आमदार अनिल गाेटे यांनी भाजपची आमदारकी साेडली; धुळ्यात भामरेंविराेधात निवडणूक लढवणार

प्रतिनिधी

Apr 09,2019 09:16:00 AM IST

धुळे - पक्षातील काही नेत्यांवर नाराज असलेले भाजपचे नेते अनिल गाेटे यांनी साेमवारी आपल्या आमदारकीचा व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सुपूर्द केला. आता धुळे लाेकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याविराेधात गाेटे उमेदवारी करणार आहेत.


अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीपासूनच पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात आपल्याच लाेकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र पॅनल उभे केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही आपण भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उभे राहणार आहाेत, असे त्यांनी सांगितले. रविवारी पत्रकार परिषदेतही त्यांनी लाेकसभेसाठी उमेदवारी करणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला हाेता. त्यामुळे गाेटे आता भाजपात थांबणार नाहीत, हे चित्र स्पष्ट झाले हाेते.

दरम्यान, रविवारी भूमिका स्पष्ट केल्यानंतर सोमवारी आमदार अनिल गोटे यांनी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आमदार पदाच्या राजीनाम्याचे पत्र दिले. या पत्राची प्रत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गाेटे लगेच धुळ्याकडे रवाना झाले.

X
COMMENT