आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतिशील आत्मकथनाचा आविष्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळी सकाळीच हातात थाटी घेतलेला अंगात धड गुंड्या नसलेला, ढगाळ मळकी पैरण घातलेला मुलगा, आपल्या दारावर दीनवाण्या स्वरात ‘भाकरी वाढावं ओ माय’ अशी हाक देतो. शेवटी लहान मूलच ते, आणि शिळपाकं शिल्लक असतंच आपल्या टोपलीत, येरवी कचराकुंडी उकीरड्याची वा दारात उभ्या राहिलेल्या आशाळभुत कुत्र्यांचे जे धन टाकूनच देणार असतो आपण, पण पारोशीपाऱ्यात परसाकडला बसताना सहज सापडावा ससा हातात, तसं दारावर चालून आलेल विनासायस हे पुण्य, आपल्या शुुल्लक्षा दातृत्वाची आर्जवी अपेक्षा करते. अन बाकी कसलीही त्या मुलाची विचारपूस न करता दोन दिवसापूर्वीची आमटी अन् तशीच शिळी चपातीभाकरी आपण त्याच्या थाटीत टाकतो, बस एवढाच असतो एकाद्या भिकारी पोराशी आपला संबंध.


‘भंगार’च्या आत्मकथनाची सुरुवात ही साधारणत अशीच...  टळटळीत घामानं धपापणारी दुपार. रस्त्याकडेला केवळ दुर्गंधाने अत्यांतिक उबग आणणारा कचऱ्याचा ओलसर ढिग, जिथे लहानगा अशोक, भंगार’ आत्मकथनाचा नायक निवेदक, आई, आणि सुंबडी नावाच्या लहान बहीणीसोबत उकिरडा उपसत प्लास्टिक, पत्रा, काचा शोधत आहेत. सापडेल त्या चिजवस्तू पाटीवर बांधलेल्या खंदाटीत टाकत आहे. निवेदक सांगतो, उन्हानं अंग शिजलेलं, सूर्याच्या दाहक उष्णतेनं अंगातले पाणी संपून वरची कातडी करपून गेलेली. यातच खंदाडीतील काच त्याच्या पाटीला खरचटते. उपाशी पोटानं पहाटेपासून भंगार गोळा करायला बाहेर पाडलेले हे, ज्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. लहानग्या लेकरांच्या आतड्यांना पिळ पडून पोट पाटीला ढासलेलं. अन् खाण्यालायक जे पडकंसडकं, तीनचार दिवसांनी कुजलेलं, सडलेल्या गाजरांचे बुरकुंड, कलिंगड वा केळांच्या काळपट पडून बुरशी फुटलेल्या साली हे सगळं घाणीत पडलेले, मळक्या पैरणीला पुसून पोटाचा खळगा भरू पाहणारा हा नायक तहानेनं कोमेजलेला अनवाणी पायांनी आई अन् बहीणीच्यापाठी भज्याच्या आमिषावर नुसता पळत होता.


अशा निर्विकार निवेदनातून या पुस्तकाची सुरुवात होते. अन् एका पाठोपाठ एक अशा अकल्पित घटनांमधून आपल्याच शहरालगतचं, गावच्या शिवेवरचं पण बिलकुल माहित नसलेले एक अगोचर जग उलगडत जाते. वाचताना आपल्या माणूसपणाची शरम वाटावी, क्षणीक दुःखाने कासावीस व्हावे अथवा शिसारी येऊन पुस्तक बाजूला ठेवावं, असा आहे या पुस्तकाचा जीवघेणा ऐवज.


अजूनही अशी प्रत्येक गावात, शहरात भीक मागणारी लहान मुले रोजच सकाळी दिसतात. मिळेल ते खाऊन ते आईबहीणीसोबत भंगार गोळा करायला जातात. शिक्षण, स्वच्छता, अन् आरोग्यापासून वंचित असलेली महाराष्ट्रातील पंधरावर्षांखालील हजारो मुलामुलींचे आयुष्य दारोदार भीक मागत उकीरड्यात कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्यात बरबटलेलं आहे. आहे त्याच शाळा बंद करणाऱ्या प्रशासनाला त्यांच्याशी फारसं देणघेणं नसते, वा साक्षर सुशिक्षित माणसं म्हणून आपण काही करीत नाही. ‘भंगार’चे लेखक अशोक जाधवांचेसुद्धा आयुष्य याहून वेगळं असण्याची शक्यता नव्हती. पण अाधुनिक साहित्यात जो आपण ‘जादुई वास्तववाद’ म्हणतो. ती अतिरंजीत अविश्वासनीय अकल्पित घटना त्यांच्या आयुष्यात घडली. आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, फुले-आंबेडकरांच्या पुण्याईने ते शिक्षणाच्या प्रवाहात आले. भीक मागायला निघालेलं पाचसहा वर्षाचे एक पोर, त्याला वाटेत शाळेत जाणारी निटनेटकी मुले दिसतात. लेखक आपल्या शब्दात सांगतात, ‘तिथली सारीच मुलं स्वच्छ होती, छान दिसत होती. माझा अवतार उकिरड्याप्रमाणे होता. फाटकेतुटके कपडे, केसांच जंगल,अंगाचा कुजल्यासारखा वास, खांद्याला झोळी नि हातात भिकेचं कळकट मळकट भांड. त्यांना बघून माझं भान हरपून गेलेलं. अभावितपणे मी त्यांच्या पाठीमागनं जायला लागलो आणि व्हरांड्यात तसाच उभा राहीलो. मला बघून खैरमोडे नावाच्या मास्तरांनी विचारलं ‘कुणाचा रं तू?’

मी चाचपडत सांगितले ‘गोसाव्याचा.’


अन् ते म्हणाले, ‘शाळा शिकणार का?’
बस एवढ्या वाक्याने शाळा शिकण्याची ऊर्मी त्यांच्या मनात आली. माझ्यासाठी ही आहे जादुई वास्तवता. नंतर पिढ्यांचे भविष्य बदलणारी कसली असेल ती आदिम इच्छा! 
नंतरचे शिक्षण त्याला कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरावरील भेदाभेद, कर्मठ शिक्षकांचा विरोध. भीक मागतली नाही तर जगण्याचे वांदे. दारूडा बाप अन् वर जुलमी जातपंचायत. नोकरी लागल्यावर सुद्धा सातआठ महिने पगाराचे अप्रुव्हल न झाल्याने भंगार गोळा करीत जगणे. याचसोबत अशोक जाधवांनी आपल्या समूहाच्या जिंदगीच्या उधसलेल्या उकिरड्यासारखा जो शब्दांमधून फाफटपसारा आपल्या समोर मांडलाय, अंगावर येणारा एक एक अनुभव सांगितला आहे, त्यातील घटना, दृश्य इच्छा नसताना आपल्या डोळ्यावर जेव्हा तरळतात अत्यंतिक दुःख, क्रोध संताप अन् आत्मिक प्रताडनेनं आपण संभ्रमित होतो, नसावे कुणाच्या वाट्याला इतके हलाखीचे यातनामय कष्टप्रद आयुष्य म्हणून डोळे झाकून घेतो. जवळपास दोनशे पानांचे हे पुस्तक पेलताना आपली कमालीची दमछाक होते.


लेखकाचा आणि एकूण गोपाळ, गोसावी समाज यांचा हा भुतकाळ नाही. देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाली तरी हे लाजीरवाणं आपल्या भोवतालचे वास्तव आहे. जवळपास अपरिचीत असलेले प्रत्यक्षातले देशाच्या वीस टक्के लोकांच रोजच जगणं आहे, यावर आपला विश्वास बसत नाही. भटकाविमुक्त समाज आज शोषणाच्या तिहेरी तिढ्यात सापडलेला आहे. चरख्यातून बाहेर आलेल्या ऊसाच्या चिपाडांसारखी त्याची आजची अवस्था आहे. सुनामीत बेटावर जगलेल्या आदिम मानवासारखीच त्याची जिजीविषा, म्हणूनच त्याच्या कलेवरात आदिम  ऊर्जेची किंचीतशी धुगधुग आहे. धर्माने लादलेली आपली जातव्यवस्था. ही एक समजायला अनाकलनीय अत्यंत विचित्र गोष्ट. साधारणतः पूर्वापार धंद्यावरून निर्माण झाल्या असाव्यात जाती पण भटक्याविमुक्त समुहाना धर्मजातीने बहाल केलेले कोणतं निश्चित कामच नाही. ज्यांना आपण गावकुसाबाहेर फेकलेलं, आपल्या थोर सामाजिक व्यवस्थेत त्यांना कुठलं स्थानच नाही. ना राहायला एखादं नेमकं गाव, मेल्यावर ना पुरायला कुठलं स्मशान आहे. थोडंफार साम्य असलेली पुंजक्यापुंजक्याने कसंबसं जगणाऱ्या माणसाला कुठल्या अनाम जातीचे लेबल लागलं अन् जखडून टाकलय. भविष्य बंदीस्त करून टाकलय. इतरांनी माणूस म्हणूनच त्यांना बहिष्कृत केलय. शिवताशिवत संवाद टाळला. वर जातीच्या श्रेष्ठत्वाची एक अमूर्त अस्मिता दिलीय. त्यामुळे आपल्यासारख्याच हलाखीत दारिद्र्यात अन् अज्ञानात जगणाऱ्या इतरांशी कसला संबंध रोटीबेटी व्यवहार ठेवलेला नाही. जगातला कुठलाही धर्म जसे एकाकी मनाच्या अंतिम विश्वासाचे श्रद्धेय ठिकाण तितकेच ते सामुहिक पिळवणुकीचे हे पहिले हत्यार. जन्मताच कातडीसारखी चिकटलेली ही अभेद्द काल्पनिक भिंत तोडून बाहेर पडता येत नाही.


स्वयंभू सर्वहारा. वर अफाट आकाश. खाली माहित नसलेल्या धनदांडग्याच्या सातबाऱ्यावरील नावांचा निलांडा माळ. आपले म्हणून काय तर हे निवाऱ्यासाठीचे पालं.लाकडांच्या निर्जीव बाहुल्या. ओढ्यानदीला कुठूनकुठून सापडलेले गोल निमुळते दगड, चामुंडा खंडोबा हे आपले देव अन हातभर काठीवर दोनतीन रंगाचे झेंडे. आणि एक लोप पावणारी भाषा ही एवढीच जातीची इस्टेट. बाकी हरवण्यासाठी आहेच काय? हातात कसलेही उत्पादनाचे साधन नाही. भीक मागण्याशिवाय कसला पर्याय नाही. सामाजिक उत्पादनात कसला सहभाग नाही. अशोक जाधव सांगतात, पूर्वी आमचे लोक गावातील राखुळीने गुरं संभाळत. गावातल्या खाजगी शिकवणीसारखे हे काम. खाइदवार मजूरी नाही. आठवड्याच्या बाजारी हातात पैसा नाही, जगायचे कसं? भंगार ही संकल्पनाच मुळी चंगळवादी भांडवली संस्कृती मधून उदयाला आलीय. म्हणजे जगण्यासाठी रोजगार नाही. कसायला कसलीही जमीन नाही. ही दुसरी पिळवणुक अन् तिसरी पुरूषप्रधान समाजाअर्तंगत जातपंचायतीने चालवलेलं स्त्रीयांचे मुलांचे जनावरांसारखे शोषण. त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत माणूस म्हणूनची मोकळीक नाही. उनवारापावसात त्यानी उगडंवागडं वावरायचे, शरीराची निगा नाही कसली. कुपोषित पायाना गंजलेला पत्रा, काच लागून कधी अपंगत्व सर्दीपडस्यानी कायमचं आजारी. आरोग्यासाठी डॉक्टर नाही, भगताकडून देवाचा प्रसाद अंगारा म्हणून राख खायची. कमालीचे दारिद्रय, शिक्षण नाही पोरं शाळेला गेलं तर भाकरीची भीक मागायची कुणी? मुलीने तर बिलकूल शिकायचं नाही. मुलगी शाळेला गेली तर वाळीत टाकूची धमकी. हुंडा घेऊन मुलीच्या बापाने लहानपणीच लग्न ठरवायचे. एकाच नवऱ्याकडे राहण्याचा अधिकार नाही. मुलगी बापाची प्रॉपर्टी. तिने कुणाजवळ नांदायचे याचाही अधिकार नाही. जास्त पैसा देणारा कोणी भेटला तर पहिल्या नवऱ्याला सोडचिठ्ठी घ्यायला लावायची त्याची पोरं परत द्यायचीत, बापाने दुसऱ्या विवाहीत अविवाहितासोबत लग्न लावायचे. याला ‘धारूच्यो’ असे म्हणायचे. उभ्या जन्मात एखाद्या स्त्रीचे एकदोन धारूच्यो होतात. प्रत्यक्ष अशोकच्या बीएडच्या शिक्षणासाठी बापाने त्याच्या बहीणीचे असे लग्न लावलेलं. कमालीची अघोरी अंधश्रद्धा, नवासाला जमीनीवर पडलेली लापशी जीभेनं चाटायची, मुलं होत नसेल तर दुसऱ्या बाळंतीण स्त्रीची वार भाजून खायची. कळकणाऱ्या भांड्यात देवाचा प्रसाद खराब झाला तर टाकायचा नाही. विटाळातील स्त्रीला रात्री पालात घ्यायचे नाही. अशा अनेक घटना अशोक निर्विकार मनाने सांगतात. कुठं राग नाही संताप नाही. तरीही वाचकाला बोचरेपणाची जाणीव होत रहाते.


‘आम्ही जे जीवन जगतो ते तुम्ही जगला असता तर सुचल्या असत्या कविता मग.’ ही अरूण कांबळे यांच्या कवितेची ओळ. भंगार वाचतांना मला सातत्याने अरूणच्या या ओळींची आठवण झाली. पण अरूण कांबळेंच्या या कवितेसारखा अत्यंतिक टोकाला गेलेला सात्विक संताप या आत्मकथनात नाही. ते परत परत सांगतात गोसावी समाज स्वभावतः फार भित्राख्हतबल. मरणाच्या दारात उभे असलेल्या आजारी लेकराकडे पहात एकादा बाप म्हणेल, ‘जगलं तर आपलं. मेलं तर देवाचं.’ मला वाटते सामाजिक उत्पादनाच्या प्रक्रियेत सहभाग नसल्याने कदाचित माणसात एवढी हतबलता येत असावी. आत्मभान येत नसावे. मला हे आत्मकथन एका वेगळ्या कारणाने अतिशय महत्वाचे वाटते. मराठीत पद्मश्री दया पवारांनी बलुतं’या आत्मकथनांनी सुरुवात केली. अन् उपेक्षित वर्गातील नवशिक्षित संवेदनशील तरूणांत आपणही लिहू शकतो हा आत्मविश्वास आला.


बौद्ध समाजाला चळवळीचा पूर्वापार इतिहास, बाबासाहेबांचा फार मोठा वारसा. त्यामुळेच त्यांच्या लिखाणात परिवर्तनाची चळवळीचे संदर्भ सर्वत्र येतात. गरीब सवर्ण आणि इतर मागास समाजातील आत्मकथनात दुर्धर परिस्थितीत शिकून कशी प्रगती केली याचा एक चढता आलेख आहे. समाजदर्शन असते पण ते बदलावे म्हणूनचा सहभाग आपवादानेच असतो. पण पूर्वाश्रमीच्या चळवळीचा कुठलाही वारसा नसलेल्या बहुतांश भटक्या विमुक्तांची आत्मकथनं शिकून शहाण्या झालेल्या जमिनीवरील कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष जगणं असते. त्यांचे लिखाण केवळ कलावादी मुल्य जोपासण्यासाठीच नसते. तर आपल्यासोबत आपला समाज सुद्धा उन्नत व्हावा ही आच असते त्यांच्या साहित्यात. अशोक जाधवांनी आपल्यासोबत समाजातील मुलांमुलीना शिकून संघटीत व्हावे यासाठी जमिनीवर काम केलंय आणि हा वारसा त्यांनी काहीसा एकलव्यांसारखाच महात्मा फुले आणि बाबासाहेंबाकडून घेतलाय. त्यामुळेच त्यांचे आत्मकथन कृतीशील. म्हणूनच ‘भंगार’ हे लेखकाने प्रत्यक्ष जगताना ‘काय करावे’ याचा आदर्श परिपाठ आहे.


लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...