आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Animal Welfare Department's Plan Will Be Not Beneficiaries

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पशू संवर्धन विभागाची योजना लाभार्थींसाठी ठरणार मृगजळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- जिल्ह्यातील दूध उत्पादनाला चालना मिळावी आणि शेतीला जोडधंदा या विकासाभिमूख उद्देशाने शासनाने २०११मध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यासाठी गाई, म्हशी व शेळी तसेच कुक्कुट पालनासाठी २८९ जनावरे वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या योजनेसाठी डिसेंबर अखेर जिल्ह्यातील तब्बल २६ हजार ५९३ लाभार्थींनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. उपरोक्त अर्जांची संख्या व जनावरे वाटपाचे उद्दिष्ट पाहता ही योजना हजारो लाभार्थ्यांसाठी मृगजळ ठरणार आहे. शेतीला जोडधंदा व बेरोजगार युवकांच्या हाताला काम तसेच जिल्ह्याची दुधाची क्षमता वाढवण्यासाठी शासन स्तरावर या योजनेचे उद्दिष्ट वाढवण्याची नितांत गरज आहे. 

मागील काही वर्षापासून शेतीमध्ये वाढलेला यांत्रिकीकरणाचा वापर, चारा, जनावरांचे संगोपन, दुष्काळी परिस्थिती यासह इतर कारणामुळे पशू पालनाकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे. परिणामी जिल्ह्यातील जनावरांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट येत आहे. नाइलाजास्तव जिल्ह्याला पर जिल्ह्यातील दूधावर आपली गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुध उत्पादनास चालना देण्यासाठी तसेच शेतीला जोडधंदा व दुधाचा व्यवसाय करण्यासाठी शासनाने पशू संवर्धनाची नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

 

या योजनेचा लाभ सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती लाभार्थी, महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना देण्यात येत आहे. परंतु या योजनेचे निकष न पाहता अनेक लाभार्थींनी या योजनेसाठी ऑन लाइन अर्ज दाखल केले. त्यामुळे डिसेंबरअखेर तब्बल २६ हजार ५९३ अर्ज प्राप्त झाले. या योजनेंतर्गत दोन, चार व सहा असे जनावरांचे गट तर दहा शेळ्या व एक बोकडासह कुक्कुट पालनाचा गट लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सर्व साधारण लाभार्थीस पन्नास टक्के तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. परंतु या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थीस ५० टक्के, अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना २५ टक्के रक्कम उभारावी लागणार आहे. या योजनेत तीस टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. परंतु दिलेले उद्दिष्ट व लाभार्थींची संख्या पाहता हजारो लाभार्थीसाठी ही योजना मृगजळ ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 

 

जनावरांच्या सहा गटांसाठी मिळणारे अनुदान 
जनावरांच्या सहा गटांसाठी ४० हजारप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये, गोठा ३० हजार, चारा कटाई यंत्र २५ हजार, विमा १५ हजार असे एकूण ३ लाख ३५ हजार रुपये अनुदान देय आहे. चार जनावरांच्या गटासाठी १ लाख ६० हजार व विमा १० असे एकूण १ लाख ७० हजार रुपये अनुदान तर दोन जनावरांच्या गटासाठी ८० हजार रुपये व विमा पाच हजार असे एकूण ८५ हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.

 

दूध उत्पादनाला चालना 
जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी २०११-१२ पासून शासनाने नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. शेतीला जोड धंदा म्हणून गाई, म्हशी, शेळी वाटप व कुक्कुट पालनासाठी गटनिहाय जनावरांचे वाटप केले जाणार आहे. पी.जी. बोरकर, उपायुक्त, पशू संवर्धन विभाग,बुलडाणा. 

 

अर्जांमध्ये १ हजार १७७ दिव्यांगांचाही समावेश 
नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील २६ हजार ५९३ नागरिकांनी अर्ज केले असून, यामध्ये १९ हजार ९६३ पुरुष अर्जदार,तर ६ हजार ६१८ महिला अर्जदारांचा समावेश आहे. दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांची संख्या ८ हजार ४१७ तर १ हजार १७७ दिव्यांगांचा समावेश आहे.