आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कुटुंबांमधील वैर उफाळले, शेतीच्या वादातून एकाचा खून, चार आरोपी अटकेत, एकाच शोध सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिम्बॉलिक इमेज - Divya Marathi
सिम्बॉलिक इमेज

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा येथील बसथांब्याजवळ शेतीच्या जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा येथे कुंडलिक तातेराव कुटे (५६) व सोपान सखाराम दराडे यांच्यात मागील काही वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता. या वादातून त्यांच्यात किरकोळ कुरबुरी होत होत्या. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून शेतीचा वाद पुन्हा उफाळून आला होता. गुरुवारी (ता.९) या दोन कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर वाद मिटला होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंडलिकराव कुटे हे बाहेर जाण्यासाठी बसथांब्यावर आले होते. यावेळी गावातील माधव सोपान दराडे, सोपान सखाराम दराडे, विठ्ठल गणेश दराडे, उद्धव सोपान दराडे, गणेश सोपान दराडे यांनी बसथांब्यावर येऊन कुटे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले गेले . त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनास्थळी आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक एस. व्ही. वाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्रदीप कुटे यांच्या तक्रारीवरून वरील पाच जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औंढा पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली असून अन्य एकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...