आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिवासी यातनांचा माग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भांडवलशाहीतून उदयाला आलेल्या आधुनिकतेने माणसाला निसर्ग अन् गावापासून  विस्थापित केले, याच एका विषयाला ऐरणीवर ठेवून शहरी मानसिकतेतून गावाच्या स्मरणरंजकतेचे, क्वचित कधी व्यक्तिगत वाताहतीचे प्रभावी चित्रण आजवरच्या एकूण मराठी कथा-कादंबरीतून झालेले दिसते. तुकाराम चौधरींची "पाड्यावरचा टिल्या’ ही आदिवासी शेतकऱ्याच्या वाताहतीची कादंबरीसुद्धा याच आसाभोवती फिरते...


भांडवली विकासाच्या परिप्रेक्ष्यात, अत्याधुनिक पद्धतीने अधिक उत्पादनाचे आमिष दाखणारी महागडी बियाणे-कीटकनाशके, कृत्रिम अन् सेंद्रिय खते वापरून, मुबलक मंजूर सालदारांकडून बाजारकेंद्री बागायती शेती करून घेणाऱ्या गावपातळीवरील राजकारणात हितसंबंध आसणाऱ्यांनाच रूढार्थाने आज आपण ‘प्रगतशील शेतकरी’ अशी उपाधी लावत असतो. त्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थासाठी दिवसरात राबणाऱ्या कोरडवाहू, उजाड-बंजार माळरानावर, डोंगराच्या घोंगडभर पठारावर निसर्गावर विसंबून असलेल्या खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांना एकतर नजरअंदाज करतो, अन्यथा उपेक्षित अवमानित करून कित्येकदा त्याच्या शेतकरी असण्यावरच प्रश्न उठवतो... हे कालपरवाच्या महाराष्ट्रातील शेतकरी ‘लाँग मार्च’मधे आपण अनुभवले आहे.


तुकाराम चौधरीने "पाड्यावरचा टिल्या'मधून प्रागैतिहासिक पद्धतीने शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याची प्रातिनिधिक कहाणी सादर केली आहे. ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या दलित साहित्याला बहरलेली "आदिवासी साहित्य’ ही आणखी एक शाखा. भुजंग मेश्राम, वहारू सोनवणे, नजुबाई गावित, अन् नव्याने लिहिणारे संजय दोबाडे यांच्याशिवाय अजून तरी इतर कवी-लेखकांची माझी ओळख झालेली नाही. पूर्वग्रहदूषित असलेले आपण मराठी वाचक. मर्यादित असतात, आपल्या आस्था... सीमित क्षितिजापलीकडचे आपण काही पाहत नाही. समजून घ्यायचेच नाहीत, असे विषय आपण ऐच्छिक ठेवतो. म्हणून बहुतेक जण दलित, ख्रिश्चन, मुस्लिम स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्य वाचत नाहीत. वास्तवात या सर्व अल्पसंख्याकांच्या साहित्याने मराठीचा सांस्कृतिक स्तर उंचावला आहे. भाषिक अंगाने मराठी अधिक समृद्ध होत आहे, अन् आशया-अनुभवाने संपन्नही.


साक्षरता, शिक्षण, ज्ञान, या गोष्टी सूर्यासारख्या स्वयंभू प्रकाशमान. अभिव्यक्त होणं म्हणजे स्वअस्तित्वाचा पुकारा करणं. लिहिण्यामुळे सर्व चराचर दृष्टिगोचर होते. दु:ख, वेदना, श्रम आनंद पूर्वजांचे संचित अन्याय, अत्याचार आदींना वाचा फुटते. लिहिण्यामुळे बाकी काहीच करता येत नसले, तरी जगण्या-मरणाचे प्रश्न वेशीवर टांगले जातात. आता शिक्षणामुळेच डोंगरातले, केवळ पाऊलवाटच जिथे पोहोचते, त्या माळावरील अन् जिथे तथाकथित सभ्य सुसंस्कृत भद्र लोक जाणं टाळतात, त्या यातनांच्या दलदलीचे जग शब्दांमार्फत प्रकट व्हायला लागलेय. पण अजूनही पालांमधले, राहुट्यांमधले गुन्हेगारीचा कपाळावर शिक्का असलेल्या अठरापगड जातजमातींच्या वाड्यावस्तींवरले जगणे आधुनिक समाजापुढे येण्याआधीच सार्वत्रिक शिक्षणाच्या स्वप्नांना चूड लावली जात आहे.


आदिवासी मुलांचे शिक्षण हा विषय केंद्रीय ठेवून एकूण आदिवासी जीवनपद्धतीचा परामर्श घेणारी तुकाराम चौधरी या नवोदित लेखकाची "वाड्यावरचा टिल्या’ ही पहिलीच कादंबरी मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली. ती वाचताना, मनात परत हे सगळे प्रश्न उफाळून वर आले. पाच भाऊ, दोन बहिणी आईवडील असलेले मूळचे मोठे कुटुंब. संपूर्ण चरितार्थ डोंगरावरील उतार सपाट असलेल्या खडकाळ मुरमाड शेतीवर. लग्न झालेले तीन भाऊ अन् एक बहीण स्वतंत्र स्वनिर्भर वेगळे राहणारे, घर म्हणून सणावाराला एकत्र येणारे, अजूनही दोन मुले अन् एक मुलगी घेऊन कमळू अन् त्याची सात मुलांची काटक पत्नी मुळीबाई, रानं घरगावापासून दूर म्हणून पाड्यावरच छप्पर टाकून आपले कष्टमय तरीही आनंदी, जगणे व्यतीत करीत आहेत.दोन मुलांच्या घरात काम करायला कोणी असायला हवे, म्हणून इथेही पुन्हा मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष. मुलांचे शिक्षण आश्रमशाळेत, तिथं दिले जाणारे जेवण, ढेकूण-पिसवांनी ग्रासलेल्या कोडवाड्यांसारख्या खोल्या, मुलांना होणारे कातडीचे आजार अशाही परस्थितीत टिल्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होते. याच दरम्यान टिल्या पालवी नावाच्या वारली मुलीच्या प्रेमात पडतो. आदिवासींमध्येसुद्धा आंतरजातीय विवाहास विरोध. तरीही त्याचे प्रेम फुलत जाते. आईबापाला समजावून सांगणार इतक्याच कमळूचा खून की अपघात होऊन तो मरण पावतो. धाकट्या भावाचे शिक्षण अर्धवट राहते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आदिवासी समूहाने शहरात मजुरीला जातात. अन् नेहमीच्या मजुरांपेक्षा कमी मजुरीत आपले दिवसरात्रीचे श्रम विकतात. पालवी इथे मजुरीसाठी आलेली. मजुरी न मिळालेल्या दिवशी तिच्यावर बलात्कार होऊन, तिला मारली जाते. टिल्या कॉलेज शिकत असताना दोन शहरी मुली त्याच्या प्रेमात पडतात. एकीला त्याला स्वीकारावे लागते. परत बुवाबाजी, टिल्याची नोकरी, मित्राला सांगून आदर्श आदिवासी गावाची उभारणी. पत्नीचा बुवाबाजीत खून, शेवटी मुलीला घेऊन टिल्या शहराला रामराम ठोकून पूर्वापार आपल्या आदिम पाड्यावर परततो.


या अगोदर लेखकाने तसे काहीच लिहिलेले नाही. कमळू आणि पालवीचा मृत्यू लेखकाने काहीसा उरकलेला आहे. मध्यानंतर कादंबरी अतार्किक आणि काल्पनिकही वाटत असली तरीही आदिवासी परिसर अन जगण्याचा पट ती अतिशय समर्थपणे मांडते. देवदेवता अन् पूजेच्या विधी पूर्णतः आदिम. देवदेवतांची नावेसुद्धा वैदिकपूर्व प्रदेशापरत्वे स्थानिक. कणसरी, येहूमाय, बहरी, पांढरी, हुसळखांबी, हिरवा अशी अपरिचित. यातील पांढरी हे नाव गावाकडे ‘गावपांढर’ म्हणून प्रचलित आहे. 


आदिवासी सार्वजनिक सण उत्सव स्त्री-पुरुष एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळेच स्वभावतःच ते अधिक निर्मळ अन् पाण्यासारखे पवित्र असावेत. आदिवासीत बलात्कार होत नाहीत. टिल्या पुंड्या सातवीला शिकणारा, लक्ष्यांसोबत तुळसा नावाची मुलगी शाळेला आलेली. आश्रमशाळेत तिच्यावर दोन नराधम शिक्षकांनी केलेल्या बलात्काराचे विवरण लेखक आत्यंतिक क्रोधाने तरीही निसर्गवादी सयंमाने मांडतो. ‘ओरडून कुठं सांगशील तर गळ्याला आगंटा दाबून इथेच घरात गाडीन.’ अशी परत धमकी दिलेली असते. तुळसेला घेवून लक्ष्मण अन् टिल्या जेव्हा घरी पायी जातात, वाटेत त्यांच्याहून थोरला आदिवासी तरुण जंगलाच्या वाटेवर घरातल्या माणसांसारखा सोबत करतो, तेव्हा लेखक सहज इतर संपूर्ण समाज अन् आदिवासी यांच्या नैतिकतेचा लेखाजोखा मांडतो. अन् वाचक म्हणून आपणाला शरम वाटते आपल्या तथाकथित आधुनिक भोगवादी मानसिकतेची. अपराधी शिक्षक हेडमास्तरांकरवी परत तुळसा अन् लक्ष्मणवर चोरी करून पळून गेल्याचा आरोप टाकला जातो. हा उरफाटा न्याय ऐकूण वाचकच खजील होतो.


टिल्यासारखी लहान मुलं जगण्याच्या पारंपारिक अनुभव, संकट अन् साहसांना निर्भयपणे सामोर जाताना या कादंबरीत दिसतात. दोन ढेंगांच्या मधे कोवळ्या सागवानाचा दांडा हवेतच या कल्पनेतल्या गाडीला किक मारून, तसाच मुठीत अदृश्य एक्सिलेटर पिळून तोंडाने हँगहँग पायांची गाडी दगडधोंड्याच्या वाटेवरून सुस्साट धावणारी, ही पाड्यावरली अजाण नागडी उघडी लहान मुलं छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदित पाहताना, आधुनिकतेत आपण काटकसरीचे निर्मळ नैसर्गिक जगणं हरवून बसलोय, याची मनस्वी खंतही वाटते. 


मध्यानंतर कादंबरी काहीशी फसलेली अन् काल्पनिक वाटते, असं म्हणालो. पण आधुनिक शिक्षणाने सुशिक्षित झालेला मीसुद्धा माणूस आहे, याची जाण झालेला गरीब अन् मागास समाजातील तरूण  उच्चवर्गीय वर्णीय मुली पत्नी होण्याची फिल्मी स्वप्नं पहातही असावा. इथे आदिवासींच्या एकूण दैनंदिनीचे लेखक विवरण करतो. घरात अन्नाचा कण नसताना ही कुपोषित माणसं, पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या कंदमुळे रानवनस्पतींचा औषधी उपयोग, पक्षी मासे खेकडे अन प्राण्यांची शिकार करणं अश्मयुगीन माणसांसारखेच त्यांचे जगणे भटकंतीचे आहे. तरीही  विणीच्या काळात मासे खेकड न पकडणे, लहान असताना एकादा प्राणी अथवा पक्षी न मारणे, ही निसर्गाकडून आलेली ‘वैश्विक नैतिकता’ ते पाळतात. ही मानवी आदिम सभ्यता आपण हरवून बसलो आहे. इथल्या प्रत्येकाच्या ठायी प्राचीन विरासत अन् निसर्गाकडून आलेली निरागसता त्यामुळे इथली सामान्य माणसंही महाकाव्यातील पात्रांसारखी वाटतात. आदर अन् न्यायाची चाड असलेली हीच माणसं उद्या स्वप्नदर्शी वास्तव मांडतील. पर्यायी जगाच्या रचनेत अग्रेसर असतील, असा आशावाद इथेच आपल्या मनात फुलतो...

 

आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...