आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकालीन राजकारणाची रूपककथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इंडियन ॲनिमल फार्म' या शीर्षकातून सूचित होत असल्याप्रमाणे ही प्राणिजगतातील पात्रांच्या साहाय्याने आकाराला येणारी समकालीन राजकारणाची एक रूपककथा आहे. जॉर्ज ऑरवेल यांच्या 'अॅनिमल फार्म' या कादंबरीशी उघड नाते सांगणाऱ्या या कादंबरीचे 'इसापनीती', 'पंचतंत्रा'पासून अनेक संहितांशी संबंध आहेत. विविध पातळ्यांवर वावरणारे वेगवेगळ्या जातकुळीचे प्राणी येथे आहेत. डुकरे, कुत्री, गायी, बैल, गाढव, घोडे, बकऱ्या, मांजरे, कोंबड्या, बदके, कावळे, कबुतरे, पोपट अशा केवळ प्राणी आणि पक्षी यांच्या माध्यमातून या कादंबरीचे कथानक आकाराला येते. 

 
उगवणाऱ्या तांबूसलाल सूर्यासारखी अगदीच स्पष्ट नसली तरी पहाटेपूर्वीच्या गुलाबी छटांच्या एका धुसर आशावादाचे दिशादिग्दर्शन करणारी, काही दीर्घ रात्रीत सुद्धा न संपणारी ही एक गोष्ट आहे. पंचतंत्रामधील राजा, प्रधान अन राणीची जशी, तशीच ती हॅन्स अॅन्डरसनच्या  परीकथेतील, उपदेशात्मक इसापनितीच्या बोधकथेसारखीच, अथवा बुद्ध या उपाधीपर्यंत अजून न पोहचलेल्या जातकाच्या फेऱ्यामधली... अन् नसेल तशी तर ती खचितच आहे  भवनीभवाइतील वृद्धाने आपल्या नातवंडाना सांगितलेल्या रूपकामधली! 


एरवीच्या गोष्टीत वाचक अथवा श्रोता म्हणून आपला रोल असतो, हुंकार देणाऱ्या वाक्याच्या शेवटच्या पूर्णविरामासारखा... जिथे फक्त निर्वाळा असतो जागे असल्याचा. पण या कथेत हुंकार देणं एवढीच आपली भूमिका नाही. आपल्या समोर असणार आहे कथांमधून उलगडत जाणारी दुसरीच अशी प्रत्यक्षातील कथा जी एक जाणकार वाचक म्हणून समजून घ्यायची आहे, गोष्टीमधील पात्रांचा प्रत्यक्षातील व्यक्ती अन् घटनांशी साधर्म्य शोधायचे आहे. कथेतील घटना भोवतालच्या वास्तवाशी पडताळून पाहायच्या आहेत. जगताना या कथेमधील नेमकी कोणती भूमिका आपण अदा करू शकतो याचा आंदाज घ्यायचा आहे. आणि आपण जगतो त्या अवकाशातील बदलाचा खेळ नव्याने मांडायचा आहे.


यासाठी प्रथम प्रवीण दशरथ बांदेकराची "इंडियन अॅनिमल फॉर्म' नावाची कादंबरी वाचायची आहे.
मुळच्या जॉर्ज ऑर्वेल या ब्रिटीश लेखकाने लिहिलेली ‘अॅनिमल फॉर्म’ ही कादंबरी कामगारवर्गीय नेतृत्वाखाली रशियन क्रांती विरोधातील ही एक विडबंनात्मक रूपककथा. ‘ऑल आर इक्वल’ असे उदात्त घोषवाक्य उदघोषित करून समाजवादी स्वप्नांनी भारावून सुरू केलेली चळवळ, भ्रष्ट नेतृत्व अन् आत्मस्वार्थी  ऐतखाऊ नोकरशाही मधून अंतिमतः एकाधिकारी हुकुमशाहीत परावर्तीत कशी होते. इतकचे नव्हे तर आपल्याच जाहिरनाम्यातील मुख्य सुत्राला दुरूस्त करून ‘ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल’ असा फेव्हरेबल फेरबदल करते.


जॉर्ज ऑर्वेलने "स्टॅलिनशैलीतील समाजवाद आणि  हिटलरशाही’ या दोन्हींमध्ये मानवी स्वातंत्र्याचा शत्रू पाहिला.’ अर्थात या दोन्ही हुकुमशाहीत काही गुणात्मक फरक असले तरी दोन्ही हुकुमशाहीत  मानवी हत्या, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कमालीचा ऱ््हास झालेला आहे. 


जेमतेम पन्नाशीच्या आसपास मरण पावलेल्या जॉर्ज ऑर्वेलच्या जगभरात अजरामर झालेल्या दोन कादंबरी मराठीत सुद्धा अनुवादीत झालेल्या आहेत.  अॅनिमल फॉर्म आणि दुसरी साम्राज्यवादी व्यवस्थेत मानवाला रोबोसारख्या गुलामासारखे कसे वागवले जाते अशी ‘नाइंटिन एटीफोर.’


प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन अॅनिमल फॉर्म या रचना आणि आशयाने वेगळया अन् महत्वपूर्ण असलेल्या कादंबरी वाचत असताना अवांतर वाचनासाठी जॉर्ज ऑर्वेलच्या दोन्ही कादंबरी वाचणेदेखील तितकेच गरजेच आहे.
"अॅनिमल फॉर्म' ही प्रहसनात्मक कादंबरी "इंडियन अॅनिमल फॉर्म' या कादंबरीसाठी चार पायांच्या प्राणी मुक्तीसाठीचा इतिहास आहे. प्राण्यांच्या क्रांतीचा तो एक वारसा आहे. स्वतः लेखकच जॉर्ज ऑर्वेलच्या कादंबरीतील कथनांचा वेळोवेळी उल्लेख करतात त्यामुळे "इं ऍ.फॉ.'चा रसस्वाद घेताना "ऍ. फॉ.'संदर्भ घ्यावा लागणार.


ब्रिटीश ऍनिमल फॉर्मचा वारसा घेवून भारतात सुद्धा  कोकणातील कोणत्या जनावरांच्या मोठ्या गोठ्यात दोन पायांच्या मालकाविरोधी बंड होवून घोडा, गाढव, गाय, बैल, शेळया - मेंढ्या, कोबड्या, बदक, मांजर, कुत्री आणि डुकरांनी आजवर पिळवणूक करणाऱ्या माणसांपासून  स्वतःला मुक्त करून  घेतलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा फ्रेंच राज्यक्रांतीचा त्रिसुत्री आदर्श जसा जगभरातील वसाहतवादाच्या जोखडातील आशियाई-आफ्रिकन लोकांनी घेतला, तसाच काहीसा आदर्श मानवापासून स्वतंत्र झालेल्या या प्राणी वसाहतीने घेतलेला असतो, तसे आजवर ते सुखासमाधानाने गुण्यागोविंदाने राहात आले आहेत एकत्र.


धार्मिक एकता आंदोलन अथवा अखिल इंडियन गोवंश संघटनेसारखेच "चार पाय चांगले, दोन पाय वाईट’अशी प्राणीमात्रात सवंग भातृभावी मानसिकता तयार करणाऱ्या प्रचारी घोषवाक्याने सुरुवातीच्या काळात एकत्वाची भावना बहुतांशवेळी बळकट झालीच नाही असे नाही. पण श्रम, सत्ता, आणि धर्माधिष्टित वंशश्रेष्ठत्वाच्या कारणाने त्यात हळूहळू दुहीन निर्माण झाली वा जाणीवपूर्वक श्रेष्ठ कनिष्ठाचा बेबनाव जोपासण्यात आला. तरीही सांप्रदायिक सद्भावना टिकवण्यासाठी सुरुवातीपासून कृष्णा म्हातारा घोडा, चंपी कुत्री, म्हादा बैल श्रमिक प्राणी मोर्चा या संघटनेच्या वतीने प्रयत्न करीतच होते. परंतू माणसांच्या उपसग्राने प्राण्यांची सुद्धा विभागणी झालेली... जसे की बैल, रेडा, घोडा, गाढव हे दिवसरात्र ढोर मेहनत करणारे कष्टकारी प्राणी, ज्यांना फॉर्मच्या विकासात मत मांडण्याचा कसलाच अधिकार नाही.


गाय, म्हैस, शेळ्यामेंढ्या, कोंबड्या, आणि बदकं ही दुध, अंडी, मांस पुरवून प्रशासकाची सेवा पुरवणारे प्राणी. त्यातच गाईला गोमातेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर अचानक तिला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. तिच्या केवळ मुत्रासाठी वेगळा गोठा तयार करण्यात आला. तशीच गोष्ट सफाई करणाऱ्या कावळयाची. माणसात तर तो मेलेल्या मृताचा जिवंत तातडीचा अवतार ... त्या एकाक्ष कावळयाला टेहळणीचे म्हणजेच गुप्तहेराचे काम देण्यात आले अन् एकूण श्रमजीवी प्राण्यात सत्ताधाऱ्यांसारखीच फोडा आणि झोडाची पूर्वापार निती अवलंबण्यात आली.


डुकरांचा तसा श्रमाशी काडीमात्र संबध नव्हताच. गलेलट्ठ, स्वआवाने ते मुलुखाचे आळशी, दिवसभर चरणे, लोळणे, आपली संतती वाढवणे, याशिवाय त्यांना कसलेही काम नाही. परत त्याचा कोणी वंशज वराह ज्याने देवाच्या तिसऱ्या अवतारात पृथ्वीला आपल्या सुळाने समुद्रातून तारली एवढ्याच एका गोष्टीचा निवार्ळा देत इंडियन ऍनिमल फॉर्ममधे बुद्धी आणि मुत्सद्देगिरीची जबाबदारी पूर्वीचे वराह म्हणजे आताच्या डुकराने हिसकावून घेतली.त्यामुळे इतर सर्व प्राणीमात्रांत ते स्वतःला श्रेष्ठ समजायला लागले. आधी मालकाशी लाळ पडेतोवर लाचार राहणाऱ्या आक्रसताळया कुत्र्यांवर डुकरांच्या संरक्षणाची जबाबदारी आली.यातूनच समोरचा प्राणी आपला मित्र की शत्रू हे सुद्धा ते विसरून गेले. डुकरांनी छु म्हणताच कित्येकदा शांतपणे विचारविमर्ष करणाऱ्या श्रमिक प्राणी मोर्चाच्या मिटींगमध्ये नेहमीच उच्छाद घालीत राहिले.


तुलनेत मांजर जातीचे प्राणी तसे आत्ममग्न, नार्सिसस सारखे स्वतःच्या अस्तित्वात दंग. वर्णाने इतरांहून शुभ्र आणि उठावदार, खाण्यात शाकाहार-मांसाहार असा भेदभाव न करणारे पुढारलेले भाटी. व्यक्ती स्वातंत्र्याचे तसे ते प्रवक्तेच. यांना नवीन मालकाचा ‘सर्व चारपायी प्राण्याने अहिंसा आणि शाकाहाराचाच अंगीकार करायला पाहिजे’ हा कडवा फतवा अजिबात आवडला नाही. यात मोहिनी मांजरची चंपी कुत्रीची मैत्री. कृष्णा घोड्याची भूमिका सुद्धा तिला पटलेली. म्हणून मध्यमवर्गीय मिजाज असलेल्या मोहिनी मांजरने श्रमिक प्राणी मोर्चा या संघटनेशी जोडून घेतलेले. म्हातारा कृष्णा घोडा जो सर्वप्राण्यांचा सर्वप्रथम हितचिंतक. जो पूर्णतः निस्वार्थी, आपण श्रम करणारे प्राणी, आपल्या कष्टामुळेच पृथ्वीचा मळा फुलतोय म्हणून तर हे जग जिवंत अन आनंदी राहतय, अशी त्याच्या विचारांची धारणा. प्राण्यांना महिना दोन महिन्यातून तो एकत्र करायचा त्यांची मिटींग घ्यायचा. कृष्णा घोडा व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपासक. कोणी काय खावे, काय पेहरावे यात कसलीही आडकाठी न आणणारा, चुकीच्या जुन्या इतिहासाची नव्याने मांडणी करणारा, प्राण्याने शिकावे, विचार करावा, सर्वंासोबत प्रेमाने रहावे, आपल्या परिसराची सर्वांनी काळजी करावी... असा प्रचार करणारा आणि आचरणात आणणारा. त्यामुळे मोहीनी मांजरांसारखे प्राणीसुद्धा त्याच्या विचारांचे पाईक झाले.

पण नवीन येऊ घातलेल्या मालकाच्या आगमनाच्या दरम्यान अचानक सकाळी माळावर रपेट मारायला गेलेल्या म्हाताऱ्या कृष्णा घोड्याचा खून करण्यात आला. ही होती भविष्यातील आरिष्ट्याची सुरुवात.


प्रवीण बांदेकरची ही कादंबरी तशी एकाच रूपकाच्या नानाविध तऱ्हांमधून उलगडत जाणारी. कादंबरीतील प्राण्यांच्या संदर्भात घडणाऱ्या दिसताना अघटित पण तितक्याच योजनाबद्ध  पद्धतीने घडणारे खून, वारंवार साध्यााभोळया पशुपक्षांना सुखांचे दिवस येतील, अशी दिलेली पोकळ अाश्वासने, सत्याचा होणारा आपलाप या सर्व बाबी आपण जगत असलेल्या जगात कुठं घडत तर नाहीत नां? असा वाचताना भास होत रहातो. वास्तवाशी कुठे ना कुठे संबंध असलेले तरीही पूर्णत: काल्पनिक असे हेे कथानक रचताना लेखकाचे कष्ट व त्याची होणारी दमछाक वाचताना जाणवत रहाते. सांप्रत काळातील नव्याने उभारून आलेले अस्मितांचे प्रश्न, त्यातून उफाळून येणारा अहंकार लेखकाने एकाच वेळी बोचऱ्या विनोदाने तितकेच आपलेपणाच्या आस्थेन मांडलाय. 


काय वाचावे आणि काय वाचू नये यावर नव्याने आलेले निर्बंध, यात जळलेले पुस्तकालय , पुस्तकं वाचवण्यासाठी आवडी गाढवीचा मृत्यू वाचताना चटका लावून जातो. गणेशाचे वहान असलेल्या आमच्या उंदिरमामाचे भक्षण केले असा खोटा आरोप लावून मोहिनी मांजरचा केलेला खून. चंपी कुत्री अन बाळक्या घोड्याच्या मैत्री संदर्भात कुजबुजकर्त्यानी उडवलेल्या अफवा... अशा असंख्य रूपकांचा अर्थ वाचताना आपण उलगडण्याचा प्रयत्न करतो. शब्द प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ही जवळपास दोनशेसाठ पानांची ही कादंबरी आजच्या मराठी कादंबऱ्याहून निश्चित वेगळी नवीन आशय आणि विचार देणारी आहे.


आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

 

बातम्या आणखी आहेत...