आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलामांचे आदिम आक्रंदन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोबेल पारितोषिक (१९९३) विजेत्या अमेरिकन लेखिका टोनी मॉरिसनची ‘बिलव्हेड’ ही जगप्रसिद्ध कादंबरी. याच नावाचा चित्रपटही प्रदर्शित झालेला. जगभरातील अनेक भाषांसोबतच सुदैवाने मराठीतसुद्धा आशा दामले यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक ‘पद्मगंधा प्रकाशना’ने बारा वर्षांपूर्वीच प्रकाशित केले. पण मराठी वाचकांनी पाहिजे तेवढी या सुंदर अनुवादाची दखल घेतलेली नाही...


कोणतीही कादंबरी मी शक्यतो एक वेळच वाचतो. नंतर ते पुस्तक मित्रांना देतो. टोनी मॉरिसनची प्रस्तुत "बिलव्हेड' कादंबरी मी दोन वेळा वाचलेली आणि अजून ती पुरेशी समजली आहे, मला असे सांगता येत नाही. परत ती मला इंग्रजी अन् मराठी संहिता समोर घेवून वाचायची आहे. अमेरिकन साहित्य मराठीत म्हणावे, तेवढे अनुवादित झालेले नाही. कृष्णवर्णीयांची कथा कादंबरी तर अपवादानेच मराठीत आलेली असावी. काही कविता मात्र प्र. श्री. नेरूरकरांनी अनुवादित केल्या आहेत. त्यांनी अनुवादित केलेल्या कवितेचे पुस्तक कोणी तरी संपादित करायला हवेच. सुदैवाने,आशा दामले यांनी या पुस्तकास आफ्रो-अमेरिकन साहित्यसंदर्भात अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेली आहे.
कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतरचा कालावधी तसा दमछाक करणाराच असणार. प्रस्तावनेत दामले म्हणतात, "पाश्चात्य साम्राज्याच्या पायाभरणीत लक्षावधी नरबळी गाडले गेले आहेत. त्यांच्या रक्ताघामांवर आजच्या विकसित राष्ट्रांची धान्यांची कोठारे ठासून भरललेली आहेत. युरोपियन वसाहतवाद्यांनी अमेरिकेची जी भूमी जिंकली त्या भूमीचे व्यवस्थापन करायला हवं. हे सगळं करायला मनुष्यबळाची आवश्यकता होती मग रेडइंडियन्स होते की! तसं नाही झालं, कारण ती आपल्या भूमीवर हक्क सांगणारी माणसं होती. साम्राज्यवाद्यांना अस्मिता असलेली माणसं नको होती. तर पशूप्रमाणे ज्यांना वागवता येईल अशी गुलाम म्हणून जगणारी माणसं हवी होती. ती आफ्रिका खंडातून त्याना मिळाली.’


साधारणतः पंधराव्या शतकात कोलंबस अमेरिकेत पोहचला. तेव्हा आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेली ती जितीजागती माणसं!ं त्यांना स्वतःची म्हणून एक संस्कृती होती. शेतीपूरक जगण्याची म्हणून त्यांची एक पद्धती होती. निसर्गपूजक ते! त्यांचे स्वतःचे विधी, रीतिभाती, चराचर भूतंखेतं, यातून ते आपलं भावजीवन व्यक्त करत होती. वाऱ्यावर डोलणाऱ्या वृक्ष लतांकडून ते नाचायला शिकलेले, झुळझुळ झऱ्यांच्या तालावर गायला शिकलेले. मुख्य म्हणजे, त्यांना स्वतःच्या संपन्न समृद्ध अशा भाषा होत्या, त्या आदिम भाषेत देव अन् आपल्याच प्रेतात्म्याशीही (कादंबरीतसुद्धा एक प्रियतमप्रिया "बिलव्हेड’ नावाच्या लहान मुलीचे एक भूत आहेच.) ते बोलत. काळाच्या ओघात नष्ट होणाऱ्या त्या प्राचीन भाषेची नावे अशांती, वाहोत्री, गोरूबा, ओयो, बोनेल आणि आकान. ऐकताना वाटते, ही कुठल्या पहाड, नदी, माळ, मोसमी वारे, पाऊस अथवा माणसांची नावे असावीत. साम्राज्यवाद्यांनी या सर्व भाषा आफ्रिकन निग्रोंच्या जुबानीत लोखंडाचा भुसा भरून मारल्या, अक्षरशः... अन् त्यांची आज्ञा पाळायला एक भाषा शिकवली इंग्रजी. त्यातून एक भ्रामक नीतिमूल्यं त्यांना शिकवायची होती. 


मिशनरींनी आणला एक धर्म ख्रिश्चन. आणली एक भाषा. सांगितला, एक आहे ईश्वर. एक भाषा. त्यांनी मानवी मूलभूत व्यक्तिपूरक विविधतेलाच नाकारले. नव्याने इंग्रजी शिकलेल्या १७७३मधील फिलिस व्हिटलीच्या कवितासंग्रहातील एक, जेत्यांना खूश करणारी कविता.
माझ्या मूर्ती आणि निसर्गपूजक भूमीतून ईश्वरकृपेने मला इथे आणलं... तेव्हा माझ्या उद्धारीत आत्म्याला नव ज्ञान प्राप्त झालं... या जगात परमेश्वर एकच आणि तो क्षमाशील आहे. तो पापविमोचक आहे, याची मला तत्पूर्वी जाणीव नव्हती, विचारही सुचला नव्हता... पण इथेही निग्रोंसाठी चर्च आणि प्रार्थनास्थळं वेगळी होती... 


‘बिलव्हेड’ या कादंबरीत ते आलंय सर्व. कादंबरीची नायिका सिदी. तिची सासू बेबी सग्ज, जिला वार्ध्यक्यामुळे श्रमातून मोकळं करावे, एक स्वतंत्र माणूस म्हणून तिनं आपले उर्वरित आयुष्य जगावे, म्हणून ‘स्वीटहोम’मधे तिचा मुलगा सिदीचा नवरा पॉल याने आयुष्यभर रविवारच्या सुटीतही काम करायचे लिहून दिले होते. लेकानं गुलामीतून मुक्त केलेली म्हातारी बेबी सग्ज रविवारी आपल्या काळ्या लोकांसाठी झाडांत प्रार्थना घ्यायची.


मानवजातीला काळिमा फासणाऱ्या वर्ण अन् जात या दोन व्यवस्था. एक धर्मव्यवस्थेने दुसरी वसाहतवाद्यांनी निर्माण केलेली. अन् माणसांवर गुलामी लादली. तसा हा ‘गुलाम’ हा शब्द! ऐकताना कानाला कसला त्रास न होणारा. कादंबरीतील एक महत्वाचे पात्र पॉल डी, या गुलामीचे वर्णन एका ठिकाणी करतो, ते निग्रो भांबावलेले, दमलेले, भुकेलेले सर्वस्व गमावलेले असत, ते आठवणीत रमत नसत, तोंडाने बोलत नसत, डोंगरांच्या कपारीत लपून त्यांनी दिवस काढलेले होते, अन्नाच्या कणांसाठी ते घुबडांसोबत भांडत. डुकरांच्या पुढे टाकलेले अन्न ते ओढून घेत, कुणी पाठलाग केला केला तर भुयारात अन् विहिरीत  लपून बसायचं, दिवसा झुडपात लपून बसायचं, रात्री वाटचाल करायची. 


अशी वर्णनंच्या वर्णन वाचताना आपण विदीर्ण हताश अन् अधिकाधिक कृद्ध बनत जातो. आपण आफ्रो-अमेरिकन साहित्याचा प्रवाह शोधत आहोत. तर त्या अबोध काळात लुप्त झालेल्या भाषांत त्यांचा आनंद, विषाद, दु:ख,आक्रोश आपले स्वकीय अन् मूळ भूमीसाठीचा विलाप नंतरच्या शतकांत पोहोचलाच नसेल. नि:शब्द झाले असेल आफ्रो-अमेरिकन साहित्याचे पहिले शतक!
नॉर्थ करोलमध्ये "गुलांमाना लिहिणे, वाचणे, शिकवणे हा गुन्हा होता. तरीही काही उदार गोऱ्या लोकांनी त्यांना शिकवले. आणि सतराव्या शतकापासून आकाराला येत गेले आफ्रो-अमेरिकन साहित्य. १९६० नंतर ब्लॅक अमेरिकन साहित्य एका विस्तीर्ण महाकाय वृक्षासारखेच विस्तारत गेले आहे. यातूनच अॅलेक्स हेली, मार्टिन ल्युथर किंग, मालकम एक्स, माया अँजुलू, अॅलिस वॉकर, रिचर्ड राइट, जेम्स बॉल्डविन, फ्रांज फूनॉनसारखे कवी लेखक अन् समीक्षक उदयाला आलेत.


प्राध्यापकी पेशाच्या मॉरिसनची सुरुवातीची काही वर्षं इंग्रजीच्या अध्यापनात गेली. १९६२ मध्ये ‘रँडम हाऊस’ या प्रकाशन संस्थेत त्या संपादकीय काम करू लागल्या. ‘ब्लॅक बुक’ या ग्रंथाच्या संपादनाच्या प्रकल्पात त्यांना जुनी कागदपत्रे, वर्तमानपत्रे त्यातील फोटो खरेदी- विक्रीचे दस्तएेवज, सरकारी नोंदी, गोऱ्या जमीनदारांनी लिहिलेल्या डायऱ्या, गुलामांचे ठेवलले हिशेब, काही लोकांच्या स्वप्नांच्या नोंदी, संगीताचे नोटेशन, एका काळाचा जवळपास समग्र दस्तऐवज वाचावा लागला. यातच आसुडाने साखळदंडाने बलात्काराने जाळपोळीने अन् दिवसरात्रींच्या निद्रेशिवायची अपार मेहनत, दबलेले आक्रोश गुलाम वाढावेत म्हणूनची लादलेली बाळंतपण भुयारात तयार केलेले कोंडवाडे माणूसपणाला लाजवणारी पिळवणूक या अतिरिक्त श्रमातून वसाहतवाद्यांची वाढलेली समृद्धी या सर्व कोलाहलात विस्कळीत झालेला निग्रो लोकांच्या गुलामीचा इतिहास, म्हणजे "बिलव्हेड’ ही कादंबरी.  कादंबरीचा अवकाश १८६० ते १८६५ च्या यादवी युद्धानंतरचा आहे. ‘ब्लॅक बुक’च्या संपादनात मुबलक मिळालेल्या पांजरपोळ घटनांचा वापर करून एक नवेच कथाबीज टोनी मॉरिसननी तयार केले आहे. उत्तर अमेरिका म्हणजे, सध्याचा यूएसए बहुतेक, इथे औद्योगिक भांडवली विकास प्रथम सुरू झाला. शेती दुय्यम ठरली, तिचे कंपनीकरण झाले. तर दक्षिणेत शेती हाच प्रमुख व्यावसाय.स्वस्त कामगारासाठी शेतीवर वेठबिगारीवर डांबून ठेवलेला पशूतुल्य गुलाम त्यांना नको होता, एक स्वतंत्र बेकार माणूस म्हणून हवा होता. म्हणून ही वरवरची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सुरू झालेलं यादवी युद्ध. 
दामले आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, उत्तरेत गुलाम बाळगण्यापेक्षा स्वस्त कामगार म्हणून आफ्रिकन लोकांना वापरणं अधिक सोयीचे होतं.’


आफ्रिकन निग्रो गुलांमासाठी एका अर्थाने पुनरुत्थानाचा हा काळ. मूळ आफ्रिकन अतिरंजित भूतकाळाचे प्रचंड आकर्षण. तो भूतकाळ आता परत आणणे शक्य नव्हते.भविष्याकडे डोळे लावून बसावे, तर दूर नजरेच्या टप्प्यात काहीच आशादायक नव्हते. स्वर्गाची कल्पना बिलकुल धूसर. जगतोय त्याहून वेगळा काय असणार आहे, नरक. हे असहाय्य वर्तमान सहन करण्याचे बळ गुलामगिरीतील लोकांनी कसं सहन केलं असेल?


हे संपूर्ण आक्रंदन टोनी मॉरिसनची आपल्या शब्दांत मांडलंय. मार्गारेट गार्नर या गुलाम स्त्रीच्या जीवनावर आधारित असलेली  ही त्यांची कादंबरी १९८७मध्ये प्रसिद्ध झाली. अमेरिकेत नावाजलेला पुलित्झर पुरस्कारसुद्धा प्रस्तुत कादंबरीला मिळालेला. मित्रांनो, मला अजूनही एकदा ती वाचायला हवी. त्यानंतर कदाचित मी तिच्या आशयसूत्राला स्पर्श करीन. दरम्यान, आपण सुद्धा ‘बिलव्हेड’ मिळवून वाचावी.


आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...