आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...पण लक्षात कोण घेतो?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशांनी मुंबई वसवली. त्यांच्याकडे दूरदर्शीपणा होता. आपल्याकडे तो अजिबात नाही. म्हणून मुंबईसारख्या शहरात पूल कोसळण्याच्या घटना पुन्हा-पुन्हा होतात. आता दादरच्या टिळक पुलाचं उदाहरण घ्या. या पुलाने शंभरी पार मागेच केली आहे. म्हणजे आता या पुलाचं आयुर्मान संपलं आहे. पण, आपण लक्ष द्यायला तयार नाही. ब्रिटिशांच्या बांधकामात सेफ्टी फॅक्टर नावाची बाब होती. म्हणजे बांधकामाची मुदत संपल्यावरही तो २५ वर्षे आरामात टिकू शकतो. त्या फॅक्टरवर आज आपण जगतोय. 

 
कसाब (हिमालय) पूल कोसळला नाही, त्याचा स्लॅब कोसळला आहे. काँक्रीटचे आयुष्य ७५ तर स्टीलचे शंभर ते सव्वाशे वर्षे पकडले जाते. पण, तेच जर बनावट वापरले असेल तर इतकी वर्षं ते तग धरू शकणार नाही.  


मुंबई पालिकेचा कारभार ढिसाळ आहे की पालिकेकडे २८ मजल्यांची शिडी आहे, तुम्ही ६० मजले बांधायला परवानगी देता. आग लागल्यावर कार करणार? मुळात या शहरात वाढीव एफएसआय देणे चुकीचे आहे. शहरात लोक वाढले की फ्लॅट वाढणार, मोटारी वाढणार आणि पूलही वाढवावे लागणार. आता तुम्हाला छोटी-छोटी नवी मुंबईसारखी शहरे वसवावी लागणार आहेत. पुणे, नाशिक याच्यामध्ये अशी शहरं वसवणं शक्य आहे.   


रिलायन्स, टाटा, बिर्ला अशा कंपन्यांना तुमच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांसाठी तिथेच घरे बांधा, अशी अट घातली पाहिजे. अन्यथा वाहतूक कोंडी वाढणार. आता बघा, जेजे, वरळी सी लिंक असे हजारो कोटींचे पूल बांधले, त्यावरून पादचाऱ्यांना जायला परवानगी नाही. म्हणजे तुम्ही सामान्य मुंबईकरांसाठी काहीच गुंतवणूक करत नाही.  


शहराचा विकास आराखडा (डीपी प्लॅन) तुम्ही बिल्डरांसाठी बनवता. गेल्या दहा वर्षांत मुंबईत तब्बल दहा लाख स्क्वेअर फूट जागा डांबरीकरण केली आहे. मग, पावसाचं पाणी मुरणार तरी कुठं? मुंबई तुंबणार नाही तर काय होणार? राज्य विधिमंडळात शहरी प्रश्नावर कोणी काही बोलत नाही. नगरसेवकांना टक्केवारीचे पडले आहे. मग शहरांचं काय होणार? असेच आपण राहिलो तर एक वेळ अशी येईल की मुंबईकरांना समुद्रातून मार्ग काढावा लागणार आहे.   


हिमालय पुलाची फ्रेम मजबूत आहे. फ्लोअरिंग कोसळलं आहे. ते काँक्रीटचं होतं. काँक्रीटला ७५ वर्षे आयुष्य असतं. दर दहा वर्षांनी काँक्रीट तपासावं लागतं. मुंबईच्या खारट हवेत स्टील लवकर खराब होतं. हा ब्रिज पुणे-नाशकात असता तर इतक्या अल्प काळात कोसळला नसता. पण, याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही.  

अनंत गाडगीळ
आमदार व वास्तुविशारद, मुंबई.

बातम्या आणखी आहेत...