Home | International | Other Country | Anil Ambani got relax of 1044 core tax relax from France Government

अनिल अंबानी यांना फ्रान्सने दिली १०४४ कोटी करमाफी, राफेल करारावरून फ्रान्सच्या वृत्तपत्राचा दावा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 14, 2019, 09:33 AM IST

आधी फेटाळली होती करमाफी, नंतर झाली माफ

 • Anil Ambani got relax of 1044 core tax relax from France Government

  नवी दिल्ली - फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणात शनिवारी आणखी एक वाद समोर आला. राफेल करारानंतर भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांचा १०४४ कोटी रुपयांचा कर फ्रान्स सरकारने माफ केल्याचा दावा ली माँडे या वृत्तपत्राने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २०१५ मध्ये ३६ राफेल विमाने खरेदीच्या घोषणेनंतर काही महिन्यांनी ही करसवलत मिळाली आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स अटलांटिक फ्लॅग फ्रान्स ही दूरसंचार कंपनी फ्रान्समध्ये सूचीबद्ध आहे. या कंपनीचा ११०० कोटी रुपये कर थकीत होता. अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने ही सवलत कायद्यानुसार मिळाली असल्याचे म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, २००८ ते १२ या काळात ज्या वेळी या थकीत कराची चर्चा होत होती त्या वेळी कंपनी २० हजार कोटी तोट्यात होती. रिलायन्स फ्लॅग कंपनी फ्रान्समध्ये टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर व केबल नेटवर्कचे काम करते.

  काँग्रेसचा वार : मोदी दलालीचे काम करताहेत
  काँग्रेसने या वृत्तावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले आहे. पक्षाचे प्रसारमाध्यमप्रमुख रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आपले मित्र अनिल अंबानी यांच्यासाठी मोदी दलालीचे काम करत आहेत. ही मोदींची कृपा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकार जनतेचा पैसा महागड्या राफेल करारावर खर्च करत असून त्यातून त्यांचे उद्योजक मित्र अनिल अंबानी यांना ऑफसेट करार आणि कराची सवलत मिळेल, अशी टीका सीपीअायने केली आहे.


  खासगी कंपनीला मिळालेली सवलत राफेलशी जोडणे चुकीचे : संरक्षण मंत्रालय
  यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, खासगी कंपनीला मिळालेली सवलत राफेल कराराशी जोडणे चुकीचे आहे. हे संभ्रमित करणारे आहे. या प्रकरणाची दखल आम्ही घेतली आहे. रिलायन्स फ्लॅग फ्रान्समध्ये दूरसंचार इन्फ्रास्ट्रक्चर आणि केबल नेटवर्कचे काम करते.


  वार्ताहराने सांगितले : उत्तम करार झाला :

  ली माँडेचे भारतातील वार्ताहर ज्युलियन बोशो यांनी टि्वट केले : हा तर खूपच उत्तम करार झाला ना. त्यांनी म्हटले आहे की, भाषांतरातील चुका टाळण्यासाठी वृत्तपत्राने ही बातमी फक्त फ्रान्समध्येच प्रकाशित केली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की, आम्हा फ्रान्सवासीयांची इंग्रजी किती उत्तम असते ते, असेही बोशो यांनी म्हटले आहे.

  आधी फेटाळली होती करमाफी, नंतर झाली माफ

  अनिल यांच्या कंपनीवर २००७ ते २०१० या काळात ६० दशलक्ष युरोचा कर होता. ली माँडेच्या वृत्तानुसार, करमाफीसाठी कंपनीने फ्रान्समधील यंत्रणेला ७६ लाख युरोमध्ये हे प्रकरण निकालात काढण्याबाबत सांगितले होते, मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. कर प्राधिकरणाने २०१० ते २०१२ मधील अतिरिक्त ९१ दशलक्ष युरो कराचीही मागणी केली होती. एकूण कर १५१ दशलक्ष युरो (११०० कोटी रुपये) झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी एप्रिल २०१५ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा निर्णय घेतला. ली माँडेच्या मते, सहा महिन्यांच्या आतच फ्रान्सच्या कर प्राधिकरणाने रिलायन्स अटलांटिक फ्लॅग फ्रान्स कंपनीचा १०४४ कोटी रुपयांचा कर माफ केला आणि प्रकरण ५६ कोटींत निकाली निघाले.

  रिलायन्स म्हणते : काहीच गैर नाही, १० वर्षांपूर्वीचे प्रकरण

  या वृत्तावरून दैनिक भास्करने रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाने सांगितले की, फ्रान्सने कोणतेही गैर काम केलेले नाही. हे प्रकरण १० वर्षांपूर्वीचे आहे. यात गैर काहीच झालेले नाही.

Trending