आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे नातू अन् काकांचे नावकरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलच्या साडेबारा एकरवर मुंबईतील आंबेडकरी जनतेने ताबा मिळवला. डॉ. आंबेडकरांच्या भव्य स्मारकासाठी ही जागा देण्याची त्यांची मागणी होती. या घटनेतूनच आनंदराज या बाबासाहेबांच्या नातवाचे नाव पहिल्यांदाच राज्याच्या पटलावर चर्चेत आले. बाबासाहेबांचे पुत्र यशवंत ऊर्फ भैयासाहेब यांना तीन मुले व एक मुलगी. यातील सर्वात मोठे प्रकाश आंबेडकर. महाराष्ट्रात ते सर्वपरिचित आहेत. प्रकाश यांच्या जन्मानंतर थोड्याच काळात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. भैयासाहेबांनी त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव भीमराव ठेवले. त्याच्या पाठीवर जन्मले ते आनंदराज. हे नाव बाबासाहेबांच्या काकांचे आहे. शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात होते त्या वेळी या काकांकडेच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती.
व्यवसायाने बिल्डर असलेले आनंदराज राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. घराण्याच्या वारशाला तेदेखील अपवाद कसे राहतील. आपसूकच आंबेडकरी चळवळीत ते ओढले गेले. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या युवा संघटनेचे ते नेते होते. भारिपचे मुंबई अध्यक्षपदही त्यांच्याकडेच होते. मितभाषी व मृदू स्वभावाच्या आनंदराज यांनी संघटन कौशल्यामुळे मुंबईत पक्षाची घडी बसवली. अलीकडे चळवळीत झालेल्या पडझडीचा फटका साहजिकच भारिपलाही बसला. त्यामुळे आनंदराज काहीसे अस्वस्थ होते. एका वेगळ्या आंदोलनाचा विचार त्यांच्या मनात घाटत होता. महाराष्ट्रभर भटकंती करून त्यांनी तरुणांचे मानस जाणून घेतले. चळवळ आक्रमकतेला मुकल्याचे लक्षात आले. त्यातूनच रिपब्लिकन सेनेचा विचार आकाराला आला. सत्तरच्या दशकातील पँथरप्रमाणे ही सेना आक्रमक असेल, पण आंदोलने हिंसक असणार नाहीत. अशा स्वरूपाची मध्यममार्गी, पण आक्रमक संघटना बांधण्याचा निर्धार त्यांनी केला.
बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही आंबेडकरी जनतेची कित्येक दिवसांची मागणी होती. चैत्यभूमीलगतची इंदू मिलची जागा जोडली गेल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, अशी मागणीही जोरकसपणे पुढे आली. 6 डिसेंबर 2011 पासून इंदू मिलच्या जागेसाठी आंदोलन छेडण्याचे आनंदराज यांनी ठरवले. मुंबईसह महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. कार्यकर्त्यांची फौज उभी केली. गेल्या 6 डिसेंबरला मिलचे फाटक तोडून ताबा मिळवला. या घटनेपासून आनंदराज हे आंबेडकरी चळवळीतील तरुणांचे आशास्थान झाले. त्यांच्या रूपाने मिळालेल्या नव्या नेतृत्वाचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. आनंदराज यांची पुढची वाटचाल कशी असेल, कोणता संघर्ष हाती घेतात, राजकारणातील डावपेच कसे असतील यावरच त्यांचे आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीचे भवितव्य ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कॉँग्रेस आघाडीशी फारकत घेतल्यानंतर आता कॉँग्रेस पक्षातर्फे आठवलेंना पर्याय म्हणूनही आनंदराज यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.