आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरिक सद्‍भावनेचा काव्योद्गार!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे जग परिघापलीकडचं, प्रवाहाबाहेरचं आहे. इथल्या चेहयांची ओळख प्रस्थापित नाही, मात्र जीवनानुभव आणि अभिव्यक्ती अस्सल आहे. कविता, कथा, कादंबरी हा या अभिव्यक्तीचा आकृतिबंध आहे. मराठीच्या साहित्यप्रांतात त्यातून उजेडात येणारे ताणे-बाणे, त्यातून ठळक होत जाणारे अंत:प्रवाह यांची मनस्वीपणे नोंद घेणारे हे विस्तारित पाक्षिक सदर...

 

कृषी संस्कृतीच्या कवींसह भटकेविमुक्त अशा दुर्लक्षित परिघांवरील कवी- लेखकांवर मी प्रामुख्याने आजवर लिहीत आलो आहे. एरवी लोकांत वावरताना अन् लिहिताना म्हणाल, तर मला कुठली जात राहिली नाही. पण भारतात, जातीच्या बिरुदावलीशिवाय माणूस जन्मालाच येत नाही. माझा एक अत्यंत जवळचा मित्र म्हणतो, ‘मी जातीमधील कवी-लेखकांवर लिहीत नाही.’ आणि खरे आहे ते, अवधानाने माझ्याकडून ते राहून गेलंय.

 

मराठीत ‘दलितसाहित्या’ने मोठी परंपरा निर्माण केली. त्या उज्ज्वल विरासतीचा विस्तार एकूण भारतीय भाषेतील साहित्यावर झालेला आहे. मी वापरत असलेली ‘परिघावरील साहित्य’ ही संकल्पनाच मुळी ‘दलित साहित्या’मधून विस्तार पावली आहे. आज दलितांवर अन्याय-अत्याचार होत नाहीत असे नाही. आजही माणुसकीला लाजवतील अशा अमानुष घटना बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू आणि काही अंशाने महाराष्ट्रात घडत आहेत. 

पण मी अभिमानाने सांगतो, महाराष्ट्र उर्वरित भारताहून वेगळा आहे. ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’च्या आंतरिक करुणेतून उजागर झालेली, जिचा नामदेवरूपी महामेरूच मुळी परिघावरील शिंप्याच्या घरातून बाहेर पडलेला, ज्याने ज्ञानाच्या लालसेनं देश पादाक्रांत केला, ज्ञानदेवासह चोखोबाला, उपेक्षित जनाई, अन् सोयरेला बरोबर घेतलं अन् पंढरपूरच्या वाळवंटात ‘अवघा रंग एक झाला’चा सोहळा सादर केला, त्या इवल्याशा रोपाचा विस्तार अवघ्या महाराष्ट्र देशी झाला. ही आपली आध्यात्मिक लोकशाहीची महान संतपरंपरा इथे उदयाला आलेली आहे. याचा दूरगामी परिणाम जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजीराजांवर झालेला आहे. याच वारशाचा व्यापक विस्तार शाहू फुले अन् वि.रा. शिंदे यांच्या आचारविचारांत झालेला. आणि शेवटी, जातिअंताचा जाहीरनामा देणारा, आत्मभान देऊन साऱ्या दलितांना जागे करणारा, मानव’ म्हणून मुक्तिगामी धम्म देणाऱ्या बाबासाहेबांच्या लढा. यातसुद्धा कोट्यवधी दलितांसोबत इथले काही सवर्ण उच्चवर्णीय सक्रिय सामील झालेले आहेत.  ज्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीत आपसी भ्रातृभाव अन् सांप्रदायिक सद‌्भाव इतर राज्यांच्या तुलनेत अधिक टिकून राहिलेला आहे.

 

हे प्रवाहाबाहेरचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी अभिनव, सुगावा, सुगत, लोकवाङ्मय आणि ग्रंथाली प्रकाशनांनी पुढाकार घेतला आहे. आता मी, ज्या ‘नाही फिरलो माघारी’ या कवितासंग्रहाविषयी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, संग्रह मोहन शिरसाट या तरुण कवीचा अन् त्याचे प्रकाशन ‘ग्रंथाली’नेच केले आहे. दलित साहित्यातील विद्रोह आणि नकार यापलीकडे जाऊन किमान एक संवादी सूर निर्माण करता येईल का, याचा खोलवर विचार करून प्रस्तुत संग्रहात आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न शिरसाटांनी केला आहे. संग्रहातल्या सुरुवातीच्या कविता दीर्घ स्वगतांसारख्या, त्यातही वाचन, चिंतन आणि अनुभवाच्या ऊर्ध्वपतनांतून आकाराला आलेली सुरुवातीची ही कविता परतपरत वाचल्याशिवाय फारशी समजत नाही. अंदमान निकोबार बेटातील एकाद्या प्रागैतिहासिक जनसमूहातील टिकून राहण्याची क्षमता पूर्वापार वंचनेतच जगणाऱ्या आदिवासीमधेच दिसून येते. म्हणूनच ‘नाही फिरलो माघारी’ या कवितेत मोहन शिरसाट म्हणतात, ‘हे दबलेले श्वास अधिक दाबून राहिलेले, वायनांची चाळणी, पायांची गाळणी, चिंध्यांचे काळीज अथंरलेले, घावांच्या व्रणांचे कवच नेसताना नाही, फिरलो माघारी.’ आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत काळशार धमन्यांतील रग जिवंत ठेवून चालताना कवी सहज म्हणून जातो, ‘सारं कसं पडकं झडकं, उफाण आतल्या आत धुमसतं, उधाण वेदनेची संवेदना मुसक्या बांधून रक्ताचे डोळे भयानतेच्या गव्हाणीत... छाती पुढे करून पावलांचे ठसे उमटवलेत पेटत्या निखाऱ्यावर.’ समीक्षेच्या भाषेत जिला आपण ‘नॉस्टॉल्जिक’ म्हणतो. सुरुवातीस निर्मितीचे हेच तर ‘संचित’ असते. गतकाळातील आठवणींशिवाय कलाकाराकडे मूळचे भागभांडवल तरी दुसरे काय असते? परत वयाच्या पंचविशीनंतर वितभर पोटासाठी नोकरीच्या निमित्ताने शहरात परात्म नीरस आयुष्य पत्करलेलं, त्याचा एक परिणाम आजच्या गावातून आलेल्या कवी-लेखकांवर प्रकर्षाने दिसतो. मोहन शिरसाटसुद्धा याला अपवाद नाहीत.

 

संग्रहात अशा अनेक कविता आहेत, दोस्त, खस्ता, माय, कसलेल्या जरठ हातांचे अलगद घेतलं चुंबन... ज्यात कवी गतकाळाच्या आठवणीत रमलेला दिसतो. यातील ‘खस्ता’ ही कविता एकाच वेळी अनेक अर्थ ध्वनित करते. नोकरीमुळे आलेली थोडी स्थिरता, रोजच्या जेवणाची किमान मिटलेली भ्रांत. ताटातला भाताचा घास तोंडात टाकताना, चव ओळखीची वाटते अन् आईची आठवण.‘ आतले स्मृतिमुख धुमसत बाहेर आले, आणि एकदम लहान झालो, जमिनीचा मालकीहक्क नसताना इमान ठेवून मातीत राबत होतो, ‘आम्ही’ या ओळीतून लहानपणीचे गरिबीचे जगणे आणि शेतमजूर शेतकऱ्यांशी असलेलं जैविक नातं, जसं उलगडत जातं, तशी कविता एका वेगळ्या वळणावर पुढे जाते...‘मात्र संसदेकडे उंगली निर्देशित पुतळ्याच्या सभोवारही फाटक्या ओसरीत अभ्यास करणारी काही मुले दिसतात.’ एक वेगळं सूचन आहे इथं. पूर्वजांची नाळ ज्या मातीत पुरली, ते गाव सुटत नाही. आणि एकीकडे बाबासाहेबांचा संदेश, ही जुलूमशाहीची गावं सोडा अन् शहराकडे चला. आज दलितांनाच नव्हे तर गावातील प्रत्येकाला जगण्यासाठी शहरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. पण केवळ वेठबिगार म्हणून न जाता शिक्षित होऊनच त्या बदलत्या शहरात जायला हवे, असा एकूण सूर या कवितेचा असावा.

 

मोहन शिरसाटांची कविता आत्मटीकेची आहे. माणसांनी निर्माण केलेली जात भविष्यात असणार नाही, असा ठाम विश्वास त्यांच्या ‘पावलांच्या ठशांवर उमटत नाही, कोणतीच जात’ या कवितेत जोरकसपणे मांडलेला दिसतो. ‘पण जात काही शाश्वत नाही, म्हणून हरेक मोर्चातील असंख्य पावलांच्या ठशावर उमटत नाही, कोणतीच जात.’ परिवर्तनाचा - ढ आशावाद ते व्यक्त करतात. तशीच ती पूर्वापार सवर्ण समज-गैरसमजावर तेवढ्याच पोटतिडकीने बोलताना दिसते. ती आपल्या हालअपेष्टा, ओढाताण आणि अपमानित जीवनापुरतीच मर्यादित नाही. ‘माणूस’ म्हणून त्यांच्यातही एक जितेजागते संवेदनशील मन आहे. ते चराचराशी, हरएक माणसाशी आपले नाते जोडून घेतात. या सर्व कारणांमुळे मोहन शिरसाटांची कविता एका अलग समजेतून व्यक्त होते. स्त्रीपुरुषाच्या निरोगी नात्याला अधोरेखित करते. सहज संवादाची वेल, मैत्रपालवीच्या घट्ट मिठीत, खांद्याला खांदा भिडवून अशा अनेक कवितांमधून निखळ मानवीय नाते अन् निसर्ग यांच्यात संवादाचा पूल तयार करू इच्छिते.

 

तरीही हजारो वर्षांच्या अवहेलना, तिरस्कार अन् सर्व तऱ्हेच्या शोषणातून निसर्गतःच समूहाने एकत्रित जगण्याच्या जनुकीय प्रेरणेसारखी, व्यक्तीपलीकडील व्यापक विचार करणारी ‘सामाजिक जाणीव’ त्याच्या जवळपास सर्व कवितेत दिसतेच. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र, मगच आरक्षणाच्या नावानं बोंबला, तर आम्हीच देशद्रोही, केला जाऊ शकतो आपला द्वेष, फुलन, बोधिवृक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्थविर, अंगुलीमालाचं सार’ प्रखर सामाजिकतेचं भान असलेल्या अशा अनेक कविता दाखवता येतील. आवर्जून उल्लेख करावा, अशी स्थविर अंगुलीमालाचं सार या कवितेत अकारणचा द्वेष, सामूहिक हत्या, युद्ध, आणि अंततः संहार या सर्वच गोष्टींना नवीन आयाम नवा पर्याय दाखवण्याचा कवी प्रयत्न करतोय, ‘छाटून टाकलेत खैरलांजीत एकेक अवयव, तेव्हा अख्खी धरणी तुडवाचं बळ उठलं’ या ओळीतला उद्रेक, संताप, आक्रोश, आपसी यादवीसारखा जरी असला तरीही कवी सांगतो, द्वेष हा पर्याय नाही होत. कवी इथे, गांधीजी अन् तथागत गौतमाची भूमिका मांडतात.मग मी विचार करतो, किती दिवस तुम्ही घोर अडवणूक करणार? द्वेष, तिरस्कार शिवताशिवत बाळगणार? रोज एकमेकांची तोंड पाहत एका गावात राहतोय, आपण. नामदेव म्हणतो, तसे कवी या आपल्या जुन्या दुष्मनीवर माती पसरून सांगतो, अंगुलीमालासारखे मी शांततेचे भाईचाराचे भगवे चिवर धारण केलेय. कायमचे वितंडवादाचे जगणे, नाही मला जगायचे. मोहनच्या कवितेला अांतरिक सद््भावनेची प्रगाढ जाण आहे, जी त्याला बुद्धांकडून मिळालेली आहे.  

 

नव्याने लिहिली जाणारी आजची दलित कविता जातीय अन्याय अत्याचार अन् पिढीजात दारिद्र्यावरच केवळ बोलत नाही. सर्वंकष खासगीकरणाच्या सत्रात आरक्षणाच्या भाबड्या आमिषांवर ती भिस्त ठेवत नाही, तर समूळ कष्टकऱ्यांच्या हिताची ती तळी उचलून धरते.जातिअंत अन् मानवमुक्तीचे स्वप्न पाहताना पृथ्वीच्या पर्यावरणाची तिला इतरांइतकीच काळजी अन् आस्था आहे. ती केवळ साहित्य निर्मितीची शाब्दिक कृती करून ‘स्वान्त सुखाय’ होत नाही तर परिवर्तनाच्या लढ्यात, शेतकरी-कष्टकरी यांच्या लढ्यातसुद्धा उतरत आहे. कलिंग अन् दोन महायुद्धांच्या संहारानंतर तिला युद्ध टाळायचे आहे. आणि हेच तिच्या निर्मितीचे ध्येय आहे. कवी अन् एक जातिवंत माणूस म्हणून मोहन शिरसाट त्याला अपवाद नाहीत!


लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

 

बातम्या आणखी आहेत...