आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्‍सल देशी वाण!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस जाडजूड चरित्रातून कळतो, त्याहून अधिक तो क्षणांतून जन्माला येणाऱ्या गोष्टींतून उमगतो. या गोष्टीत अवघं जगणं सामावलं असतं. जगण्याचा अर्थ ठासून भरलेला असतो. प्रसाद कुमठेकर याच छोट्या छोट्या गोष्टींतून अस्सल देशी कादंबरी आकारास आणतात...

 

परिघावरील जग माझ्या आस्थेचा विषय. हा परीघ जसा मानवी जनसमूहाशी निगडित आहे, तसाच परिसराशीसुद्धा संबंधित. दूरवर पसरलाय आपला महाराष्ट्र. ज्यातील दहा-बारा जिल्हे अजून मी पाहिलेसुद्धा नाहीत. तुळजापूरची भवानी, अंबाजोगाई, पैठण-जायकवाडी, नाशिक, नागपूर, जव्हार स्टेशनवरच डहाणू रोड पाहिलेलं. याव्यतिरिक्त उभा सगळा सह्याद्री, सगळा रत्नागिरी, खाली बेळगाव अन् तसंच पुढे सोलापूर यापलीकडचा सगळा भूभाग मला अपरिचित. खान्देशी, अहिराणी, वऱ्हाडी, दख्खनी या बोलीभाषा बोलणारा इसम मी नाही पाहिलेला. परवा अशोक कोतवालांनी ‘दालगंडेरी’ पाठवलेलं. अजून ते मला वाचता आलं नाही, नीट.
आणि आता हे समोरच उदगिरी बोली भाषेतीलं ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या.’ या पुस्तकाचे लेखक प्रसाद कुमठेकर सांगतात, मला सुरुवातीपासून लिहिण्याचा कंटाळा. जितके बोलून भागवाय इलं तितकंच बोलायचं, अन् अगदीच अनिवार्य वाटले तर पेनवर  ‘कंटाळा’ बसवूनच लिहायचे. हे विधान एकट्या लेखकाचे की संपूर्ण उदगीर परिसरातील समूहाचे? कारण लेखक सांगतात, तसे नाव घेण्यासारखा आधीचा कुठला कवी लेखक झालेला नाही इथे.

 

कुमठेकरांच्या कादंबऱ्या वाचताना मला टेकड्या-पर्वतांचा कसलीही अडसर नसलेला, वानगीदाखलच फाटलेल्या सावलीचा, कधी कुठं यडीबाभळ असलेला, अहोरात्र भणभण वाऱ्याचा, माती उडवीत जाणारा तो सगळा माळ, माझ्या डोळ्यासमोर येतो. वाचताना मला दिसते ते, अटंग्या रानाचे पठार. इथे मी माणदेशातील मित्राशी मोबाइलवर बोलतानाही धुवांधुवा वारे माझ्या कानात शिरतं. अन् बोलण्याआधीच त्याचा संवाद संपतो. उदगिरीवर तर बिन आळ्याचा सुसाट वारा. कशाला माणूस गरजेशिवाय काय बोलायला जाणार? शिक्षण अन् उपजीविकेसाठी परत सगळा अभावग्रस्त प्रदेश. लिहिण्या-वाचण्याइतपत समजायला लागतं, की तरुण मिळेल त्या शेरभर रोजगाराच्या पाठी. पुढच्या शिक्षणासाठी काही ऐपतदार मूठभरांना, दूर लांबचं पुणं. अशा प्रसंगी लिहिण्याचे अनाठायी अतिरिक्त कष्ट कोण कशाला घेणार? आणि दुसरे म्हणजे, कुमठेकर तर स्वभावतः मितभाषी. लिहीत नसले, तरीही ते कवीच. आपण जगलेलं अवकाश उलगडून दाखवायचे म्हणूनच ते कथनाकडे वळले असावेत. अनेक अर्थांचे आशय असलेली त्यांची एक-एक वाक्यं. अशा तीनचारशे वाक्यांतून साकारणारी एक लघुकथा.अशा तीसएक लघुकथांचा ऐवज म्हणजे, प्रस्तुत कादंबरी.

 

शंभरभर पानांच्या परिवेशात ते आपला अनुभव, भेटलेल्या व्यक्तींचे चित्रण, गाव, ऊन, वादळ, भुरभूर पाऊस, काँग्रेस गवतासारखा अंधार अन् एरवीच्या लख्ख उजेडासह, ते भोवतालचा सगळा माहोल आपल्या डोळ्यासमोर आणतात. दीर्घ कवितेच्या भाषाशैलीचे खरं तर हे काम. पण त्यांचा अवकाश हा कथानकापुरताच मर्यादित, म्हणून ते गद्य लिखाणाच्या भानगडीत पडतात. अशी अर्थवाही मितभाषी परंपरा यापूर्वी पु.शि. रेगे आणि बा.सी. मर्ढेकरांनीच वापरलेली. म्हणाल तर या ष्टोरी लघुकथांचा ऐवज असलेल्या, स्वतंत्रही असतात. वाचताना आपण ती क्रमवार वाचावीत, असा अट्टहास नाही. हाताला लागेल त्या पानापासून सुरुवात करा, शेवट आधी वाचला तरी हरकत नाही. मुळात तो शेवट तरी आहे कां? अन् जिथून आपण सुरुवात करतो तिला सुरुवात तरी का म्हणावे?

 

एवढ्या लहानशा पुस्तकात जागतिकीकरणानंतरच्या दशकातील उद्ध्वस्तेच्या टोकावर उभ्या राहिलेल्या संपूर्ण ग्रामीण भारताचा चेहराच आपण पाहत असतो. ऐंशीच्या अखेरच्या सत्रात जन्माला आलेल्या पिढीचे प्रसाद कुमठेकर प्रतिनिधी. प्राथमिक शाळेतील आदर्शाचे, ते अखेरचे शिलेदार. ज्या वातावरणात बिंबवली गेली होती, एड्स अन् कॅन्सरची भीती. जिथे शिक्षक म्हणजे, आदरणीय राक्षस, ज्याने मूड आलाय म्हणून मर्जीने मारले, तरी दुरुत्तर करता येणार नाही. अशा आशयाचा पाठसुद्धा आहे या वर्गात. जो मला परत वाचवला, नाही. तर या संपूर्ण पिढींची स्वप्नं, शिकून कुठं कन्फर्म नोकरीला चिकटणं. आणि हे अर्थातच सर्वत्र.
कुमठेकरांनी सादर केलेले त्यांचे निवेदक कधी सामाजिक स्तरावर वेगवेगळे असले तरीही, ते सर्वच एकसंध आपल्या काळाचे, आपल्या परिसराचे प्रतिनिधित्व करतात. संपूर्ण कादंबरीला एकसूत्री कथानक नसले, तरीही, एका गावपरिसराच्या सामाजिक अन् कौटुंबिक वाताहती, अन् क्वचितच्या उत्कर्षाचा आलेख वाचकासमोर मांडतात. इथे प्रत्येकाची स्वप्नं वेगळी आहेत. शहरापासून दूर असलेले, हे नुकतेच मिसरूड फुटलेले तरुण. आहे त्या सामाजिक आर्थिक अन्् शैक्षणिक पर्यावरणात आपले महाविद्यालयीन उच्च(?) शिक्षण घेण्यासाठी एसटीच्या लाल डब्याची कोणत्या तरी भणभणत्या माळावर वाट पाहत असतात. त्या वेळी शहरापासून लांब कोणतेही दूरस्थ गाव वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. अन् नेमक्या त्याच क्षणी कथानकाला प्रादेशिकतेच्या मर्यादा राहत नाहीत. आशयाच्या अनुषंगाने व्यक्तिपर स्वप्ने सार्वत्रिक वास्तवाचा एक भाग बनतात.


कथानक मग उदगिरीचे राहत नाही, बीड, नांदेड औरंगाबाद, जालना, गोंदिया अशा मराठवाडा विदर्भातील होतात. तितकीच सोलापूर-जत-आटपाडी-मिरज-सांगली-कोल्हापूर अन्  साताराकडील पोरांचीही ठरतात. एका काळातील स्वप्नांना भाषेचा अडसर राहत नाही. ती सर्वांची ठरतात. यामधे ऐपत नसतानाही जिवाची उरस्फोड करून इंजिनिअर होऊन अमेरिकेला जायचे असे स्वप्नं पाहणारा धीरज कुंभार जसा आहे, तसेच आजवर ज्यांनी बापजाद्यांचा आशीर्वाद विकायचे पाप केले नाही, त्या मध्यम शेतकऱ्याचा चिरंजीव संजय आहे. ज्याला आपली वडिलोपार्जित जमीन विकून पंधरा लाखांच्या बदल्यात, एका संस्थेत कन्फर्म नाेकरी मिळवायची आहे. यात वर्कशॉप काढून लौकर श्रीमंत होऊ पाहणारा अन् सरकारी पेमेंट थकल्याने पंधरा एकराच्या डागाला मुकलेला, शेवटी तोंड दाखवायला जागा न उरल्याने पराभूत, घरच्या ओसरीवरचा थोऱ्यामोठ्या घरातला, सुशील कुलकर्णी जसा आहे, तसाच आपल्या दोस्ताला जिवाला जीव देणारा खालच्या जातीतला नाना आहे. मिथुनसारखा सिनेमात करिअर करण्यासाठी घरातून चोरी करून जाणारा शेख सद्रुद्दीन आहे. अशा अनेकांचे हे उदगिरी गाव केवळ उदगिरी राहत नाही. त्यामुळे प्रस्तुत कादंबरी एकाच वेळी, जशी ती लोकल तितकीच ती देशीयसुद्धा बनते. या गोष्टी केवळ सांप्रत अवकाशात वावरतात, असं नाही. प्रत्येकाला एक भूतकाळ आहे, जो इथल्या जगण्याला कळत नकळत जखडलेला आहे. यात कधीकाळी जमीनदार असलेल्या आपल्या वडिलांची फुशारकी सांगणारा बबनकाका आहे, ज्याचे अखेरपर्यंत लग्न झाले नाही, तसाच बिनलग्नाचा मेलेला शांत्या काका आहे. जो मुंजा बनून सतत आपल्या संचितात राहणार आहे. देशमुखी जमीनदार घराण्यातील न सांगावी अशी, ही शोकांतिकाच आहे. पोटच्या पोरांची कधी काळजी न करणारा, पण पागेला तीन तीन घोडे पाळणारा कधीकाळी तालुक्यात श्रीमंत म्हणून गणला जाणारा लक्ष्मणराव देशमुख. ज्याने केवळ एक लावणी एेकायला जमुनाबाय वायकरणीला एकदा उदगिरीला बोलवले आहे. सांप्रत काळातील जीवनाला कसल्याही कामी न येणाऱ्या भूतकाळाचे ओझे आहे, परत पाठीवर.

 

भोवताली कोणतेच परिवर्तन-प्रबोधन न दिसल्याने समोर एक भविष्याचे धूसर विवर आहे, जे त्यांच्या सीमित अभ्यास अाकलनातून तयार झाले आहे. कादंबरीच्या रचनेविषयी मी फारशी मांडणी करणार नाही. एवढं मात्र निश्चित की, वास्तवाशिवाय कादंबरी नाही. ते कोणत्या तऱ्हेनं सादर करायचे ही प्रत्येकाचा वेगळा वकूब अलग तजुर्बा. तो रिअॅलिझमच, मग तो मॅजिक असो वा सरधोपट असो!


प्रस्तुत लेखकाच्या लिखाणात मला आवडलेली किंबहुना मनापासून भावलेली गोष्ट आहे, त्याने केलेला भाषेचा वापर! प्रथम ते शुद्धातिशुद्धाविषयी एक क्रांतिकारी भूमिका मांडतात, अन् प्रचलित व्याकरणाला मोडीत काढतात. घरेलू विधिनिषेध धुडकावत अवामच्या जुबानला माझे म्हणून स्वीकारतात. एका अर्थाने ते आवाजांच्या कोलहली बाजारातच उभे राहतात. बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्यांना बहुआयामी निवेदनाचा स्तर असा उगा नसेल आलेला. यातूनच मला ‘बगळा’मधील एक कॅरेक्टर आवडले ते लहान पारधी मुलाचे. भाषा अन् संस्काराचे अतिरिक्त जोखड तोडल्याशिवाय लोकांच्या सुखदुःखापर्यंत पोहोचता येणार नाही, हेच खरं.
जातीय कळपातून बाहेर पडून गावाचा बहुतांश परीघ कवेत घेणारी मराठीतील ही प्रयोगात्मक कादंबरी रचनेच्या अनुषंगाने नवीन मापदंड निर्माण करून अनेक निवेदकांच्या कुंचल्यातून आजच्या ग्रामीण भारताचे एक तरल वास्तव चित्रित करते. पूर्वाग्रही संस्कारांना दूर करत, जातीअंतर्गत समज-गैरसमजांना व्यापक भातृभावी मानसिकतेमधून ती समजावून घेते. शहरात नव्यानेच अार्थिकदृष्ट्या स्थिर झालेला अन् दुरून गावाच्या संथ-साचलेबद्ध जीवनाचे नॉस्टॅल्जिक उदात्तीकरण करणाऱ्या क्रियाशून्य बहुतेक कवींसारखे अकारण भावुक न होता, गावाचे भलबुरे भागधेय काहीसे तटस्थ तरीही अपार आस्थेनं मांडणारे प्रसाद कुमठेकर भविष्यात एक ब्रहद अाख्यान सादर करताना ठोस भूमिका मांडतील अशी आशा व्यक्त करतो. पाचसहा पुस्तकांच्या प्रकाशनातच नावारूपाला आलेलं हे ‘पार’ प्रकाशनचे पुस्तक.ज्याची बांधणी, आतील चित्रं अतिशय देखणी. महेश लीला पंडित यांचे कौतुक. ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ दोन्ही बोलीभाषेतील कादंबऱ्या देऊन प्रसाद कुमठेकरांनी मराठीला अधिक समृद्ध केले आहे.

 

anandwingkar533@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८
 

 

बातम्या आणखी आहेत...