आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादगी लिखाणाचे बळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सर्वे सुखिन: सन्तु’चे मानवाने पाहिलेलं आदिम स्वप्न साकार होण्याची शक्यता निर्माण झाली होती, भविष्यात. ‘हम होंगें कामयाब एक दिन’चे वैश्विक गाणे अजूनही गात आहोत, आपण. अशीच काही हळवी स्वप्नं पाहणाऱ्या मोहिब कादरी यांचे ‘आठवणी जुन्या शब्द नवे’ नावाचे ‘साधना प्रकाशन’चे छोटेसेच पुस्तक आले, वाचण्यात. हे पुस्तक म्हणजे अंधारून आलेल्या दिवसांचे गाणे आहे...

 


अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने होंगे, अब तोडनेही होगे मठ और गढ सब... ही निद्रिस्त आत्म्यांना जागी करणारी गजानन माधव मुक्तिबोधांची ओळ. आणि याच ओळींना पर्यायी काहीशी आशावादी कवितेची ओळ, जगप्रसिद्ध कवीनाटककार ब्रेख्त यांची...
दिवस अंधारून आल्यावर गाणं असेल कां?
होय तेव्हीही गाणं असेल
अंधारून आलेल्या दिवसांचे...

 

आपण सर्व एका धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम देशात रहात असलेले नागरिक आहोत. संविधानाने आपला पेहराव, भाषा, रीतीरिवाज, उपासना, संचार, संवाद आदींना सकृतदर्शनी कसलाही अटकाव केलेला नाही. आपल्या रास्त जीवनाच्या मागण्या आणि न्यायहक्कांसाठी  समूहाने उतरू शकतो रस्त्यावर. तरीही एक दहशत आहे अनाम, वाढत चाललाय संशय. आपण सुरक्षित नाही आहोत असा, एक भास जाणवतोय सर्वत्र. त्याला पुष्टी देणाऱ्या घटना आपण पाहतोय. हळहळतोय. मूक आक्रोश करतोय एकांतात. नामदेव म्हणतो, तसं हरतऱ्हेने लोकांचे आंधळे मुके बहिरे माकड तयार करण्याचे षडयंत्र सुरू झालेय या ‘भयंकाराच्या दरवाजात...’

 

‘सर्वे सुखिन: सन्तु’चे मानवाने पाहिलेलं आदिम स्वप्न साकार होण्याची शक्यता निर्माण झाली होती, भविष्यात. ‘हम होंगें कामयाब एक दिन’चे वैश्विक गाणे अजूनही गात आहोत, आपण. अशीच काही हळवी स्वप्नं पाहणाऱ्या मोहिब कादरी यांचे ‘आठवणी जुन्या शब्द नवे’ नावाचे ‘साधना प्रकाशन’चे छोटसेच पुस्तक आले माझ्या वाचण्यात. निवेदनात ते स्पष्टच करतात, की रूढार्थाने ते लेखक नाहीत. कष्टाने अन् मोठ्या जिद्दीने उस्मानाबाद जिल्ह्यातील कुठल्या दुरस्त खेड्यात, गावापासून दूर त्यांचे शेतात वस्तीस्थान. ते अन् त्यांच्या थोरल्या बंधूंनी कष्टसाध्य शालेय शिक्षण कसे घेतले? कसं होतं आणि अजूनही कसं असतं, खेडातील जग? तिथली एक दुसऱ्यांना मदत करणारी माणसं, कसे अजूनही टिकून आहेत, सामूहिक जीवन जगण्यातून आलेले जीवातोड प्रयास. अशा या साऱ्या लहानपणातील निवडक आठवणींचे, हे पुस्तक. एका बैठकीत वाचून संपवावे असे. आजवरच्या सरकारांच्या कल्याणकारी उत्तरदायित्वातून नव्याने शिक्षण साक्षर झालेला वेगवेगळ्या जात अन् धर्माने विभागलेला आपला तळागळातील उपेक्षित अपमानित समाज. त्यांच्या जनसमूहांचे आत्मकथने मी अलीकडे जाणीवपूर्वक वाचतोय. त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय. माणूस म्हणून या सर्वांच्या सामाजिक मानसिकतेचे सार समाजावून घेतोय. आणि लक्षात येतं, या सर्वांच्या जगण्यातील एक सार्वत्रिक सूत्र आहे, आपल्या देशाने वरदानासारखे बहाल केलेलं, ते म्हणजे ‘दारिद्र्य.’

 

परिघावर जगणाऱ्या लोकांत गरीबी हालाखी उपासमार सर्वत्रच. कादरींच्या लिखाणात गरिबीचे उदात्तीकरण मात्र कुठेच दिसत नाही. ‘शाळेचा पहिला दिवस’ या लेखात माझ्या बालपणातील गावापासून लांब शेतात वस्ती करून राहणारी गरीब शेतकरी कुटुंबातील कुरवाडी समाजातील, घरी काम करत शिकणारी मुले अन् कादरी बंधू यांचात तिळमात्र फरक मला जाणवला नाही. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील माझ्या मनात साकारले चित्र पाठीवर दप्तराची जड पिशवी घेऊन नेटाने चाललेली दोन लहान मुलं, पार्श्वभूमीला काळ्याशार ढगांचा वादळ वाऱ्याचा पेन्सिलच्या स्ट्रोकनं निर्माण केलेला अाभास. खरेच का मानवी जाणीवेसोबतच आपल्या मनात धर्म आणि जात येते? हळूहळू ती बिंबवली जाते, मात्र निश्चित. कधी घरातल्या संस्कारातून भोवतालच्या परिसरातून समाजातून अन्् शिक्षणातून. पहिल्याच दिवशी मोहिब कादरींच्या बालमनात वर्गात मुलांनी बसायचे कुठं, यातून ती बिंबवली जाते. खालच्या मातीच्या काठ्यावर बसलेला एक बहुतेक दलिताचा लहान मुलगा त्यांना विचारतो, ‘तू मुसलमान आहेस का?’ कारण वरच्या शहाबादी फरशीवर बसलेली मुले सर्व सवर्ण. आणि खाली मातीवर बसणारी मुलं केवळ दलित अन् मुस्लिम. पण स्वभावतः निरागस निष्पाप लहान मुले कुठे दिवसरात्र जातपात अन्् धर्माचा विचारच करीत राहतात? एवढंच काय रोज एका गावात रहाणारी मोठी थोरली माणसं तरी साध्यासाध्या गोष्टीत कुठं कोण जातपात पाहतात? असतात काही नतदृष्ट ज्यांना माणसामाणसांत सतत तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधायचा असतो. मोहिब कादरी सर्वसाधारण सामान्य माणसांचे पक्षधर असल्यानेच,दारिद्रयाचे जसे कौतुक करत नाहीत, स्वाभिमानाने, श्रमाने प्रसंगी उपाशी राहून त्याला प्रतिरोध करतात.तसेच शाळेतील मुलांत मिसळून जातात. उमदेपणाने अपमान उपासमार सहन करीत व्यक्तिगत पातळीवर अज्ञान अन् गरिबीशी झुंज देत माणसं-मित्र-गाव  परिसर ‘माझे’ म्हणून स्वीकारतात हे त्यांच्या सादगी लिखाणाचे बळ आहे. गावातील तिसरीपर्यंतचा त्यांची आरतपरत, पाचएक किलोमीटरची रोजची पायपीट.घरची गरीबी, प्रसंगी उपासतापास,वर्ग शिक्षक बहुतेक ब्राह्मण. म्हणूनचे एकमेव पुरोहित. त्यांच्या प्रेमळ मनाचे कादरी मनापासून कौतुकही करतात. गुरुजी नसताना शाळा चालवणाऱ्या किराणा दुकानदाराचा केवळ ते मुसलमान म्हणून छडीचा अमानुष मार खातात. अगदी सुरूवातीपासून मुस्लिमांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी वापरण्यात येणारे वाक्य ‘मुसलमान जुम्मे को जुम्मा नहाता है.’ अशा कुजकट अपमानाला निमूटपणे सामोरे जातात.गरीब लहान मुलांना कुठला धर्म नि कुठली कसली जात? मग तुम्ही वेगळ्या पंक्तीला बसवा, वा झोळीत खरकाटे  टाका. अन्न हाच त्यांचा धर्म असतो! भूक ही मजबुरी. शेजारच्या गावातील मशिदीतील संध्याकाळी रोजा सुटतानाची इफ्तार आणि अखंड हरिनामाचा सांगता महाप्रसाद, दोन्ही कार्यक्रमांत अन्न न मिळाल्याने उपाशी पोटानंच घरी येतात. तरीही त्यांच्या लिखाणात गावातील मिलनसार माहोल वाचताना जाणवतोच. आणि आपसी बेबनावाच्या भीषण अरिष्टात ते आत्यंतिक गरजेचेही आहे. जवळपास सोळा लेखांचे हे पुस्तक, प्रत्येक लेख वाचनीय. काही तर व्यक्तिचित्रण अफलातून. आत मला दोन-तीन लेखांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्यातील पहिला नंदिनी. एक तरुण रुबाबदार फौजी, जो शिकणाऱ्यांना मदत करतो अन् गावात सर्वात सुंदर तरुणी, त्यांचे परक्या ठिकाणी बहरत जाणारे प्रेम, चंद स्वर्गीय सुखाचे हे मोजके दिवस. अचानकपणे झालेला मृत्यू झंझावातातील वेलीसारखे नंदिनीचे कोसळणे. आणि परत तग धरून उभे रहाणे. परत त्याच दुरस्त शहरात चिवटपणे उभे रहाणे. मुलीचे शिक्षण तिची परदेशातील नोकरी हे सगळेच सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेबाहेरच. खऱ्या अर्थाचे आक्रित. लेखकाची एक स्वकीय म्हणून धर्म अन् जातीच्या पलिकडेचा त्या कुटुंबाशी संवाद अन् तितकिच मानवीय आस्था. सगळेच अचाट असे.

 

‘उरूस’ नावाच्या लेखाचे वाचन करताना मला पश्चिम महाराष्ट्रातील लेंगरे आणि कडेगाव येथे गुण्यागोविंदाने सर्वधर्मीय जातीय सहभागाची आठवण होते. आणि मी विचार करतो, गावात जगताना इतर धर्मजातीमधील माणसांचे कसले निजी वैर असते. जिथं ईदचा शिरखुर्मा संध्याकाळी आपल्याही घरी एकदा मुस्लिम दोस्त आणून देतो. रात्री पारावर बसून मुस्लिम मित्राच्या बिर्याणीच्या आमंत्रणाची वाट पहातो. आपणसुद्धा जवळच्या एकाद्या घनीभायला दिवाळी फराळाचा डबा देतो. त्याच्याशिवाय आपल्या रानातल्या मसुबाच्या कोंबड्याची सोडवणूक होत नाही. तोसुद्धा आपल्या भावनांची कदर करीत सोमवारी कोणतं बकरं लावत नाही. वेळ आलीच तर सर्व श्रद्धा गुंडाळून मित्रांच्या अाग्रहासाठी चुकून कधी गुरूवारी वा माहित नसलेल्या एकादशीला धाब्यावर जातो. वर आपण म्हणतो, ‘ते’ आपल्या सांस्कृतिक पर्यावरणात सामील होत नाहीत. मग कोण असतात तुमच्या जत्रेत कधी रंगीत धागे, कधी अबीर गुलाल अथवा नारळ अगरबत्त्या विकणारे? कुठल्या स्त्रिया लग्नकार्यात मेंदी काढतात प्रसंगी आपल्या बायकांना बांगड्या भरतात? कोण असतात लग्नात बँड वाजवणारे? त्यांच्या कलेचं आपण कधी कौतुक केलंय? त्यांना महाभारत रामायणाच्या सिरियल आवडतात. आपण कधी कुराण-बायबल अथवा बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक घेतलंय हातात? आपल्या रानाशेजारी त्यांची घर, घराशेजारी घर. लग्न आणि शादीत तर आपण सगळेच अवर्जून सामिल असतो. अाशीर्वाद, मुबारकबाद देतो, पंक्तीत जेवतो. प्रसंगी मयत आणि माती सावडायला जातो. ही आहे, आपल्यातील सुप्त माणुसकी. त्यांनी खुशाल आपले आंधळं-मुकं-बहिरं माकड बनवायचे ठरवू देत. आपण बोलत राहू महागाईविषयी, पावसाविषयी शहरात वा युद्धात निघून गेल्या आपल्या पोरांविषयी. चौकशी करूयात एकमेकांच्या तब्बतेविषयी. आणि आपल्यातील माणुसकी बरकरार ठेवूयात. साधना सप्ताहिक अन प्रकाशनाच्या योगदानाविषयी बोलायचं होतं.ते नंतर कधी. समेवर येताना मी परत म्हणेन.
होय, तेव्हाही गाणं असेल, अंधारून आलेल्या दिवसांविषयी...


anandwingkar533@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...