणहत्तेवर असलेली ही कादंबरी केवळ हिंसेवरच लक्ष केंद्रित करीत नाही, तर शक्यतो ती घटना टाळून भोवतालची हिंसेवर आधारलेली इत्यंभूत व्यवस्थाच ती वाचकासमोर उघड करते. मला या ‘बिलव्हेड’मधील सिदीविषयी काही लिहायचे नाही. कारण, दलितांवर अमानवी अत्याचार आणि लहान मुलांसोबत आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया या दोन गोष्टी तर भारतात प्रांतोप्रांत सापडतात. पण आपण त्यावर लिहीत नाही.

 

मी ‘बिलव्हेड’मधील पात्रांची तोंड ओळख करून देत आहे. तिची दोन नंबरची मुलगी डेन्व्हर. या पात्राचे नाव, अवघडलेली सिदी स्वीटहोममधून पळून जाताना वाटेतच बाळंतपणात जिने अनन्यसाधारण मदत केली, त्या डेन्व्हर नावाच्या श्वेत मुलीकडून घेतलेले. डेन्व्हरने आपला बाप पाहिलेला नाही. बेबी सग्जचा हा मुलगा, त्याचं नाव हॉल.  अात्यंतिक संकटात कसलीही मदत न करता आयागमनी बेपत्ता झालेला, कदाचित कुठे मेलेला सिदीचा नवरा. सिदीच्या उर्वरित आयुष्यातील मित्र  म्हणून उरलेला पुरूष पॉल डी. खरं तर या पॉलचा सर्वात जवळचा मित्र हॉल. आणि उरल्यानंतर राहतो, तो डेन्वरने उभ्या आयुष्यात कधी न पाहिलेला बाप हॉल! 
केवळ हीच एक दुखरी आठवण तिचा पाठलाग करतेय, असे नाही. लहान मुलाच्या भुताने झापाटलेल्या घरात डेन्व्हर आपल्या आईसोबत रहात आहे. याच एका कारणाने वस्तीतील काळ्या शिकलेल्या स्त्रीने जी शाळा सुरू केलेली असते, ती शाळाही तिला अर्धवट सोडावी लागलेली आहे. मला वाटते, ‘बिलव्हेड’ या कादंबरीतील डेन्व्हरच खरे प्रमुख पात्र आहे. टोनी मॉरिसनच्या एकूण कादंबरीत पुरूषाच्या तुलनेत स्त्रियाच अधिक सोशिक आणि धीराच्या आहेत. रोजच्या संघर्षमय अन् सुरक्षितेची कसलीही हमी न देता, येणाऱ्या खडतर वर्तमानातही आपले भूतकाळातच्या यातनांचे ओझे निग्रो साहित्याच्या प्रत्येक पानापानावर  आपणाला जाणवते. हे आपल्या यातनांचे उदात्तीकरण नव्हे, तर स्मरण, एका अर्थाने सुंबरान आहे...

 

सिदीची सासू निग्रो गुलाम वृद्धा, बेबी सग्ज. तिला सेजेला आलेल्या पण,नावानिशी माहीत नसलेल्या गोऱ्यांची की काळ्यांची एकूण आठ मुले झाली. जी सगळीच तिच्यापासून शेळीपासून जसे तिचे दूध पिते कोकरू हिसकावून घ्यावे, तशी ती गोऱ्या लोकांनी हिसकावून घेतली. गुलामीत असताना तिच्या देहातील सगळ्या अवयवांवर अत्याचार झाले. जसे की पाय, डोकं, हात, किडनी, गर्भाशय. तिचा म्हणून आपल्या शरीरावर कसला अधिकारच राहिला नाही. म्हाताऱ्या बेबी सग्जचा गोरा मुळात माणूस असतो, यावरून विश्वास उडाला. सिदी तुरंगात असताना  आपल्या अंथरूणातच बेबी सग्ज मरण पावली. तिचा मुलगा हॉल, ‘स्वीट होम'मधील तो एक गुलाम. संपूर्ण कादंबरीत तो एकदाही प्रत्यक्ष भेटत नाही. ‘स्वीट होम’मधे सहा गुलाम होते, अन् एक तेरा वर्षाची मुलगी सिदी. या सहा जणांत सिदीच्या, संदर्भात एक करार केला होता. त्यांच्यासाठी जेवण करणाऱ्या सिदीला कोणीही त्रास नाही, द्यायचा. तिच्या मर्जीने सहा पैकी कोणा एकाला तिने स्वीकारायचे. सिदी हॉलला पसंद करते. का तर, हॉलने तिच्या आईला म्हणजे बेबी, सग्जला गुलामीतून मुक्त केलेले असते.

 

गार्नर पतीपत्नीने सिदी अन् हॉलच्या लग्नाला मान्यता दिलेली. पण गार्नरसाहेब मरण पावले, गार्नरबाई आजारी तशी घराची देखभाल करण्यासाठी हा शाळामास्तर अन् त्याचे दोन वांड पुतणे आले, अन् स्वीटहोम एक छळछावणी बनली. तिथे जगणे असहृय झाले म्हणून या सर्वांनी पळून जायचे ठरवले. सहाव्याला त्यांनी मारले, दोघं पसार झाले. सिदीची दोन मुले आधी गेली. पॉलला त्यांनी घुसळखांबाला बांधले. सिदी सोबत तो जाणार. म्हणून स्वतःला सोडवून तो माळ्यावर लपला. तर या या वांड पुतण्यांनी गरोदर काळ्या स्त्रीची स्तनं पिळली. तिचा पान्हा नासवला, त्यांनी. पॉलला काहीच करता आले नाही. नवरा म्हणून पॉल अपराधी आहे,सिदीचा. तो तोंड काळं करून परागंदा होतो. परत भेटत नाही. भटकत रहातो, एक अशांत काळा आत्मा की, मरून जातो, समजत नाही. पॉलचे हे गुलाम नवरा असलेल्या माणसाचे दुःख. ते दिसत नसले तरी जाणवत रहाते. एक दुसरा, गुलाम पॉल डी. सिदीचा आणि हॉलसह बाकी चार गुलामाचा तो मित्र.तब्येतीने तो धडधाकट. त्या सहा तरूण गुलामांत सिदी तशी द्रौपदीसारखी. सगळ्यांचे जेवण करणारी, सगळ्यांना ती आवडायची, पण तिच्या बाबतीत कोणीही अगोचरपणा केला नाही. पॉल डीला भेटलेल्या सर्व बायका आपली व्यक्तिगत दुःख सांगायच्या, स्वीटहोम सोडताना मालकाने अन् त्याच्या पुतण्यांनी लोखंडाचा भुसा घातला त्याच्या तोंडात उद्देश हा की, त्याला बोलता येवू नये. तो अठरा वर्ष अखंड चालत राहिलेला. दुसऱ्या जमातीच्या गुलाम स्त्रीसोबत सहा महिने राहिला. त्याला एक झाड आवडायचे. त्या झाडाशी तो बोलायचा. अठरा वर्षांनंतर तो सिदीला भेटला. घरातील लहान मुलीचे भूत त्याने हुसकावून लावले. कादंबरीत एकदाच फक्त, सिदीचा अन् त्याचा संग दाखवलाय, तोही उरकता. सिदीच्या पाठीवर अत्याचारानंतर उमटलेले एक झाड आहे, जे तिला मदत करणाऱ्या श्वेत मुलीने सांगितले. पॉल डी हा पहिला पुरूष तिच्या पाठीवरील झाडावर, अपार मायने हात फिरवणारा. शाळामास्तर मालकाने तिला चाबकाने फोडून काढलेले. ज्यातून ते जन्मभर यातनांची आठवण करून देणारे झाड उगवलेलं. पण, पॉल डी अखेरच्या क्षणी सिदीला सर्वार्थाने साथ देतो.

 

अजून एक सहावा आहे, सर्वात शेवटचा. जो आपल्या प्रियेला भेटायला जवळपास ऐंशी मैलांचा पायी प्रवास करून, सोमवारी सकाळी कामावर येई. आणखी एक पात्र, स्टँप पेड. आयुष्यात जगण्यासाठी त्याने खूप भूमिका अदा केल्यात. सिदीला बेबी सग्जच्या घरांपर्यंत त्यानेच आणले. कादंबरीत दोन घरं जशी पात्रं आहेत, तसेच निग्रो लोकांत रंगाविषयी कमालीचे आकर्षण आहे. बेबी सग्ज तर रंगाची दिवाणी, पण सर्वात शेवटी ती फक्त दुःखाचा निळा रंगच पहात रहाते. ती एकदा सिदीला सांगते, मला थोडा लॅवेंडर घेवून ये.

 

मुलाखतीत मॉरिसन म्हणतात, रंग ही आमच्यासाठी चैन आहे. ‘बिलव्हेड’ या पात्राला पिवळा रंग आवडतो.
हो, मी ‘बिलव्हेड’विषयी बोललो नाही. हे पात्र  तुर्की लेखक ओरहान पामुकच्या ‘रेड’ या कादंबरीतील पात्रांसारखेच वाचकांशी बोलते. तसं, या पुस्तकातील वाक्यं नि वाक्यं रसग्रहण करावे एवढं थोर आहे. अमेरिकन निग्रो साहित्याविषयी मॉरिसन म्हणतात, "ही परंपरा समृद्ध, तिचे स्त्रोत गुंतागुंतीचे. परिघावर असलेल्या गोष्टींना तिच्यात ओढण्याची ताकद आहे. आफ्रिकन अमेरिकन साहित्य परंपरा अधिक आधुनिक आहे, तिला एक मानवी भविष्य आहे.’ आणि ही गोष्ट दलित अन् देशोदेशीच्या सर्व परिघावरील साहित्याला तंतोतंत लागू पडणारी आहे.

 

वाचकांनी प्रस्तुत कादंबरी मिळवून जरूर वाचावी. सुंदर मुखपृष्ठासह ‘पद्मगंधा’ने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचा अनुवाद अतिशय सुंदर झालेला आहे. एक दु:खद घटना अशी की, या कादंबरीच्या अनुवादिका, आशा दामले यांचे दरम्यान निधन झालेलं आहे. त्यांनी ‘सुला’ या मॉरिसनच्या कादंबरीचा सुद्धा मराठीत अनुवाद केला होता. त्यांच्याविषयी ही सांत्वना!

 

आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...