Home | Magazine | Rasik | Anand Vingkar wrute about poem of Satyapal Singh Rajputan

प्रतिभासंपन्न काव्यलिपी

आनंद विंगकर | Update - Aug 26, 2018, 07:21 AM IST

मुक्तीचा ध्यास घेणारी ही कविता आहे. ही मुक्ती जशी व्यक्तिसापेक्ष आहे, तेवढीच समष्टीचींही आहे.

 • Anand Vingkar wrute about poem of Satyapal Singh Rajputan

  मुक्तीचा ध्यास घेणारी ही कविता आहे. ही मुक्ती जशी व्यक्तिसापेक्ष आहे, तेवढीच समष्टीचींही आहे. त्यात अभिनिवेशी प्रेम नाही, तशीच दांभिकताही नाही. म्हणून हा कवी आणि त्याच्या कविता प्रतिभासंपन्न कुळांशी नातं सांगणाऱ्या आहेत...

  अहर्तपद, बोधीसत्व, निर्वाण बौद्ध धर्मातील या तीन अवस्था महत्वाच्या. अहर्तपद हे संघटनात्मक कार्यातील सर्वात शेवटची अवस्था. यात धम्माचे संपूर्ण सार अवगत असणे महत्वाचे. शिवाय स्वत:चे आचरण काटेकोर नितीनियमाने परिपूर्ण असावे. तसेच इतर साधूंनी ते अंगीकारावेत म्हणून दिशादिग्दर्शन करणे क्रमपात्र असते. बोधिसत्व ही त्याहून वरची पायरी. बोधिसत्व झालेले ज्ञानी पुरूष निर्वाणाला जावू शकता. पण निर्वाण ही व्याक्तिमत्वाची सर्वश्रेष्ठ उन्नत अवस्थाच नव्हे, तर एक वैश्विक उर्जास्त्रोतच असते. हे फक्त आजवर तथागतानाच प्राप्त झालेय. बोधिसत्व हा सर्वात उत्तममार्ग. ज्ञानाच्या एका उतुंग शिखरावर पोहचल्यानंतर आपणास प्रतित झालेला. सन्मानमार्ग इतरांना सांगणे, इतरांनाही हा भवसागर आनंदात कसा पार करता येईल, यासाठीचे प्रचंडमोठे योगदान म्हणजे, बोधिसत्व. हे पद बाबासाहेबांना मिळाले.

  सत्यपाल रजपूतांची कविता मोक्षाची आस धरणारी आहे. हा कवी मुक्तीचा रस्ता शोधत आहे,असे सकृत अर्थाने मला दिसते. अष्टांगमार्गासारखे आपल्या कवितेच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे तो उधृत करतो आहे. ज्यांना मी माझ्या सोयीसाठी सुक्त असे म्हणतो.
  ‘काळ्या जादूचे अवशेष’ या त्याच्या संग्रहातील साधारणतः अट्ठावन कविता सात सुक्तांमधे विभागलेल्या आहेत. या संपूर्ण कविता वाचून त्याचा प्रवास निश्चित कोणत्या दिशेने चाललाय, याचा किमान काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. तो बरोबरच असेल, असेही मला म्हणायचे नाही.


  उत्खननः कविता समजून घेताना आपली दमणूक होते. सत्याची कविता समजण्यासाठीची पूर्वअट वाचकाला इतिहास, तत्वज्ञान,राजशास्त्र भारतीय दर्शनाची किमान माहिती असायला हवी. त्याच्या कवितेची बांधणी गोळाबंद चेंडूसारखी. कोणताही शब्द अनाठायी नाही. शिवाय प्रतिमा-प्रतीकं मिथकांच्या वेली अन् झुडपांनी ती एवढी एकजीव एकसंग झालेली, की तिच्या आत्म्याजवळ पोहचणे, काहीसे दुस्तर झालेले असते. तर उत्खनन म्हणजे आपल्या अस्तित्वाचा शोध. मानवाला पडलेला अगदी मूलभूत प्रश्न मी कोण? सत्यपाल त्याच्या भूतकाळाचे उत्खनन करतोय इथे.


  पहिलीच कविता निर्वाणपद. ‘वारं’ सोडलेल्या झाडाची ही उन्मलीत अवस्था, त्याचा हा आत्मरत संघर्ष मुक्तीच्या रस्त्यावरील मध्ययुगातील संतांचा आहे. त्याला मूलाधार चक्रातून वर आलेला एक प्रश्न. झाडाला शोधायचंय स्वतःचे बीजपूर्व अस्तित्व. कां आपण अवतरलो या भूतलावर? नेमकं कोणतं प्रयोजन की हा आहे अपघात? की पक्षाने फळ खावून विष्टेद्वारे फलित झालेल्या बी’चा विस्तार. मानवी उदय, विकास, अन् सर्वंकष ऱ्हासाचा प्रवास त्याला शोधायचा आहे.
  "अॅडमला हवाय मोक्ष’ची निर्माण प्रक्रिया सत्यपालने एका लेखात मांडलेली आहेच. त्याला मुक्ती हवी आहे, रादर एक निचरा. पण ती सिव्हिलायजेशनच्या काटेरी कुंपणात असल्यानेच तो जेरबंद होतो. ही सारी बंधन त्याला नकोयत. एक आदीम ‘बारबेरियन’ मानसिकता सुप्तावस्थेत अजूनही शिल्लक असतेच मानवी जानुकात, तिचा हा काव्यात्म अविष्कार. अशा उन्मादी अनुभवाला भिडण्याची प्रामाणिकता जाणवते ही कविता वाचताना. ‘जला दो, इसे फूँक डालो , यह दुनिया’चा जोश, एका सार्वत्रिक व्यापक आयामात विस्तारत जाण्याचा एक मूलगामी प्रयत्न म्हणजे, सत्यपाल रजपूत याची ही कविता!


  रिक्तिकाः सत्याच्या मते, या शब्दाचा अर्थ अपूर्णता, पराभूतता, जगण्याला आलेली परात्मता. परात्मभाव म्हणजे, स्वतःच्या मताचा अभाव. सत्याला नाकारणे. ज्ञान अन संघर्षाविषयची अनास्था. आपल्या एकूण साहित्यचर्चेत ‘परात्मता’ फार आपुलकीने उच्चारला जाणारा शब्द. खरेतर ही असते, आत्मप्रताडणा. ही आत्मवंचना परिस्थितीच्या रेट्यातून येते. अन् परस्थितीचा रेटा असतो, सरंजामी भांडवली व्यवस्था! वास्तव नाकारणे म्हणजे परात्मता!


  रिक्तिकामधील सर्वच कविता पराभूत मानसिकतेच्या आहेत. परिस्थितीला सामोरं न जाण्याची मानसिकता इथे कळत -नकळत जाणवते. मार’ नावाचा राक्षस सिद्धार्थाला जसा त्याच्या सत्य समजावून घेण्याच्या प्रयत्नांना अवरोधित करतो. तसे मानवी संघर्ष अन् स्वप्नांना विरोध करणारी व्यवस्था वेगवेगळ्या फॉर्ममधून अवतीर्ण होताना दिसते. पाणी, गाळ, चिखल अन् मातीतून वर आलेल्या मानवी आदीम उत्सर्जित प्ररणेला अंध:कार, अज्ञान, विसंवाद हरतऱ्हेनं हतबल करणारी जी एक व्यवस्था कार्यरत असते, तिच्यातून रिक्तिका येते. सर्व अर्थी शोषणाचे हे ऱ्हासपर्व पृथ्वीवर सुरू झालंय, असं या कविता वाचताना जाणवते.

  अभिव्यक्त होणारा आवेग अन् ज्वालामुखीय स्फोट इथे नाहीत. तर काहीसे संथावलेपण दिसते. परात्मतेचा काळसर्प अापल्या भावभावनांचा वादप्रतिवादाचा इश्किया याराना बाजार तर उधळून लावणार नाही, अन् प्रस्थापित करेल, आमच्या निसर्गदत्त वासनांचे ‘इंटरनॅशनल मार्केट’? अशी एक अनाम भीती या कवितेतून जाणवते. या सर्वच कविता समजण्यासारख्या.
  शाक्तः राजस्थानहून स्थलांतरित, पायाखाली उष्ण उघडी वाळवंटं, वर प्रदीप्त सूर्य काळा. खोल दऱ्या अन् दंतूर किनाऱ्यांच्या तापी-नर्मदा, नद्या सात पर्वंतांचा सातपुडा पार करीत तो इथे आलाय. त्याच्या रक्तातून वहात आल्यात दोन-तीन भाषा. एक अजब रसायन आहे त्याच्या व्यक्तिमत्वात. लढाया, युद्ध, उपासमार. एक वेगवान वारे, त्यातून वाहणारी लोकगीते अलख निरंजनची एक धून आपल्या सोबत. इथे जगण्यासाठी हासिल कलेलं ज्ञान. परिवर्तनाचे वारेही शिरलेलं त्याच्या शिडात. एक अजब कोलाज आहे, सत्यपाल.


  शाक्त मधील सर्वच कविता सेंद्रिय प्रेमाच्या. जिथे भाकरी इतकेच शरीर अनिवार्य. पूर्णत: देहिक आहेत, या कविता. मराठीत अशा विस्फोटक प्रेमाच्या कविता. एक नामदेव अन् दुसरे सतीश काळसेकर मधे सापडतील. यात उर्दू शायरीतील सुफियाना टच आहे परत.
  अघोरी शाक्त तसे अराजकीयच. स्त्री ही त्यांची आदी शक्ती. भारतीय समाज व्यवस्थेनं ठरवले जिला, अनाचारी. पण स्त्री भोवती केवळ फिरते कां शाक्तांचे तत्वज्ञान? या तत्वज्ञानाने छत्रपतींना, संभांजी राजेंना मोहित केलं. काय असेल शाक्तांचे सामाजिक राजकारण? तत्वज्ञानाचा विद्यार्थी सत्यपाल. त्याने यावर प्रकाश टाकायला हवा होता. खैर.
  "आधिभौतिक’ आणि पुरूष प्रकृती’ या एकाच कवितेचे दोन भाग आहेत. माझ्या जीभेवर उगो/तुझ्या मानेवरची निरागस सोनेरी लव. तुझ्या आतून पुरवलेली/खंडीत न होवो मोहाची भरभक्कम रसद. किंवा मी तुलाच पीत असतो चहाच्या प्रत्येक घोटातून/मी तुलाच लिहित असतो चर्चासत्राच्या प्रत्येक पेपरामधून. तू क्रांतीची ठिणगी./तू लाल बावट्याची काठी. तू बोधीवृक्ष मला मिळूदे निर्वाण.
  मजनूला सर्वत्र लैला दिसते. प्रेम असते प्रमादी, आदी विद्रोही. जात- धर्म -वर्ग वंशांच्या सीमा ते लांघते. प्रेम असते बंडखोर, आणि क्रांतिकारकाराची आदीम उर्जाही असते प्रेम. हेच प्रेम माणसाला व्यापक बनवते, अन् बदलास कारणीभूतही ठरते.

  बहिर्गोलःसत्यपालच्या कवितेच्या प्रवासात मला मुक्तीचा ध्यास जाणवतो.बोधिसत्वांसारखीच त्याची ही मुक्ती. जशी व्यक्तिसापेक्ष, तेवढीच समष्टीच्या मुक्तीची आस तिच्यात,आहे उधृत. ‘को अहम’पासून सुरू झालेला हा सगळा प्रवास खडतर. मानसिक कौटुंबिक संघटनात्मक खचलेपण. वर शरीर म्हणून त्याचा एक धर्म. या समूळ अडथळ्यांना भिडून त्यांना सोबतीला घेवून जाणं आहे. मुख्य म्हणजे ,तो प्रामाणिक आहे. त्यात अभिनवेशी प्रेम जसे नाही. तशीच दांभिकता नाही. समकालीन वास्तव तो अधिक सजगतेन समजून घेतो. मरून पडलेल्या एकविसावे शतकात तो हातात मशाल घेवून फिरतोय. बुद्धीच्या पुरातन शहरात त्याने आपले गावठीपण सोडलेलं नाही.कार्पोरेटी सट्टेबाजारात ही भांडवली लोकशाही विकताना त्याने अनुभवलीय. तो म्हणतो, किती रूपये फुली सुरूये तुझ्या वार्डात. सगळं भोवतालच फितूर झाल्याचा साक्षात्कार त्याला झालेला आहे. काहीसे उद्वेगाने तो म्हणतो, आपण जन्मभर बसायचकी काय विरोधी बाकावर?

  मला इथे जाणवते, सगळ्या गोष्टी अॅट इझ, इंस्टंट. सगळे समजते बाकी चिकाटी अन् एव्हरलास्टिंग स्ट्रगल तेवढा माहित नाही, या बुद्धीजीवी पिढीला. किरकोळ पटलं नाही की लगेच यांचे ब्रेकिंग.
  या सर्वच कवितांमधील प्रतिमा उत्तराधुनिक, धर्मांध जातीय अन् फॅसिस्ट आवकाशात वावरणाऱ्या. संवेदनशील मनाचे तितकंच प्रत्ययकारी कलात्मक आविष्करण. वानगी दाखल ही ‘हे काळेकुट्ट नशीले ढग’ ही कविता. अफवांच्या घुसमटत्या धुक्यातील हे भीतीदायक दृश्य, म्हणाल, तर ते निखळ वास्तव किंवा अभास. भाषणबाजीतील अमूर्त स्वप्नं, उबावू मध्यमवर्गीय राष्ट्राभिमान, लोकांना गोंधळात टाकणारी फसवी भावनिक मिथकं, टार्गेटेड वस्त्यांतील सरेआमच्या कत्तली. बेबस माणसं... स्मृतिभ्रंशाचा गारवा, तर इतका दाटून राहिलाय हवेत/की झालीच नाही जणू नोटबंदीची अवकाळी ढगफुटी. खरेतर रोज नव्या अरिष्टांना सामोरं जाताना माणसं कालचा घिनोना भूतकाळ विसरू इच्छिताहेत. मला आणखी एक आवडलेली कविताःलिपीकथा. भाषेच्या उगमाविषयी भाषेशिवायच्या एका पर्यायी वैश्विक संवादाची, तो या कवितेत मांडणी करताना दिसतो. आपसी संवादाचे एक नवं माध्यम तो इथं दाखवतो.
  पलटवारः जहाँ जहाँ चरण पडे गोतमके’ ही अनुवादित कादंबरी आहे, एका अशियायी लेखकाची. एक घास बत्तीसवेळा चावून खाणे म्हणजे, रवंथ नाही केवळ जनावराचे. तर अंर्तमुख अन नम्र होवून अधिक सखोल चिंतन करणे असते, भवतालचे. म्हणजे ताट वाढून येण्याआधी/सूर्याच्या प्रकाश उर्जेचं/धान्याच्या रासायनिक उर्जेत/रूपांतर झाले असेल प्रकाशाच्या संश्लेषणाच्या निमित्ताने. तथागत तर पेरण्यापूर्वीच्या जमीनीपासून सुरवात करतात.ते भूमीपुत्र. पंचमहाभूतांची साथ अन् अथक मानवी श्रम यातून अवतिर्ण हा ‘पसारा’ त्या श्रमाला डावलून आपल्याकडे कोणतं सत्व उरते? सत्यापाल विचारतो, मग हे चिडलेले लोक जेव्हा कांद्यांची पोती उभरून टाकतात, रस्त्यावर/किंवा गर्दी करतात अाझाद मैदानावर मोर्चासाठी... या संपूर्ण कविता समष्टीच्या कोलाहलाच्या आहेत. कैवल्याच्या वाळवंटातील आत्मरंगी रंगल्याचे, सर्व सोहळे आता मोर्चात विसर्जीत होणार आहेत. लहानपणापासून बापाविना पोरका तो, विधवा आईच्या दीर्घ वर्षांचा आकांत एक समजूतदार पुरूष बनून अभिव्यक्त करतो, ही माणूस म्हणूनची लालमभूत गोष्ट आहे.

  उर्ध्वपतितः उर्ध्वपतित म्हणजे दुसरे काय? अनुभवाचा स्तर तो घेण्याची तीव्रता, आणि आपला जीवनाविषयचा दृष्टिकोन यातून तुमच्या अत्तराची उंची ठरते.नवसाडेनवशे शब्द माझ्या सदराचा अवकाश अन् अरण्यासारखी सत्यपालची कविता. हे एक जंगल आहे, काहीसे गूढ मायावी, मोहमयी तितकेच निर्मळ नितळ संवादी. मुद्दा येवढाच की ‘काळ्या जादूचे अवशेष’ वाचायला आपण ‘वाल्डेन’ तळ्याकाठी आत्मशोधासाठी वस्तीला गेलेला हेन्री डेव्हिड थोरो बनायला हवे.


  चांगल्या कविविषयचे माझे व्यक्तिगत निकष वेगळे आहेत. एकादा कवितासंग्रह वाचल्यावर त्यामधील आठदहा कविता वाचकाच्या आठवणीत रहिल्या, तरच तो एक महत्वाचा कवी. या कवितांद्वारे सत्यापाल रजपूतने मराठीत आपली मुद्रा निश्चित उमटवली आहे.
  शब्द प्रकाशन अन यशू पाटीलचे आभार!


  anandwingkar533@gmail.com
  संपर्क : ९८२३१५५७६८

Trending