आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या इच्छेनुसार चालणारी शाळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्या शाळेत मुलांना पुर्ण स्वातंत्र्य आहे, ती शाळा मुलांच्या इच्छेनुसार चालते आणि मुख्य म्हणजे या शाळेत मुलांच्या चुकांचा सन्मान केला जातो...राज्य शासनाच्या राज्य पाठ्पुस्तक अभ्यासक्रमावर आधारित आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पाला भेट दिलेल्या एका शिक्षकाचा हा अनुभव...

 

त्यागाचं नाटक करता येत नाही आणि कुठलंही नाटक फार काळ टिकत नाही,’ वाबळेवाडीतल्या वारे सरांचं वाक्य काळजात घर करून गेलंय. परवा वारेंची वाबळेवाडी पाहिली आणि लक्षात आलं की वाडीच्या आधी आंतरराष्ट्रीय शब्द कसा लागला.....!!!


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी ते जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी  या प्रवासाची सुरुवात वारे-खैरे ही जोडी २०१२ मध्ये ३२ पोरांना घेऊन करतात आणि आज २०१९ मध्ये वाडी ६०० च्या वर पोरांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे..!  शाळेची गुणवत्ता ,अध्यापन पद्धती याहीपेक्षाही खरी उत्सुकता हे जाणून घेण्यात होती की वाबळेवाडीचा हा डोलारा नेमका उभा कसा राहिला? असं कोणतं मॅजिक,अशी कोणती जादू वारे गुरुजींकडे आहे की ज्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ एका आवाजावर शाळेसाठी तन-मन-धन अर्पण करतो? 
प्रत्येक पालक शाळेत आपापल्या परीने योगदान देतो. मग ते पैशाच्या रूपात असेल किंवा वेळेच्या किंवा मेहनतीच्या. कसं साध्य केलं वारेंनी हे? विचारांती एकच उत्तर मिळतं ते म्हणजे त्यांची शाळेप्रती असलेली त्याग आणि समर्पण वृत्ती. ज्यातून त्यांनी मिळवला लोकांचा विश्वास आणि पाठबळ. म्हणूनच ८२ वर्षांचे अण्णा शाळेला लेकरू समजून आपला संपूर्ण वेळ शाळेत घालवतात. इथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपला अध्यक्षपणा राजकारणासाठी नव्हे, तर शाळेच्या विकासासाठी वापरतात.


शिक्षण हे भविष्याचा वेध घेणारे असावे, म्हणूनच वाबळेवाडीचा वेदांत कायम लॅबमध्ये बसून काही तरी इन्व्हेंट करू पाहतो, जे भविष्यात सर्वांना फायदेशीर ठरेल. आणि शाळेतील अशा अनेक वेदांतला मार्गदर्शन करण्यासाठी आपणही या समाजाचं काही तरी देणं लागतो हा विचार मानणारा अनुप यादव हा आयआयटी इंजिनिअर लाखो रुपयांचे पॅकेज सोडून या वाडीतील मुलांचे इंटरनॅशनल स्वप्न पूर्ण करू पाहतोय! या इंटरनॅशनल स्वप्नांमध्ये असतो ड्रोन कॅमेरा,रोबोटिक्स,3D प्रिंटर आणि इलेक्ट्रिक कार.ज्या भविष्यातील मोठ्या संधी आहेत.
मुलांनी खिडकीतून बाहेर बघू नये म्हणून वर्गाच्या असलेल्या खिडक्या बंद करायला लावणाऱ्या गुरुजींच्या उलट वारे गुरुजींनी बिनभिंतींचे वर्ग बांधून अख्ख्या पर्यावरणाला साद घालण्याची मोकळीक लेकरांना दिलीय.
मुलांनी शाळेनुसार नव्हे, तर शाळेने मुलांच्या इच्छेनुसार वागायचं आहे.... हा मूलभूत विचार शाळा पाळते, म्हणून शाळा सुटल्यानंतरही मुले शाळेतच रेंगाळतात. कुणी लॅबमध्ये बसून music compose करतं, तर कुणी EVM हॅक केलं जाऊ शकतं का या विचारात अकलेच्या तारा जोडत बसतो. मुलांना शाळेत पूर्ण स्वातंत्र्य आहे. मुलांच्या चुकांचा इथे सन्मान केला जातो. वाबळेवाडीचा प्रत्येक मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगला आपलं करिअर म्हणून पाहत नाही कारण त्यातील अनेकांना  बनायचे आहे शास्त्रज्ञ, संगीतकार, खेळाडू, संशोधक.


ज्ञानरचनावाद हा वाबळेवाडी शाळेचा पाया आहे. प्रत्येक मूल स्वतःच शिकतं. हा विचार शाळेला मान्य आहे. या खडतर प्रवासात तुम्हाला काही अडचण आली नाही का....? या प्रश्नाचं उत्तर देताना वारे गुरुजी सांगतात “तुमची नियत जर साफ असेल आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तर आलेल्या अडचणींमधूनही तुम्ही ठरवलेलं मोठं काम उभं राहतं.’


पेरलं तर उगवतं. या विचाराच्या पुढे जाऊन वारे विचार सांगतात की हे विश्व त्याच्यावर काहीच उधार ठेवत नाही. त्याला दिलेल्या गोष्टीची ते भरभरून परत फेड करतं. हे सांगताना वारे गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.


वारे गुरुजी मुले घडवत आहेत,असे सगळे म्हणत असताना गुरुजी मात्र प्रत्येक मुलाकडून मी काही न काही शिकतोय व घडतोय, असं अगदी स्पष्टपणे सांगतात. गुरुजींच्या या वेगळेपणामुळे आज इंग्रजी शाळेत वारेमाप पैसे खर्च करणारे लखपती, करोडपती पालक आपल्या पोरांना आज वारे गुरुजींकडे सोपवत आहेत. शिक्षक, ग्रामस्थ आणि पालक एकत्र आल्यावर कोणत्या उंचीचं काम उभं राहू शकतं याचं वास्तव उदाहरण म्हणजे वाबळेवाडीची शाळा....

बातम्या आणखी आहेत...