आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फात दडलेला सांस्कृतिक संघर्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्नो’ या ओरहान पामुकलिखित कादंबरीत तुर्कस्थानातील काही सामाजिक संघर्षात्मक घटनांचे क्लेषकारक संदर्भ आपल्याला सापडतात. मॉरीन फ्रीली यांनी २००४ साली इंग्रजीत अनुवादित केलेली ही कादंबरी साकेत प्रकाशनाच्या वतीने विशाल तायडे यांनी मराठीत आणली आहे.

 

नोबेल पुरस्काराचे मानकरी ओरहान पामुक हे आजचे प्रसिध्द जागतिक लेखक. जगभरातील भाषेत त्यांच्या कादंबरीचे अनुवाद झालेत. ते इतके लोकप्रिय की समकालीन कादंबरीकरांच्या शैलीवर त्यांच्या लेखनपध्दतीचा प्रभाव कळत नकळत जाणवत रहातो.


"स्नो' कादंबरीतील निवेदक स्वत: लेखक आहे. कादंबरीचा नायक "का' जो जन्मतः एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संस्काराने घडलेला काहीसा एलिट वर्गाचा प्रतिनिधी,ज्याचे सुरुवातीचे शिक्षण इस्तंबुलसारख्या मोठया शहरात झाले आहे. उच्चशिक्षण त्याने जर्मनीत घेतलेले. स्वभावत: संवेदनशील, तसाच प्रसिध्द कवीही... तारुण्यात डाव्या चळवळीत सक्रिय काही काळ असलेला पण शिस्तीची सवय नसलेला इंटलेक्च्युल. आधुनिक जगात जगताना धर्मनिरपेक्ष,तसाच तो श्रध्दावानही. पूर्वी तो स्वत:ला नास्तिक समजायचा. तो देव मानतो पण त्याचा देवधर्मात बध्द नाही. लोकं आधुनिक असावीत, त्यांना आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे, आपल्या देशाचा विकास व्हावा, जटादाढीधारीपेक्षा धर्म वेगळा असू शकतो, ही त्याची मतं. तो हुषार, बुद्धिमान आणि देखणा असल्याने नामांकित रिपब्लिकन वृतसंस्थेत वार्ताहार म्हणून कामाला लागलेला आहे. परंतू धर्मवादी लोकं त्याला आधुनिक दरवेशी समजतात. हे सगळं वर्णन लेखकाच्या निजी जीवनाशी निगडीत असेच आहे.

 


"का' इस्तंबुलहून बसने अर्झरूमला येथे संध्याकाळी पोहचलेला अन् तिथून पुढे शेवटच्या बसने कार्स या तुर्कस्थानातील दुर्लक्षित शहरात आलेला आहे. कार्समध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे वार्तांकन तो करणार असतो. लेखक आपल्या कथनातून एक निष्णात वार्ताहर असण्यासाठी किती साऱ्या गोष्टीची माहिती असणे गरजेच आहे, याची वाचकाला जाणीव करून देतो. वार्ताहार बनणं हे म्हणावे तितके सोपे नसते कधीच. ज्या ठिकाणाचे रिर्पोटिंग करायचे आहे त्या शहराचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती, लोकांच्या उपजिवीकेची साधनं,  त्यांचे राहणीमान, साक्षरतेचे एकूण प्रमाण,शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण, प्रचलित राजकीय व्यवस्था, दस्तुरखुद्द वार्ताहराच्या संबधित विषयाची आस्था, त्या परिसराविषयी निजी भावनिक गुंतवणूक आणि आवडणऱ्या व्यक्ती... या शिवाय कमालीची धाडसी वृती, इतक्या साऱ्या गोष्टी आणि तेवढीच धंदेवाइक पारदर्शी तटस्थता असणे गरजेचे आहे.


सोसाटयाचे वारे अन बर्फाचा अविरत पाऊस पांढऱ्याशुभ्र बर्फाच्याराशीने समोरचा रस्ता सुध्दा अदृश्य. पाठीमागचे जवळपास सर्व दोर काही दिवस तरी तुटलेल्या जगापासून अलिप्त झालेल्या कार्स या शहरात तो पोहचलेला आहे. एरव्ही खिडकीबाहेरच्या बर्फाशी "का'चं मंगलमय पवित्र असे वेगळ नातं. बर्फ पडत असताना त्याला देवाची आठवण होते. पण कार्स मधे बर्फाचे वेगळच रूप "का' पाहतोय.त ्याला दिसतं इथे बर्फाचा निष्पापपणा संपलेला आहे, बर्फाने भितीदायक रूप धारण केलय. तरीही सकाळ होताच तो बाहेर पडलाय. इथल्या स्थानिक वार्ताहर सरदारभाईशी संपर्क साधण्यासाठी त्याला सांगितलं गेलं आहे.

 


स्थानिक पातळीवर तीनसाडेतीनशे प्रतींचे वृतपत्र चालवणारे वार्ताहार, त्यांचा पोलीस अन् प्रशासकीय वर्गाशी असलेले संबंध अन् उर्वरित जागा भरण्यासाठी उथळ अन् भडक बातम्या देण्याची व्यापारी वृती यावर सुध्दा पामुक भाष्य करतोच. प्रशासनाला फारसा त्रास न देता एक रूटीन सरळसोट जगणं स्वीकारलेल्या एखाद्या दुर्लक्षित शहरात मान्यवर वृत्तपत्र समुहाचा स्वतंत्र बुध्दीचा वार्ताहर आल्यास प्रशासनाला एक वेगळीच डोकेदुखी निर्माण होते.पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवते. तसेच स्थानिक राजकीय पुढारी सुध्दा आपआपल्या पध्दतीने वार्ताहराचा वापर करून घेण्यास पुढे सरसवतात. पामुक या सर्व गोष्टींचे अत्यंत निरस पध्दतीने वर्णन करतो. 
स्त्रियांच्या आत्महत्येकडे अनाठायी लक्ष देऊ नये असेच ते वेगळया पध्दतीने "का'ला सांगतात. या शहरातच त्याची पूर्वीची प्रेयसी नापेक रहाते, तिच्या दुसऱ्या बहीणीचे नाव आहे कदीफ. दोघीही अतिशय सुंदर... नापेकचे लग्न मुहतार या धर्मवादी राजकारण करणाऱ्या पुरूषाशी झालेलं. तो स्वत:ही कवीच आहे. तीनचार वर्षांच्या कालावधीनंतरही त्यांना मुल होत नाही म्हणून ते सध्या विभक्त आहेत. कादीफचे प्रेम मध्यरात्रीतील आकाशाच्या निळया रंगासारखे डोळे असलेल्या ब्ल्यु या अतिरेकी धर्मवादी तरूणावर आहे. त्या दोघींचे वडील सत्तरच्या दशकातील एक कम्युनिष्ट कार्यकर्ते होते. धर्मवादी राजकीय पक्षांचा जोर वाढल्यामुळे पत्नीच्या पश्चात आपल्या दोन तरूण मुलींच्या मदतीने ते हॉटेल स्नो पॅरेडाइज मध्ये जीवन व्यापन करीत आहे.

 

 
"का' चे कार्सला येण्यामागे हे सुध्दा एक कारण आहे. दरम्यानच्या काळात कार्स आणि भोवतालच्या परिसरात स्त्रिया अन् तरूण मुलींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या साथीच्या रोगासारखी स्त्रियांमध्ये आत्महत्येची लागण लागलेली आहे. निवडणुक वार्तांकन ही एक व्यावसायिक जबाबदारी आहे तसेच नेमक्या कोणत्या कारणाने या स्त्रीया मृत्युला कवटाळत आहेत हे जाणून घेण्याची एक संवेदनशील कवीमनाची अंतरिक गरजदेखील आहे. व्यक्तिगत पातळीवर एका अपार कारुणिक आस्थेनं "का' कार्स या शहरात आलेला आहे. कार्स जेव्हा शहरात फिरतो तेव्हा त्याच्या लक्षात येते या शहरातील गरिबी. वास्तवात  आत्महत्येच्या पाठीमागचे कारण असते बेकारी अन् दारिद्रय. दिवसांची तोंडमिळवणी कशी करायची या अतिरिक्त ताणातूनच स्त्रीया आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.

 

रोजचे पूर्वापार रूटीन आयुष्य जगतानाच अचानक आणि अनपेक्षितपणे बायका गळफास लावून घेत आहेत.म्हणजे आत्महत्येची पूर्वतयारी त्यानी आधीच करून ठेवलेली असावी.खरेतर पुरूषांपेक्षा स्त्रीचे आत्महत्येचे प्रमाण तीनचार टक्याने कमीच असते. पण इथे उलटच घडताना दिसत असते. दोन तरूण मुलींची आत्महत्या वेगळया कारणाने घडलेली आहे. शाळेच्या  मुलीला तिच्या वर्गशिक्षकाने मुलीच्या कौमार्याविषयी शंका घेतली, त्याची चर्चा शहरभर झाली.आजी काळजीने म्हणाली, पोरी तुझं आता लग्न कसं व्हायचं? आठवडयानंतर नेहमीसारखेच रात्री बाप दारू पित बसलेले, टिव्हीवर एका लग्नाची मालिका सुरू आहे. मुलगी उठली, वरच्या खोलीत गेली. आजीच्या झोपेप्या गोळया घेतल्या, बसं संपल आयुष्य.पोस्टमार्टममध्ये तिचे कौमार्य अबाधित असल्याचे समजले.
दुसऱ्या एका मुलीला मुख्याध्यापकाने डोक्यावर स्कार्फ घालून आली म्हणून वर्गातून बाहेर काढले. म्हणे सरकारी फतवाच निघालाय. ती म्हणाली, आता माझ्या जगण्याला कसला सन्मानच उरला नाही.चार दिवसानंतर माडीवर गेली, प्रार्थनेसाठी गुडघ्यावर बसली. तोंडावरून अपार मायेने हात फिरवला,ओढणीचा फास केला. बसं संपवल आयुष्य...


"का' इपेक सोबत एका पेर्स्टी बेकरीत चहा पित बसलेला. बऱ्याच वर्षानंतर ते भेटत आहेत. ते मुहतार विषयी बोलत आहेत. "का' विचारतो, अचानक लोक असे देवधर्माकडे कसे वळत आहेत?आणि या गावातल्या मुली आत्महत्या का करताहेत? इपेक सांगते, बेकार भ्रमिष्ट तरूणांना देव, राष्ट्र अन् भ्रामक आस्मितेकडे बहकवलं जातयं. अन् घर चालवणाऱ्या हताश बायका-मुली पर्याय कसला दिसत नसल्याने स्वतःचा जीव गमावत आहेत. नेमके याच वेळी प्रस्तुत बेकरीच्या एका कोपऱ्यात ते कॉलेजचे प्रिन्सिपल आणि एक बुटका तरूण बोलत असलेले. अचानक तो तरूण उठतो अन स्कार्फवर बंदी आणणाऱ्या त्या प्रिन्सिपलला गोळया घालून संपवतो. हे सगळं प्रकरणच लेखकाने ज्या कष्टाने अन सफाईने चित्रित केले त्याला तोड नाही.


कादंबरीत अशा अनेक नाटयमय घटना घडत असतात. बेकरीतील चहा आटोपून तो मुहतार कडे जाणार असतो. जो इपेकचा पूर्वीचा नवरा अन धर्मवादी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष,  अतिरेक्याने गोळया घातल्या हे तो पोलिसांना सांगणार असतो, पण टेलीफोन कुठे मिळत नाही म्हणून तो मुहतारच्या ऑफिसवर जातो. मुहतार अतिरेकी कारवाईत सामिल असावा असा पोलिसांचा त्याच्यावर संशय आहे. 


ओरहानची स्नो ही कादंबरी समजून घेताना सोव्हिएत रशियानंतरचे पतन, १८४ नंतरचे सुरू झालेलं उदारीकरणाचे धोरण, धर्मवादी दहशतवादी संघटनाना जागतिक राजकारणात आलेले अनन्यसाधारण महत्व, पौरात्य अन पाश्च्यात्य संस्कृतीमधील संघर्ष...या सर्व गोष्टींची किमान जाण असायला हवी.


ओरहान पामुक हा प्रयोगशिल वास्तववादी लेखक आहे.आपल्या कथनात मॅजिक रिऍलिझमचा तो अभावानेच कधी वापर करीत असेल. "माय नेम इज रेड' या कादंबरीतील  पात्रे वाचकाशी बोलतात. पण बोलणारे केवळ जिवंत व्यक्ती नसतात तर चराचरातील प्रत्येक वस्तू असते... जसे की विहीर, कुत्रा, झाड, मृत माणूस. वाचक संमाहित होतो अन् वाचत रहातो.


तुलनेने दिर्घ असलेल्या या कादंबऱ्या जगभरातील चोखंदळ वाचक खूप आस्थेने वाचतात. कथनातील प्रमुख विषयाचे एक प्रकरण ,ओरहान त्याला साधारण मोठं शीर्षक देतात.पुस्तक वाचणे वाचकाला अशाने सोयीचे अन सोपं वाटते. जगाच्या सामाजिक साहित्यिक राजकीय अन् सांस्कृतिक घडामोडीत साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे योगदान फार महत्वपूर्ण आहे. विसाव्या शतकातील अखेरच्या पर्वाचे ते साक्षीदार.ज्यांच्या पिढीने पृथ्वीवर स्वर्ग प्रत्यक्ष साकारताना पाहिला अन् त्यांच्या डोळयासमोरच त्या उष:कालानंतर अाकस्मित आलेली काळरात्रसुध्दा बघावी लागलेली आहे. अशा पिढीचा काहीसा अपयशी हताश तरीही आशावादी वारसदार आहे, ओरहान पामुक.


मराठीत स्नो आणि माय नेम इज रेड या कादंबरी औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या आहेत. माय नेम इज रेडचे अनुवादक गणेश विसपुते आणि स्नो या कादंबरीचे भाषातंरकार आहेत विलास तायडे.
-------------------------

आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...