Home | Magazine | Rasik | Anand Windgkar writes about Daina Book

माणुसपणाची दैना!

आनंद विंगकर | Update - Apr 21, 2019, 12:12 AM IST

चोरी करणे पाप, ही सरंजामी नैतिकता तशी एकांगीच. उपाशी मरा, पण भूक लागली तरी चोरी करू नका, हा कुठला न्याय?

 • Anand Windgkar writes about Daina Book

  पारधी समाजातील आत्मकथनाच्या एकवीस आवृती. हा एक उच्चांकच! पण तरीही भास्कर भोसले या पारधी लेखकाचे "दैना' हे पुस्तक मराठी सारस्वतांनी वाचलेलं नसावेच. रूचीपालट म्हणून कित्येकदा उपेक्षित जनसमूहांची आपण आत्मकथनं वाचतो. वाचून आपण भावूक हळहळ व्यक्त करतो. पण ही व्यवस्थाच अशी का? याचा विचार आपण अभावानेच करतो.

  चोरी करणे पाप, ही सरंजामी नैतिकता तशी एकांगीच. उपाशी मरा, पण भूक लागली तरी चोरी करू नका, हा कुठला न्याय? पापी पेटके लिए केलेली ही चोरी तशी भ्रष्टाचारी राजकारणी पुढऱ्यांहून एक शतांश पटीने लहान असूनही समाज म्हणून आपण त्यांना मरणाची सजा देत असतो.


  गेल्या दोनतीन महिन्यापासून भास्कर भोसले या पारधी लेखकाचे आत्मकथनाचे पुस्तक मी शोधत आहे. शंकर कसबे, या कवी मित्राने मला त्यांचा मोबाइल नंबर दिला. वारंवार फोन करूनही मला ते पुस्तक मिळत नव्हते. परवा, ‘फोटोग्राफी ऑन व्हिल्स’ या उपक्रमांर्तगत प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांच्यासोबत मी बीडला गेलो. तेव्हा बीड जिल्ह्यातील गेवराईचे सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळेकडून मला हे पुस्तक योगायोगानेच, अगदी अचूक समयी मिळाले.

  काळोख पडल्यावर साडेसातच्या दरम्यान रहदारीचा रस्ता सोडून दोन्ही बाजूस डगरीच्या पांदीतून तीनचार किलोमीटरवरच्या फळाटे न काढलेल्या एका कापसाच्या शेतात अंधारात एक झोपडी, अशोक बांगर या दलित इसमाची. गावातल्या लोकांनी, या पारधी कुटुंबाला हद्दपार केले. प्रयत्नाने मिळवलेल्या गायरान जमिनीवर ते रहात होते. चोरी कुठं दुसऱ्या तालुक्यातील गावात झाली आणि यांच्यातील लोकांनाच पोलिसांनी धरले. बायका, लहान नेणती मुलं जाणार कुठं? गावातले लोक एवढ्या वर्षाची ओळख विसरले. म्हणाले, गाव सोडा. राहायचे नाही इथे. तर माजी सरपंच ‘जय भीम’वाले बांगर म्हणाले, राहा माझ्या शेतावर म्हणून. दहापंधरा माणसांची वस्ती इथे आसऱ्याला आलीय. तेच त्यांना बोअरचे पाणी देतात. बांधावरील लिंबाच्या झाडांची सावली, हाच त्यांचा सार्वजनिक तक्या. आम्ही अचानक तेही असे कडुसे पडल्यावर त्यांच्या वस्तीचा माग काढीत मोटरसायकलवरून आल्याने पोलिसांचे लोक म्हणून ते सुरुवातीला साशंक. कडुदासने हाक मारल्यावर पांगलेले, ते परत एकत्र आले. नंतर त्यांच्या बायकांनी तीन दगडांची चुली पेटवल्या. तेव्हा कुठं मानवी अस्तित्वाच्या खाणखुणा धूसर कां असेनात पण दिसू लागल्या.

  असे अगदी तंतोतंत वर्णन ‘दैना’ या आत्मकथनात पानोपानी आपणाला वाचता येतं. याचा अर्थ एकाच वेळी मी, पारधी समाजाची ‘दैना’ पाहात अन् वाचतही आहे...
  कोणत्या अश्मयुगीन काळातली माणसं मला भेटलीत, जे घर या संकल्पनेपासून कोसो मैल दूर

  आहेत अजून. डोंगर अरण्यातून ते बाहेर आलेत, पण ते सुटलेले नाही अजून. हरण, ससा, चितर, अन् मागून आणलेले भाकरीचे शिळे तुकडे एवढेच त्यांचे सकाळ-दुपार-संध्याकाळचे अन्न आहे. मिळेल ते फळ, कधी झाडांचा पाला, एखादे अर्धबोबडे ज्वारी, मक्याचे कणीस पिकून पिवळी झालेली, गहू तांदुळाची लोंब्या, उसाचे कांडके... जे हाताला मिळेल, ते ही माणसं खातात. आपल्यासारख्या माणसांना ते भितात. जसे आपण त्यांना गुलाम करणार आहोत, पकडून ठेवणार आहोत, मारून टाकणार आहोत. केवळ लाज राखण्यासाठीच त्यांच्या अंगावर जुने मळकट कपडे. अर्धनग्नच ते. लहान पोरं तर जवळपास, नागडीच. कोणाच्याही पायात पायताण नाही. जमिनी हेच त्यांचे अंथरूण. आणि रात्रीचा काळोख पांघरूण. तहान लागली तेव्हाच करतात, ते पाण्याचा वापर.

  अशाच कित्येक दहशतीच्या रात्री लेखक भास्कर भोसले अन् त्यांच्या घराने अनुभवलेल्या आहेत.
  पारधी समाजाला स्वतःचा पत्ता सांगायला, महाराष्ट्रात निश्चित असे गाव नाही. दगडांच्या वा राखेच्या खाणाखुणांचे स्मशान नाही. लाकडांच्या बाहुल्या पितळेचे टाक आणि पिवळ्या, हिरच्या, लाल, छोट्या झेंडयाच्या फडफडीत, त्यांना आपले देव पालांसोबत जिवंत ठेवता येत नाहीत. एका मोठ्या गुटळ्यात मावतो, त्यांचा पुरा संसार. ते नेहमीच गावापासून रोजंदारीच्या शेतीच्या कामापासून दूर, चोर दरोडेखोर म्हणून लोकांच्या वस्तीपासून दूर. रोज उशीचे ठिकाण बदलणारे, हे शतकानुशतकांचे फिरस्ते.

  १८५७च्या पहिल्या भारतीय लढ्यानंतर भिल्ल आदिवासी अन् फासेपारध्यांना ब्रिटिशांनी चोर गुन्हेगार म्हणून घोषित केले. तेव्हापासून आजतागायत कुठेही चोरी होवो, भावबंदकीच्या आपसी वैरातून सत्ता संपत्ती वा स्त्रीसाठी खून पडो, आडवाटेला कुण्या अभागणवर झालेल्या बलात्कारासाठीसुद्धा पोलिसांच्या लिस्टवर पहिला संशयीत अपराधी पारधी समाज असतो. जगण्यासाठी कसलीही उत्पादनांची साधनं नसताना, गाव अन् लोकांचा विश्वास अर्जित करता न आल्याने सामाजिक उत्पादनाच्या प्रक्रियेतील रोजगारात या समाजाला सामील न केल्यामुळे रोजच्या उपासमारीला सामोर जावे लागतं. मग खाण्यासाठी लायक असेल, ती वस्तू ते पोटासाठी कधीतरी चोरतही असतील. रिकाम्या पोटाने सारासार विचार करता येत नाही. चावड्यामध्ये डांबतो, भर चौकात पोलीस कारवाई होण्याअगोदर हजारो सामूहिक हातांनी मिळेल तिथे मारतो. प्रसंगी हातपाय, डोळे, डोके फोडतो. कित्येकदा, यात बेबस गरीब भुकेला बळी पडलेला जीव मरतो. आपणाला त्यांचे कसलेही सोयरेसुतक नसते.

  असा असतो, आपला अमानुष अघोरी न्याय.
  ‘दैना’ हे केवळ व्यक्तिगत जगण्याचे आत्मकथन नाही. आजवर कोणी भाषेतून व्यक्त न केलेल्या समाजाचे सार्वजनिक रूदन आहे. लेखक जसा घटनेचे विवरण करतो, तसेच वर उल्लेख केलेले, सर्व प्रश्न वाचकांला विचारतो.

  मनोरंजनासाठी रोजच्या रूटीन जगण्याला आपण कैकदा कंटाळतो. रूचीपालट म्हणून कित्येकदा उपेक्षित जनसमूहांची आपण आत्मकथनं वाचतो. वाचून आपण भावूक हळहळ व्यक्त करतो. फेसबुकवरून लक्षात आले, आपण उदार होऊन आदिवासी मुलांना जुनी कपडे, वह्या पुस्तकांची मदत करतो. हे असते आपले वाचनातून आलेले सामाजिक उत्तरदायित्व. आपण आपल्या अलवार दुःखाचे करीत असतो परिमार्जन, विरेचन. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला कॅर्थर्सिस (!) पण ही व्यवस्थाच अशी का? याचा विचार आपण अभावानेच करतो. दलित वंचित उपेक्षितांच्या आत्मकथनांचे अंतिम प्रयोजन काय? याचा विचार आपण क्वचितच करतो.


  ‘दैना’ या आत्मकथनाचा लेखक आपल्या जगण्याचे कथन करताना ब्रेख्तियन पद्धतीने वाचकांच्या डोळ्याला डोळा भिडवत मधेमधे आपणास मार्मिक प्रश्न विचारतो. आपल्या समाजावर चाललेल्या हकनाक अन्याय अत्याचारांचे वृतपत्रांसारखे रिपोर्टिंग करतो. आपण तल्लीन होऊन वाचत असताना मधेच आपला रसभंग करीत प्रश्न विचारतो, अशा भटक्या विमुक्तांना माणूस म्हणनू आपण स्वीकारणार आहोत का?


  गेवराईच्या भेटीत नुरखास ही लढाऊ विधवा म्हणाली, "घेऊन जा माझ्या पोराला अन् त्याला माणूस बनवा. मला त्याला चोर नाही बनवायचं इथं. "तुरुंगात नवरा मरून नऊ वर्ष झालीत. पस्तीस वय असलेली ही लढाऊ स्त्री, चार मुलं एकटी सांभाळते. तिला वाटतं, मुलांनी शाळा शिकावी अन् या पिळवणुकीच्या चक्रातून बाहेर पडावे. मुलांनी पंधरा वर्षं पूर्ण केली की त्यांची पोलीसांच्या दप्तरात नोंद होते म्हणे. अठरा वर्ष झाल्यावर संशयीत चोर म्हणून पकडले जाते. चोर होण्याची प्रक्रिया कळतनकळत सुरू होते.


  नुरखासला आपले मूल जड नाही झालेलं. पोटचा गोळा आहे तिच्या पण त्यांच्या नशिबात सटवीने की या समाजव्यवस्थेने तुरुंगाची वारी लिहिलीय, जी नको आहे तिला. नुकताच मिसरूड फुटलेला अकाली बापाय झालेला मुलगा बालाजी भोसले हा नुरखासचा पुतण्या.जो नुकताच उसतोडी टोळीतून वस्तीवर आलाय. म्हणत होता, तीनचार महिने दिवसरात काम करून मी बिनघोरी झोपलोय. पोलिसांच्या भितीने आता मला इथे रातीला डोळाच लागत नाही. वाटतं कधीही येतील अन्् कारण नसताना उचलून घेऊन जातील.

  एक सर्वसामान्य माणूस बनण्याची चाललेली त्यांची धडपड ही मला ‘दैना’मधील लाल्यामध्येसुद्धा दिसते. बांधकाम मजूर म्हणून महाबळेश्वरला गेलेला लाल्या भोसले आडनावाचा आसरा घेत, आपण मराठा असल्याचे सांगतो. इथे भास्कर भोसले यांना आपली जात लपवायची नसते, तर बाकी काही नका विचारू फकस्त माणूस म्हणून मला स्वीकारा, ही विनंती असते.

  आत्मकथनात एकूण अकरा भावंड असलेले, एका विशाल कुटुंबाचा निवेदक, स्वतः लेखक, ज्याचे वापरातील नाव आहे, लाल्या. त्याचे वडील गाव धरून असलेले, गाईच्या पाठीवर बसून गावाची अन् रानांची राखण करणारे आहेत. पोलिस अन् गावातील लोकांचा सुरुवातीला त्याच्यावर विश्वास आहे. तो चोर नाही. मात्र चोरांचा, चुकलेल्या प्राण्यांचा माग काढणारा एक निष्णात आसामी आहे. सहा बैलांच्या शक्तीचा थोरला मुलगा बाप्या आहे, कमालीचा ताकदवान. तितकाच कामांध बायकोसाठी, तो वेडा. पण बायका भितात त्याच्या सावलीला. त्यांची एक देखणी बहीण आहे, गोदा जिला आपल्या भावंडाचा सांभाळ करण्यासाठी लग्न करता येत नाही, जन्मभर. आणखी एक दुसरी बहीण, जी जन्मजात आंधळी आहे. एक भाऊ वेडा होता, एक मरतो, म्हातारपणात बाप्या विकलांग होतो. आठदहा खाणारी तोंड अन् जेमतेम मिळणारं बलुतं यावर गुजारण होत नसल्याने कधी क्वचित पोटासाठी चोरी करावी लागल्याने, गावाचा विश्वास ते गमावून बसतात. स्वतःच्या गावात त्याना चोर म्हणून चावडीत बंदिस्त व्हावे लागते. आईचा एक भाऊ पोलीस असतो, म्हणून तिला वाटतं, आपल्या पोरांनी चोरी करू करू नये, त्यांनी शाळा शिकावी, तशी तिची मुले शाळेत जाणारी असतात. पण सगळ्यांनाच शाळा शिकवणे कुटुंबातील नवरा बायकोला शक्य नसते. तुकाराम, लाल्या अन् नामदेव शाळा शिकतात, पण पोलीस होता येत नाही कोणालाच.

  मुलगा पोलीस होण्याचं स्वप्न पहाणारी, एक पारधी स्त्री. पोलीस होण्याचीच का आपेक्षा करीत असावी? न्याय व्यवस्थेत जर जातीचे कोणी असले, तर किमान तो समाजाचे अपमानीत अवहेलनेच दुःख समजून तरी घेईल. मुळात भाषेपासूनच हा पारधी समाज आपल्यापासून तुटलेला आहे. उसनवारीच्या बोलीत अत्यंतिक व्यक्तिगत दु:ख कधी व्यक्त करता येत नाही.

  या आहेत, वंचितांच्या शोषितांच्या सुप्त आकांशा, ज्यांना कधीच प्रशासनात, न्यायनिवाडयात जनतेच्या राजकारणात सहभाग मिळालेला नाही. आतातर साधी झेडपी सदस्याची निवडणूक गावातील सधन शेतकरीसुद्धा लढवू शकत नाही, मग या बहुजन शोषितांचे प्रतिनिधित्व संसदेत कोण करणार, कोण त्यांच्या अन्याय अत्याचाराची वार्ता छेडणार?

  पारधी समाजातील आत्मकथनाच्या एकवीस आवृती. हा एक उचांकच! पण तरीही ते पुस्तक मराठी सारस्वतांनी वाचलेलं नसावेच. छपाई चांगली नसल्याने सुरवातीची पाने नीट वाचता येत नाहीत. नव्याने एकदा, या आत्मकथनाचे पूर्नलेखन करून, परत हे पुस्तक यायला हवेय...

  आनंद विंगकर
  [email protected]
  लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

Trending