आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिम आशावादाचे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळे परिसर,परिसरातील मिथकं, तिथली बोलीभाषा, आशयाला अनेक पदर अन् अर्थांची गहनता आणणारे शब्द. अशा अनेक अंगांनी कविता आज फुलून येत आहे. ही गोष्ट सार्वांगीण परिवर्तनाच्या लढ्याला अधिक बळकट करणारी आहे. "पुन्हा फुटतो भादवा’ हा ‘दर्या प्रकाशना’चा कवी अमृत तेलंग यांचा काव्यसंग्रह त्याचीच साक्ष देतो आहे...

 

वतामाजी झालीय कविता’, ही ओळ कवितेचा सन्मान करणारी खचितच नाही. तुलनेत ‘हजारो फुलू देत फुले’ या विधानात मात्र नैसर्गिक विविधतेला अश्वासक अवकाश अधिक आहे. पंचावन्न नंतर खूप लिहिली जातेय कविता. वेगवेगळे परिसर, तिथली बोलीभाषा, स्थानिक परिसरातील मिथकं, एकाच अर्थाचे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे, आशयाला अनेक पदर अन् अर्थांची गहनता आणणारे शब्द, जातीय अन् वर्गीय सांस्कृतिक पर्यावरण, अन् सांप्रतकाळी भेडसवणारे सर्वग्रासी प्रश्न अशा अनेक अंगांनी कविता आज फुलून येत आहे.
तिचा काव्यात्मक स्तर फार उंचावलेला आहे, असं नाही. प्रयोशिलता अन् नवेनवे फॉर्म ती क्वचितच शोधत आहे. कबूल तिच्या राजकीय, सामाजिक, अन् पर्यावरीण आकलनाचे अवकाश मर्यादित जरी असले तरीही, परिसराचे सूक्ष्म निरीक्षण, छोट्या-छोट्या मिथकांविषयी पूर्वापार जोपासलेली अपार श्रद्धेची आस्था ती जोरकसपणे उभारून दृष्टिगोचर होत आहे. आत्मीय प्रेरणेला पुढे घेवून जाणारी प्रेरकशक्ती या कवितांमधे प्रचंड प्रमाणात आहे अन् ही गोष्ट सार्वांगीण परिवर्तनाच्या लढ्याला अधिक बळकट करणारी आहे.
या सर्वांची आठवण मला "पुन्हा फुटतो भादवा’ हा ‘दर्या प्रकाशना’चा कवी अमृत तेलंग यांचा काव्यसंग्रह वाचताना झाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात राहणारा हा कवी. केवळ बिरूदासाठी मराठा, वस्तुतः गरीब शेतकरी माळरान अन् डोंगराच्या कडसरीला ज्याला त्याच्या परिभाषेत म्हटलं जाते, ‘उताणीचं रान’, अशी दोन-अडीच एकराची जमीन त्याची कोरडवाहू. आईवडील अन् पुतण्याला घेवून नोकरीसाठी गावालगतच्या शहरात तो रहातो. एक भाऊ जो अनपढ, रूढीग्रस्त, तो शेती कसतो गावात. हा त्याच्या कविता संग्रहातील वृतांत नाही. उशीरा रात्री तासदोन तासांच्या आमच्या फोनवरील बोलण्यातून मला मिळालेली माहिती.
मला अमृत तेलंगच्या कवितेने, तिच्या कंधार भाषेने, गाव परिसराच्या आस्थेनं मोहून टाकले. पहिल्याच कवितेत बालपणातील निखळ गावरान आठवणी, तो ज्या बालसुलभ आत्मप्रौढीने सादर करायला लागला, त्यावेळी ही भूतकाळातील सरंजामी स्मरणरंजकता म्हणून दुर्लक्ष करायचे मी ठरवले. पण गावातील प्रत्येक ठिकाणाविषयीची त्याला असलेली माहिती, गावातील रोजच्या व्यवहारात उपयोगी, पण नेहमीच्या पाहण्यातील म्हणून दुर्लक्षित स्थळांविषयीच्या दंतकथा, ओढाडोंगर कडा अन् झाडंझुडपांबद्दलची पूर्वापार मिथकं, हे सर्व त्याच्या कवितांचे विषय जेव्हा बनतात, तेव्हा लक्षात येतं, आपल्या दीडदोन एकराच्या रानांसोबतच, या तरूणाने एकाद्या मेंढपाळासारखा पुरा परिसरच आपला म्हणून कवेत घेतलाय. 
"भटाची आंबराई, लोकडोबाचा कडा, वर्तळ्याचा माळ, मांगखोपडा, डोपकडाची तळवणी अन् उरलंसुरलं सारतळं विरासत म्हणून बालपणात मिळालेले टापू होती, माझी जाहागीरदारी.’ एवढी बिनमालकीची अफाट श्रीमंती केवळ परिसर अन् निसर्गावर असीम प्रेम करणाऱ्याकडेच येवू शकते. बरं, हे इथेच नव्हे सुरूवातीस सांगितलेल्या या कवितेमधील प्रत्येक ठिकाणांवर त्याची एक अलग कविता तिच्याविषयीची निजी आठवण, जेव्हा आपण वाचतो, त्यावेळी लक्षात येते की, कवितेत एवढे जीवापाड प्रेम फक्त मला जॉन बर्जरच्या कथांमधून अन् थॉमस हार्डींच्या कवितेमधून जाणवते.
निसर्गात असं वारं प्यायलेल्या खोडासारखा उन्मुक्त उंडरणारा हा चौदा-पंधरा वर्षाचा गोऱ्हा, पण अवेळी नाकात वेसण घालून त्याचा भोंड जिरवला जातो. अन् मान खाली घातलेल्या बैलासारखे खांद्यावर जू येतं. पुढची पायरी बिनकष्टाचा भातुकलीचा बालपणातील खेळ संपून  प्रत्येक पावलावर हरेक ऋतू बेईमान झाल्याचा प्रत्यय येतो. इथूनच सर्वथा पावसावर विसंबून असलेली गावाकडच्या कास्तकारांची संघर्षमय दैनंदिनी आकाराला येते. पण, "जागलकरी सोडायचे वळाण अन् सावडून न्यायचे आयतं माश्याचं खळं. वरडोळी, डोकडा, मुरीख मुरी मळगा असा बारामिसळीचा माश्याचा कळप. चांदण्यात चांदीची फडफड करणाऱ्या ही माश्यांची शिकार. अन् हातात आला भुजंग चवताळून की झिंजाडून पळायचो’ बापमाय सोबतचे हे सारं  आठवताना, काटकुटीच्या संसारात लहानपणात आपण किती बेफिकीर अन् उधळे होतो, याची मनस्वी खंत कवी इथे व्यक्त करतो. अर्थातच अमृत तेलंगची कविता केवळ शेतीवर बोलत नाही. समूळ परिसरावर बोलते. छोट्या-छोट्या कवितेमधून गावातील कष्टमय जीवनाची काही ‘क्षणचित्रे’ त्यातून शब्दातून साकार होतात.चोंदा अन् खंदा नावाची एक साधी कविता, चोंदा हा दूरदराज असलेला शेताचा कबड्डीच्या मैदानाहून थोडा मोठा तुकडा. पण पेरणी करताना तो पाडून नाही चालणार, भले त्यातून पसाभरच धान्य कां न येईना. अशी अनाठायीची कष्ट शेतकरी बिनातक्रार उपसत असतोच. ज्याचे परत कसले मोल करता नाही, येत. फक्त एक असते, आंतरिक समाधान. माळावरील एका मोठ्या रानाची रापणी करून शिणलेले बैल खपाटीला गेलेली त्यांची पोटं, चढणीची वाट तुडवून गळून गेलेले त्यांचे खूर. औताच्या बाहीत उरलेलं पसाभर बियाणं काही क्षण बैल निमूट, एकाजागेवर स्थितप्रज्ञ  बाप, बैलाच्या खांद्याला पडलेली चाय, खांजाळात भाषा अन् शब्दाशिवाय मुक्या प्राण्यासाठीचे आपले प्रेम व्यक्त करतोय, असा असतो गरीब शेतकरी.
तशीच एक ‘उताणीचं रानं’ नावाची दुसरी कविता. ही जी मऊसूत मातीची, दगड, गोटे, झाडांची, मुळंकांड, अन् परत परत उगवणाऱ्या काटेरी झुडपांनी मुक्त, समतल भव्य ताडपत्र्यांसारखी रानं आपण पहातो नां? हे पिढीदर पिढीच्या मालकमजूरांचे असतात, निनावी श्रम. कित्येक पिढी त्यात खपल्या, तेव्हा ही वाळू अन् दगडातून आकाराला आलेली माती.पण काही तरीही असतात, मरडवाक जमिनी उताणीच्या रानात किती गोठाळ काढावं, रान पोटाशी धरून किती रगत वकावं. तासातासाला इचका असलेल्या, या रानात मांड मातीतच खुतून बसतो. एवढंच काय, अशा या पट्ट्यात कुठं पाखरू दिसत नाही, की समृद्धीचा अभाव असलेल्या या रानात  चुकून एखादं लाव्हरू गाभ धरीत नाही, तरीही हा आपला बाप असलेला शेतकरी दरसाल तिथं खपतो.
रान अन् मानवी कष्टाशी असलेलं जैव नाते अमृत तेलंगच्या कवितेत ठायी ठायी जाणवतच राहते. ही ठिकाणं स्थळं, सरंजामी मालकीची व्यक्तिगत असोत सार्वजनिक वा नैसर्गिक, परिसरातील सर्व घटकांशी त्यांचे नाते कमालीच मानवीय राहते. मग तो झोळवनातला चेलमा’ असो ज्याचा दुःष्काळातही पाण्याचा दोरवा, कधी तुटलेला नाही. त्याच्या अख्यायिका सांगताना "उचंबळून यायचा बुजूर्ग माणसांचा ओला भूतकाळ आड, विहिरीचा इतिहास बसायचे खंगाळत’, ‘बाळांतपण निस्तारताना’ ही कविता माता अन् जमिनीची समानता विशद करणारी.निर्मितीची आदिम मुद्रा ही पृथ्वी. तेवढीच आदिम स्त्री. अस्तित्वात जे उदयास आले, निर्माण झाले ते सर्व धरित्रीचं. वांजपणाचा कधी कलंक लागू दिला नाही तिने. "जपत आलीस बियासंग मानवजातीची पैदास बहरत आलीस, रक्त होवून सळसळत संचारलीस दरपिढीदरसाल.’ खूप सारे झालेत प्रयोग तुझ्यावर सुरुवातीपासून तशी नहातीधुती तू. "कधी सेंद्रिय कधी रासायनिक कधी झालीस बिटी काळाच्या कलानं टिकून ठेवलंस सत्व सर्जन.’ अमृतच्या कवितेमध्ये सरधोपटपणे कुठलाही राजकीय विचार दिसत नसला,  तरी त्याचा कष्टकऱ्याविषयी अन् अवघ्या सृष्टीविषयचा अंतरिक उमाळा वाचताना जाणवतोच, जाणवतो. गावाच्या आर्थिक अन् सामाजिक पडझाडीचा लेखा मांडताना साऱ्या बलुतेदारांची त्याला आठवण होते. अशा व्यक्तिचित्रांमधे उध्वस्त म्हादू कुंभार’ आहे. "लोखंडाशी नाते तुटलेला किसन लोहार’ आहे. इतकेच काय गावाचे मनोरंजन करणारी ‘कळवातीन’ कवीच्या अथांग नजरेतून सुटत नाही. कवी म्हणूनच नाही, तर एक निखळ माणूस म्हणून अमृत तेलंग जगतानाही मानवीय वागत असावा, एवढी त्याच्यातील करूणा आहे, पारदर्शी. अमृतच्या भाषेत बोलायचे तर हे आहेत, खंगत गेल्या गावाचे अवशेष.अमृतच्या कवितेत असे असंख्य शब्द आहेत, जे फारसे परिचित नाहीत. अनेक मिथकं आहेत. अनेक दंतकथा.अजूनही त्याची कविता पारंपारिक रचनेतून व्यक्त होतेय. महाराष्ट्रात दूरवर रहाणारे हे मानवतेचा फुटवा जोपासणारे संवेदनशी कवी, त्यांना पुस्तक नसतंय वाचायला. योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे.या सर्व गोष्टी जर उपलब्ध झाल्या, तर संताचा वारसा असलेला सांप्रदायिक सदभावनेचा प्रतिभासंपन्न महाराष्ट्र उदयाला येईल, नक्की.
 समेवर येताना मी म्हणेन, पिढीदरपिढी आठवणीत राहिलेले, असे झरे सुकून गेलेत. एकूण अस्तित्वातूनच त्यांचे बेदखल निघून जाण्याने नष्ट होत जाते, आपले सामूहिक संचित.प्रत्येक गोष्टीवर कब्जा टाकला जात आहे, घेतलं जातेय, त्याचे कार्पोरेटी पेंटंट. जीव लावावे तसे आपले म्हणून तरी काय राहिले आहे? नष्ट होत जाणाऱ्या या ‘ग्लोबल कोलाहलाविषयी’ आपण मूलभूत पातळीवर येवून विचार करीत नाही.लवकरच हे सगळं हळूहळू अस्तित्वातून निघून जाणार आहे, याची आपल्याला दखल नाही.
अमृतची ही सर्वांभूती आस्था एकाच वेळी हताश अन् उदास जशी करते आहे, तसेच ‘पुन्हा फुटतो भादवा’ या कवितेत म्होटीचे धारण मातीत रोवल्यावर पुन्हा चिगोर दाटतो’ या ओळीसारखाच वाचकाचा मनात पुन्हा पुन्हा अवतीर्ण होण्याचा, एक आदिम आशावादही भादव्यासारखा फुटतो आहे...


लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...