आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्फोटाचे आख्यान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री ही उपभोग्य वस्तू ठरवली गेली, त्यालाही आता युग लोटले. देव, धर्म, जात, समाज, सत्ता, बाजार अशा सगळ्याच वाटांवर तिचा यथेच्छ वापर होत राहिला. तिची प्रतवारी निश्चित होत राहिली. या प्रतवारीत सगळ्यात तळाशी राहिली देवदासी आणि तिचं प्राक्तन. आजवर जगाने तिची किंमत ठरवली. पण सनातन वेदना तिच्या मुखातून कधी बाहेर आली?  मराठीच्या साहित्यप्रांतात नुकत्याच दाखल झालेल्या ‘गावनवरी’ या काव्यकादंबरीने एका निद्रिस्त ज्वालामुखीचा स्फोट घडवून आणलाय. ज्यातून बाहेर पडणारा लाव्हा बराच काळ  एक समाज म्हणून आपल्याला भाजून काढणार आहे...


पुस्तकाचं नाव-‘गावनवरी’. पॉप्युलर प्रकाशनाचं वेदिका कुमारस्वामींच्या कवितांचं हे पुस्तक. ते वाचताना मी तसा बेसावधच होतो. देवदासी हा विषय फारसा अपरिचित नाही, मराठी साहित्याला. पण अचानक समोर आलेली पहिली ओळ - हेगडे मला म्हणतेला, ‘रांडे तुजी अवकात काय्ये...’ वाचता वाचता मी थोडा सावरून बसलो. दीर्घ कविता, खंडकाव्य यांचीसुद्धा एक परंपरा आहेच. बासष्ट कवितांमधून एक आत्मकथन. कथन. तेही परत बऱ्याच वेळा तृतीयपुरुषी म्हणजे, ही काव्यकादंबरी. वेदिका त्याची निवेदक आहे. एकूण तीन अवतरणं. प्रत्येक अवतरणाच्या सुरुवातीला बसवेश्वरांचे अभंग. मराठीने बसवेश्वरांना आपले म्हणून मनापासून समजून घ्यायला हवे.


एरवी, घमेंडखोर पुरुषी मानसिकतेमधून हेगडेनं विचारलेला प्रश्न कडाक्याच्या भांडणात निर्णायक क्षणी प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या तऱ्हेने विचारला जातोच. पण शरीर हेच जिचे उपजीविकेचे भांडवल, माणूस म्हणूनचा तिलाही आत्मसन्मान असतोच ना पुन्हा? अन् जसजसा मी कविता वाचत गेलो, तेव्हा लक्षात आले. म्हणतो, तेवढं साधे नाही हे प्रकरण. 
"हेगडेला आठवत नही कोण्हच्या रस्त्यानं आलाता, मांड्यासारखे फाकलेत दोन रस्ते लांबच लांब.  इथे बाईच्या रूपात अवघी पृथ्वीच समोर येते. तरीही "येकदा देवाच्या गळ्यात बांधलं की सर्वे प्रश्न मिटतेत रस्ता उरत नही, बेचकी उरते.’ परत ती आपल्या अवकातीत येते. मुंगीलाही असतो संताप, म्हणून मग ती प्रेमाचाच जुगार खेळते. आणि वय झालेला हेगडे पंडूसारखा मरून पडतो, तिच्या बेचक्यात. भांबावते ती "काय असतेत नियम, काय असतात  कायदे, देवाला वाहिलेल्यांना कायदे लागू असतेत काय?’ हळूहळू शोकांतिकेकडे जाणारे एक नाट्यच उभारत राहते, आपल्या पुढ्यात. ही तर प्रत्यक्ष अंगावर येते, कविता. घटनांतून आकारत जातोय या कवितेचा विस्तार. वेदिका, तिची अम्मा आणि आजी या तीन प्रमुख पात्रांची ही कथा. यात हेगडे जसा आहे, तशीच हेगडेसारख्या बदफैली नवऱ्याची पत्नी कावेरीअम्मा, माणूस म्हणून तिलाही शरीर आहे. नवरा बाहेरख्याली म्हणून ती गड्यासोबत मश्गुल. वेदिकाची आई अम्मा गावनवरी बनवून ज्या पुजाऱ्याकडे प्रथम राहिली त्याच्या लग्नाच्या बायकोचा मुलगा मादण्णा, दुरान्वयी नात्याने वेदिकाचा जो भाऊ लागतो. नंतर ही अम्मा हेगडेची रखेल तोच तिचा पोशिंदा. अम्मा उतरणीला लागली, तरी हेगडेची अजून जीव घरून असलेली कामेच्छा, म्हणून त्याची वेदिकेवर नजर. 


वेदिकेच्या नावाची पण एक गोष्ट. आजीला नाव ठेवायचं होतं, एका फुलाचं, पण आजीशी जन्मभर न बोलणारी अम्मा देवीपुढं बसून म्हणाली, “फुलं का कोण्हीबी तोडतं, कोण्हीबी माळतं, कोण्हीबी वास घेतं,देवाला वाहतं. फुलाचं नाव नुको.’ मग पुजाऱ्याच्या बायकोनं नाव सांगितलं. लहान असतानाच सासूला तिच्या ती अपशकुनी वाटली म्हणून दुधाच्या घंगाळात बुडवून मारली, त्या लेकीचं होतं, वेदिका! 


बायका नवऱ्यासोबत आलेलं सगळं स्वीकारतात. जसे आजी, सवत जयंतीच्या लेकाला आपलाच मानते मुलगा. महेश. अन् पुजाऱ्याची बाइल रखेलीच्या पोरीचं ठेवते, नाव. वेदिकेला खाऊ घालते समोर बसवून. बायका खरे तर झाडांच्या असतात मुली. झाडांसारखेच जमिनीतील मुळांतून एकमेकांना अन्न आणि पाण्याची रसद पुरवतात, गरजेनुसार.


वेदिकेला शिकायचं आहे, हेगडेच्या मुलीसारखं. जसं “तिचं दप्तर दाट भरलं असायचं पुस्तकायनी. जसा कैऱ्यांनी तिच्या अंगणातला आंबा. जसा कावेरीअम्माचा गळा काळ्यासोनेरी मण्यांनी’ पण तिला प्रवेश नाही मिळाला. बिनबापाची क्षुद्र पोर म्हणून. वेदिका सांगते, “मला रांगच नव्हती, मी कधी म्हणतली नही प्रार्थना, तरी मला पाठ अाहे भारत माझा देश अाहे आजून “शिकवनीला येणारी लता मॅडम म्हणाली, कोण्हत्या भाषेत शिकवायचं? वेदिकेला आजी हसून विचारते, “कोण्हत्या भाषेला गिऱ्हायकं जास्ती? चांगल्या शिरीमंत गिऱ्हायकाच्या भाषेत शिकीव माज्या नातीला’  मानवी इतिहासात आजवर सत्ताधाऱ्यांच्या भाषेनेच वाढवलाय विस्तार. भाषा असते चलनातले नाणं. माणसं शिकतात जास्ती गिऱ्हाइकांची भाषा. मग ते कोणीही असोत मध्यमवर्गी, बुद्धिजीवी, बुर्ज्वा, परक्या मुलखातील वेठबिगार- कामगार, नाही तर पोटासाठी देहाचे भांडवल करणारी गणिका.गावनवरीला दोनच भाषा असतात, अवगत. एक पोटाची, दुसरी देहाची. 


आणि आता हेगडेच्या पश्चात तिच्या जीवनात आला हेगडेचा तरुण मुलगा सदाशिव. शरीर विकताना किमान जे हवं असते, मानसिक सुख, ते आता कुठं आले तिच्या आयुष्यात. खूप आत्मीयतेनं सदाशिवाचे तिनं स्वागत केलं. “वाहून टाक मस्तकातल्या अस्थी माझ्या हसण्याच्या गंगेत.’ रोज रातीला सदाशिव यायचा तिच्या सेजेला “चुंबनाला ताज्या कॉफीच्या दळलेल्या बियांचा वास रोज रात्री सदाशिव रोज रात्री’ उन्हाळी मोगऱ्यासारखाच अल्पकाळात संपून गेला, तिच्या प्रेमाचा बहर. मामा लग्न लावून द्यायला निघाला, घरात सवाष्ण पाहिजे. विरहाच्या सुरुवातीच्या अन् सुखाच्या शेवटच्या दिवशी सदाशिव तिला मातंगीच्या पर्वतावर घेऊन गेला होता. कर्नाटकात प्रत्येक स्थळाला दगड, डोंगर, नदी, वारुळाला एक लोककथा चिकटलेली. “मला नवल नही वाटतेलं की लहान शिळा मोठ्या शिळेला कशी जन्मभर डोक्यावर घिऊन बसलेली कोण्हत्याच बाईला वाटत नही नवल पुर्षासारकं’कोण कुठला जात धर्म काळा की गोरा म्हातारा की तरुण, काही नाही विचारायचे. तिलाही कोणी विचारले नाही, कोणती जात. जशी ती होती सदाशिवाची अर्धांगिनी. “सदाशिवप्पा रातभर गुमसूम व्हता बिछान्यात म्हणतेला त्या अखेरच्या रात्री मला तू माजी आयी व्हती, माजी बायी झाली, आता तू माजी लेक व्हय आईक माजं,आणि शिक्षण कर धाव्वीची परीक्षा बाहेरून दे, अभ्यास कर, रोज पास झाली, तर धाडीन म्हैसूरला कॉलेजात म्हणतेला.’ तो व्यवहारी प्रेमळ तरुण आहे. आत्मिक सुखासाठी हवा असणारा मुक्तीचा रस्ताच त्याला ठाऊक नाही. हतबल तो.


पहिले सत्र संपताना वेदिका इथंही क्षीण का असेना, सुदीप प्रकाशाचा आशेचा किरण दाखवतेच. “कोसळती म्हणजे नष्ट नही व्हत. कोसळणं म्हणजे, दरयेळी नसती अधेगती पावूस उतरून येतला नभातनं, त्याला अधोगती म्हणतंत का कोण्ही?’ गळ्यात लालपांढऱ्या मण्यांचे गळ्यात दर्शन बांधलेली विरक्तीच्या प्रवासाला लागलेली हताश बेसहारा तरुण स्त्री. सगळ्या भूतकाळाचे पाश तोडलेली. ना घर, ना कुठला आधार, ना कसला निर्धास्त आसरा, एकाद्या रातीचा. पायाखाली गावं-शहरं-माळ-अरण्य-नदी-सकाळ-दुपार-रात्री, अशी तब्बल दोन वर्षं!


हे दुसरे सत्र वाचताना मन विदीर्ण होते, काहूर उठते. वाटतं कसं शक्य आहे, एका स्त्रीचं सर्वथा एकट्याने भटकणं. मीराला कुठं आश्रय मिळाला असेल, राजाची सूनच ती. अंगावरची कापडं राजाकडं फेकून, पडली ऐश्वर्यातून. ती अक्क महादेवी कोण? खूप कष्टदायक वेदिका कुमारस्वामीचा हा प्रवास. बोलायला ठीक वाटते समृद्ध अनुभव. पण चारसहा दिवस असं नि:संग एकटे जगणे भल्याभल्या गड्यांना शक्य नाही. एक पुजारी देवळातला येकटा भेटला “मी म्हटलं मांग तर म्हणतेला, ‘हट्टर हादर मुट्टीर मुडचट.’


आणि एक प्रसंग सांगून मी संपवतो हे सुंबरान. जे नको वाटतं वाचताना, वाटतं पडावं बाहेर,कानात तप्त शिसं घालावेत, तरीही ढोलाचा आकांत पाठ सोडत नाही. “म्हणतले देवाला, मी टाकून सोडला तुला. देली सोडचिठी. काडीमोड करतेली भरली तुझी जन्माची जकात. आता कर माझी वाट मोकळी’ असं क्वचितच कुठं मराठीच्या परिघात ऐकायला आलंय याआधी. जवळचं सगळं चोरीला गेलं. वारुळाजवळ तशीच पडून राहिली. आजी म्हणते, वारुळं म्हणजे पृथ्वीची योनी. किती आदीम मिथक! चोरानं डोकं आपटलं होतं तिचं. तेव्हा भेटला तिला अंबिगार. “रुमालात धरलंतं माजं रक्त फुलासारकं माजा काटा, तव्हाच टेचतेला त्याच्या बेंबीच्या देठाला’ पुरुषाला आंतर्बाह्य सोलून काढणारी ही वेदिका कुमारस्वामीची कविता! व्यक्त होताना  नीती-अनीतीच्या सर्व मानमर्यादा फाट्यावर मारते. माणूस म्हणून जो प्रत्येकात असतो, उन्माद तो तेवढ्याच ताठ्यानं ती स्वीकारते. संसारी पोरबाळाचा अंबिगार, ज्याचे हात होते थंडगार त्याला ही वेदिका तशी पेलणारी नव्हतीच. रांडेनंही संतपण राखावं, म्हणणाऱ्या त्याच्या नातेवाइकांनी, भर दुपारी बाहेर काढलं.हा अपमान तिला सहन झाला नाही. आभाळाला तडा जाणारा संताप ती शब्दांशिवाय व्यक्त कशी करणार? “त्याच्या गावाच्या वेशीवर हुबं ऱ्हावून मी सूर्याला पायताण दाखवलं मगच सोडून टाकलं तेई गाव’


...कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात प्रबोधन आणि अाधुनिकतेची चळवळ लवकर सुरू झाली. त्याचे निश्चित फायदे झाले. आपली स्त्री घरातून बाहेर पडली. जातीयता इतर राज्यांच्या तुलनेत कमी. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार झाला. पण बदल्यात आपण आदीम अतिताचे विस्मरण केले. जे चांगले होतं, त्याचं संवर्धन नाही केलं. वेदिका कुमारस्वामींची काव्यकादंबरी वाचताना जे मला जाणवतंय.


नेमकं इथेच, हे पुस्तक वाचायचे थांबवून, मी हा संवाद केलाय. आता तुम्ही सुद्धा ते वाचायचे आहे. वेदिका कुमारांच्या कवितेवर अजूनही विस्ताराने लिहायला हवं. या कवितेने दबलेल्या स्त्रियांना मुखर होण्याचे धाडसी बळ दिले आहे. मराठीत ही काव्यकादंबरीची पहिली मळवाट. त्यांचे मनापासून स्वागत!

- आनंद विगंकर
anandwingkar533@gmail.com
संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...