आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इफ्फीत 'आनंदी गोपाळ'चे झाले सादरीकरण, वेगळे काही करण्यावर भर : ललित प्रभाकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी : एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचेच चित्रपट करण्याची विचारणा अधिक होत असल्याने त्या भूमिका साकारण्यावर माझा भर असतो. त्यामुळे अजून विविध प्रकारच्या भूमिका मिळतील, असा अभिनेता म्हणून माझा प्रयत्न असतो. एकसारखे काम करण्यात काही गंमत नाही, असे मत मराठी चित्रपट अभिनेता, लेखक ललित प्रभाकर याने 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.

चि. सौ. कां. आणि आनंदी गोपाळ असा एक विनोदी-कौटुंबिक व दुसरीकडे कलात्मक चित्रपट साकारताना एकदम वेगळा रस्ता निवडल्याबद्दल काय वाटते, या प्रश्नावर ललित म्हणाला की, मी मध्यंतरी हम्पी नावाचा एक चित्रपट केला, तोही वेगळ्याच प्रकारचा. विविध प्रकारच्या भूमिका करणे मला आवडते आणि निर्मात्यांकडून जर विचारणा होत असेल तर त्या करण्यावर माझा भर असतो. चित्रपट आणि थिएटरमध्ये अधिक काय आवडते या विषयावर तो म्हणाला की, दोन्ही क्षेत्रांची मला आवड आहे. नाटक मी आधीपासून करत आहे, पण आता चित्रपटांमुळे मला नाटक करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही.


आधुनिक काळात वेब सिरीजचे नाटक आणि चित्रपटांपुढे आव्हान वाटते का, यावर ललित म्हणाला की, हे लोकांवर अधिक अवलंबून आहे. चित्रपट करणारे लोक निष्काळजीपणा करत नाहीत, लोक येणारच नाहीत म्हणून आपण कशाला चित्रपट करावा, त्यात कशाला पैसे गुंतवावेत, असे सध्या तरी होताना दिसत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांचीही काही तरी जबाबदारी आहे. आम्ही एखादी गोष्ट निवडली, त्यावर मेहनत घेतली किंवा त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केले, तर प्रेक्षकांची जबाबदारी आहे की, त्यांनी घरातून बाहेर येऊन चित्रपट बघितले पाहिजेत. लोकांनी जर आमच्या कलाकृतींना कमी प्रतिसाद दिला तर पुढे चित्रपट तयार करणाऱ्यांचे नुकसान होईल व चित्रपट तयार होणारच नाहीत.

हॉररपासून ॲक्शन चित्रपट करण्यास आपल्याला आवडेल. तसेच रोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेला 'मीडियम स्पाइसी' नावाचा चित्रपट येत असल्याचे त्याने सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...