आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का रे दुरावा, का रे अबोला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिल गोवीलकर
मुंबईच्या चाळीचे जीवन हा अभ्यासाचा आणि दीर्घ लेखनाचा विषय आहे. आता हळूहळू चाळ आणि चाळसंस्कृती लयाला जात आहे. कदाचित पुढील पिढीला फार काही कळणारच नाही.याच पार्श्वभूमीवर  ७० च्या दशकात "मुंबईचा जावई' हा  चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातलेच "का रे दुरावा, का रे अबोला' या गाण्याचा आस्वाद आपण या सदरात घेणार आहोत.


मुंबईच्या चाळीचे जीवन हा अभ्यासाचा आणि दीर्घ लेखनाचा (खरे तर पुस्तकाचा) विषय आहे. आता हळूहळू चाळ आणि चाळसंस्कृती लयाला जात आहे. कदाचित पुढील पिढीला फार काही कळणारच नाही. याच पार्श्वभूमीवर  ७० च्या दशकात "मुंबईचा जावई' हा  चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातलेच "का रे दुरावा, का रे अबोला' या गाण्याचा आस्वाद आपण या सदरात घेणार आहोत. 

गाण्याची पार्श्वभूमी ही तशी पारंपरिक आहे. दोन खोल्यांत राहणारे एकत्रित कुटुंब, त्यामुळे होणारी मानसिक कुचंबणा आणि नवपरिणीत दोन तरुण जोडपी तसेच एक वयस्कर जोडपे. अर्थात एकांत हा अभावानेच मिळणार. साधे कुजबुजणेदेखील दुसऱ्याला ऐकू जाण्याची शक्यता. त्यातून सांसारिक कटकटींनी वैतागलेला नवरा. त्यातच रात्र होते आणि एका जोडप्यातील पुरुष मान वळवून झोपेला लागलेला. अर्थात त्याची बायको थोडी धीट, प्रणयचतुर आणि मुख्य म्हणजे आपल्या नवऱ्याला पुरेपूर ओळखणारी. याच पार्श्वभूमीवर हे प्रणयी थाटाचे गाणे. अर्थात नेहमीप्रमाणे लडिवाळपणा, काहीसा धीटपणा - अर्थात त्या २ खोल्यांत सामावू शकलेला. माडगूळकरांना चित्रपटीय भाषा किती वश झाली होती, हे या गाण्याच्या शब्दांकनातून जाणवते. एखाद्या जोडप्याच्या गद्य संवादी भाषेलाच माडगूळकरांनी पद्यरूप दिले आहे. पहिलीच ओळ - "का रे दुरावा, का रे अबोला" या काहीशा प्रश्नार्थक ओळीतूनच सुरुवात केली आहे. अर्थात इथे एक ध्यानात ठेवायला हवे, प्रणय झाला तरी मागील शतकातील मध्याच्या काळातील काहीसा मुग्ध, संयत असाच होता. अर्थात त्या वेळचे मुंबईचे आणि मुख्य म्हणजे चाळीतील वातावरण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ती मानसिक वृत्ती नेमकेपणाने जाणून माडगूळकरांनी शब्दरचना केली आहे. एका बाजूने हवाहवासा वाटणारा शृंगार परंतु जागेची अडचण असल्याने काहीसा कोंडमारा झालेला. "अपराध माझा असा काय झाला' या पुढील ओळीतून पहिल्या ओळीतील प्रश्नार्थक पृच्छा अधिक गडद केलेली. चित्रपटात गाणी लिहिताना शैली ही अधिकाधिक चित्रमय असावी, जेणेकरून पडद्यावरील पात्रांचे विशेष ठळकपणे उठून यावेत. माडगूळकरांची शैली कशी अधिक धीट होते आणि आरक्त शृंगार व्यक्त करते हे बघण्यासाठी - गाण्याच्या शेवटच्या ओळी बघाव्यात. 

"रात जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे' :  आपला प्रियकर आता थोडा मोकळा झाला आहे. काहीसा मिश्किलदेखील झाला आहे, हे जाणवून ती नायिका आपली भावना अशा धीटपणे व्यक्त करते. परंतु त्या धीटपणातही कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही. संगीतकार सुधीर फडक्यांनी शब्दकळेची जातकुळी ओळखून चाल बांधली आहे. राग यमन तर या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा इतक्या विपुल प्रमाणात या संगीतकाराने चाली निर्माण केल्या आहेत. सुधीर फडक्यांच्या स्वररचनेत नेहमी आघाती तालवाद्यांचा बराच वापर असतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे. परंतु या गाण्याच्या बाबतीत तालवाद्य म्हणून तबला वापरताना, एकूणच अतिशय धीमा स्वर ठेवलेला आहे. एक तर गाण्याचा समय रात्रीचा आहे आणि एकांतासाठी आसुसलेला आहे आणि हेच लक्षात ठेवून संगीतकाराने आपली रचना बांधली आहे. गाण्याच्या सुरुवातीच्या सतारीच्या सुरांतून रागाचे आणि चालीचे सूचना होते. स्वररचनेचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर ध्यानात येईल की एव्हाना या संगीतकाराची शैली प्रस्थापित झाली आहे आणि दोन अंतऱ्यांमधील वाद्यमेळ तसेच चालीचे गायन करताना, ठराविक टप्पे सहजपणे लक्षात येतात. अर्थात जर का तुमची कारकीर्द जितकी मोठी तशी शैलीचे साचे तयार होणे क्रमप्राप्तच होत असतात. गायिका आशा भोसले यांची मराठीतील कारकीर्द खऱ्या अर्थाने सुधीर फडक्यांकडे खुलली. अर्थात आशाबाई नेहमीच ते श्रेय मनमोकळेपणी या संगीतकाराला देतात. सुधीर फडक्यांची स्वररचना ही नेहमीच शब्दानुकूल असते. कवितेतील कुठल्या शब्दावर जोर दिला म्हणजे त्यातील आशय अभिवृद्धी होते, हे सुधीर फडके नेहमीच पारखून घेतात आणि त्याचा परिणाम गायनावर होतो. गाण्याची पहिलीच ओळ म्हणायला "दुरावा" आणि "अबोला' शब्दांचे उच्चार ऐकण्यासारखे आहेत. काहीशी वंचना आहे पण लटका राग आहे, याची अचूक जाणीव आहे आणि हे सगळे आशाबाई आपल्या गायनातून दर्शवतात. आणखी एक उदाहरण बघायचे झाल्यास, दुसऱ्या अंतऱ्यातील "जवळी जरा ये हळू बोल काही' ही ओळ गाताना स्वर थोडा हलका ठेवला आहे. जोडपी प्रणयी कूजन थाटाचा स्वरांश असल्याने अशी गायकी खुलून दिसते. ही गायकी शब्दभोगी गायकी आहे. या सगळ्याचा परिणाम एक अतिशय सुंदर, संयत प्रणयाचे गाणे आपल्याला ऐकायला मिळणे. 

का रे दुरावा, का रे अबोला 
अपराध माझा असा काय झाला 
नीज येत नाही मला एकटीला 
कुणी ना विचारी, धरी हनुवटीला 
मान वळविसी तू, वेगळ्या दिशेला 
तुझ्यावाचुनी ही रात जात नाही 
जवळी जरा ये हळू बोल काही 
हात चांदण्याचा घेई उशाला 
रात जागवावी असे आज वाटे 
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे 
नको जागणे हे नको स्वप्नमाला 

संपर्क - ९८१९९३१३७२

बातम्या आणखी आहेत...