आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोगवादी समाजाची धरपकड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अवाढव्य वैश्विकतेचा सचेत सृजनशील घटक असलेल्या शून्याच्या परिमाणात ज्याची मोजदाद करावी, असा नगण्य मानवीय जीव. ज्याने मुठीच्या आकाराच्या आपल्या मेंदूने या जगड्व्याळ पसाऱ्याचे जवळपास सुटत आलंय, असं सूत्रबद्ध गणित मांडलंय.काळाने कूस बदलायच्या अवधीत पृथ्वीवरील या दोन पाय असलेल्या प्राण्याने जणू प्रतिसृष्टी निर्माण केलीय. त्याला डावलून या पृथ्वीची संहिता लिहिता येणं शक्य नाही. पी. विठ्ठलांचा ‘शून्य एक मी’  कवितासंग्रह त्याचाच उद्घोष आहे...

 

पी. विठ्ठल आपल्या जगण्याशी कमालीचे प्रामाणिक आहेत. त्यांची कविता एकाच वेळी आत्मकेंद्री नि भोगवादी संस्कृती, तिची सांप्रत आर्थिक स्थिती अन् इतरांच्या बाबतीत हालअपेष्टा कुपोषण अन् वेळीच इलाज न करता येणाऱ्या वंचनेच्या दायऱ्यात लंबकासारखी लोंबकळताना दिसते.

प्रस्तुत कवितासंग्रह वाचण्याआधी २०११मध्ये ‘गोदा प्रकाशन’ने प्रकाशित केलेला आणि नंतर २०१८मध्ये “लोकवाङ््मय गृहा’नेे दुसरी आवृती काढलेला, ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ हा कवितासंग्रह दिवसभराचा बाकी सर्व उपदव्याप बाजूला ठेवून एका बैठकीत मी वाचून काढलेला. तेव्हाच खरंतर काळाच्या असीम वाळवंटात, धुळाक्षरांतून त्यांनी अर्थातच पी.विठ्ठल यांनी आपलं नाव कोरलं होतं. आता सात-आठ वर्षातच कवितेच्या आकृतिबंधावर कमालीची मांड कमवून “काँटिनेंटल प्रकाशन’च्या वतीने मोठ्या दिमाखदार पद्धतीने ‘शून्य एक मी’ हा कवितासंग्रह वाचकांसमोर प्रस्तुत केला आहे. ज्याचं मुखपृष्ठं आणि रेखाटन आहे, दिनकर मनवरांचं!

जागतिकीकरणानंतर उदयाला आलेली नव्वदोत्तर तरूण पिढी अस्मितेच्या मुद्यांवर अधिक सजग आणि प्रसंगी आक्रमक होऊन बोलू लागली आहे. उपेक्षित समाजातील शिक्षित तरूण, जातीची बिरुदावली टिळ्यासारखीच अभिमानाने आपल्या भाळावर मिरवीत आहेत. आपल्या समूहाच्या हक्कांसाठी लढे उभारत आहेत. मराठी कविता अधिक बर्हिमुख होते आहे. तिच्या आस्थेचा परीघ अधिक विस्तृत होतो आहे. धर्म, जात, लिंगाच्या सीमा पार करीत कवितेची आस्था अधिक मानवीय अन् वैिश्वक बनत आहे. वेगळी मिथकं, वेगळे रूपबंध आकाराला येत आहेत. समकालीन कोणत्याही कवींच्या आपण केवळ दहा कविता वाचल्यात तरीही, आपल्या लक्षात येईल प्रस्तुत कवी कोणत्या वर्ग अन् जात समुहाचे, कोणत्या सांस्कृतिक विरासतीचे प्रतिनिधित्व करतोय. कोणतं संचित अन् बापजाद्यांच्या पिढीदर पिढीच्या अनुभवांचा वारसा तो उलगडून दाखवत आहे. 

पी. विठ्ठल पेशाने प्राध्यापक असल्याने कवितेमधून त्यांचा वर्ग समजतोच. त्यांच्या सर्वच कवितेमधील प्रतिमा, प्रतीकं आणि आशय प्रामुख्याने मध्यमवर्गीय मानसिकतेच प्रतिनिधित्व करताना दिसतात. वानगीदाखल सुरुवातीच्या, ‘माझ्या जगण्याची संहिता’ या कवितेत ते म्हणतात ‘मागच्या वेळी आलो, तर बत्तीसची घेतली होती मी जिनपँट. आता कंबर रूंद झालीय एका इंचाने.  पुढे, म्हणजे नुकतेच घेतलेत, मी ब्रँडेड बूट. सवय नाही पायांना,बिचारे गुदमरून जाताहेत, माझ्या वागण्याने.’ ही संपूर्ण कविताच कवीच्या वर्गीय चरित्राचे विवरण करताना दिसते. कवी आपल्या जगण्याशी प्रामाणिक असल्याने, ते कबूल करतो, ‘मंदिरापासून ट्रिपल एक्सपर्यंत घडून गेलाय माझा अथक प्रवास. पराकाष्टेने जपत आलोय स्वतःला’ नाळेतून आलेले पाठीमागचे जवळपास सगळे पाश त्यांनी तोडून टाकलेत. पुरावा म्हणून पुढच्याच कवितेची ओळ अशी आहे, ‘पूर्वजांचे प्रेम भिंतीवरच्या फ्रेममध्ये अडकून पडलंय’ आणि वरील कवितेत ते म्हणतात, ‘कुणाच्याही आक्षेपांचे खलिते फुटत नाहीत आपल्यासमोर.’ तसे कवीला आपल्या भूतकाळातील संस्कारही सुटत नाहीत. ते म्हणतात, अभिरूचीचे केंद्र हलले आहे, आपले.’ आपली ही अभिरूचीसुद्धा पूर्वापार संस्कारातून आकाराला आलेली कबीर- तुकारामाची. सुबत्तेमधून ती अधिक भोगवादी शोकेसमधील न्यूड बाहुल्यांपर्यंत पोहचलेली...

प्रचंड श्रीमंतीमधून अन् कमालीच्या दारिद्र्यातून मनास हव्या असणाऱ्या दिलाश्यासाठी आपला प्रवास अध्यात्म्याकडे चाललेला असतो. पण, एक करमणुकीचे साधन म्हणून कित्येकदा पाहिले जाते, अध्यात्माकडे. मी कोण,कुठून आलोय, काय आहे माझ्या जगण्याचे प्रयोजन, असे रिकाम्या मनात  काही प्रश्न असतातच. अशा प्रश्नांमधून खरेतर आपण वैज्ञानिक दृष्टीचे बनायला हवे. पण तसे होत नाही. जाळ्यातील कोळ्यासारखे, आपण नेहमीच चक्राकार फिरत असतो. मूलभूत प्रश्नांना बगल देत वरवरच्या गोष्टींवरच  गुंजारव करीत रहातो. असेच काही प्रश्न कवी शेवटी विचारताना दिसतो. ‘सांस्कृतिक अभिसरणाच्या बख्खळ गोष्टी करणारे शेवटी अध्यात्माकडूनच कां करून घेतात ब्रेनवॉशिंग?’

पी. विठ्ठल आपल्या जगण्याशी अनुभवाशी कमालीचे प्रामाणिक आहेत. त्यांची कविता एकाच वेळी आत्मकेंद्री नि भोगवादी संस्कृती, तिची सांप्रत आर्थिक स्थिती अन् इतरांच्या बाबतीत हालअपेष्टा कुपोषण अन् वेळीच इलाज न करता येणाऱ्या वंचनेच्या दायऱ्यात लंबकासारखी लोंबकळताना दिसते. आजच्या नोकरीत स्थिर झालेल्या सुखवस्तू चंगळवादी गाव अन् समाजापासून फारकत घेतलेल्या समूहाचे सामाजिक आर्थिक चरित्रच कवी लिहीत आहेत, की काय अशी एक पुसटशी शंका येते. याच एका आसाभोवती त्यांचे चिंतन रहाते. धर्मभोळेपणा, रूढी-परंपरा तसेही नव्याने मध्यमवर्गीय मानसिकतेला पटत नाहीत. याचे प्रत्ययकारी भूतदयावादी चित्रण त्यांच्या काही कवितेत दिसते. ‘दुसऱ्या जगातल्या माणसांबद्धल’ या कवितेत एकाच माणसाच्या आयुष्याशी निगडित परस्पर दोन भिन्न जगाचे वर्णन आपल्यासमोर येते. उच्च मध्यमवर्गीय दोलायमान मानसिकता परत परत त्यांच्या कवितेमधून प्रकट होताना दिसते. ‘कपाटातल्या हँगरला टांगून ठेवावा महिनोन्महिने स्टार्च करून ठेवलेला शर्ट, इतके अधंतरी जगणे आपण जगत असतो सदैव.’ अशी ते कबुलीही देतात. आणि मग त्यांना आठवतात, आपल्यापासून परागंदा झालेली आपल्याच आतड्याची माणसं. ज्यांनी भविष्यातील  स्थैर्यासाठी किमान काही खस्ता खल्लेल्या असतात. आणि त्याच्यासाठी आपण काहीच केलेलं नसतं. ‘काकाचं लिव्हर ट्रान्सप्लान्ट नाही करता आलं. कुणालाच जाता आलं नाही. ग्लोबल, ब्रीच कँडी किंवा कुठल्यातरी सुपरस्पेशालिटी हॉस्पपिटलात’अशी कळकळ त्यांच्या कवितेमधून नकळत येते. नोकरी मिळाल्यानंतर गाव गणगोत सोडणं, शहरात एक सुरक्षित आयुष्य जगणं आणि आपण संवेदनशील आहोत म्हणून मगरीच्या अश्रू गाळणारी एकअख्खी पिढीच उदयाला आलेली आहे, आज. त्याचे उपहासनात्मक चित्रण, इथे दिसते. गाव किती अर्तंबाहय बदलत गेलेत. याची प्रचिती ‘ज्या चिंचोळया रस्त्यावरून’या कवितेमधील छोट्या छोट्या नोंदीतून लक्षात येत जाते. अपराधी मध्यमवर्गीय मानसिकतेचे दर्शन घडवणाऱ्या अशा अनेक कविता या संग्रहात भेटतात. आपल्या आयुष्यातले परिच्छेद’ ही चिंतनशील दीर्घ कविता. ज्यात संक्षिप्त रूपात कवी आपले चरित्र मांडताना दिसतात. परंतु कवी नव्हे, तर आजचा तमाम नवश्रीमंत उच्च मध्यमर्वीय समाज एकूण समाजापासून तुटलेला आहे. परमनंट प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर आयटी क्षेत्रातील कुशल कर्मचारी ही त्या क्षेत्रातील वानगी दाखलची उदाहरणं. संक्षिप्त रूपात कवी आपल्यासह इतरांचे सार्वजनिक चरित्रच आरेखताना दिसतो. 


‘तर अधून मधून वाटतं मला की संपत चाललंय आयुष्य हळूहळू आणि आपण उगीच पतंग उडवतोय टेरेसवर उभं राहून’ आपल्या हातून काही सुटत गेल्याची जाणीव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकट होताना इथे दिसते. हे नेमकं काय आहे? “आपली कविता गुदमरून पडतेय कुठल्यातरी अनैतिक अक्षरांत.’ कवीचे हे कन्फेशन आहे. मोकळेपणाने सांगायचे झाल्यास कवीची प्रामाणिकता मला अधिक भावणारी आहे. 

तशी अजूनही वेळ गेलेली नाही. आजवर बापपणावर, आपल्या पुरूषपणावर, पराभवाच्या ओळी तर खूप लिहिल्यात. आता कवीने अधिक बर्हिमुख व्हावे, बाहेरचा कोलाहल समजून घ्यावा, समजून घ्यावे जागतिकरणाचे रास्त वास्तव, त्यातील ताणतणाव. त्यांचा माणूस म्हणूनचा संघर्ष. प्रसंगी त्यांच्या सुखदु:खाची अधिक आस्थेनपणाने विचारपूस करावी. कारण समूहाच्यासोबत उभे राहिले, तर आपल्यातील अपराधाची शून्यपणाची जाणीव नष्ट होईल. मग निश्चितच कवीला वगळून सृजनशील सार्वभौम इतिहास कुणाला लिहिता येणार नाही...


आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com

संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...