Magazine / विस्कटलेली घडी दुग्धव्यवसायाने सावरली

समोर येतील त्या अडथळ्यांवर मात करण्याचं त्यांनी ठरवलं आणि विखुरलेला संसार पुन्हा एकदा सावरू लागला

अनंत वैद्य

Jun 11,2019 12:16:00 AM IST

पावसाअभावी कोरड्या पडलेल्या शेतानं साथ सोडली, तशी कोल्हारवाडीतील शहादेव यांनीही पत्नी कांताबाईंची साथ सोडली अन् मरणाला कवटाळलं. पण कांताबाईंनी याही स्थितीत उभे राहण्याची जिद्द उराशी बाळगली. समोर येतील त्या अडथळ्यांवर मात करण्याचं त्यांनी ठरवलं आणि विखुरलेला संसार पुन्हा एकदा सावरू लागला.

सातत्याने अवर्षणाच्या छायेत असणारा बीड जिल्हा. बहुतांश क्षेत्रही कोरडवाहू. याच भागातील कोल्हारवाडी (ता.बीड) येथील शेतकरी शहादेव इंगोले. कष्टाने, मेहनतीने शेतीत घाम गाळत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी झटूनही दुष्काळी संकटामुळे हाती काहीच लागत नव्हते. अशा स्थितीत वाढत्या तणावातून शहादेव यांनी एप्रिल २०१५ मध्ये जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, वृद्ध सासू-सासरे अशा कुटुंबांचा गाडा हाकण्याची जबाबदारी आपसूकच पत्नी कांताबाई यांच्यावर पडली. ही जबाबदारी सार्थ करत त्यांनी एक मुलगा मेकॅनिकल अभियंता, दुसरा मुलगा दुग्ध व्यावसायिक बनवत स्वत:च्या पायावर उभा केला, तर मुलीलाही पदवीधर बनवले. मुलांचे विवाहही पार पाडले.


एकटीचा संघर्ष
ग्रामीण भाग, तेथील समजुती, त्याचा दैनंदिन जीवनात होणारा त्रास, दुष्काळाचा अडसर अन‌् चिमुकल्यांचे भवितव्य असा गुंता कांताबाईसमोर आव्हान बनून आला. कुटुंबप्रमुखाच्या जाण्यानंतर स्वत: आणि कुटुंबाला सावरणे हे किती आव्हानात्मक आहे, हे त्रयस्थ व्यक्ती नाही समजू शकत. त्यातही तुम्ही महिला असाल तर अडचणी अधिकच असतात. एकट्या महिलेप्रती समाजाची बदलणारी वागणूक हादरवून साेडते.
‘माझी मुलं शिकवायची आहेत, त्यांनी पायावर उभा राहिलेलं मला पाहायचं आहे. नियतीनं संकट आणलंय, पण आता मुलांसाठी, वृद्ध सासू-सासऱ्यांसाठी आपल्याला उभा राहावंच लागणार आहे,’ असं मनाशीच ठरवत कांताबाई यांनी वाटचाल ठरवली. मोठा मुलगा केशव अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात होता. दुसरा मुलगा राहुल नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला, तर मुलगी पूजा ही पदवीचे शिक्षण घेत होती. वडिलांचे छत्र गमावल्यानंतर मुलांना आधार देण्यापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी कांताबाई या झटत राहिल्या. या काळात त्यांनी सहा एकर कोरडवाहू शेतीत झाेकून दिले.


दररोज ६० लिटर दुग्धोत्पादन
सुरुवातीला त्यांनी शेतीतील छोट्याछोट्या कामांत लक्ष घातलं. पाणी राहील की नाही, भरवसा नव्हता. त्यामुळे फक्त पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. अशा स्थितीत जुना दुग्धव्यवसाय वाढवायचं ठरवलं. या कामी धाकटा मुलगा राहुलची साथ लाभली. तो शेतीसह आईला दुग्धव्यवसाय वाढवण्यासाठी मदत करायचा. पूर्वी जमवलेली जमापुंजी वापरत पशुधन घेतलं अन‌् कणाकणाने हा व्यवसाय पुढे नेला. याच दरम्यान राहुलचे लग्न पार पाडले. पतीच्या पश्चात घरातील पहिले कार्यही कांताबाई यांनी नेटाने तडीस नेले. सन २०१६ च्या अखेरीस मोठा मुलगा केशव मेकॅनिकल अभियांत्रिकी उत्तीर्ण होत नोकरीस लागला अन‌् कांताबाईंच्या संघर्षाला फळ मिळाले. केशवचाही कुटुंबाच्या उन्नतीसाठी हातभार लागू लागला. याच काळात म्हशींची संख्या वाढवत १४ पर्यंत नेली. दररोज सरासरी ६० लिटर दुधाचे उत्पादन होते. राहुलमुळे हे कामही हलके होत होते. अनेकदा हे पशुधन सांभाळताना आव्हानं आली. पाणी, चारा नसणं अशा अडचणी नेहमीच्याच होत्या. जुळवाजुळव करावी लागायची. शिवाय शेतात कायम नगदी पीक घेण्यावर कांताबाई याचा भर असायचा. शेतीतील प्रत्येक काम स्वत: करत त्यांनी ही वाटचाल यशस्वी केली. मुलगी पूजाचं लग्नही कांताबाई यांनी पार पाडलं. एकूणच अनाहूत घटनेने रुळांवरून निसटलेली जीवनरूपी गाडी कांताबाईंनी संघर्ष, सचोटी, कष्ट अन‌् इच्छाशक्तीने पुन्हा रुळांवर आणली आहे, त्यांची ही वाटचाल अशा अनेक एकल महिलांना दिशा देण्यास सक्षम ठरतेय.

छावणीतही जित्राबांच्या पाठीशी!
सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अत्यंत तीव्र आहेत. पशुधन सांभाळणं कठीण बनलंय. अशा स्थितीत दुग्धव्यवसाय सांभाळणाऱ्या इंगोले कुटुंबीयांसमोर नवे आव्हान उभे ठाकले. कांताबाई व राहुल यांनी सर्व गुरं सध्या छावणीवर नेली आहेत. गुरांकडे लक्ष द्यायला, चारा, खुराक टाकायला, धारा काढायला मनुष्यबळही लागतं. स्वत: कांताबाई या दिवसा छावणीवर गुरांकडे लक्ष देतात. त्यांचा हा खंबीरपणा महिलांची ताकद दर्शवणारा असून वेळप्रसंगी महिला प्रत्येक आव्हान ताकदीने पेलू शकतात, हे सिद्ध करणारा आहे.

> लेखकाचा संपर्क : ९५६१९९९८८६

X
COMMENT